Login

एक वळण असेही( थरारक सत्यकथा)

ही एक सत्यकथा आहे, अंत्यसंस्काराला जातांना झालेला अपघात, त्यातून सगळे कसे वाचतात त्यावर सत्यकथा


राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा
विषय:- काळ आला होता पण.....
शीर्षक:- एक वळण असेही ( थरारक सत्यकथा)

_________________________________________________
       

             आत्याची प्रकृती ठीक नव्हती. वार्धक्यामुळे तिची स्थिती हालावतच चालली होती.अंदाजे  पासस्ट वर्षाचे तिचे वय असावे. मामाजी कॄषी संचालय विभागात  चांगल्या पदावर होते. काय झाले कुणास ठाऊक  मोठ्या मोठ्या  बाता करायचे.  मी खुप मोठा ऑफीसर आहे आणि  मला मोठ्या पदावर कार्यभार पाहायचा आहे. ऑफिस मध्ये  जाऊन खुप बडबड करायचे आणि  वरिष्ठांच्या खुर्चीवर जाऊन बसायचे. मोठेपणाचा तोरा बाळगायचे. त्यांची ती वागणूक  पाहुन त्यांना नोकरीहुन कमी केले होते. आणि  शेरात लिहले होते." ही इज  अ मेन्टली डिस्टर्ब. प्लीज रेफर टू सायकॉलॉजिस्ट." 
           त्यांना चार मुलंच, सगळ्यात मोठा पंचवीस वर्षाचा. बाकी तीन मुले ,तीन-तीन वर्षांच्या फरकाने  लहान  होते.

           मामाजींना मदतीचा हात त्यावेळेस फक्त  बाबांनी दिला. बाबासुध्दा शासकीय सेवेत असल्यामुळे व इकडे कुटुंबाकडेही  लक्ष्य द्यावे लागत असल्याने त्यांना मामाजींना मदत करणे खुप कठीण पडते होते. ही सगळी  कसरत करुन ते मामाजींना दर आठवड्यातुन एकदा नागपुरच्या मेंटल हाॅस्पीटल मध्ये तपासणीसाठी   नेत होते, ते फक्त  आपल्या  बहिणीला मदत व्हावी  म्हणून व मामाजी या धक्क्यातून सावरावे. हि एकच त्यांची इच्छा  होती.
         तसेही बाबा लहानपणापासून म्हणजे बारा वर्षांचे असतांना पासुनच आपल्या कुटुंबाला वडिलांसोबत हातभार लावण्याचे कार्य करित होते.हातात आलेले कोणतेही काम करण्यासाठी ते तत्पर असायचे. पंचवीस वर्षाचे झाले  तेव्हा त्यांना सेन्ट्रल जेल प्रेस, नागपूर मध्ये नोकरी लागली होती.
          
        कुटुंबात बाबा हेच  चांगल्या नोकरीवर असल्याने व त्यांच्या मनात कुटुंबाप्रती  जास्तच प्रेम वाहत असल्यामुळे  तिन बहिण्यांचे शिक्षण , लग्न आणि  अजुन दोन भावांच्या शिक्षणाची धुरा बाबांवरच होती. म्हणुन बहीणीही आमचा
भाऊ आमचा भाऊ म्हणुन वडिलाइतका मान बाबांना देत असे.
           आता मामाजी कोणत्याही  बाहाण्याने नेहमी नागपुरला यायचे आणि  बाबा ड्युटीवर व आम्ही भावंडे शाळेत  गेल्यावर घरी येऊन आपले बस्तान  मांडुन बडबड गीत चालु करुन आईला त्रास देत असत . गडचिरोली जिल्ह्य़ात झाडीपट्टीत आरमोरी या गावी  त्याचे राहणे असल्यामुळे  भातावर जरा जास्तच ताव मारायचे व त्यांचा आहारही मोठा होता.
        घरातील कामधंदे सोडुन नुसती त्यांचीच खातीरदारी  करण्यात  आई कंटाळून  गेली होती. पण कधीही तिने बाबांच्या  कडक स्वभावामुळे  त्यांच्याजवळ तक्रार  केली नाही.
         बाबाही त्यांना दवाखान्यात नेऊन नेऊन खुप त्रासले होते. पण मामाजी बरे व्हावे व पुर्वरत आपल्या नोकरीवर रुजू व्हावे. यासाठी सगळी  त्यांची पायपीट  चालू  होती.
      एक दिवस  वैर्याचा आला आणि आरमोरीहुन आमच्या  कडे खबर आली की, मामाजी मरण पावले..!
     झाले जे व्हायचे तेच झाले. बातमी ऐकुन सर्वाना अतिशय  दु:ख झाले होते . आत्यावर व तिच्या  मुलांवर तर खुप मोठा आघातच झाला होता. पण मुलांनी आधीच मामाजी हयात असतांनी \" गजानन स्वीट मार्ट\" हे ब्रेड, बिस्किट आणि  अंड्याचे दुकान लावले होते. त्यामुळे  उदरनिर्वाह करण्यासाठी  त्यांना  तेवढा त्रास सहन करावा  न लागला नाही.
         
       मामाजी जायला खुप  वर्ष लोटले होते. चारही भाऊ मोठे झाले होते. त्यांची सर्वाची लग्न  होऊन सर्व आपल्या संसारात लागली होती. आणि  सांगायचे विशेष  म्हणजे  सर्वानी एवढी मेहनत केली होती कि, त्यांचे सर्वाचे वैयक्तीक एक एक दुकान झाले होते. पैश्याची  भरभराट  आली होती. त्यांची मुलेही मोठी झाली होती.
           एक दिवस अचानक  आतेभाऊचा फोन आला कि,  \"आत्याची तब्येत खूप खराब आहे.\"तिने अन्नपाणी  सोडले आहे. मी चमच्याने तिला फक्त पाणी आणि  ज्यूस  पाजत आहे.
        आत्येभाऊ म्हणाला, " आई, मामाची खुप आठवण करत आहे. सतत फक्त  मामाचेच नाव घेते." तिचा जीव भावामध्ये अडकलेला होता. कारणही तसेच होते. माझे बाबा गेले कित्येक वर्ष बहिणीकडे गेले नव्हते.  कारण तेही खुप  म्हातारे झाले  होते व कुठेही परगावी  जायला त्यांचा नाहिचाच पाढा असायचा.
       मी आत्येभाऊचा आलेला काॅल बाबाजवळ देत म्हणालो,\" आत्याची तब्येत जरा जास्तच  आहे. तुम्ही  आणि काका भेटुन  या तिला.\" मग दुसर्‍या दिवशी बाबा आत्येभाऊशी बोलले , \"मी आणि  लहान  मामा एकदोन दिवसात येतो गावाला आईला सांग...!\"
      आत्येभाऊ  आता काकुळतेने गयावया करत होता. "मामा तुम्ही  लवकर निघा आई तुमची खुप आठवण करत आहे.  "
     मी आईलाही म्हटले काका व्यस्त आहेत. तर तुम्ही  दोघेजण जा आणि  आत्याला भेटुन  या.  पण रागिष्ट बाबांसमोर  तिचेही काही  चालत नव्हते. 

आईने बाबांना  चालण्याचे म्हटले तर , बाबा आईवरच ओरडले...तुझे कोणते काम म्हणुन. ....!
       आत्या खूप जीव लावत होती माहेरकडल्या लोकांवर.  महिन्यादोन महिन्यानी तिची एकटीचीच नागपुरला आमच्या कडे फेरी असायची आवर्जुन राहायची ती सर्वाकडे, काही  दिवस. सर्वाची ती विचारपूस  करायची आवडीने...! तिचा जीव गुंतला होता आमच्यात खास करुन बाबा आणि  काकांमध्ये...!तिच्या  पडत्या वेळेस बाबांनी खूप मदत केली होती. तिचे लग्नही बाबानेच केले होते. सासरेच असे वयस्क व्यक्ती तिच्यावर प्रेम  करणारे कुणी नव्हते आणि  आता शेवटी मुलेही तिच्याकडे जास्त  लक्ष   देत नव्हते .म्हणूनच  ती माहेरच्या  लोकांमध्ये  जीव ओतत होती.  तिचा खूप लळा होता आमच्याबद्दल.
       बाबाने आत्येभाऊचे बोलणे ऐकल्यावर त्याला आपले नितीवचन सांगितले, "  की , तु आईला समजव आम्ही  दोघे भाऊ  ( काका आणि बाबा) उद्या  किंवा  परवा येतोच . प्रकृतीचा नियमच आहे. जो जन्म  घेतो त्याला एक दिवस हे जग सोडुन  जावेच लागते.  तु मोठा मुलगा  आहेस तिला धिर दे. शेवटी आम्ही  आलो नाही तर तुलाच सांभाळावे लागेल. तु काळजी करु नको , आम्ही  येतोच..!"असे बोलत त्याला धिर देत बाबांनी फोन ठेवला.
        बाबांची दोरी काका पर्यंत येऊन थांबली  होती. काकांना काही अत्यंत  आवश्यक  मिटींग होती म्हणून  ते दिरंगाई करत होते. "पण आपली बहिण  काकुळतेने मरणाच्या  दारात असंताना तिच्या  भेटीला जाण्यापेक्षा दुसरे महत्वाचे  काम नाही " .  हे मात्र  दोघेही भाऊ विसरले होते. बहिणी प्रती त्यांचे मन कठोर झाले होते....... नियतीलाही तेच मंजुर असावे. "  ज्या दिवशी आत्येभावाचा  मला सकाळी  फोन आला होता त्याच दिवशी  मी माझ्या ड्युटीवर असतांना दुपारी चार वाजता.! माझ्या फोनवर त्याचा फोन आला की, "आई गेली...!" तो गंभीरपणे भरलेल्या स्वराने बोलू लागला. ..!
    झाले  आत्या आता या जगात नव्हती.  शेवटच्या  क्षणी ती भाऊ ...भाऊ करत राहिली.... तिचा जीव अडकून राहिला ...पण भावाची भेट घेण्याआधीच तिचा आत्मा... शरिराला सोडुन निघुन  गेला... तडफत राहिला तो भावाची माया शोधत...!
      मग मी, इकडे तिकडे  फोन लावले.. ज्या नातेवाईकांना  सांगायचे होते. त्यांना सांगितले.  माझ्या  मनातही तिच्या बद्दल ची हळहळ होतीच.
       मी माझ्या बहिणीलाही आत्या गेल्याचे कळवले होते .मग रात्री मी, घरी गेल्यावर  कोण-कोण आत्याच्या अंत्यविधी साठी जाणार याची विचारपूस  करु लागलो.    बाबा म्हणाले की," कुणी नका या फक्त मी, काकांसोबत जातो."
माझी आई आणि  मी विचार  करु लागलो," बाकी आपण नाही  गेलो तर लोक  काय म्हणतील.? "
मी तिच्या  प्रश्नाशी सहमत होतो. 

मी आईला म्हटले  ,"आपण दोघे बस नी जाऊ."
आई म्हणे ,"ठिक आहे." तितक्यात माझी बहिण घरी आली. जिचे सासर पंधरा- विस मिनिटांच्या अंतरावर होते. ती पण यायला जिद्द  करत होती. तशी तिच्या सासु-सासर्यांनी व नवर्‍याने  परवानगी दिली होती. 
       काका-काकु आणि  माझी  लहान  आत्या सकाळच्या बसने त्वरित  निघुन  गेले.
मी , आईबाबा व माझी बहिण  असे चारजण बसने जाऊ असे ठरले. 
       माझी पत्नी नेहमीप्रमाणे माझ्या  मागे कूरकूर  करायला लागली...
" तुम्ही कशाला जाता ?आईबाबा  चालले ना..!"
मोठ्या माणसाचेच काम असते..  "
घरचे सगळे  जातात काय...?
आणि  दुर पण जायचे आहे. 
काही अधिक  प्रमाणात  तिचे पण बरोबर होते.
" मी तिला दुजोरा देत म्हणालो," माझी आत्या  आहे आणि  बाबा म्हातारे आहे त्यांच्या  तबियतीची काळजी घ्यावी  लागेल... त्यांनी बरेच दिवस झाले  प्रवास  केला नाही. " मी तिला अजुन  चिडवत म्हटले,  तु चलते काय....? तु आली तर बरे होईल. आपण "फोर व्हिलर "ने जाऊ..(माझ्या  पत्नीची वॅगेनार गाडी होती )
    ती म्हणाली ,"तुम्ही  अवश्य  जा, बसनी !..
मी काही येणार नाही. 
आणि  माझी गाडी  देत पण नाही. "

   आत्याचे गाव हे साधारणत: बसने चार तासांच्या  अंतरावर  होते.  मी.....एक शब्द  माझ्या  पत्नीला विचारले,".. बाबा व आई म्हातारे असल्याने त्यांच्या सोयीसाठी म्हणजेच लवकरही जागेवर पोहचता  येईल व सुरक्षितही जाता येईल. या   आशेने वॅगेनार गाडी साठी विचारले. पण ती अजुन रागाने संतापली व म्हणाली नसती उठाठेव करू नका. तुम्हाला  जायचे असेल तर बसनीच सुरक्षित जा. अंत्यविधीला घाईगडबडीने जाता येत नाही.  अशी ती समजावणी वजा आपला पक्ष घेऊन  बोलली. हे सर्व संभाषण ज्या दिवशी आत्या मरण पावली. त्याच रात्रीचे होते...!
        का कुणास ठाऊक. ....! नियती काय दस्तक देत होती देव जाणे. ......दुसरा दिवस उजाडला.  सकाळचे सहा वाजले होते. तो जानेवारी महिना होता. हवेत थोडी थंडी होतीच. तरी मी बसने जाण्याच्या दृष्टीने  बस मिळावी म्हणून  लवकर तयारी केली. व आईबाबांनाही तयारी करायला लावली. तिकडून  माझी बहिण पण घरी पोहचली होती.
      मी तयारी करुन  आपल्याच हाताने चहा करुन घेतला होता . ती व माझी मुलगी छान सकाळच्या निद्रेत मग्न असतांना .... तिला हाताने थोडे हालवत मी येतो म्हणून  सांगितले.
" ती म्हणाली ठिक आहे, व्यवस्थित  जा, स्वतःची काळजी घ्या . "
असे म्हणुन पुन्हा  झोपी गेली.
थोड्या वेळाने  मी पहिल्या मजल्यावरून खाली तळमजल्यावर आलो. खाली आई आणि  बहिणीची तयारी झाली होती.  मी आई आणि बहीण माझ्या  बाबांची वाट पाहत बाहेर गेट जवळ चर्चा  करत उभे होतो.
        अंत्यविधीची वेळ सकाळी दहा वाजेपर्यंतची दिलेली होती. बस मिळेल  काय आपण पोहचु काय..?असे अनेक  प्रश्न  करित आम्ही  बाबांना आवाज  देत त्यांची वाट पहात बाहेर  उभे होतो.
         इतक्यात माझ्या  पत्नीनीने बाहेर बालकनीत उभी राहुन खाली पाहिले तर , तिला एकदम आश्चर्य  वाटले...!
" आश्चर्याने तिने विचारले, " अरे..!तुम्ही  अजुन पर्यत गेले नाही  का...?"
"कधी निघणार  तुम्हाला  उशीर  होईल ना."  हा विचार  तिने मांडत समोरचा शब्द  असा काढला की, आम्ही  तिघेही जण आश्चर्याने चकित झालो व एकमेकां कडे पाहु लागलो. आश्चर्य  करण्याचे कारणही तसेच होते. 

      काल रात्री पर्यंत जी नाही म्हणत होती. कालपर्यंतच काय आज मी उठलो तेव्हा ही ती फोर व्हिलरने जाण्याचे नाहीच म्हणत होती. जी नाहीचा पाढा  म्हणत होती,  ती स्वता: कोणी काही  म्हटले नाही  तरी आम्हाला फोर व्हिलरने घेऊन  जाण्यास तयार झाली होती.
        तुम्हाला  प्रश्न  पडला असेल, एक स्त्री  असुन  एवढ्या दुर कशी काय गाडी  चालवेल.?. तुमचे अगदी बरोबर आहे.
       ती प्रवाहाच्या  विरुध्द  होती. ती एका चांगल्या  पदावर सेवेत होती. तिने स्वच्या बळावर वेगनार गाडी घेतली होती आपल्या  जिद्दीने आणि ती एकदम चांगल्या चालवणाऱ्या पुरुषालाही गाडी चालवण्यामध्ये मागे टाकेल . असे तिचे  ड्रायव्हिग होते. आम्ही  फार खुश झालो. आता आम्ही  गाडीने लवकर पोहचु या आनंदात मी पुन्हा  ती येणार  या खुशीत वर घरी  गेली.
तेव्हा  माझ्या  मुलीने मला खुप  रागविले ती म्हणाली, " कशाला तुम्ही  माझ्या  मम्मीला एवढ्या दुर ड्रायव्हिंग  करायला लावता.?"
माझ्या  मम्मीला नेऊ नका. तुम्ही  एकटेच जा...!
आणि   ती पंधरा वर्षांची माझी मुलगी मला रागवत होती.
      कदाचित नियती..! पुढे जाण्यास  नकार देत असेल......आम्हाला गाडीमध्ये  नको जा म्हणुन  म्हणत असेल . कारण काल पर्यत जी येण्यास तयार नव्हती,  ती अचानक कशी काय तयार झाली ? पुढे  काहीतरी अघटित  असे घडायचे असेल. ...पण मुलीला...... नियतीची हाक ऐकायला आली होती. ...म्हणुनच ती झोपेतून उठुन. ...माझ्या  आईला कशाला  नेता म्हणून. .बोलु लागली व रस्त्यात आडवी झाली...!पण  समोर काहीतरी अघटित असे घडायचे होते. म्हणूनच  मी आणि  माझी  पत्नी  तिचे मन व  भाषा समजु नाही शकलो.
       सगळे  गाडीत बसले व आम्ही  आरमोरीच्या दिशेने फोर व्हिलरने निघालो. गाडी माझी पत्नी  चालवत होती. मी तिच्या  बाजुलाच म्हणजे ड्रायव्हिंग सिटच्या बाजुलाच बसलो होतो. मागच्या  सिटवर माझे बाबा आई व माझी बहिण  बसली होती. एका ठिकाणी  आम्ही  नागपुर शहराच्या  बाहेर  गेल्यावर गाडीत हवा व पेट्रोल  भरुन  घेतले. गाडी एक ते दीड  तासात मस्त  छान  कमी स्पिड मध्ये  कुणालाही धक्का  लागणार नाही   अशा  पध्दतीने  सकाळच्या  मोकळ्या  रस्त्यावर  चालत होती.
      जिथे स्पिड घ्यायची तिथे स्पिड घेऊन  व जिथे हळु करायचा वेग तिथे हळु करुन  गाडी  चालु लागली.
       या आधीही आईबाबांना तिच्या गाडी चालविण्याचा अनुभव आला होता. ती व्यवस्थित  गाडी  चालविते, हे सगळ्यांनाच माहीत  होते.
          मध्ये  एकदा चार मैत्रीणींसोबत दोन दिवसाच्या आऊटिंगला  ती स्वता:ची हिच गाडी नेली होती, हे मला माहीत  होते म्हणून  मीही तिला  चांगलाच आग्रह गाडी चालविण्यासाठी  केला होता.
      आता जास्त  अंतर उरले नव्हते  , आम्ही आत्याकडे पोहचणारच होतो... सकाळचे पाऊणेदहा वाजले होते...    एक हलकेसे वळण आले होते...
तेच वळण आमच्या  पाचही जणांसाठी  खुप धोक्याचे ठरले.! आमची गाडी वळण घेतांनी कशी डांबरी रस्त्याच्या खाली उतरली देव जाणे,  मी आवाज दिला पत्नीला ...... गाडी रस्त्याच्या  कडेने उतरली ...सांभाळ...!
        असे म्हणताच...ती भांबावली...!
व्यवस्थित  गाडी  चालवणारी.... तिला काय करावे सुचेना... तिने गियर कमी केला... आणि मनाचा ब्रेक घेत ती कंट्रोल  करणार... इतक्यातच  गाडी  प्रचंड  वेगाने फिरुन... कितीतरी  दुर अंतरावर  गाडी एका बाजुने घासत गेली... आणि  एका ठिकाणी रस्त्याच्या  कडेला ...झुडूपाजवळ गाडी पुर्णपणे वेगाने फिरुन पलटली होती.
       थोड्या वेळेपर्यंत आम्ही जिवंत आहो, की या जगातून निघुन गेलो.हे आमच्या  पाच पैकी सर्वानाच वाटत होते. कारण जशी गाडी गोल फिरली. तसे डोळ्यासमोर सर्वाच्याच एक प्रकारचा काळाकुट्ट अंधार झाला होता. श्वास आमचे क्षणापुरते बंद झाल्यासारखे वाटत होते...!डोळे तर उघडतच नव्हते.   आम्हाला सर्वानाच दिसेनासे झाले होते.   माझे बाबा सर्वात खाली गाडीमध्येच एका भागात  व त्यांच्या  अंगावर  आम्ही  सर्वच जण एकमेकांवर चेपल्या गेलो होतो. आमचे हातपाय, डोके कुठे आहे , आणि शाबुतही आहे का ..? हेही कळत  नव्हते .
        बाबा खुप  ओरडत होते,"मी मेलो !मी दबलो....!" सगळ्यांचा श्वास थोड्या वेळासाठी थांबला  होता. काय करावे सुचत नव्हते ?
गाडीचा दरवाजा लाॅक झाला होता... डोक॔ सुन्न झाल होतं. डोळ्यासमोर काहीच दिसत  नव्हतं  ... आणि  गाडीचा दरवाजा कुठे आहे.  आपण कुठे  आहो ....हे सुद्धा  कळत नव्हते.
       दिशा दिसत नव्हती,  कुठे आहो हेही कळत नव्हते.  मला माझ्या  पत्नीचा जोरजोरात आवाज आला.  ती भांबावली, मोकळा श्वास घेत होती...पण अशा परिस्थितीतही तिने सगळ्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न  केला.मोहन..!मोहन..! मोहन....असा जोराचा आवाज देऊन माझ्या हात पकडुन उठ उठ केले व स्वत:एका खिडकीच्या काचेतून बाहेर निघुन. ....हेल्प....हेल्प....हेल्प .....करुन  ओरडु लागली.. गाडी रोडाच्याच बाजुला एक झुडूप होतं.. तिथे जाऊन चालकाच्या दिशेने  पालटली होती... देवच आडवा होता. समोर दरी होती. अजुन थोडा वेग असता तर आम्ही त्या खोल दरीत ...पडलो असतो..आम्ही  प्रत्यक्ष डोळ्यासमोर मृत्यू पाहिला होता.
       मी फुटलेल्या काचा दुर करुन खिडकीतून बाहेर निघालो. रस्त्यावरचे लोक ...कमीतकमी वीस ते पंचवीस तरुण मुले , माणसे आमच्या  गाडीच्या  दिशेने  धावत आले. ...आम्ही एकेक  करुन खिडकीतून बाहेर निघालो. सगळे एकमेकांना भितीने चाचपडु लागलो.   आई व ताई माझी खुप घाबरली होती. मी सगळ्यांशी बाहेर  निघाल्यावर विचारपूस  केली कुणाला कुठे वेदना, रक्त वगैरे  लागले काय..?
माझ्या  बहिणीच्या  मानेला थोडा झटका लागला होता... आई च्या छातीला थोडे लागले होते. ती छाती दुखते म्हणुन  सतत  सांगत होती. बाबा एकदम खाली होते. त्यांनाही आम्ही लवकरच लोकांच्या  मदतीने बाहेर काढले. सर्वानी आम्ही एका ठिकाणी निवांत बसून आधी पाणी प्यालो. आम्ही आधी मोकळा श्वास घेतला गाडीच्या  बाहेर निघुन  कुठे जास्त  प्रमाणात इजा तर झाली नाही.  आणि शरीराच्या अवयवांना कुठे इजा तर झाली नाही ना.?   हे बघत होतो.बाबांच्या डोळ्यांच्या वर थोडी जखम व छातीला हलकेसे लागले होते. लोकांचा गोंधळ चालुच होता. "खुप मोठ्या धोक्यातुन आम्ही वाचलो होतो. "  देवच आडवा आला होता, आमचे पुण्य आडवे आले होते. जे एवढ्या मोठ्या धोक्यातुन  आम्ही पाचही जण सुखरुप वाचलो होतो. सगळे  आश्चर्य  करित होते. कारण गाडीची हालत पाहता कुणी वाचेल याची श्वाश्वती वाटत नव्हती.  गाडी चालकाच्या भागानी संपूर्ण चेपली होती. गाडीच्या डाव्या-उजव्या बाजुच्या  व पुढची व मागची पण काच पूर्णपणे फुटली होती. चकनाचुर झाली होती. गाडीचा टाॅप चेपला होता. एखाद्याने वरुन क्रेनने दाब दिला असे वाटत होते.
       लोकांनी रस्तावरच्या लोकांना थांबविले आम्हाला भिवापूरच्या ग्रामीण रुग्णालयात चेकअप साठी पाठवले. लोकांचीही ऐन वेळेवर देवासारखी मदत झाली.  मी आणि पत्नी गाडीजवळ थांबलो.लोक म्हणाले गाडी सरळ करायची आहे काय...?आम्ही  म्हटले हो...!आम्ही  भयभीत झालो होतो काही सुचेना.  लोकांनी रस्ताच्या कडेलाच अगदी देवासारखी उभी असलेली क्रेन आणली गाडी सरळ करण्यात  आली. आणि  तशीच क्रेनने उचलुन बाजुच्या शेतात ठेवण्यात  आली. मग आम्ही ही एका गाडीने , लोकांनी हात दाखवलेल्या गाडीत बसुन रुग्णालयात गेलो. तिथे प्रायमरी ट्रीटमेंट घेतली . आणि  मग इकडे तिकडे फोन करु लागलो .
      मी आत्येभाऊ व माझ्या  काकांना झालेला प्रकार  सांगितला व आम्ही ग्रामीण रुग्णालयात  ट्रिटमेंट  घेत आहो. आता आम्ही आत्याच्या अंत्यविधीला येऊ शकत नाही. तुम्ही  सर्व विधी पार पाडून घ्या हे सांगितले.  तेही आश्चर्य करु लागले.व तुम्ही  सर्व बरोबर आहेत ना याचा शाहानिशा करु लागले.
        लोकं म्हणत होती. या वळणावर नेहमीच  अपघात होत असतात . आताच २६ जानेवारीला एका पी. एस. आय. चा झेंडावदन आटोपून येता-येता अपघात  झाला.  मी माझ्या  एका वनअधिकारी मित्राला हा वाक्या सांगितला....जो भिवापुर वनक्षेत्र विभागात कार्यरत होता. तो म्हणे तिथला जमिनीचा भाग बरोबर समांतर नाही तिथे भाग थोडा खड्डयासारखा आहे. तिथे नेहमीच अपघात होतात. तिथे जजमेंट कळत नाही. 
         आम्ही  इकडे तिकडे फोन केले. मग  माझे दोन मेहुणे ताबडतोब इकडे यायला निघाले.  मोठ्या मेहुण्याचा मेहुणा भिवापूरलाच राहत होता. तोही मदतीला आला.

       का कुणास  ठाऊक  असे वाटत होते की, आत्याची शेवटपर्यंतची भावाला भेटण्याची इच्छा  शेवट पर्यंत अधुरीच राहिली होती...!
        काही दिवसांनी कळले कि,आत्या चांगल्या दिवशी गेली नव्हती. तिची कुंडली पाहिली तेव्हा कळले की, ती मरण पावली तेव्हा  अमावस्या  होती. आणि  योग बरोबर नव्हता.

काहीही असो मी त्या गोष्टीवर विश्वास  ठेवत नाही.  आमच्या जीवनात  धोक्याचे वळण आले होते तो धोका  आम्ही काही सतकृत्य केले असावे .म्हणून  आम्ही  वाचलो होतो.
     कुणाला खुप  मोठे काही झाले असते तर खुप  मोठे बोल आयुष्याभर माझ्या मस्तकी लागले असते.
     अजुनही माझी पत्नी  धास्तावली होती. ती स्वताला दोष देत धापा टाकत होती.
    मी तिला जवळ घेत व तिच्या  डोक्यावरुन हात फिरवत समजत व तिला धीर देत म्हटले, "वेडाबाई!तुझ्या  मुळे  आम्ही  वाचलो...!तु मन हलके करु नको...!"
     अशाप्रकारे  आता आलेला धोका टळला होता.!
      खुद्द  देवच आडवा आला होता वाचविण्यासाठी. .!

धन्यवाद
समाप्त
©️®️
मोहन सोमलकर
टिम-नागपूर

          
0