लक्ष्यप्राप्तीचा दैवी उपाय- भाग २

This part is in continuation with earlier series.

सादर कथा काल्पनिक असून एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी सबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा...

फोटो सौजन्य- गुगल
  
                                     ---------
तिची अवस्था पाहून विपुलला वाईट वाटलं.. नकळतपणे त्याच्या डोळयातून अश्रू ओघळले होते.. तिला घरी परतताना पाहून, तो घाईतच माघारी फिरला.. कार वेगाने पळवत त्याने घराबाहेर पार्क केली.. फ्रिजमधून फळे बाहेर काढून त्याने त्यांची स्मूदी बनवली आणि तो मानसीची वाट पाहत बसला..

                                    ---------

अचानकपणे सुरू झालेल्या व्यायामाने मानसीची पार लया गेली होती.. स्वतःच अवजड शरीर सांभाळत कशीबशी ती घरी परतली होती.. विपुलच्या हसऱ्या अभिवादनाचा कृत्रिम हसून स्वीकार करत ती थेट बाथरूममध्ये शिरली.. संपुर्ण अंगावर थंड शॉवरचा शिडकावा होताच तिला काहीसं हलकं वाटलं.. पुढच्याच क्षणी संध्याकाळच्या नृत्य साधनेची आठवण येताच तिच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहीला..

'देवा, कसली परीक्षा घेतोस रे एवढी?? साडी न दिल्याची एवढी मोठी शिक्षा?? ठीक आहे.. जशी तुझी मर्जी..पण मी पण एक स्त्री आहे.. माझे प्राण गेले तरी बेहत्तर परंतु माझ्या कुटुंबाच्या दिशेने येणाऱ्या प्रत्येक संकटाला आधी माझ्याशी मुकाबला करावा लागेल.. मला काही झालं तरी माझ्या नवऱ्यावर, माझ्या लेकीवर मी कोणतंच गडांतर येऊ देणार नाही..'- मानसीच्या मनाचा  निर्धार झाला तशी सर्व आवरून ती पटकन बाहेर आली..

'घ्या राणीसाहेब, तुमच्यासाठी शेफ विपुल यांची खास पेशकश..'- विपुलने स्मूदीचा ग्लास मानसीसमोर पुढे केला..

'अहो, एवढं कशाला त्रास करून घेताय?? मला किमान पंचेचाळीस दिवस साधना करायची आहे; आठवतोय ना बाबांचा आदेश?? रोज असे लाड करणार आहात का?? घ्या.. अर्धी तुम्हीसुद्धा प्या..'- बोलता बोलता मानसीने थोडीशी स्मूदी दुसऱ्या ग्लासात ओतत; ग्लास विपुलसमोर केला..

मानसीच्या चेहऱ्यावर थकवा साफ दिसत होता.. न राहवून विपुलने आज ऑफिसला उशिरा जाण्याचं ठरवलं.. असंही त्याच्या ऑफिसमध्ये फ्लेक्सिबल वेळापत्रक असल्याने लेटमार्कचा प्रश्न नव्हता..

नेहमी विपुलने जरा घरकाम करायला घेतलं की त्याला तस न करण्यास बजावणारी मानसी आज त्याला घरकामात मदत करून देत होती.. बऱ्यापैकी काम आवरल्यानंतर; विपुल ऑफिसला निघून गेला होता..

'आज माझ्या चुकीमुळे यांना थांबावं लागलं.. पुढील किमान पंचेचाळीस दिवस तरी यांचे असे हाल होतीलच.. हाय रे देवा.. स्वतःच्या नवऱ्याला कामाला लावलं मी..'- मानसीतली पतिव्रता जागी झाली तशी ती स्वतःला बोल लावू लागली..

'पण.. पण संकट तर घरावर येणार आहे.. माझ्या एकटीवर थोडं..ते पण या घराचे घटक आहेत म्हटल्यावर त्यांनी थोडं काम केलं तर कुठे बिघडलं?? एरव्ही मी कुठे त्यांना काही काम करू देते??'- मानसीचे मनाशीच द्वंद्व सुरू होतं..

थोड्याच वेळात मुग्धा उठली तशी मानसी तिच आवरण्यात जुंपली.. तिच सारं आटपून ; तिला शाळेत सोडून येईपर्यंत मानसीच्या शरीरातील उरलीसुरली सारी ऊर्जा संपली होती..  

घरी येताच तिने स्वतःला बेडवर झोकून दिले आणि तत्क्षणी तिला गाढ झोप लागली.. काही वेळाने तिला जाग आली तिच मुळात मोबाईलच्या रिंगने..

'हॅलो, मानसी? अग ठीक आहेस ना ग? मुग्धाला आणायला गेली नाहीस?? शाळेतून फोन आला होता.. अर्धा तास झाला अग? तु व्यवस्थित आहेस ना की मी जाऊ??'- पलिकडून विपुल काळजीने बोलत होता..

मानसीने घड्याळाकडे पाहिलं आणि ती उडालीच.. संध्याकाळचे सहा वाजले होते..

'अरे देवा.. माझी सोनूली.. आधीच तिला भूक सहन होत नाही.. देवा किती पातक माथी मारशील रे..'- मानसीच्या डोळयातून घळाघळा पाणी वाहू लागलं होतं..

'अहो, ऐका ना? आज प्लीज तुम्ही तिला घेऊन याल का?? मी तिच्यासाठी काहीतरी खायला करते.. भुकेली असेल माझी पोर..'- मानसीने रडवलेली झाली होती. 

'अग, तु एवढा ताण नको करून घेऊस... मी जातो तिला आणायला..'- विपुलला आता बायकोची काळजी वाटू लागली.. आपण उगाचच तिच्यावर ओझं लादलं नाही ना? काही क्षण तो तसाच डोक्याला हात लावून बसला पण पुढच्याच मिनिटाला त्याला लेकीची आठवण आली आणि तो तडक तिच्या शाळेकडे निघाला..

                                    ----

मानसीने सर्वांसाठी नाश्त्यासाठी शिरा केला आणि ती बाप-लेकीची वाट पाहत बसली.. मधल्या वेळेत तिने आपल्या नृत्य साधनेसाठी देवघरातील जागा रिकामी करून घेतली होती..

'आई... मलाआआ खूप भूक लागली आहे.. लवकर खायला दे..'- लेकीने अपेक्षेप्रमाणे दरवाज्यातूनच आरोळी ठोकली तसं मानसीच्या थकल्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं..

'येस माय डॉल.. माझ्या बेटीच्या आवडीचा शिरा रेडी आहे..'- मानसीने पुढे होत तिला उचलून घेत तिचा गालगुच्छा घेतला..

'ये... लव्ह यु आई...'- मुग्धाने पटकन मानसीच्या गालाचा मुका घेतला..

सवयीप्रमाणे सारे जण हातपाय धुवून; खेळीमेळीने नाश्ता करण्यासाठी एकत्र बसले.. मुग्धा आणि विपुल तर अधाश्यासारखे शिऱ्यावर तुटून पडले.. मानसीनेही आपल्या प्लेट मधील शिरा तोंडाजवळ नेला आणि तिचा हात जागीच थबकला.. तिला बाबांचं म्हणणं आठवलं आणि नाईलाजाने तिने आपल्या पुढ्यातली प्लेट बाजूला सारली.. बाजूला बसलेल्या विपुलला झाला प्रकार लक्षात आला आणि तो ही खायचं थांबला..

'मनी, थांब मी तुझ्यासाठी पटकन ज्युस बनवतो..'- विपुल उठत म्हणाला..

'अहो, नको.. वेळ बघा.. सात वाजायला अवघे दहा मिनिटे आहेत.. मी करेन मॅनेज.. आज थोडी हळूहळू साधना करेन..'- स्वतःला कसंबसं सावरत मानसी आत किचनमध्ये हात धुवायला गेली..


विपुलने मुग्धाला शिरा भरवून स्वतःच्या प्लेट मधला शिरा ही तिला दिला.. मानसीवर त्याच जीवापाड प्रेम होतं त्यामुळेच ती उपाशी असताना आपण पोटभर खाण त्याला पटत नव्हतं..

सातच्या ठोक्याला मानसीच्या नृत्यसाधनेला सुरुवात झाली होती.. काही काळ तिच्या आभूषणाची लयबद्ध किणकिण ऐकू येत होती.. तिच्या साधनेत व्यत्यय नको म्हणून विपुलने लेकीला महत्प्रयासाने रोखून धरलं होते..

पुढे काही क्षण गेले आणि अचानक आतून धपकन पडल्याचा आवाज आला.. आवाज ऐकताच विपुल देवघरात धावला.. आत मानसी चक्कर येऊन पडली होती.. तिला तस पडलेलं पाहून मुग्धा तर रडू लागली होती.. विपुलने मात्र शांतपणे आतून थंड पाणी आणत तिच्या चेहऱ्यावर शिंपडले.. पाण्याचे थेंब पडताच मानसीने डोळे उघडले.. विपुलने तिला कंबरेत हात घालून कसंबसं बसवलं.. तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत; त्याने तिच्या घामाने   भिजलेल्या कपाळाच हलकं चुंबन घेत तिला शांत करण्याचा प्रयत्न केला..

'अहो, माझी अजून अर्धा तास साधना बाकी आहे.. काय करू मी??'- मानसीचा चेहरा रडवलेला झाला..

'आज तु जास्त थकली आहेस ना ग?? आणि दिवसभरात काही खाल्लंही नाहीस.. आज राहू दे.. जितकं केलं तितकं पुरे.. चल मी तुमच्यासाठी काहीतरी करतो.. '- विपुल तिला आश्वस्त करत उठला तोच त्याला मुग्धाने त्याला अडवलं..

'आई तुला काय झालं?? तु बरी आहे ना??'- मुग्धाच्या डोळ्यातील पाणी काही थांबत नव्हतं..

'बेटा, तिने आज सकाळपासून काही खाल्लं नाही पण व्यायाम जास्त केला ना, म्हणून तिला चक्कर आली... ती आता छान आहे..'- विपुलने लेकीला कसंबसं  समजवलं..

'मग मघाशी शिरा का नाही खाल्ला तिने??'- समोरून निरागस प्रश्न आला..

'ते बाळ, आईला एका आजोबांनी गोड खाण्यास मनाई केली आहे.. आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आई हे सगळं करतेय..'- विपुल..

'मग.. मग.. आपण पण कोणीच गोड खायचं नाही.. मी पण नाही खाणार.. तु पण नाही खायचं.. आपण आईला कंपनी द्यायची..'- लहान वयात मुग्धाच्या तोंडून असले प्रगल्भ विचार ऐकून दोघा नवरा बायकोना भरून आलं होतं.. मानसीने तर तिला आपल्याकडे ओढून घेत तिचे पटापट मुके घेतले..

'यू.. आई तुला वास मारतो...'- मुग्धा तोंड वाकडं करत म्हणाली तसा संपुर्ण घरात एकच हशा पिकला..

                                          ----

दुसऱ्या दिवशी मानसी मंदिरात जाण्यासाठी रेडी होतच होती की तिला विपुल पुर्ण ट्रक आणि शूज घालून रेडी असलेला दिसला..

'राणीसरकार, आज पासून आम्ही पण तुमच्या सोबत व्रत चालू करणार बरे..'- विपुलने नाटकी हावभावात म्हटलं..

'अहो, एकदा चक्कर आली म्हणून काय सारखी सारखी मी पडणार आहे.. आणि मला येऊन घरी आराम तरी मिळेल, तुमचं ऑफिस आहे; तेवढं लक्षात असू द्या.. नाहीतर तिथे झोपा काढत बसाल..'- मानसीने इतकं सांगून पण विपुलने तिचा हात धरत तिला घराबाहेर आणलं..

'आपल्या घरावरच संकट टळो वा न टळो; पण तुझा जुना आत्मविश्वास तुला नव्याने गवसायला हवा.. बस..माझी तेवढीच इच्छा आहे..'- विपुलने स्वगत म्हटलं..

क्रमशः

© मयुरेश तांबे

🎭 Series Post

View all