' चौकट '

चौकट

अंधश्रद्धा हा मानवी समाजाला मिळालेला शाप आहे. अजूनही

अंधश्रद्धेचा पगडा आपल्या समाजातून पूर्णपणे गेलेला नाही.

बुवाबाजी, भोंदू साधू, महाराज यांच्याकडून फसवल्या गेलेल्या 

लोकांच्या वार्ता कानावर येत असतात. यावरून तथाकथित 

प्रगत समाज अंधश्रद्धेच्या निबिड अरण्यातच चाचपडत आहे.

शकुन अपशकुन यावर विश्वास ठेवणारी मंडळी आपल्या 

सभोवताल दिसतात.

रस्त्याने जाताना मांजर आडवे गेले तर चुकचुकणारी मंडळी

आजही पाहायला मिळतात. रात्रीला कुत्रा बेसूर ओरडत असेल

तर काहीतरी अघटीत घडणार असे शब्द आजही कानावर येतात.

एखाद्या घरी दुधाचे पातेले  मांजरीने पाडले असेल आणि..

जीवाच्या भयाने ती पळत सुटली असेल. त्या मांजरीला थोडेच 

माहित आहे की तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडले आहात.

कुत्र्याच्या पोटात वगैरे दुखत असेल आणि त्यामुळे तो

जीवाच्या आकांताने ओरडत असेल. अशा प्रकारे अपशकुन,

अंधश्रद्धा यांच्या चौकटीतचं आपण अडकून आहोत.

समजा असा अपशकुन झालाच तर हा केवळ 'कावळा बसायला

आणि फांदी मोडायला 'असंही असू शकतं.

लग्न जुळल्यानंतर ते लागतपर्यंत अनेक धार्मिक विधी केले जातात.

मग घटस्फोटाचे प्रमाण का वाढलेले आहे. मानव चंद्रावर जाऊन 

आला तिथे त्याने नैसर्गिक विधी सुद्धा पार पाडले असतील.

पण आजही चतुर्थीला ढगाळलेल्या आकाशामुळे चंद्र दिसला नाही

तर पाटावर चंद्राची प्रतिमा काढून त्याची पूजा केली जाते.

श्रद्धा म्हणून काही गोष्टी ठीक आहेत पण त्याचा अतिरेक नको.

कुठे कुठे तर देवाला नैवेद्य दाखवेपर्यंत लहान मुलांना सुद्धा

जेवायला दिले जात नाही. वास्तविक लहान मुलं म्हणजे प्रत्यक्ष

देवाची रूपं ना. घरातल्या म्हाताऱ्या माणसांना सुद्धा लवकर

भूक लागते अशावेळी देवासाठी थोडे वेगळे काढून ठेवा आणि

मुलांना, म्हाताऱ्या माणसांना जेवू घाला. तोच खरा नैवेद्य.

 नवीन जीव जन्माला आला तर त्या घरी सात दिवस विर्दी

पाळली जाते म्हणजे भाऊबंदकीतील लोक सात दिवस

देवाची पूजा करत नाही .मंदिरात जात नाही. त्यामागे

शास्त्रीय कारण वेगळेच आहे. पण त्याचा अर्थ वेगळाच घेतला 

जातो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिढ्यानपिढ्या हे चालूच

आहे.मृत्यू झाल्यास सुतक पाळतात.मृत्यू झालेली व्यक्ती

आजारी असते .काही व्याधी असतात अशावेळी इतर लोकांना...

त्याचा जंतू संसर्ग होऊ नये ही त्यामागील भावना.

अशावेळी त्या व्यक्तीचे नातलग दुसऱ्या शहरात राहत असतील,

ते काही कारणामुळे येऊ शकले नसतील तर ते सुद्धा घरी

सुतक पाळतात. देवाची पूजा करत नाहीत मंदिरात जात नाहीत.

काय म्हणावे याला. याही पलीकडे जाऊन तर मी एक गोष्ट

स्वतः पाहिली आहे.माझ्या एका नातलगाच्या अन्त्यविधीसाठी..

जाता आले नाही म्हणून नंतर दोन तीन दिवसांनी भेटीसाठी 

गेलो.तर तिथे अगदी नवीन लग्न झालेल्या सुनांपासून तर

वयस्क स्त्रियांपर्यंत कुणीही कपाळाला कुंकू वा टिकली..

लावलेल्या दिसत नव्हत्या. मनात एकदम धस्स झालं.

न राहवून मी विचारलंच काय झालं? कोरोना मध्ये तर....

अरेरे वाईटच... तेव्हा एका स्त्री ने बाजूला नेऊन सांगितले

अहो आमच्याकडे अशीच प्रथा आहे त्या मृत व्यक्तीच्या तेरवीपर्यंत

येथे स्त्रियांपैकी कोणीही कुंकू लावत नाहीत. केस विंचरत..

नाहीत. बापरे किती भयानक. आणि हे सर्व असंच परंपरेने

चालतच राहणार का? मनात नाना तऱ्हेचे प्रश्न येऊन गेले.

जादूटोणा,करणी हा आणखी एक भयानक प्रकार. अज्ञानी

समजल्या जाणाऱ्या समाजापासून तर काही वेळा सुशिक्षित

म्हणवल्या जाणाऱ्या लोकांच्या तोंडूनही हे शब्द आपण ऐकतो.

अशा रीतीने कुप्रथा परंपरा, शकुन अपशकुन, अंधश्रद्धा

या चौकटीतून बाहेर पडणं समाजाच्या प्रगतीच्या दृष्टीने

खूप आवश्यक आहे.