यशोदा आणि तिचा कान्हा- भाग ३ (मराठी कथा: marathi story)

This part is in continuation with earlier series

               मागील भागाचा सारांश-

मागच्या भागात आपण पाहिलं; शिंदे मॅडमची आतापर्यंतची हिस्टरी माहित असल्यामुळे; यशोदाला त्यांना भेटण्यासाठी भयंकर दडपण आले होते.. पण तिच्या भीतीच्या विपरीत वागत; शिंदे मॅडमनी तिचं नेमकं दुखणं जाणून घेतलं होतं तसेच तिला या परिस्थितीतुन बाहेर काढण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासनसुद्धा दिले होते.. 


यशोदाच्या दुःखामुळे व्यथित असलेल्या शिंदे मॅम; त्यांच्या मनातली सल लक्ष्मीला बोलून दाखवतात.. लक्ष्मी आणि यशोदेच नात काय ? ती यशोदेची मदत करू शकेल का? चला मग वाचूयात या भागात..

             यशोदा आणि तिचा कान्हा- भाग ३

'मावशी, ती माझी भावजय आहे... माझ्या छोट्या भावाची बायको..'- लक्ष्मी खाली मान घालून बोलली असली तरी तिच्या डोळ्यातला अंगार शिंदे मॅमच्या नजरेतून सुटला नव्हता..

'लक्ष्मी, माझा तुझ्यावर पुर्ण विश्वास आहे.. आणि मला पक्की खात्री आहे की तू यशोदेला साऱ्या नरकयातनेतून नक्कीच सोडवशील.... मी तिला अशीही एक आठवड्याची सुट्टी दिलीच आहे.. मी तुला पर्सनली विनंती करेन की तू प्लीज तिच्यासाठी काय तरी कर.. खूप टेन्शनमध्ये आहे ग ती...'- शिंदे मॅडमच्या बोलण्यातून त्यांच्या मनात यशोदेबद्दल असलेली कळकळ समजून येत होती..

'मावशी, हे जग किती विचित्र आहे ना ओ? घरच्या माणसाच्या मनाची, तिच्या वेदनांची जाणिव घरच्यांपेक्षा घराच्या बाहेरच्या व्यक्तीला जास्त असते.. अवघड आहे यशोदेच.. मावशी, तुम्ही आता निवांत राहा.. मी नक्कीच यांतून मार्ग काढेन...पण मला आता निघायला हवं.. उद्या देवकातेंच्या घरात तांडव करायचं आहे ना; तयारी करावी लागेल मला आज...'- हलकं हसून लक्ष्मीने शिंदे मॅडमचा निरोप घेतला..

                                ---##---


दुसऱ्या दिवशी सकाळी माई हॉलमध्ये बसून चहा पीत बसल्या होत्या तर अण्णा समोरच्या खुर्चीवर बसून पेपरमध्ये डोकं घालून बसले होते..

'अहो ऐकलात का? अहो माझा ना उजवा डोळा फडफड करतोय आज.. बायकांची उजवी बाजू फडफडणे अशुभ म्हणायचे आमचे बाबा.. काय आक्रीत घडणार असेल हो? अजून काय घडेल..घरात अशी वांझोटी सून असल्यावर अजून काय होईल.. येईल कोणतरी आणि परत शेण फेकून जाईल...जळलं मेलं आमचं नशीबच फुटक..'- मुद्दाम माईनीं आपला आवाज यशोदेपर्यंत जाईल इतका वाढवला होता..

सकाळ सकाळीच आपला उद्धार ऐकून यशोदाला वाईट वाटलं होतं.. पण रोजच्या सवयीमुळे तिच्यासाठी हा हलकासा टोमणा होता आणि त्याने तिला काही विशेष फरक पडणार नव्हता..

'कोणी परत शेण फेकून जाईल? म्हणजे घरात अस किती शेण जमा केलं आहेस माई?? जागा उरली नसेल तर सगळ्यांच्या डोक्यात पण शिरलं  असेल ना ग...शेण म्हणतेय मी..'- लक्ष्मीने दरवाज्यातुन खड्या आवाजात म्हटलं तसा माईना हलका ठसका लागला..

'अरे देवा या साठी डोळा फडफडत होता की काय?'- लक्ष्मीचं खोचक बोलणं ऐकून माई स्वतःशीच बोलल्या..

'अरे बाळा, ये ये..आत ये.. बाहेर का थांबलीस?'- लेकीला आणि नातीला- प्राचीला पाहून अण्णांना आनंद वाटला..

'थांब ग तिथेच.. आरतीचं ताट आणते.. नजर काढते अन मगच आत ये.. यशोदा ताट आण ग आरतीच..लक्ष्मी आली आहे माझ्या एकुलत्या एक नातीला घेऊन'- माईनीं आवाज दिला तसा  यशोदेला त्यातला त्यांचा एकुलत्या एक शब्दावरचा जोर ऐकून हसू आलं होतं.. त्याच वेळी लक्ष्मी येण्याने ती सुखावली होती.. आता पुढचे काही क्षण तरी तिला मनःशांती लाभणार होती..

यशोदा ताट तयार करून बाहेर आली होती... छोटी प्राची किलकिल्या नजरेने सर्वांना पाहत होती.. तिचा गोड रूप पाहून यशोदा आपलं भान हरपली होती.. नेमकी प्राची तेव्हाच तिच्याकडे बघून हसली तशी ती अजूनच हरवून गेली आणि माई आपल्या ताटासाठी खोळंबून आहेत याचा देखिल तिला विसर पडला..


'दुसऱ्याची पोर पाहून झालं असेल तर ते ताट दे इकडे.. आणि मी तिची नजर काढेपर्यंत स्वतःच्या खोलीत जाऊन बस..'- माईनीं तुसडेपणाने म्हटलं तस यशोदेच्या डोळयांत टचकन पाणी आलं.. माईच्यां हातात ताट देऊन ती मागे फिरणार तितक्यात लक्ष्मीने आवाज दिला..

'जागेवरच थांबायचं यशोदा.. कुठे नाही जायच तु... माझी लेक अख्या घरात फक्त तुझ्याकडे बघून हसली आहे.. आणि तुला तर माहीतच आहे ना; छोटी मुलं म्हणजे देवाचं रूप.. आणि देव फक्त निरागस लोकांवरच लोभ ठेवतो.. त्यामुळे जर आमची नजर कोण काढणार असेल तर ती तूच.. दुसरं कोणी नाही.. माई;  ताट यशोदेकडे दे..'- लक्ष्मीने करड्या आवाजात फर्मान सोडलं तस माईनी ताट निमूटपणे तिच्याकडे दिलं..

ओवाळणी होताच लक्ष्मी आत येऊन बसली तशी तिने प्राचीला मुद्दाम यशोदे कडे दिलं आणि माईनां पाणी आणण्याची विनंती केली..

काही वेळ औपचारिक गप्पा आणि चौकश्या झाल्या तोच दरवाजात यशोदेचा भाऊ प्रशांत आला होता.. त्याला बघून यशोदेला आनंद झाला तर माईच्यां कपाळाला आठ्या पसरल्या..

'अरे, प्रशांत ये आत.. बस..यशोदा मीच बोलवून घेतलं त्याला..खरतर तुझ्या आई-वडिलांना बोलवायचं होतं पण प्रशांत बोलला की त्यांना ताण पडेल म्हणून तोच आला..'- लक्ष्मीने यशोदेच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर दिलं..

'पण ताई? मला समजलं नाही.. अस अचानक?'- यशोदेने गोंधळून प्रशांतकडे पाहिलं तर त्यानेसुद्धा खांदे वर करून आपल्याला काही माहीत नसल्याचे सांगितले..

'सांगते.. पण त्याआधी एक मिनिट..नंदू..नंदू.. निमूटपणे बाहेर ये.. नाहीतर मी आत आले तर तुझी खैर नाही बघ..'- लक्ष्मीने आवाज देण्याचा अवकाश; पुढच्याच मिनिटाला नंदू तिथे येऊन उभा राहीला होता..

'ता..ताई..कशी आहेस??..मला बोलवलं?'- बहिणीच्या फटकळपणाची भीती असल्याने नंदू मनातून पुरता घाबरून गेला होता..

'बर.. यशोदा नंदू आला आहे इकडे.. आता तू आत जा.. तुझी बॅग भर.. आणि चालती हो या घरातून.. परत पाऊल टाकायचं नाही या घरात..'- लक्ष्मीने शांतपणे यशोदेला सांगितलं तसे सर्व जण शॉक लागल्यासारखे जागीच थिजून गेले होते..

माईनां काहीच सुचत नव्हतं; त्यांना मनोमन ही वादळापूर्वीची शांतता वाटत होती..अण्णांनी तर मनातल्या मनात गणेश संकटनाशन स्त्रोत्र बोलायला घेतलं होतं.. नंदूच शरीर भीतीने गार पडायला लागलं होतं.. 

'ता..ताई..का अस?'- यशोदा..

'ताई..अस नका करू..तुम्ही आलात म्हणून मी खूप आशेने आलो आहे.. प्लीज ताई..'- प्रशांत

'यशोदे, मी काय बोलली ते ऐकलं नाहीस का? जा बॅग भर आणि निघ इथून.. लायकी नाही या घराची अन घरच्यांची तुझ्यासारख्या मुलीला सांभाळायची.. वय किती तुझं? ३२ ना? सोड हा भित्रा कोल्हा.. घटस्फोट घेऊन टाक याच्याशी.. जा बाहेर लाख चांगली मुलं भेटतील..निघ आणि सावर स्वतःच आयुष्य..'- लक्ष्मी अजूनही शांतपणेच वाक्य उच्चरत होती..

माईनां आता त्यांचा डोळा फडफड करण्यामागचा अशुभ संकेत समोर दिसत होता... 

'हा...जा घेऊन जा तुझ्या बहिणीला.. मी पण बघतेच ना की कोण ही भाकड गाय गळयात मारून घेत ते.. आणि ही ब्याद जाईल तर चांगलीच आहे.. माझ्या नंदुसाठी चांगली बायको शोधून आणेन मी..'-माईनीं पण आता त्यांची शस्त्रे परजली होती..

'आणि माई समज.. दोष तुझ्या लेकातच असेल तर??'- लक्ष्मीने थंडपणे प्रतिप्रश्न केला..

'का..काय बो..बोलतेस तु?? स्वतःच्या भावाबद्दल अस बोलतेस?'- माई..

'हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही माई.. कशावरून दोष नंदू मध्ये नाही??काही पुरावा?? यशोदा.. आत जा आणि तुमचे सर्व टेस्ट रिपोर्ट घेऊन ये जा..'- लक्ष्मीचा स्वर हळूहळू वाढू लागला होता तस अण्णांच्या मनातलं स्तोत्रपठणपण सुद्धा फास्ट होऊ लागलं होतं..

काही क्षणातच यशोदेने साऱ्या फाईल आणल्या तशा साऱ्या फाईल लक्ष्मीने नंदू पुढे सरकवल्या..

'यातून तुझ्या टेस्टची फाईल शोधून दे..'- लक्ष्मीने नंदूला म्हटलं तशी त्याची चलबिचल झाली आणि त्याने नकारार्थी मान हलवली..

'का?? एवढा कॉन्फिडन्स? की भीती? आपलं गुपित उघड झालं तर समाज काय बोलेल? काय तर शेण..शेणच ना?? शेण फेकून मारेल.. बरोबर ना? नंदू तुझ्याशी बोलतेय मी.. ऐकू येतंय का??'- लक्ष्मीचा आवाज वाढला होता..

'ते...ते माईने ग..गरज नाही म्हणून सांगितलं होतं..'- कसेबसे शब्द जुळवत नंदूने उत्तर दिलं..

'बघितलं प्रशांत..म्हणूनच तुम्हाला बोलवून घेतलं मी इकडे..अजूनही सांगते; घेऊन जा  तुमच्या बहिणीला इकडून..मी सांगते की माझा भाऊ भ्याड आहे.. तो कधीच तुमच्या बहिणीसाठी उभा राहणार नाही'..

'ये मूर्खा.. यशोदे बरोबर लग्न तु केलं आहेस की माईने केलंय?? सात फेरे घेताना दिलेली वचनं ऐकली होतीस ना की लक्ष दुसऱ्या मुलींकडे होतं अन वचनं नेमकी काय दिली हेच माहीत नाही?? अरे काय लाज वाटते की नाही?? कुठे आहेत तुझे टेस्ट रिपोर्ट?? आणि नाही आहेत तर का नाही??'- लक्ष्मीचा स्वर आता तारसप्तकाला भिडला होता..

माईनापण आता समजून चुकलं होतं की आता हे वादळ चांगलंच गरजणार आहे त्यामुळे त्यांनीपण  शक्य तितका वेळ शांत बसण्याच ठरवलं...

'सॉरी ताई..मी..मी करून घेईन टे.. टेस्ट..'- नंदू

'मग अजून पर्यंत का नाही केलीस तु टेस्ट?? पाच वर्षे तुझ्या बायकोवर लोक शिंतोडे उडवत राहिले.. ती एकटीच बिचारी सगळं सहन करत राहीली.. तिचं रडू बघून तुला एकदापण वाटलं नाही का रे तिला सावरावं? स्वतःहुन आपली टेस्ट करून घ्यावी..सांग नंदू.. सांग.. आज हे प्रशांत नसते ना तर अण्णांच्या बेल्टने चांगलाच फोडून काढला असता मी तुला..'- बोलता बोलता लक्ष्मीने रागाने आपला हात सोफ्यावर आपटला तसा नंदू घाबरला..

'ताई..मला माफ कर.. चुकी झाली माझी..मी..मी उद्याच टेस्ट करून घेईन.. प्रॉमिस..'- नंदूच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं होतं..

'ये मोठ्या प्रॉमिसवाल्या.. बायकोला दिलेली प्रॉमिस आठवत नाहीत आणि मला अजून एक प्रॉमिस.. उद्या वगैरे काही नाही.. आताच्या आता घरातून चालू पडायचं.. मी पत्ता देते; तिथे जाऊन ताबडतोब टेस्ट करून यायचं.. कळलं? चल निघ इथून..उठ.. आणि एक मिनिट..काय बोललास तु? सॉरी ना?? ये असा पुढे ये...घाल त्या यशोदेच्या पायाशी लोटांगण..'- लक्ष्मी कडाडली तशी यशोदा थक्क होऊन तिच्याकडे बघतच राहीली..

'हे आई, तुलाच काळजी ग माझी.. शेवटी तूच आलीस ना ग नणंदेच्या रुपात?'- मनोमन देवीची प्रार्थना करत असतानाच तिला नंदू तिच्या पायाशी दिसला..

'अहो, काय करताय तुम्ही..तुम्ही माझे पती आहात.. माझ्या कुठे पाया पडता??'- यशोदा मागे सरकून बोलली..

'पडू दे ग मला..पडू दे.. आज ताईने धिक्कार केला नसता तर कदाचित मी तसाच राहीला असतो ग.. ती बरोबर बोलतेय..माझी लायकीच नाही नवरा म्हणवून घेण्याची.. इतके वर्षे तुझ्यावर लोक चिखल फेकतच राहिले पण मी कधी समोर येऊन कोणाला त्यापासून अडवलं नाही.. बाहेरचे सोड; घरच्या लोकांच्या टोमण्यापासून तुझी सुटका नाही करू शकलो मी.. माफ कर ग मला..मी दोषी आहे तुझा..दोषी आहे तुझा..माफ कर यशोदे..'- नंदू हसमसून रडत होता तशी यशोदेने खाली वाकून त्याला उठवून उभं केलं..

'जाऊ द्या ना ओ.. जे झालं ते सोडून द्या..माझे भोग असतील मागच्या जन्माचे..तुम्ही असे तुटून नका जाऊ..तुम्ही मला कालही प्रिय होतात, आजही आहात आणि पुढेही असाल..'- यशोदेने नंदूच्या डोळ्यातले अश्रू फुसले तसे त्याने तिला पटकन मिठी मारली.. काही क्षण एकमेकांना सावरण्यात गेल्यावर; नंदू टेस्ट साठी निघून गेला होता..

'या यशोदा बाई..सॉरी संतश्रेष्ठ यशोदा नाही का बाई तुम्ही??'- लक्ष्मीने आपल्याकडे मोर्चा वळवल्याचे समजताच यशोदेला धडकी भरली..

'मोठी बहीण बोलायचीस ना मला?? कशाला?? फक्त तोंडाला पाणी पुसायचं म्हणून??? आणि मला मोठी बहीण म्हणतेस तर का नाही इतक्या वर्षांत मला हे कळलं?? का इतके दिवस अत्याचार सहन करत बसलीस?? अग तु सहन करत राहिलीस म्हणून या लोकांची इतकी हिम्मत झाली.. वेळीच अडवलं असतेस किंवा निदान मला सांगितलं असतेस तर इतक्यात उपायपण सापडला असता ना ग..'- लक्ष्मीचं बोलणं ऐकून यशोदेने मान खाली घातली होती.. पुढच्याच क्षणाला ती लक्ष्मीच्या समोर जाऊन जमिनीवर बसली.. लक्ष्मीच्या मांडीवर डोकं ठेवून तिने आपल्या नेत्रांतून अश्रूंना वाट मोकळी करून दिली..

'सॉरी ताई..मला वाटलं सगळं थांबेल हे..आज थांबेल, उद्या नाहीतर परवा तरी थांबेल.. पण अस करता करता पाच वर्षे गेली पण माझी काही हिम्मत झालीच नाही ताई.. सॉरी ताई..'-यशोदा स्फुंदून रडत होती..

'शांत हो..यशोदे..आता मी आली आहे ना.. सर्व ठीक होईल... एवढा वेळ नाही सहन करायचं ग..दुःख वाटल्याने हलकं होतं ना ग.. बघ आता नंदूला कशी त्याची चूक लगेच कळाली.. तु वेळीच मदत मागायला हवी होतीस..चल आता सावर स्वतःला..'- लक्ष्मीच्या डोक्यावरून हात फिरवत लक्ष्मी तिला धीर देत होती..

'प्रशांत, तुम्ही मुलीकडचे म्हणून तुमची बाजू कधी पडती समजायची नसते.. समजलं?.. मुलगी सासरी गेली याचा अर्थ ती तुमच्यासाठी मेली असं तर नाही ना? तिच्या हक्कांसाठी, तिच्या आत्मसन्मानासाठी माहेरच्यांनी उभं राहिलंच पाहिजे.. मुलीनेपण माहेरची जबाबदारी उचलावी आणि माहेरच्यांनी पण तिची जुनी जागा कायम जपून ठेवावी.. तुम्ही वेळेवर कठोर झाला असतात तर आज तुमच्या बहिणीवर ही वेळ आली नसती.. बर..आता तुम्ही निघा.. हे सगळं निस्तारल की बहिणीला आवर्जून घरी घेऊन जा काही दिवस..'- लक्ष्मीने प्रशांतलापण मवाळ शब्दांत समज दिली होती..

सर्वांचा निरोप घेऊन प्रशांत घरी निघाला..तो घराबाहेर पडताच अण्णा आणि माईला घाम फुटू लागला होता कारण लक्ष्मीच्या तडाख्यातून अजूनपर्यंत तरी फक्त ते दोघेच वाचले होते..

'माई, अण्णा आता काय ते मनपसंत जेवून घ्या.. कारण आज संध्याकाळपर्यंत तुमच्या चिरजीवांचे रिपोर्ट्स येतील; अस नको होवो की ते वाचून तुमचं जेवण सुटायचं..बाकी माझ तुमच्या वाटणीच औषध बाकी आहे ते मी रात्री देईनच..'- एवढं बोलून लक्ष्मी प्राचीला दूध पाजण्यासाठी आत घेऊन गेली होती..

'खरी जगन्माता ग तु..खरी आदिमाया..'-यशोदा तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे थक्क होऊन पाहत होती.. नकळत तिचे हात जोडले गेले होते..

क्रमशः


© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..

🎭 Series Post

View all