जे नकोय ते नाही म्हणणे लाईफ स्किल आहे...

स्पष्ट नकार देता यायला हवा.. की

१. जे नकोय त्याला सरळ नाही म्हणणं हे सुद्धा एक life skill आहे.

अनुष्का ऑफिकला दांडी मारून अनिकेतसोबत टेकडीवर फिरायला आली होती. बराच वेळ अनिकेतच्या कुशीत शिरून त्याचा हात घट्ट पकडून त्याच्या हृदयाचे ठोके ऐकत होती ती. अनिकेत तिची अवस्था चांगलीच समजू शकत होता कारण त्याची ही अवस्था तशीच झाली होती. अनिकेत शिप वर जाणार होता दोनच दिवसांनी तो ही सहा महिन्यांसाठी. त्यामुळे सहा महिने अनुष्का आणि आदिती शिवाय रहाणे त्यालाही तितकेच जड जाणार होते. त्यामुळेच उरलेल्या दोन दिवसांचा सगळा वेळ तुझाच असेल असे अनुष्काला दिलेले प्रॉमिस तो तंतोतंत पाळत होता. आदिती पण बिचारी आपला लाडका बाबा जाणार यामुळे खूप उदास झाली होती. शाळेत जायला नको म्हणत होती पण अनिकेतने आल्यावर फिरायला नेईन असे सांगितल्यामुळे ती जायला तयार झाली होती. पण अनुष्का मात्र खूपच अस्वस्थ होती इतकी की, ती अनिकेत लाम्हणते नको ना जाऊ तू अनिकेत, आपण इथेच राहू सगळे एकत्र. तसंही माझा जॉब आहेच, तुला दुसरी नोकरी लागेपर्यंत मी संभाळेन सगळं घर. इतके दूर जाऊन नोकरी करायची काय गरज आहे तेंव्हा अनिकेत म्हणतो, उलट तू इथे काम करतेस ते मला आवडत नाही अनु. खरतर जगातली सगळी सुख मला तुला आणि आदूला द्यायची आहेत म्हणूनच तर तुमच्यापासून लांब राहून मी नोकरी करतो. कारण तिथे पगार चांगला आहे तसे काम मला इथे मिळणार नाही आणि हे काय मी पहिल्यांदा जात आहे का शिपवर ?? या आधी ही गेलोच ना. पण सुरुवातीला थोडा त्रास होतो दोघानाही पण नंतर होते सवय. तू जर अशी रडत राहिलीस, उदास राहिलीस तर माज पण लक्ष लागत नाही तिकडे माहिती ना तुला ?? 

त्याच्या समजवण्याने अनुष्का जरा सावरते आणि दोघेही घराकडे निघतात. तेवढ्यात अनुष्काचा फोन वाजतो, ती बघते तर तिच्या सरांचा फोन असतो, अनुष्का तोंड बारीक करून फोन ठेवते. काय झालं अनु ?? अनिकेत विचारतो तशी ती म्हणते, अर्जंट काम आले आहे त्यामुळे थोड्या वेळासाठी ऑफिसमध्ये जावं लागेल सरांनी बोलावलं आहे. ठीक आहे हरकत नाही मी तुला ऑफिसमध्ये सोडतो आणि आदितीला फिरायला घेऊन जातो. तू तुझ आवरून झालं की सांग मी घ्यायला येतो तुला. अनुष्का ऑफिसमध्ये जाते, तर तिचे सर फाईल आणि प्रेझेंटेशन पेन ड्राईव्ह सापडत नसल्यामुळे तिच्यावर ओरडतात. तिचे सर खरतर अनिकेतच्याच वयाचे होते. अनिकेत ची आणि सरांची चांगली ओळख असल्यामुळे त्यांना अनुष्काची सगळी परिस्थिती माहीत होती. ते तिला म्हणतात, मिसेस अनुष्का, तुमचे मिस्टर आले की तुम्हाला काय होत तुमचं तुम्हालाच माहीत तुमचं कामात लक्षच नसतं. कुठे आहे फाईल आणि पेन ड्राईव्ह ?? मी कधीचा शोधत आहे आणि तुमच्या टेबलवर पण नाही. सॉरी मी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात बोलायला नको पण आता अनिकेत जाणार असेल ना पुन्हा शिपवर म्हणून हा गोंधळ होत आहे ना तुमच्याकडून ?? पण तो काय पहिल्यांदा जात आहे का?? सवय करून घ्या मिसेस अनुष्का. सरांच्या या बोलण्यावर काय बोलावे हेच तिला समजत नाही, बिचारी कशी बशी टेबलवर जाऊन कॉम्प्युटर सुरू करते आणि प्रेझेंटेशन शोधून देते आणि फाईल पण देते. तिने सुटी घेतल्यामुळे लगेच घरी येते.

 बघता बघता अनिकेतच्या जाण्याची वेळ येते. त्याची फ्लाईट संध्याकाळची असल्यामुळे ती त्याला सोडून घरी येते आणि मनसोक्त रडून घेते. जगासाठी जरी हे जाण येणं नेहमीच आणि सबईच असले तरीही तिला मात्र अनिकेतचे जाणे खूप त्रास देऊन जात होते नेहमीच. 

दुसऱ्या दिवशी स्वतःला जरा सावरून ती आदितीला शाळेत सोडते आणि स्वतःही वेळेत ऑफिसमध्ये पोहचते. लंच टाईम होतो, सगळे जेवायला जातात पण अनुष्का मात्र न जेवता अनिकेतचे फोटो बघत बसलेली असते. डोळ्यात पाणी आणि मनात त्याची आठवण यामुळे ती पुन्हा उदास होते. तेवढ्यात तिचे सर तिला केबिनमधून बघतात आणि आत बोलावून घेतात. मिसेस अनुष्का मला कल्पना आहे तुमच्या दुःखाची. मी समजून घेऊ शकतो तुम्हाला काय वाटत असेल ते पण तुम्ही असेच न खाता पिता अनिकेतच्या विचारत हरवून बसलात तर मग तुमच्या मुलीला कोण सांभाळणार ?? तुम्ही स्वतःला सावरायला हवे नाही का ?? सर तिला समजावत तिच्या खांद्यावर हात ठेवतात तसे अनुष्काला खूप भरून येते आणि ती भावनेच्या भरात सरांच्या कुशीत शिरून रडून घेते. सर ही तिच्या अंगावरुन हात फिरवत तिला समजावतात, थोड्याच वेळात अनुष्का भानावर येते आणि सॉरी म्हणत केबिनमधून बाहेर पडते. 

घरी आल्यावर, तिचेच मन तिला खात होते. असे अचानक आपण सरांच्या कुशीत शिरून कसे रडलो याचीच तिला लाज वाटते.दुसऱ्या दिवशी पण सरांची ती मनापासून माफी मागते. असेच काही दिवस निघून जातात, आता अनुष्का बऱ्याच प्रमाणात सावरली होती आणि नेहमीप्रमाणे ती अनिकेतसोबत फोनवर हसून खेळून बोलत असल्यामुळे तिकडे अनिकेत पण छान काम करत होता. सगळे व्यवस्थित सुरू होते. आजही अनुष्का आदितीला शाळेत सोडून ऑफिसमध्ये आली होती, आज ऑफिसमध्ये आल्यावर लगेच तिने स्वतःला कामात गुंतून टाकले होते. नेहमीप्रमाणे लंच टाईम झाला आणि अनुष्का तिच्या मैत्रिणीसोबत जेवायला गेली. जेवण होऊनही वेळ शिल्लक असल्यामुळे सगळ्याजणी गप्पा मारत होत्या तेवढ्यात अनुष्काला सरांनी फोन करून बोलावून घेतले म्हणून ती केबिनमध्ये आली तेंव्हा सर म्हणाले, मिसेस अनुष्का मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणले आहे आय होप तुम्हाला आवडेल असे म्हणून एक बॉक्स त्यांनी अनुष्का समोर धरला, तेंव्हा त्यांची नजर अनुष्काला जरा विचित्र वाटली त्यामुळे ती म्हणाली, सर आज माझा वाढदिवस नाही किंवा असा कोणताच प्रसंग नाही ज्यामुळे तुम्ही मला गिफ्ट द्यावं. तसंही कोणाकडून कारण नसताना काही घेणं मला आवडत नाही त्यामुळे मला नको. पण सर काही केल्या ऐकायला तयार होत नाहीत आणि तिच्या हातात बळेच गिफ्ट ठेवत म्हणतात, इथून पुढे कधीही तुला एकट वाटलं, उदास वाटलं तर आधार द्यायला मी नेहमीच तुझ्यासाठी उपलब्ध असेन, असे म्हणून हळूच तिचा हात दाबतात. आता मात्र अनुष्काच्या डोक्यात लक्ख प्रकाश पडतो आणि ती हात बाजूला घेऊन म्हणते, मला त्या दिवशी अनिकेतच्या जाण्याने उदास वाटले आणि भावनेच्या भरात मी तुम्हाला मिठी मारून तुमचा आधार घेतला सर. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला मी उपलब्ध असल्याप्रमाणे मला बघाल आणि मी ते सहन करीन. तुम्हाला वाटलं म्हणून काहीही देऊन माझ्या परिस्थितीचा फायदा घ्याल. पण असे होणार नाही, मला तुमचे गिफ्ट, आधार आणि तुमची सहानुभुती नकोच आहे. तुमचे गिफ्ट तुमच्याकडेच राहुदे म्हणून ती टेबलवर ठेवून तिथून निघून जाते.