आता मात्र ही घटना सगळ्या गावाने गंभीरपणाने घ्यायची ठरवल. पहिला बळी सरपंचांच्या मुलीचा झाला होता. दुसरा एका सामान्य माणसाच्या मुलीचा. पुन्हा एकदा सगळी निमझरी एकत्र झाली. झाल्या प्रकरणा बद्दल सगळ्यांनाच आता भीती वाटायला लागली. आता काहीतरी करायलाचं हवे होते. अन्यथा प्रकरण हाताबाहेर गेलं असतं.
पोलीसांनी तातडीने तक्रार नोंदवून घेतली आणि पुन्हा गावाबाहेर वस्ती करून राहात असलेल्या पारधी पोरांना पकडल. पारध्यांविरोधात लोकांचा संताप उसळला. लोकांनी पोलिसांना आरोपी त्यांच्या ताब्यात द्यावे म्हणून घोषणा दिल्या. पण ते कायद्यात बसत नसल्याचं पोलीसांनी लोकांना सांगितलं. लोकं चौकीच्या बाहेर जमा झालेले होते तेंव्हा आत मधे पोलीस बेदमपणे पारधी पोरांना चामड्याच्या पट्ट्याने मारत होते. पण ते लोकही एव्हढे निर्ढावलेले होतें की ईतका मार खावून देखील गुन्हा कबूल करत नव्हते.
पुन्हा स्थानिक वृत्तपत्रात बातमी छापून आली. काही लोकांनी ही गोष्ट हलक्यात घेतली तर काही लोकांनी अगदी चवीने चहा सोबत ती बातमी वाचली.
पुन्हा मूक मोर्चा निघाला. आता त्यात थोडी घोषणांचे फलक घेतलेल्या आणि हातात पेटत्या मेणबत्त्या घेतलेल्या मुली एव्हढाच बदल होता.
संध्याकाळी जाहीर सभेचे आयोजित करण्यात आलेले होते . धनपालराज मुख्य वक्ता होता. अर्थात या सभेचे आयोजनच त्याने केले होते. विक्रम सर्व व्यवस्था बघत होता. साधनाचे आई-वडील पुढे बसलेले होते. तिच्या आईच्या डोळ्यातले पाणी थांबत नव्हते. शाळेतील शिक्षक आणि इतर मान्यवर लोक सभेमध्ये आलेले होते.
सभेला सुरुवात झाली. अगोदर सर्व वक्त्यांनी झालेली घटना किती भयंकर आहे, याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. त्यानंतर काही लोकांनी कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्न निर्माण केले. सदर घटनेची मुळापासून चौकशी करण्याची आग्रह काही लोकांनी केला.
काही लोकांनी या पारधी लोकांना इथून हाकलून लावण्याचे सल्ले दिले. अशा क्रूर लोकांना जवळ करणे म्हणजे एक प्रकारे स्वतःच्या जीवाला धोक्यात घालणं आहे, असंही काहीजण म्हणाले. काही जणांनी निमझरी मध्ये लहान मुलींना क्रूरपणे ठार मारले जात आहे, याबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला. आज ही गोष्ट दुसऱ्याच्या बाबतीत घडलेली आहे. उद्या ती घटना कोणाच्याही बाबतीत घडू शकते. त्यावेळी आताच सावध होणं हाच त्यावर उपाय आहे. असा सल्ला काहीजणांनी दिला. सगळ्यांचं बोलणं पूर्ण झाल्यानंतर ज्यांच्यावर कायद्याचे आरोप होते. ते निमजरीचे पोलीस प्रमूख बोलायला उभे राहिले. त्यांनी सांगितलं की आम्ही पुरेपूर चौकशी केलेली आहे आणि याबाबतीत जे गुन्हेगार होते. त्यांना कायमची अद्दल घडेल अशी सजा दिलेली आहे आणि आम्ही ग्वाही देतो की यानंतर असा प्रकार या गावात कधीच घडणार नाही. या आधी ज्या घटना घडल्या त्याबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो. तरी लोकांनी शांत राहून आम्हाला सहकार्य करावे.
त्यानंतर धनपाल राज बोलायला उभा राहिला. तो म्हणाला,
" माननीय उपस्थित नागरिकहो, मी या गावचा सरपंच या नात्याने नव्हे, तर या घटनेची सगळ्यात आधी झळ पोहोचलेला, एक पिडीत नागरिक म्हणून आपल्या समोर आज उभा आहे. झालेली घटना अतिशय निंदनीय आहे याबद्दल कोणतेही संदेह नाही. परंतु यामागे कोणाचा हात आहे ? कोणाला आपल्या गावची शांतता नष्ट करण्याची इच्छा आहे ? हे अगोदर शोधायला हवे.
मी स्वतः या दुःखातून गेलेलो आहे. आणि ज्याच्या वरती अशी दुःख कोसळते त्यालाच त्याच्या वेदना ठाऊक असतात. हृदयावर दगड ठेवून मी त्या लोकांना क्षमा केली होती. परंतु जित्याची खोड मेल्या शिवाय जात नाही हेच खरं. आज पुन्हा त्या लोकांनी आपल्या गावातील एका निष्पाप मुलीचा जीव घेतला आहे. आता नेमके ते हेचं लोकं आहेत की अजून कोणी दुसरे लोकं आहेत माहीत नाही.
माझं असं म्हणणं असतं की प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे आणि तो कोणीच हिरावून घेऊ नये. सापाचा स्वभाव असतो दंश करणे परंतु जर त्याच्या सारखाच आपण दंश केला तर त्याच्यात आणि आपल्या त काय बरं फरक राहील ? श्रीकृष्णाने शिशुपालाला मारण्याच्या आधी त्याचे शंभर अपराध पोटात घातले होते. आपण देखील या लोकांना अंतःकरणापासून क्षमा करून, पुन्हा असे होणार नाही याची आपणच काळजी घेऊया. जर आपण पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आणि जिल्ह्यामधून पोलिसांच्या तुकड्या मागवल्या तर या लोकांच्या पावलोपावली होणाऱ्या अत्याचारामुळे आपणास भीक नको पण कुत्रा आवर असे म्हणण्याची वेळ येईल असं मला वाटते. म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करतो की या घडलेल्या घटना बघता. आपल्या घरातील छोट्या मुलींना शक्य तो एकटे दुकटे कुठं पाठवू नका. स्वतःची काळजी स्वतःच घ्या. आपण आपल्या गल्ल्यांमध्ये गटा गटाने पहारा देण्याची शिस्त लावू या."
वगैरे वगैरे असं काही तो बरच बोलतं होता. त्या नंतर त्याने खून झालेल्या दुर्दैवी मुलीच्या आई वडिलांना सगळयांच्या समोरं, या दुःखातून सावरण्यासाठी फुलं ना फुलाची पाकळी म्हणून पन्नास हजाराची रोखं रक्कम दिली. आणि त्याचं बरोबर गावातल्या लोकांनाही मदतीचे आवाहन केले. उत्स्फूर्त पणे लोकांनीही जमेल तितकी मदत ताबडतोब जमा करुन त्या दुर्दैवी शिंप्याला दिली. त्याच्या सगळ्या आयुष्यात मेहनत करून देखील ईतके पैसे त्याला मिळाले नसते. त्या मुळे तो धनपालचा एकदम ऋणी होवून गेला. धनपालने त्याला दोन शब्द बोलण्याची विनंती केली. पण तो ईतका गांगरून गेला होता की त्याला बोलणे सूचत नव्हते. नंतर कळले होते की त्याने तक्रार करायलाही ईच्छा दाखवली नव्हती. जिथं जिल्ह्याला चकरा मारायला लागू नये म्हणून धनपाल सारख्या माणसाने माघार घेतली होती. तिथं त्याच्या सारख्या सामान्य माणसाने असा प्रयत्न करण म्हणजे दगडावर डोके आपटण्या सारखे होते. असा विचार त्याने केला. आणि हे सर्व करून आपली मुलगी परत मिळाली नसती ते नसतीच.
जागी झालेली निमझरी काही दिवसांनी पहिल्या सारखे जीवन जगायला लागली.
( क्रमशः )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा