राजाने वाचवले प्राण...

राक्षसाची गुफा.


बद्रापुर गावात भद्रसेन नावाचा राजा राहत होता.राजा खूप न्यायप्रिय आणि जनतेच्या हितासाठी झटणारा होता,त्याच्या याच गुणांमुळे त्याची किर्ती दूर दूरवर पसरलेली होती.त्याच्या न्यायप्रिय स्वभावामुळे तो जनतेचा लाडका राजा झाला होता.कोणत्याही अडचण आली तर लोक लांबून लांबून त्याच्याकडे येत असत.

राजा दयाळू होता,तसाच तो धार्मिक होता.देवावर त्याची खूप श्रद्धा होती.जे काही मला मिळाले आहे ते सर्व ईश्वराच्या आशीर्वादामुळे आहे यावर त्याचा विश्वास होता.राजा प्रत्येक सोमवारी महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी जात असे.

एका सोमवारी भद्रसेन नेहमी प्रमाणे महादेवाच्या मंदिरात आला.मंदिर तसे खूप जुने होते पण जागृत होते,त्याच्याच आशीर्वादाने भद्रसेन सुखी होता.मंदिरात आले की राजाचे मन प्रसन्न होई.मंदिराचा परिसर शांत आणि स्वच्छ होता.मंदिराच्या जवळ खूप झाडे,नद्या आणि मोरांची पिसे होती.मंदिरा जवळच एक जंगल होते,तेथील मोर मंदिरात फिरत असतं त्यामुळे मोरांची खूप पिसे तिथे असत.

नेहमी प्रमाणे राजाने दर्शन घेतले आणि तो राजदरबारात आला.राजदरबारात एक साधू महाराज आले.ते येताच राजाने उठून त्यांना नमस्कार केला,"यशस्वी भव" असा साधू महाराजांनी आशीर्वाद दिला.साधू जरा काळजीत होते.त्याचे कारण राजाने विचारले असता साधू म्हणाले,राजा तू अगदी बरोबर ओळखलेस,मी आज मोठ्या संकटात सापडलो आहे,तू जनतेच्या हितासाठी नेहमी झटत असतो याची मला कल्पना आहे म्हणूनच मोठ्या आशेने मी तुझ्याकडे आलो आहे.राजा म्हणाला आज्ञा करा महाराज काय करू मी तुमच्यासाठी ?? 

साधू म्हणाले मी आज माझ्या झोपडीत साधना करत होतो,माझी मुलगी नदीवर पाणी आणण्यासाठी गेली होती,बराच वेळ झाला तरी ती आली नाही, म्हणून मी तिला शोधायला गेलो तर जंगलातील राक्षस तिला ओढून घेऊन जात होता,मी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो खूप दूरवर होता त्यामुळे मी काहीच करू शकलो नाही.तू काहीही कर राजा पण माझ्या मुलीला वाचव.

राजाने साधू महाराजा ना शब्द दिला,मी तुमच्या मुलीला सुखरूप परत आणेन.राजा काही सैनिकांना घेऊन तिकडे गेला.जंगल घनदाट होते,प्राण्यांच्या डरकाळी चे आवाज येत होते,पण राजा शुर होता,तो पुढे गेला तसे त्याला एक गुफा दिसून आली.तो त्या गुहेत गेला,आत जाताच काही भाले त्याच्या दिशेने येताना त्याला दिसले,त्याने ते वार पालटून लावले,थोडे पुढे गेल्यावर एका पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला,राजा जरा जखमी झाला पण त्याच्यावर तलवारीने वार करून त्याने कुत्र्याला जागीच ठार केले,राजा एक एक पाऊल जपून पुढे जात होतो,काही अंतर गेल्यावर त्याला राक्षस दिसला.

तो भयंकर होता,अक्राळ विक्राळ दिसत होता,बलाढ्य होता,त्याचे केस वाढलेले तर दात पुढे आलेले होते.हाताची नखे वाढलेली होती, डोळे मोठे होते. तो राजाला पाहून म्हणाला राजा इथे येऊन तू खूप मोठी चूक केली आहेस,तू स्वतःच्या पायाने इथे आला असला तरी माझ्या मर्जी शिवाय इथून जाऊ शकणार नाहीस.

राजा म्हणाला मी बोलण्यापेक्षा करून दाखवण्यावर विश्वास ठेवतो असुर राज.माझ्याशी लढून दाखव,असे राजाने म्हणताच राक्षस चिडला आणि त्याच्यावर तलवारीने हल्ल केला,राजा तलवार बाजीत निपुण होता,त्याने कसब दाखवून राक्षसाला हरवले,राजाने पुन्हा त्याच्यावर शस्त्रे फेकली,आगीचे गोळे,भाले,दगडी गोळे,त्याच्या वेगवेगळ्या शक्तींचा वापर करून राजा घाबरला नाही शेवटी राजाने धनुष्यबाण काढला आणि त्याच्यावर मारला,तो बरोबर राक्षसाच्या छातीत घुसला आणि तो खाली पडून मरण पावला.

तशी ती गुहा ढासळू लागली,राजाने इकडे तिकडे पाहिले तर एका खोलीत राक्षसाने साधूच्या मुलीला बांधून ठेवले होते,राजाने तिला सोडवले आणि पटकन दोघे बाहेर आले.ते दोघे बाहेर येताच गुहा पडून गेली.

इकडे साधू महाराज काळजीत होते,त्यांच्या मुलीचा विचार करत होते,बाबा अशी हाक ऐकू येताच त्यांनी वळून पाहिले,तर राजा त्यांच्या मुलीला घेऊन दरबारात हजर झाला होता.मुलीला भेटून त्यांना खूप आनंद झाला. तू पुन्हा दाखवून दिलेस राजा,जनतेच्या सुखासाठी तू कोणत्याही थरापर्यंत जाऊ शकतोस,असे म्हणत त्यांनी राजाचे मनोमन आभार मानले.