येते माहेराची आठवण

married womans memories about her mothers house
  येते माहेराची आठवण............
              
          माहेर केवळ तीन अक्षरांचा शब्द पण पण प्रत्येक विवाहित स्त्रीची भावनिक नातं असतं ह्या शब्दाबरोबर. प्रत्येक स्त्रीच्या मनातला एक हळुवार, नाजूक, अलवार कोपरा म्हणजे तिच माहेर.
           माहेर असतं प्रत्येक सासुरवाशिणी हक्काचं, प्रेमाचं, जिव्हाळ्याचं आपलं स्वतःच गाव. या गावात असतात नात्यांचे, जिव्हाळ्याचे, प्रेमाचे अनेक रेशमी धागे. बालपणीच्या आठवणी, आई-वडिलांचे प्रेम, आजोबा-आजी आजीचं लाड करणं, हट्ट पुरवणं, भाऊ-बहिणीच्या गमती-जमती, बालपणीचे खेळ, मित्र-मैत्रिणींशी रंगलेल्या गप्पा, सुरक्षेचे विश्वासाचं आधार छत्र. नात्यांचे त्यातल्या अलवार ओढणीचे अनेक कडूगोड प्रसंग तिला आठवत असतात आणि माहेराची ओढ लावत राहतात.
            अभंग, कविता ,ओव्या भोंडल्याची गाणी ह्या प्रत्येक भाषिक ,भावनिक काव्यप्रकारात माहेरचा उल्लेख आलेला आहे. एकनाथ महाराज आपल्या अभंगात म्हणतात-" माझं माहेर तर पंढरपुर आहे आणि ते भीमेच्या काठावर वसलेले आहे. संत एकनाथ महाराज आपला भाऊ ' पुंडलिक' आहे आणि ते फार प्रसिद्ध आहेत असं सांगतात ' चंद्रभागेला'- नदीला त्यांनी आपली बहिण म्हणून संबोधले आहे
             "माझिया माहेरा जा रे पाखरा" या गाण्यात अशीच माहेराची ओढ लागलेली गृहिणी आपल्या माहेरी जाण्यासाठी, ती सासरी अगदी खुशाल आहे असा निरोप आपल्या वाट पाहणार्या माऊलीला- आईला देण्यासाठी  "पाखराला" विनवणी करते ती म्हणते,
                   " देते तुझ्या सोबतीला आतुरले माझे मन
                   वाट दाखवा या नीट, माझी वेडी आठवण
                   मायेची माऊली, सांजेची साऊलि
                    माझा ग भाई राजा
                     माझिया माहेरा जा"
              गृहिणीला आपल्या भाऊ भावजय ची आठवण आल्यावर ती त्यांना  " सावळा बंधुराया साजिरी वहिनी बाई" असं म्हणते तर कधी आपल्या शेजारणीला माहेरचे वर्णन सांगताना म्हणते
                   " माझ्या रे भावाची उंच हवेली
                     वहिनी माझी नवी नवेली
                    भोळ्या रे सांभा ची भोळी गिरीजा"
                  अशा अनेक प्रकारे आपल्या भावाचे, माहेराचे वर्णन करते, तिला आपल्या भावाचा गर्व असतो, माहेरच्या माणसांचा सार्थ अभिमानही असतो. भाऊ गरीब असो किंवा श्रीमंत, बहिणीची माया त्याच्यासाठी तसूभरही कमी होत नाही. आपल्या प्रेमळ भावानं कष्टानं, मेहनतीने प्रगती केली, त्याच्या घामाचे चीज झालं असं सांगताना ती म्हणते,
                     " राबतो भाऊराया, मातीचं झालं सोनं
                      नजर काढू कशी, जीवाचं लिंबलोण
                     मायला पूर येतो, पारुच मन गातं
                     गुलाब जाई जुई मोगरा फुलवीतं
              अशाच एका भुलाबाईच्या गाण्यात ' कारल्याचं बी' असे एक गाणं आहे. सुन सासुला सारखी विनवणी करते की मला माहेरी जाऊ द्या, माहेरी पाठवा, पण सासू अनेक कारण देते सासू सुनेला आधी कारल्याचं बी करायला लावते, मग त्याला वेल येऊ दे, कारले लागू दे, कारल्याची भाजी कर,स्वयंपाकाची भांडी घास, अशी अनेक काम सांगून तिला म्हणजे सुनेला माहेरी पाठवायला टाळाटाळ करते आणि एवढेही करून सासू माहेरी जाण्यासाठी परवानगी देतच नाही तर परवानगी मागण्यासाठी सासऱ्या कडे पाठवते, सासरा सुनेला तिच्या दीरा कडे पाठवतो, दीर नणंद कडे पाठवतो, आणि नणंद नवऱ्याकडे. पण शेवटी नवरोजी तिला माहेरी जायला परवानगी देतो. एकत्र कुटुंबातल्या सासुरवाशीण गृहिणीचं जगणंच जणू या गाण्याच्या रूपकातून रेखाटलं आहे पण तरीही ती गृहिणी नवऱ्याची मर्जी राखून, सासरच्या जबाबदाऱ्या पूर्ण करून माहेरी जातेच. पण कधीकधी सासुरवाशिणी च माहेरी जाणं होत नाही अशावेळी तिच्या मनाची अवस्था या चार ओळी तून अगदी हुबेहूब जाणवते.
           " अंगणात पारिजात, तिथं घ्या वो घ्या विसावा
              दरवळे बाई गंध, चोहीकडे गावो गावा
              हळूच उतरा खाली फुलं नाजुक मोलाची
           माझ्या माय माऊली, च्या काळजाच्या तोलाची
          तुझी ग साळुंकी ,आहे बाई सुखी
           सांगा पाखरांनो तिये चे कानी
           एवढा निरोप माझा
             माझिया माहेरा जा रे पाखरा "
          आजच्या धावपळीच्या, मोबाईल, इंटरनेटच्या जगात गृहिणी असो किंवा कमावती, स्वतःसाठी निवांत वेळ तिला आता ही मिळत नाही आणि आधीही मिळत नव्हता. मागच्या शतकात जात्यावरचे दळणकांडण, धुणी-भांडी, घरची दूध- दुभती गाई -जनावरं असा तिचा सारा प्रपंच होता तर आताच्या आधुनिक युगात रोजच्या दैनंदिन धावपळीत मुलांच्या शाळा, क्लासेस, प्रोजेक्ट तर कधी, नवऱ्याचे नोकरी व्यवसायाचे ताणतणाव याशिवाय ती स्वतः जर नोकरदार असेल तर तिथल्या जबाबदाऱ्या, टार्गेट्स, डेडलाईन्स असं सगळं तिच्या मागे लागलेलं असतं याशिवाय सासरच्या इतर जबाबदाऱ्या कर्तव्य पार पाडताना माहेर कधी- कधी मागे सुटुन जाते, पण सणावाराला, सुट्ट्यांमध्ये ती आठवणींच्या हिंदोळ्यावर बसून परत एकदा माहेरी जाते.
                   परवा माझी मुलगी लग्नानंतर पहिल्यांदाच राखी पौर्णिमेसाठी माहेरी आली होती. माझ्या तर उत्साहाला उधाणच आलं होतं. तिच्या आवडीचा मेनू, आवडीचं परफ्युम, तिला आवडतात म्हणून तिच्या भावाने म्हणजेच माझ्या मुलाने खास तिच्या आवडीचे चॉकलेट आणले होते. राखी बांधण्याचा सोहळा आनंदात, उत्साहात संपन्न झाला. दुपारी ती म्हणजे माझी मुलगी जरा निवांत झोपली, मी स्वयंपाक घराची आवराआवर केली, आणि मी पण माझ्या माहेरी गेले आठवणीतच. मलाही माझ्या लहानपणीची राखीपौर्णिमा आठवली. भावाची भांडून घेतलेलं गिफ्ट आणि ओवाळणी हेही आठवलं.
                 भाऊ ला जेव्हा मुलगी झाली तेव्हा सगळे म्हणत होते " राणी" माझी भाची, अगदी माझ्यावर गेली आहे, माझी मावशी आणि आजी नेहमी " राणीला" म्हणायच्या  ' आईवर ना बाईवर जाऊन पडली फु ई वर'.
                "राणीच्या" हळदी च्या दिवशी ती किती सुंदर दिसत होती. माझी आई तर वारंवार तिची दृष्ट काढत होती. तेव्हाही उत्साहाला उधाण आलं होतं. लग्नाचा खर्च जेव्हा जरा आटोक्याबाहेर गेला तेव्हा माझ्या मोठ्या बहिणीनं भाऊला सढळ हातानं मदत केली. बाबा गेले तेव्हा ही ताई भाऊला नेहमीच धीरही द्यायची आणि आर्थिक मदतही करायची ,जणू ती माझ्या आईचा दुसरा मुलगा च होती.
                 " राणीच्या" लग्नाच्या कुलाचाराच्या दिवशी जेव्हा ताई आणि राणी सोबत जवळ जेवायला बसल्या तेव्हा साऱ्या बायका म्हणत होत्या,
                   " मायलेकी लोकाच्या
                      पण आत्या भाच्या एकाच्या"
                  आत्या -भाची हे नातही किती एक  सारख असतं, दोघीही एकाच घरात जन्माला येतात आणि लग्न करून मग त्याच घराच्या पाहुण्या होतात. गेल्या काही वर्षात भाऊचा माझ्याकडं 'राखी' करता येणे काहीसा कमी झाला आहे, मुलांच्या शाळा, क्लासेस, प्रोजेक्ट आणि दिवाळीच्या कमी सुट्ट्या आणि मग माझाही संसार ह्यात आताशा माझंही  "भाऊबीजेला" माहेरी जाणं झालंच नाही. आधी आई होती पण ती गेल्यावर माहेरची ओढ जरा कमी झाली पण संपली मात्र नव्हती. माझ्या आठवणींच्या -विचारांच्या मागे मी अशी धावत होती आणि दारावरची बेल वाजली, माझी तंद्री तुटली, मनात आलं "आज सणाच्या दिवशी कोण आलं असेल बरं?" दारावर पाहिलं तर माझा भाचा होता. मला तर क्षणभर कळेच ना कोण आहे ते, मग भाचाच म्हणाला," आत्या अगं आता तरी घे मला" , मलाच ओशाळल्यासारखे वाटलं. चहापाणी झाल्यावर, तो सांगत होता, या वर्षी मी आणि आप्पाने- म्हणजे माझ्या मोठ्या भावाने ठरवलं होतं, "आत्या तुझ्याकडे आणि मोठ्या आत्याकडे जायचं". आप्पा 'मीना' आत्याकडे म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीकडे, तर भाचा माझ्याकडे आला होता.
               आज माझी माझ्या मोठ्या बहिणीची आणि माझ्या मुलीची सगळ्यांचीच राखीपौर्णिमा आनंदात साजरी झाली, आज भाऊ आणि भाच्या ने आमच्या नात्याला नव्यानं झळाळी दिली.



               

ReplyForward