लालबागच्या राजासाठी केलेला प्रवास

गणपती पाहायला गेल्यावर लाईन पाहून माघारी फिरलेलो आम्ही...

लग्नानंतर मुंबईला राहायला गेले;घर छोटं आणि माणसं जास्त...आणि अजूनही सासरे व त्यांचे दोन भाऊ एकत्र राहत असल्याने आमची एकत्र कुटुंबपद्धती अजूनही  आहे.मग काय गावच्या घरी गणपती असल्याने मुंबईला गणपती नव्हता.पण माझ्या माहेरी गौरी-गणपती होता आणि आम्ही खूप धमाल करायचो.पण लग्नानंतर गणपतीची मजाच अनुभवता येत नव्हती.मुंबईतले गणपती पाहायला लोक कुठून कुठून गर्दी करतात,पाच पाच दिवस लाईनमध्ये उभा राहतात पण माझी मुलगी लहान असल्याने मी कधीच हट्ट धरला नाही,की मला गणपती बघायला जायचंय.लग्नाला चार वर्षे झाली,तितक्याशा मैत्रीणीही झाल्या होत्या आणि मुलगीही मोठी झाली होती.
मग गेल्या वर्षी आम्ही मैत्रीणींनी ठरवलं की,गणपती बघायला जायचं आणि तोही लालबागचा राजा......तरी माझे मिस्टर सांगत होते की,तुम्ही लालबागचा राजा बघायला चाललाय खरे पण तिथे खूप लाईन असते.तुम्ही चालून चालून थकाल पण दर्शनाची लाईनसुद्धा समजणार नाही.पण ऐकेल ती मी कसली.....आमचं प्लॅनिंग झालेले आम्ही मोडणार नाही.लालबागच्या राजाला जाणारच.......सगळी कामं आवरून नटून थटून आम्ही लालबागला पोहोचलो.आम्ही टॅक्सीने जिथे उतरलो तिथूनच लाईन दिसली,असं वाटलं चला बाबा,निदान दोन तीन तासांत दर्शन होईल.लाईनला थांबणार एवढ्यात एका पोलिसाला विचारले लाईन किती लांब आहे.त्यांनी सांगितले, इथे उभा राहिला तर उद्या दुपारपर्यंत दर्शन होईल.बापरे....मग आम्ही मुखदर्शन घ्यायचं ठरवलं;पण कशाच काय??मुखदर्शनाची लाईन शोधली तिही तेवढीच लांब...मग ठरवलं चला,गणपती लांबून दिसतोय का ते पाहाव.पण किती वेळ शोधत होतो तरीही लाईनच संपेना.मग काय कंटाळलो,तिथेच संध्याकाळ झाली.मग तिथलेच आजूबाजूचे गणपती पाहिले आणि दर्शन घेतलं.मस्तपैकी सगळ्याजणी उसाचा रस पिलो,पाणीपुरी फस्त केली.आणि निघालो परत माघारी घरी.....
घरी येताना लोकल तुडुंब भरलेली;पाय ठेवायला जागा नाही,तसेच २ तास उभा राहून घरी आलो.घरी आल्यावर पाहिलं, समोरच मिस्टर बसलेले...दारात पाय टाकताच,कसं झालं दर्शन;पाहिलास का लालबागचा राजा..!!!आणि मी मात्र रागातच नाक फुगवून बेडरूममध्ये गेले.फ्रेश होऊन येताच माझ्यासमोर मस्त उकळलेला गरमागरम चहा माझ्या हातात...मी वरती पाहिलं तर ते होते माझे मिस्टर...नंतर आमची स्टोरी सगळ्यांना सांगितली.त्यात लोकलचा पहिल्यांदाच आलेला अनुभव....तेव्हा मनात विचार आला.माझे मिस्टर रोज तीन ट्रेन बदलून २ तास प्रवास करून कामाला कसे जात असतील.असा आमचा गणपती पाहण्यासाठी झालेला मोठा प्रवास...

##अक्षया राऊत
प्रिय वाचकहो लेख आवडल्यास लाईक करून फॉलो करायला विसरू नका.