यशोदा आणि तिचा कान्हा- भाग ५ (मराठी कथा: marathi story)

This part is in continuation with earlier series..

                      मागील भागाचा सारांश-
मागील भागात आपण पाहिलं की लक्ष्मी उर्फ पार्वतीने; स्वतःच्या वडिलांची कानउघाडणी करत त्यांना त्यांची चूक कबूल करायला भाग पाडल होते.. तसेच शेजारच्या मोघेकाकूंना त्यांच्या कुटुंबावर असलेल्या यशोदेच्या उपकाराची आठवण करून देऊन; त्यांना आणि त्यांच्या सुनेला यशोदेची क्षमा मागायला लावली होती..

काय असेल नंदूच्या रिपोर्ट्समध्ये? आतातरी लक्ष्मी माईला सुनवेल? चला तर मग वाचूयात या भागात..

                 यशोदा आणि तिचा कान्हा-भाग ५

नंदूला दरवाज्यात तशा विखुरलेल्या अवस्थेत पाहून यशोदा त्याच्याकडे धावली..दारूचा तेजतर्रार सहन होत नसतानासुध्दा ; तोंडाला पदर लावून तिने त्याला सांभाळत घरी आणलं होतं..

'सॉ..सॉरी य..यशोदा.. म..मला माफ कर.. तु...तु..तु म..मला माफ कर..करशील ना?'- नंदू दारूच्या नशेत बोलताना अडखळत होता..

'यशोदा, त्याला आत घेऊन जा..आराम करू देत त्याला..'- लक्ष्मीने शांत आवाजात यशोदाला सूचना केली तसे घरचे सर्वच अवाक झाले.. खासकरून माई-अण्णा आणि स्वतः नंदू शॉक झाला होता..

'ता..ताई...सॉरी ते...ते रिपोर्ट्स..'- नंदूने लक्ष्मीला कारण सांगण्याचा प्रयत्न केला तस तिने त्याला हातानेच थांबवलं..

'तु आता शुद्धीत नाही आहेस.. आत जाऊन निमूटपणे पड.. उद्या सकाळपर्यंत तुझी सर्व नशा उतरली पाहिजे; तेवढं बघ..राहिला प्रश्न रिपोर्ट्सचा.. तर ते तु व्यवस्थित असतानाच आपण बघू.. सध्यातरी ते माझ्याकडे देऊन ठेव..'- लक्ष्मीने त्याच्याकडे रिपोर्ट्ससाठी हात पुढे केला तसा त्यानेपण मुकाट्याने सर्व रिपोर्ट्स तिच्या हातात सोपवले..

तो उर्वरित दिवस लक्ष्मी सोडून सर्वांसाठीच कसोटी पाहणारा होता.. माई- अण्णानां; मागच्या खेपेला नंदू मित्रांसोबत दारू पिऊन आल्यावर दरवाज्यातच त्याच्या गालावर आपला पंजा उमटवणारी लक्ष्मी आज गप्प कशी बसू शकतो याचा उलगडा होत नव्हता.. आतापर्यंतचं लक्ष्मीचं वागणं पाहून त्या दोघांनाही ती वादळापूर्वीची शांतता वाटत होती..माईच्या मनात वेगळीच भीती होती; आतापर्यंत लक्ष्मीने यशोदेला बोल लावणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला धारेवर धरत; सर्वांना तिची माफी मागायला लावली होती.. पण यशोदेचा सर्वाधिक छळ करणाऱ्या माईला तिने एकाही शब्दाने काही म्हटलं नव्हतं.. पोर उद्या नक्कीच काहीतरी सुनवणार या विचारात माई रात्रभर तळमळत राहिल्या होत्या.. तर नवऱ्याची तशी अवस्था पाहून यशोदा आतून घाबरली होती.. कारण नंदू तिला इतर काहीही न सांगता सारखा फक्त तिची माफीच मागत होता..त्याच बडबडीत तो झोपून गेला होता.. सर्व रिपोर्ट्स लक्ष्मीच्या ताब्यात असल्याने बाकीच्यांसाठी सत्य उद्याच्या सकाळपर्यंत गुलदस्त्यातच राहणार होते..

सारी रात्र विचारात घालवल्यानंतर; दुसऱ्या दिवशी सर्वकाही आटपून सर्वजण अंमळ लवकरच एकत्र जमले होते.. नंदू निमूटपणे मान खाली घालून बसला होता, माई लक्ष्मीच्या खोलीकडे सारख्या सारख्या वाकून तिची वाट पाहत होत्या.. आण्णा नेहमीप्रमाणे आजही शांतच होते.. नाही म्हटलं तरी यशोदेची सर्वाधिक चुळबुळ चालू होती.. अशातच छोटया प्राचीला झोपवून लक्ष्मी बाहेर हॉलमध्ये येऊन थेट नंदुसमोर बसली.. तिला पाहून नंदूने मागच्या आठवणीतून स्वतःचे दोन्ही गाल आपल्या हाताने झाकून घेतले तस लक्ष्मीने त्याच्याकडे पाहून हलकं स्मित करत त्याला खुणेनेच शांत राहण्यास सांगितले..

'आज तूच स्वतःहुन बोलायच आहे नंदू.. मी काही आज तुझ्यावर हात उचलणार नाही.. हे घे तुझे रिपोर्ट्स.. उघडून सांग सर्वांना; नेमकं काय आहे यात.. मी काही ते ओपन केलेले नाहीत... मी ते काल फक्त माझ्याकडे सांभाळून ठेवले होते.. नाहीतर इतर कोणाकडेही दिले असते तर उत्सुकतेने ते उघडले गेलेच असते...आणि मग जे मला करायचं आहे ते मला करता आलं नसतं.. सोड ते सर्व.. तु रिपोर्ट्स वाचून दाखव..'- लक्ष्मीचा चेहरा निर्विकार होता आणि तिचा आवाजपण..

'ता..ताई..'- नंदूला कालच डॉक्टरसोबतच संभाषण आठवलं तसा तो हसमसून रडू लागला..

कोणी काही रिऍक्ट करण्याआधीच लक्ष्मी उठून त्याच्या बाजूला जाऊन बसली होती.. तिला बाजूला आलेलं पाहून नंदू तिच्याबद्दलची सारी भीती विसरून तिच्या खांद्यावर डोकं ठेवून आवेगाने रडत होता..नवऱ्याची तशी अवस्था पाहून यशोदेच्या डोळ्यांतूनसुद्धा नकळत पाणी वाहू लागलं होतं..
काहीवेळ लक्ष्मीने त्याला असच त्याला रडू देत, त्याच मन मोकळं होऊन दिलं होतं.. अधून मधून मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत ती त्याला धीर देत होती.. काही मिनिटांनी त्याच्या भावनांचा आवेग ओसरला तसा तो बाजूला झाला... आपले अश्रू पुसून तो काही काळ डोळे मिटून तसाच थांबला..

'यशोदा... बर झालं ताईच्या सांगण्यावरून मी माझी टेस्ट करून घेतली ग.. नाहीतर माईच्या बोलण्याला भुलून या घरात अजून एका यशोदेचा नाहक छळ झाला असता ग.. माई मला मागचे काही दिवस सारखी बोलत होती मी तुला घटस्फोट देऊन दुसरं लग्न करावं.. प..पण माझं मन तयार होत नव्हतं ग..मला पण बाप बनायचं आहे ग..एकक्षण मी सुद्धा विचलित झालो होतो.. दुसऱ्या लग्नासाठी तयार झालो होतो.. पण नंतर मला तुझा निरागसपणा आठवायचा.. या घरासाठी तु घेत असलेले कष्ट आठवायचे आणि..आणि मग मी नाद सोडला ग.. प..पण बरं झालं मी..मी माईच ऐकलं नाही..'- नंदूला परत एकदा रडावस वाटत होतं पण त्याआधीच लक्ष्मीचा मायेचा हात परत एकदा त्याच्या डोक्यावरून फिरला तस त्याने स्वतःला आवरलं..

'थँक्स ताई..काल डोळे उघडलेस तु माझे.. माई, अण्णा आणि मेन म्हणजे यशोदा तुम्ही सर्वांनी ऐका... मी..मी कधीच बाप बनू शकणार नाहीये..दो.. दोष माझ्यात आहे..माझ्या यशोदेमध्ये नाही..'- एवढं बोलून त्याने लक्ष्मीच्या मांडीवर डोकं ठेवून रडणं सुरू केलं..
पुन्हा एकदा त्याला मोकळं होऊन दिल्यानंतर लक्ष्मीने त्याला उठवून नीट बसवलं...त्याचे डोळे पुसत तिने त्याला नजरेनेच धीर दिला..

आपल्या पाठीमागे माई करत असलेले एवढं मोठं कारस्थान ऐकून यशोदेला धक्का बसला होता.. आपलं सर्वस्व या घराला अर्पण करूनसुद्धा आपल्याला या घराने कधीच आपलं मानलं नाही याचं तिला जास्त दुःख झालं होतं.. तिचा उतरलेला चेहरा पाहून लक्ष्मीने ते नेमकं ताडले होते आणि नेत्र भाषेतूनच तिने तिच सांत्वन केलं होतं..

आपलं नकारात्मक रूप समोर येताच, माईला दरदरून घाम फुटला होता.. आता ही अंबा आपल्याला काही सोडत नाही या विचारानेच त्या थरथर कापू लागल्या होत्या..

'ओके.. रिपोर्ट्स तर कळले..पण मग तु काल दारू का पिऊन आलास ते सांगशील??'- लक्ष्मीने नंदूला प्रश्न केला तसा तो घाबरला..

'नको घाबरू एवढं..मी बोलले ना की नाही मारणार आज.. बोल.. मला फक्त कारण हवंय..'- लक्ष्मी..

'ताई..ते..ते...मला टेन्शन आलं होतं...तुम्हांला आता कस तोंड दाखवायचं..यशोदेसमोर कोणत्या तोंडाने जायचं..किती त्रास दिला मी तिला.. छळ मांडला तिचा..तो पण अख्या जगासमोर..'- नंदूला पुढे शब्द सुचत नव्हते तस लक्ष्मीने त्याला खुणेने थांबवलं..

'बरं.. मग आता सगळं टेन्शन संपलं? काही उपाय भेटला??'- तिने शांतपणे त्याला विचारलं.

नंदूने नकारार्थी मान हलवली तशी ती हसली..त्याच्या मांडीवर हलकं थपथपत तिने त्याचा कान हलकासा पिरगळला..

'मग अण्णा काय करायचं तुमच्या  चिरंजीवाच?'- तिने अचानक अण्णांना प्रश्न केला तसे ते गोंधळले..

'ते...ते मार..मार त्याला..'- अण्णांनी वाक्य पुर्ण करण्याआधीच लक्ष्मीने त्यांना अडवलं..

'या अवस्थेत? नाही अण्णा..यावेळी नाही..मारझोड हा प्रत्येक गोष्टीवर उतारा नाही.. आज त्याला आपल्या मानसिक आधाराची जास्त गरज आहे..तस तर ते तुम्हाला नाही कळायचं.. नाहीतर तुम्ही तो याआधी यशोदेला दिला असतात..'- तिच्या खोचक बोलण्यावर सर्वांनी आपल्या माना खाली घातल्या..

'नंदू...अरे दारूने कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे रे आजपर्यंत?? नशेच्या अंमलाखाली काही काळासाठी आपण आपलं दुःख विसरतो.. बास एवढंच ना?? पण जेव्हा नशा उतरते तेव्हा आपल्याला पहिल्यापेक्षा जास्त अपराधी वाटतं.. वाटतं ना रे?'- तिच्या प्रश्नावर नंदूने मान हलवत ते मान्य केलं..

'यशोदेला आजपर्यंत दुखावलं म्हणून तु पिऊन आलास अस तु म्हणतोस...पण तू पिण्याआधी हा विचार केलास का की जर समजा रस्त्यात तुझा काही अपघात झाला असता किंवा तुझ्यासोबत काही दुर्देवी घटना घडली असती; तेव्हा तुझ्या यशोदेसोबत काय झालं असतं??  तिचा दोष नसताना कस तिने समाजाच्या प्रश्नांना तोंड दिलं असतं? तु तिचा विचार केलाच नाहीस माझ्या बंधुराया..जर केला असतास तर तू दारूचा विचारपण केला नसतास.. तु यावेळीही फक्त तुझाच विचार केलास नंदू..फक्त तुझा विचार.. आणि तु एवढा उच्चशिक्षित आहेस त्यामुळे दारूचे दुष्परिणाम मी तुला वेगळे सांगायला नको..'- लक्ष्मीचे शब्द तिखट असले तरी तिची बोलण्यात एकप्रकारची माया होती..

'बरोबर ताई.. चुकलं ग माझं.. मी दारू नाही पियाला हवी होती.. मी आजही फक्त माझ्याच वेदनांचा विचार केला..माझ्यामुळे माझ्या यशोदेला किती वेदना होतील याचा मी विचार केलाच नाही..आणि फक्त तेवढंच नाहीतर माझ्या अशा वागण्याने माई अण्णांना काय भोगावे लागेल हेही मी ध्यानात घेतलं नाही ताई..सॉरी ताई..सॉरी यशोदा..'- नंदूने यशोदेकडे पाहून हात जोडले..

'यशोदे.. ऐक ना तु..बघ इतके दिवस आम्ही तुझ्यात दोष समजून तुझा छळ करत होतो की नाही?? माई तर माझं दुसरं लग्न लावणार होती..आ..आता मी बोलतो.. यशोदा तु..तु दु.. दुसरं लग्न कर.. माझ्यासारख्या वांझोट्याकडून तुला याआधीपण मनःस्तापच मिळाला आहे आणि पुढेही तेच मिळेल.. त्यापेक्षा तु..तु दुसरं लग्न कर..आणि..आणि सुखी रहा..'- नंदूच्या डोळयातून अखंड अश्रुधारा वाहत होत्या..

'खबरदार अस काही मनात आणलं तरी.. बायको आहे मी तुमची.. तुमच्यावरची अशी दहा संकटं माझ्या अंगावर घेईन मी..मी हात जोडते ओ तुम्हांला.. आ..आपण असेच एकत्र राहू.. शेवटपर्यंत एकमेकांना सोबत करू.. माई-अण्णांची सेवा करू.. आपल्या म्हातारपणी जाऊ की एखाद्या वृद्धाश्रमात.. पण आपण एकत्रच राहू.. नंदू.. प्लीज असा अभद्र विचार नका करू.. प्लीज..'- यशोदेने नंदूचा हात पकडला तस दोघांनाही गहिवरून आलं आणि एकमेकांना मिठी मारत त्यांनी जणू त्यांच्या परस्पर प्रेमाची कबुली दिली...

आपल्या सुनेचा इतका छळ करूनसुद्धा तिने आपल्याबद्दल आजही माया दाखवावी आणि तेही जेव्हा तिला तिच्या अपमानाचं उट्टे काढण्याची चांगली संधी असताना तिने खुल्या मनाने आपल्याला माफ कराव; यापेक्षा अजुन काय करू शकते ती? पण आपण कधीच तिचा विचार केला नाही..आपली बायको तिला बोलत राहिली अनं आपण कधीच तिला एका शब्दाने अडवलं नाही..- अण्णांना त्यांचं मन खात होत..

इथे लक्ष्मी नंदू आणि यशोदेला धीर देत होती तितक्यात तिला प्राची उठल्याचं समजलं आणि ती तिच्याकडे निघून गेली.. आत जाऊन ती छोट्या प्राचीला कडेवर घेऊन बाहेर आली..

इतक्या दिवसांत प्राचीची तिच्या मामीशी चांगलीच गट्टी जमली होती त्यामुळे बाहेर यशोदेला पाहताच तिने लगेच तिच्या अंगावर झेप घेतली..

'अले माझ लबाड पिल्लू..मामी इतकी आवडली तुला.. तुला मामीकडेच सोडून मी एकटी घरी जाऊ??'- यशोदेकडे लेकीला सोपवत लक्ष्मीने तिला विचारलं तस प्राचीने निरागसपणे यशोदेच्या गालावर आपले ओठ टेकवले आणि ती लक्ष्मीकडे हसून पाहू लागली..

'अच्छा.. अस काय..आता मामी हवी का..चालेल..मी जाते आता मग..'- लक्ष्मीने जायचं नाटक केलं तस प्राचीने रडायला सुरू केलं..

'अले ले..नाही सोना..मी नाही सोडून जात माझ्या बच्चाला..बघ मी इकलेच आहे..'- लक्ष्मीने तिचा   गालगुच्छा घेतला तशी ती खिदळून हसायला लागली..

दोघी मायलेकींची मस्ती पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुललं होतं.. 

'यशोदा, नंदू..पुढचे एक-दोन तास प्राचीला बाहेर घेऊन जाऊन फिरवून आणा... मला थोडा आराम करायचा आहे..'- लक्ष्मीने जांभया देत दोघांना फर्मान सोडलं तसे दोघे आनंदाने तयार झाले..

'जास्त दूरपण जाऊ नका.. आपल्याला रात्री लवकर जेवणं आटपून अजून एक चर्चा करायची आहे'- लक्ष्मीने आपल्या खोलीत जाताना दोघांना बजावलं तशा दोघांनीपण माना डोलवल्या.. 

लक्ष्मीचं आजच रूप पाहून यशोदा थक्कच झाली होती.. 'मानलं बाई हिला... काश आपण पण हिच्यासारखं असतो.. जेव्हा माया करायची तेव्हा मायाळू स्वभाव, जिथे संघर्ष करायचा आहे तिकडे सडेतोडपणा.. अन्याय सहन न करता तो परतवून कसा लावावा, वेळप्रसंगी आपल्या माणसाला कसा धीर द्यावा, कस त्याला सावरावं हे सगळं शिकावं ते आपल्या नणंदेकडूनच..'- यशोदा मनोमन तिचं कौतुक करत होती..

काही वेळातच नंदू आणि यशोदा छोट्या प्राचीला घेऊन घराबाहेर पडले होते.. ते जसे बाहेर पडले; तशी माई उठून आत जाऊ लागली..

'एक मिनिट माई..'- लक्ष्मीने रूमबाहेर येऊन माईला थांबवलं तशी माईच्या घशाला कोरड पडली.. 

'झालं आता आपलं काही खर नाही..'- माई मनातून घाबरली असली तरी तिने जमेल तसा प्रतिकार करण्याचा ठरवला होता..

'बोल..आल्यापासून आज बोलावं वाटलं तुला माझ्याशी??'- माईने कुजकट सुरुवात केली तशी लक्ष्मी हसली..

'काय म्हणून मी तुझ्याशी बोलावं? तुझं वागणंच अस होत की मलाच तुझी लेक म्हणवून घ्यायला लाज वाटत होती.. इनफॅक्ट आताही वाटतेय आणि यापुढेही जर तु नाही सुधारलीस तर पुढेही वाटेल..'- लक्ष्मीच्या बोलण्यातला रुक्षपणा कळताच माई आतून चरकली..

'का..काय केलं मी...मी अस?? म..मला काय माहीत की नंदूने टेस्ट नाही केल्यात?'- माईनीं पलटी मारली तशी लक्ष्मीची तार सटकली..

'माई.. अग किती निर्दयी आहेस तू?? जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळग...तुला आजही तुझ्या वागण्याचा काहीच वाटत नाही??'- लक्ष्मी कडाडली तशी माई बॅकफूटवर गेली..

'ते..तु..तु मला नको शिकवू'- माईने कसेबसे शब्द जुळवत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला खरा पण पुढच्याच क्षणात त्यांना आपण हे वाक्य बोलून चुकी केल्याची जाणिव झाली..

'माई, मला तुझ्या या वागण्याला हसावं की रडावं हेच कळत नाही ग.. चल बर सोड सगळं.. मला सांग माझा जन्म तुमच्या लग्नानंतर किती वर्षांनी झाला??'- लक्ष्मीचा प्रश्न ऐकताच अण्णांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला..- 'संजना.. गेलीस तु.. सकाळपासून सौम्य रुपात असणारी पार्वती आता रुद्र स्वरूपाची महाकाली बनतेय.. संभाळ बाई स्वतःला..'

'चार वर्षांनी...'- माई

'चार वर्षे ? का? फॅमिली प्लॅनिंग?'- लक्ष्मी..

'आमच्या वेळी कसलं डोंबलाच फॅमिली प्लॅनिंग.. ती थोडी तब्येतीची कुरकुर होती..'- माई

'कोणाच्या? अण्णांच्या?'- लक्ष्मी

'नाही.. माझ्या..पण त्याचा इथे काय सबंध?'- माईने त्रासिकपणे विचारलं..

'तुझ्या गर्भाशयाला सूज होती हेच कारण होतं ना??'- लक्ष्मीने माईच्या डोळ्यांत डोळे रोखून प्रश्न केला तशी माई चपापली..

'तु..तुला को..कोण बोललं हे??'- माईला तिच्या बोलण्याचा रोख लक्षात आला तशी तिला ती पूर्णतः जाळ्यात फसल्याचं कळलं..

'ते जास्त महत्वाचं नाही माई... कारण खर आहे की नाही तेवढं सांग?'- लक्ष्मीचा धारदार आवाज घुमला तशी माईने होकारार्थी मान हलवली..

'मग..चार वर्षे आजी-आजोबांनी तुलापण वांझोटी म्हणून छळले असेल ना ग? तुझं जगणं मुश्किल करून सोडलं होतं ना त्यांनी?'- लक्ष्मीने प्रश्न केला तसे माईच्या डोळयातून नकळतपणे अश्रूंचें काही थेंब ओघळले..

'नाही..कधीच नाही..आई- बाबांनी कधी एका शब्दाने संजनाला दुखावलं नाही..उलटं हिच जास्त टेंशन घ्यायची; आई-बाबा कायम हिला धीरच दयायचे.. नाही काही झालं तरी चालेल; वेळ आली तर कोणी दत्तक घेऊ अस म्हणायचे ते...लोकांचे टोमणे त्यांनी कधीच हिच्यापर्यंत येऊन दिले नाहीत.. किती खटपट केली, किती नवस केले आणि किती डॉक्टरी उपाय केले..कशाचा काय परिणाम झाला माहीत नाही पण बरोबर चार वर्षांनी ऐन नवरात्रीत तुझा जन्म झाला.. घरात देवी आली म्हणून नावरसाला अनुसरून तुझं नाव पार्वती ठेवलं..आणि तुझ्यामागे तीन वर्षांनी नंदू झाला..'- अण्णांनी सारा फ्लॅशबॅक ओपन केला..

'तरीपण आजी-आजोबांकडून तुम्ही काहीच शिकलात नाहीत?'-  लेकीच्या प्रश्नावर निरुत्तरीत अण्णांनी मान खाली घातली.. माईचा चेहरा साफ पडला होता.. त्यांनी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या डोळ्यातला पश्चाताप लक्ष्मीच्या नजरेतून सुटला नव्हता..

'माई, काही गोष्टी प्रकर्षाने लक्षात घे.. आजपर्यत ज्या सुनेचा तु छळ केलास तिच सून आजही म्हातारपणात पण तुमचा सांभाळ करण्याचं कर्तव्य पार पाडण्याची ग्वाही देतेय.. तिच्या मनात लाख वेदना असतील पण तुझ्यासारख तिच मन कलुषित नाही.. तुला हेही कळत नाहीये की आज तु स्वतःच स्वतः करायला समर्थ आहेस; पण म्हातारपणी?? जर जागेवर बसलीस तर ती करेल तुझं आपुलकीने?? नाही माई.. मी ओळखते तिला..ती करेल तुझं सर्व.. तुझं जेवण, औषधपाणी अगदी तुझं आंघोळ आणि बाकी सर्व सर्व..पण त्यात नाही म्हटलं तरी यांत्रिकपणा असेल..आपुलकी नसेल... तु आता जितकी माया लोकांवर खर्च करशील तितकीच तुला आयुष्याच्या उत्तरार्धात कामी येईल.. बघ माई विचार करून शांतपणे.. एक सासू बनून नको..एक आई बनून विचार कर..अगदीच नाही जमलं तर किमान एक स्त्री बनून विचार कर..'- एवढं बोलून लक्ष्मी तिच्या खोलीत परतली होती..

'संजना, शेवटचा चान्स आहे.. आवर स्वतःला.. आताच काय तो कमीपणा घे.. सोन्यासारखी सून आहे.. जप तिला.. माफी माग तिची.. ती मोठया मनाची आहे.. माफ करून क्षणात सर्व विसरून जाईल बघ...'- अण्णांनी  माईला समजवलं..

माई काही काळ स्वतःच्या भूतकाळात हरवून गेली होती.. पुढच्या क्षणाला मनाशी काहीतरी ठरवून ती किचनमध्ये गेली होती..


क्रमशः


© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही.

🎭 Series Post

View all