यशोदा आणि तिचा कान्हा- भाग ७ (मराठी कथा: marathi story)

This post is in continuation with earlier series..

                     मागील भागाचा सारांश-


मागील भागात आपण पाहिलं की माईने सर्वांच्या आवडीचे जेवण बनवून ; यशोदेसकट सगळ्यांना सुखद धक्का दिला होता.. 

जेवणानंतर माईने घरच्या प्रत्येक सदस्याची व्यक्तिशः माफी मागितली होती.. इतरांप्रमाणे यशोदेनेदेखील माईचे अपराध पोटात घालत तिला क्षमा केली होती.. 


या साऱ्या घडामोडीत लक्ष्मीला आपला प्रस्ताव मांडता आला नव्हता.. काय असेल तिचा नेमका प्रस्ताव?? काय असेल त्यावर घरच्यांची प्रतिक्रिया? चला तर मग वाचूयात या भागात..

यशोदा आणि तिचा कान्हा-भाग ७

माईच्या माफी नाट्यामुळे उशिर झाल्यामुळे लक्ष्मीने आपलं बोलणं दुसऱ्या दिवसावर ढकललं होतं.. उद्या पुन्हा एकदा सगळं कुटुंब दुपारच्या जेवणाआधी नंदू आणि यशोदेच्या भविष्याबद्दल चर्चा करणार होते..

कायम आपल्या नशिबाला दोष देत; अश्रूंच्या कुशीत झोपायची सवय लागलेल्या यशोदेला आज खूप दिवसांनी समाधानाची झोप लागली होती.. तिच्यासाठी सारं काही स्वप्नवत झालं होतं..मनोमन ती लक्ष्मीचे आभार मानत होती..

इकडे माईला सुद्धा आज मन हलकं वाटत होतं.. दुसऱ्या बाजूला इतका अपमान माथी मारुनसुद्धा; आपल्याला खुल्या मनाने माफ करणाऱ्या सुनेचा विनाकारण छळ केल्याबद्दल तिचं मन तिलाच खात होतं.. कित्येक वेळा तिने अण्णांकडे आपल्या मनातलं द्वंद व्यक्त केलं तस त्यांनी तिचं सांत्वन करत तिला धीर दिला..

दुसऱ्या दिवशी घराची सकाळ सगळ्या कुटुंबाच्या हास्यकल्लोळात डुबली होती.. प्रत्येकाने आपआपली काम पटापट आटपली होती.. छोट्या प्राचीने आज आजी- आजोबांकडून आपले लाड करून घेतले होते.. खेळता खेळता थकली तशी ती जागीच झोपी गेली होती.. तिला तिच्या जागेवर झोपवून लक्ष्मी हॉलमध्ये परतली होती तसे सर्वजण तिथे हजर झाले होते...

सगळे एकत्र येताच लक्ष्मीने बोलायला सुरू केलं होतं..

'तुम्हांला सर्वांनाच माहीत आहे ना की मी एका एन.जी.ओ. साठी काम करते आणि आमची संस्था अनाथ मुलांसाठी काम करते.. तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगू इच्छिते की आजमितीला संपुर्ण भारतात जवळपास 30 लाख मुले अनाथ आयुष्य जगत आहेत.. यातल्या खूप कमी  मुलांना आमच्या संस्थेसारखं कोणी तरी आश्रय देतं तर अत्यल्प संख्येत मुलं स्वतःच्या प्रयत्नांने आपलं आयुष्य सावरतात.. पण जवळपास साठ टक्के अनाथ मुलांना जगण्यासाठी भयंकर संघर्ष करावा लागतो.. मग त्यातूनच कित्येकजण पोटाची खळगी भरण्यासाठी अनैतिक मार्ग स्वीकारतात.. तुम्हाला एक सांगू का? आजमितीला गैरमार्गाला असणाऱ्या तरुणाईमधले जवळपास दोन टक्के मुले ही अनाथ असतात आणि केवळ चांगली संगत किंवा योग्य संस्काराच्या अभावी हे सर्वजण वाम मार्गाला लागलेले असतात.. आता अशा किती संस्था किती अनाथ लेकरांना पुरणार? खूप खूप कमी संस्था आहेत अशा..'- कालपर्यंत लोकांना घाम फोडणाऱ्या लक्ष्मीच्या चेहऱ्यावर आज कारुण्य पसरलं होतं..

'आणि त्याच बरोबर आताच्या घडीला विविध कारणांमुळे निपुत्रिक दांपत्याची संख्या भारतात जवळपास साडेतीन लाखाच्या आसपास आहे.. कदाचित यात स्वमर्जीने मुल होऊ न देण्याचा निर्णय घेतलेली जोडपीदेखिल असतील पण त्यांची संख्या नगण्यच आहे..'- कालपर्यंत सफाईने आपलं म्हणणं मांडणाऱ्या लक्ष्मीला आज मुख्य मुद्दा सर्वांसमोर मांडण्यासाठी शब्द निवड सुचत नव्हती.. 

'नंदू- यशोदा, माझं ही हेच मत आहे की तुम्ही सुद्धा एखाद मुल दत्तक घ्यावं'- माईने अचानकपणे आपलं म्हणणं मांडलं तसे लक्ष्मी वगळता सर्वजण चकीत झाले..

'संजना, माझं ही म्हणजे?? अजून कोणाला अस वाटतं?'- अण्णांनी प्रश्न केला..

'मला अण्णा..थँक्स माई.. मला खरंच सुचत नव्हतं ग की मी यांना कस सुचवू....नंदू , यशोदा ; नंदूने त्याचे रिपोर्ट्स पुर्ण वाचलेच नाहीत.. त्यात डॉक्टरांनी त्याच्या प्रोब्लेमवर ट्रीटमेंट चालू करायला हरकत नाही असं क्लिअर लिहलं आहे.. फक्त त्याची त्यांनी अवघी दहा टक्केच खात्री दिली आहे.. आता ते तुमच्या आशावादावर आहे की त्यावर भरोसा ठेवून आयुष्य काढावं की माझ्या मतावर विचार करावा.. माझ्यामते हा सर्वस्वी तुमचा दोघांचा वैयक्तिक निर्णय असेल..'- लक्ष्मीने आपलं मत मांडलं..

'यशोदा, मी काही बोलू का ग?'- माईने यशोदेकडे पाहत तिला विचारलं..

'माई?? अस का करताय? कालच आई म्हटलं मी तुम्हांला.. मग अशी परवानगी?'- यशोदेने काहीश्या नाराजीने उत्तर दिलं..

'तस नाही बाळा, पार्वती योग्यच बोलतेय.. हा निर्णय तुमचा तुम्हीच घ्यावा असे माझं मत आहे.. मला फक्त तुझ्या काळजीपोटी काही सांगायचं आहे..'- माई..

'बोला ना आई..तुमचं मत आजही आमच्यासाठी तितकच महत्वाचं आहे'- यशोदा आदराने बोलली..

'चांगलं वाटलं ऐकून बाळा.. आजच्या घडीला तुझं वय पस्तीस आणि नंदूच वय सदतीस.. आजच्या मेडिकल क्षेत्रातल्या प्रगतीमुळे कदाचित तुम्हांला अपत्य होईल ही; अशी आपण प्रार्थना करू.. पण समज बेटा, वयाच्या चाळीशीनंतर जर तुला गर्भधारणा झाली तर तुझ्या आरोग्याच्या दृष्टीने ते किती जिकिरीचे असेल? तुझं शरीर तुला तेव्हा साथ देईल? आधीच तुला मी मानसिक त्रास देऊन अशी सडपातळ करून ठेवली आहे आणि त्यात अस उशिरा मातृत्व सांभाळणं म्हणजे अवघड होईल ग.. बस एवढीच काळजी होती.. बाकी तुमचाच निर्णय अंतिम असेल... अण्णा तुमचं काय मत?'- माईने पहिल्यांदाच अण्णांना मत विचारलं तसे अण्णांना हसू आलं..

'अरे व्वा..म्हणजे कालची माफी खरी होती की काय?'- अण्णा मिश्कीलपणे बोलले तसे लक्ष्मीने डोळे मोठे करून त्यांना प्रसंगांचे भान राखण्यासाठी सुनावलं..

'माझंही हेच मत आहे यशोदा आणि नंदू.. आम्हांला यशोदेच आयुष्य अस धोक्यात घालून वंशवृद्धी नको.. आजवर तिला त्रास दिला परंतु यापुढे तिला खूप आनंदात ठेवणार आहोत आम्ही..अगदी आमच्या पोटच्या मुलीप्रमाणे.. माईचा तर पुढच्या दहा वर्षाचा सुनेच्या लाडाचा प्रोग्राम ठरला आहे.. विनोदाचा भाग सोडला तर नंदू तु स्वतः व्यवस्थित विचार करावा असे मला वाटतं... वाटल्यास तु स्वतःची ट्रीटमेंट सुरूच ठेव आणि या मताचापण विचार कर..'- अण्णांनीसुद्धा माई अन लक्ष्मीच्या मताला दुजोरा दिला होता..

'अरे तुम्ही दोघे; आमची तिघांची मत एकाच पारड्यात पडली म्हणून तुमचा निर्णय फिरवू नका हा.. तुम्ही तुमचा वेगळा असा निर्णय घेतलात तरी आमचा कोणाचा त्याला विरोध नसेल...'- लक्ष्मीच्या या वक्तव्याला अण्णा आणि माईने मान डोलवत समर्थन दिल..

'एक आठवलं...तुम्ही एक काम कराल का?? उद्या आमच्या संस्थेचे इथेच जवळ एक चॅरिटी फंक्शन आहे.. डोनेशन जमवण्यासाठी आमच्या संस्थेची मुले मिळून काही करमणुकीचे कार्यक्रम सादर करणार आहेत.. तुम्ही याल का माझ्यासोबत?? नंदू, फक्त तुला हाल्फ डे घ्यावा लागेल..यशोदेला तर अशीपन सुट्टीच आहे.. बघा जमत असेल तर..'- लक्ष्मीने सुचवलं तसे दोघेही प्रोग्राम अटेंड करण्यासाठी तयार झाले..

देवकाते परिवाराने आता नंदू आणि यशोदेवर निर्णय सोपवून बाकीच्यांसाठी तो विषय थांबवला होता.. सर्व सदस्यांनी उर्वरित दिवस एकमेकांच्या सानिध्यात आणि गप्पांमध्ये घालवला होता.. प्राचीच्या बाललीलांनीं तर सर्वांचाच छान वेळ गेला होता..

दुसऱ्या दिवशी लक्ष्मी प्राचीला माई आणि अण्णांकडे सोपवून ; यशोदेसोबत कार्यक्रमस्थळी पोहचली होती..नंदू डायरेक्ट हॉलवर येणार असल्यामुळे यशोदा बाहेरच त्याची वाट बघत थांबली होती.. लक्ष्मी कार्यक्रमासाठी लागणारी मदत करण्यासाठी आत गेली होती.. काही वेळाने नंदू आला तशी दोघे उभयता हॉलमध्ये लक्ष्मीने सांगितलेल्या जागेवर बसले होते..

कार्यक्रमाच्या सुरवातीच्या प्रस्तावनेलाच संस्थेमार्फत प्रेक्षकांना एक प्रेझेन्टेशन दाखवण्यात आले होते..  त्यात भारतातली गरिबी आणि अनाथ मुला-मुलींच्या समस्या ठळकपणे मांडल्या होत्या...समाजाकडून त्यांच्याकडे होणाऱ्या सोयीस्कर दुर्लक्षाकडे प्रेक्षकांच लक्ष वेधून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता.. योग्य मार्गदर्शनाभावी त्यांच्या आयुष्याची होणारी वाताहत स्क्रिनवर दाखवली होती..संपुर्ण प्रेझेन्टेशन पाहता पाहता यशोदेच्या डोळयातून कधी पाणी वाहू लागलं हे तिलासुद्धा कळलं नव्हतं..

'नंदू...'- तिने आपला हात त्याच्या हातावर ठेवत त्याला हाक मारली..

'काय ग?? काय झालं?आपणही घ्यायचं का एखाद मुल दत्तक??'- तिच्या डोळयांत पाणी पाहून नंदू काय समजायचं ते समजून गेला होता.

'हो..काल रात्रीपासून मी तोच विचार करतेय.. काल ताई बोलल्या की आपल्यासारखी जवळपास साडे तीन लाख जोडपी निपुत्रिक आहेत.. बघा ना यातल्या किमान अर्ध्यांनी जरी अनाथ मुलांना दत्तक घेतले किंवा त्यांचं आयुष्य सावरण्यात त्यांना मदत केली तर यातून किती काही साध्य करता येईल ना? मुलांना आई- बापाचं प्रेम मिळेल, जोडप्यांना मुलाच सुख नाहीतर किमान कोणाचं तरी आयुष्य सावरल्याच समाधान.. बाकी कोणाला अतिशोयक्ती वाटो; पण आपण एकतरी मुल दत्तक घेऊयात.. त्याने आपल्याला पुढे आई-बाबा म्हणो वा न म्हणो पण आपण त्याच्या आयुष्याची घडी नीट बसवून देऊ..'- यशोदेने नंदूसमोर इच्छा व्यक्त केली..

'मग मुलगा की मुलगी?'- नंदूने तिच्या हात हलका पकडत विचारलं..

यशोदा काही बोलणार तितक्यात समोर स्टेजवरचा पडदा उघडला होता.. मुलांनी स्टेजवर कृष्णलीला सादर करायला चालू केल्या होत्या.. स्टेजवरची सर्व मुले- मुली साधारण सात-आठ वर्षाखालचीच होती.. गोपिका बनलेल्या मुलींची; श्रीकृष्ण बनलेला मुलगा लाडीवळपणे छेड काढत होता.. त्याला साथ देण्यासाठी अजुन काही मुलं त्याचे साथीदार बनून त्याच्यासोबत फिरत होते... 

सगळ्या मुलां-मुलींमध्ये श्रीकृष्ण बनलेला मुलगा त्याच्या निरागासपणामुळे भाव खाऊन जात होता.. बहुधा सर्व मुलांमध्ये तो सगळ्यात लहान होता त्यामुळेच त्याच लक्ष सर्वाधिक विचलित होत होतं.. त्याचे फम्बल त्याच्या गोंडसपणामुळे प्रेक्षकांना मजेशीर वाटत होते..

 यशोदेची नजर तर त्याच्यावरून हटतच नव्हती.. एक दोनदा नंदूने मुलांच्या सादरीकरणातील गंमती दाखवण्यासाठी तिला हाताने हलवलं तेव्हा तिने चक्क त्याचा हात झटकून टाकला होता.. स्टेजवरच्या बालकृष्णाने तिला वेड लावलं होतं.. त्याच्या चेहऱ्यावरच्या भावानुसार यशोदेच्या चेहऱ्याचा रंग बदलत होता..तो हसला की यशोदा हसायची, सादरीकरणात त्याची फजेती झाली की तिला वाईट वाटायचं, त्याची फजेती पाहून प्रेक्षक हसली की तिला चीड यायची.. एक दोनदा तर तिने हसणाऱ्या नंदूला तिने रागाने कोपराने ढोमसलं होतं...

'आऊच..एवढा आवडला का कान्हा?? यालाच उचलायचा का आपण देवकातेंच्या गोकुळासाठी??'- नंदूने मुद्दाम तिला विचारलं..

'हो..हो..हाच हवा मला..हाच हवा..माझा कान्हा'- अजाणतेपणी यशोदेच्या तोंडून होकार बाहेर पडला होता..


क्रमशः


© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही.

🎭 Series Post

View all