यशोदा आणि तिचा कान्हा- भाग 2 (मराठी कथा: marathi story)

This part is in continuation with earlier series

मागील भागाचा सारांश-

यशोदा एक उच्चशिक्षित आणि नामांकित कंपनीमध्ये उच्चपदावर असणारी स्त्री.. लग्न होऊन पाच वर्षे झाली तरी अपत्यसुखापासून वंचित असल्यामुळे तिला सासरचे टोमणे ऐकावे लागतात..साऱ्या प्रकारात आपलीच चूक समजून; मन मारून जगत असलेली यशोदा, मनातली घुसमट व्यक्त न केल्यामुळे तिला होणारा मानसिक त्रास आपण वाचलात..  व्यक्तिगत आयुष्यासोबत आता तिच्या नोकरीवरसुद्धा आलेलं गंडांतर टळेल की त्यातूनच तिच्या सुटकेचा मार्ग निघेल, वाचूयात या भागात..

             यशोदा आणि तिचा कान्हा- भाग २

'मे आय कम इन मॅम'- भीतीने दडपलेल्या उराने यशोदेने शिंदे मॅडमच्या केबिनच्या दरवाजावर नॉक करत आत येण्याची परवानगी मागितली..

'येस.. मिसेस. देवकाते.. बसा'- शिंदे मॅडमनीं तिला समोर बसायला सांगितलं तस तिला थोडं अवघडल्यासारखे झाले.. 

एकतर कंपनी व्यवस्थापणामधील सर्वात कडक शिस्तीची अधिकारी म्हणून असलेला त्यांचा लौकिक आणि त्यातही लोअर पोस्टवरच्या लोकांना त्यांनी भेटायला बोलावणं म्हणजे त्या व्यक्तीला आयुष्यभराची फायरिंग एकाच दिवसांत आणि ती पण काही मिनिटांत भेटणार एवढं एकच फिक्स असायचं....

आधीच मेमोमुळे डिस्टर्ब असलेल्या यशोदेला; यामुळेच शिंदे मॅडमच्या बोलावण्याचं भयंकर दडपण आलं होतं.. समोरच्या खुर्चीवर बसूनपण यशोदेची त्यांच्या नजरेला नजर मिळवण्याची हिंमत होत नव्हती.. मान खाली घालून, बोटांनी आपल्या ओढणीशी विनाकारण चाळे करत यशोदा; शिंदे मॅडमचा चेहरा चुकवत बाकी सगळीकडे नजर फिरवत बसली होती..

'टिपिकल लो कॉन्फिडन्स केस.. तुम्हांला मेमो देण्याऐवजी सरळ डिसमिस करायला हवं होतं.. राईट मिसेस. यशोदा देवकाते??'- शिंदे मॅडमनी त्यांच्या करड्या आवाजात केबिनमधल्या शांततेचा भंग केला..

डिसमिस शब्द ऐकताच; यशोदेच्या डोळ्यातून अश्रुंचे टपोरे थेंब टपटप बाहेर पडू लागले..तिने एकवार शिंदे मॅडमकडे पाहून लगेच मान खाली घातली होती.. हळूहळू तिला आवेग आवरेनासा झाला तशी ती स्फुंदत रडू लागली..

'हॅलो, राजू? बाळा माझ्या केबिनमध्ये, दोन लाटे कॉफी आणि दोन चीज सँडविच पाठवून दे..आणि बाळा, येताना डोअर नॉक करून येशील.. मी आतून हो म्हटल्याशिवाय आत येऊ नकोस.. कळलं??'- शिंदे मॅडमनी ऑफिस बॉयला फोन करून सूचना केली होती..

शिंदे मॅडमच्या आवाजाची सॉफ्ट टोन आणि त्यांनी दिलेली ऑर्डर ऐकून यशोदेने चमकून त्यांच्याकडे पाहिलं तशा त्या हलक्या हसल्या..

'हेच आवडतं ना तुम्हांला स्नॅक्स म्हणून?? म्हणजे आपल्या ऑफिस रेकॉर्डस् मध्ये तुमच्या नावावर याच ऑर्डर जास्त वेळा आहेत.. म्हटलं आज आपण पण बघू ट्राय करून.. कळेल तरी की याने नेमकं डिप्रेशन येतं की दारू सारखं याने डिप्रेशन कमी जाणवतं..'- शिंदें मॅडम खळखळून हसत होत्या..

त्यांना तस हसताना पाहून यशोदा  गोंधळली होती.... एकतर मेमोमुळे आणि शिंदे मॅडमच्या वन टू वन मिटिंग कॉलमुळे आधीच तिचा जीव घाबरघुबरा झाला होता आणि त्यात आता मॅडमच असं वागणं पाहून तिला त्यांच्यासमोर कसं रिऍक्ट करावं हेच सुचत नव्हतं.. 

तिचा गोंधळ पाहून, शिंदे मॅडम काही बोलणार तितक्यातच बाहेरून राजूने आवाज देत आत येण्याची परवानगी मागितली होती..परवानगी देताच आत येऊन त्याने कॉफी आणि सँडविच टेबलवर ठेवून आणून ठेवलं होतं..

'मिसेस. देवकाते, खाऊन घ्या'- राजू बाहेर जाताच एक सँडविच स्वतः उचलून शिंदे मॅडमनी दुसरं सँडविच तिच्या पुढे केलं होतं..

'मॅ.. मॅम.. ते.. ते.. भूक नाही मला.. थँक्स..'- कसेबसे शब्द जुळवत यशोदेने सँडविच खाण्यासाठी इच्छा नसल्याची त्यांना कल्पना दिली..

'मी तुला, तु खाणार का असं विचारलेल नाही यशोदा.. तुला हे खावंच लागेल.. वाटल्यास माझी ऑर्डर समज..'- शिंदे बाईनी कडक आवाजात तिला दरडावल..

यशोदेने निमूटपणे सँडविचचा एक पीस उचलून खाण्यास सुरुवात केली.. खाता खाता परत तिला आठवू लागलं होतं; आज माईनीं सकाळी घरातून निघता निघताच सर्वांसमोर पुन्हा एकदा तिचा पाणउतारा केला होता... नेहमीप्रमाणे आजही नंदू  माईसंमोर मान खाली घालून उभा राहीला होता.. त्यात इकडे ऑफिसमध्ये आल्या आल्या दोन तासांतच तिला वॉर्निंग नोटीस मिळाली होती..दिवसाची सुरुवातच अशी भकास झाल्यामुळे तिची अन्नावरची वासना उडून गेली होती.. हाऊस किपिंगवाल्या पोराला आपला टिफिन देऊन; ती स्वतः मात्र आपल्या दुर्भाग्याचं दुःख रवंथ करत बसली होती.. 

दोघींचं खाऊन झालं झालं तस यशोदेने सर्व प्लेट्स व्यवस्थित एकत्र करून बाजूला ठेवून दिल्या होत्या.. 

' यशोदा, हे तर राजूचं काम आहे... तो करेल.. तु आपला वेळ का विनाकारण वाया घालवते आहेस??'- तिचा टापटीपपणा पाहून शिंदे बाईनी तिला विचारल..

'मॅम, तो पण माणूसच आहे ना.. आणि हे करायला मला कितीसा वेळ लागला.. काही सेकंदच.. माझ्या काही सेकंदाच्या कामाने कोणाचं काम कमी होणार असेल तर मी ते का न करावं??'- उत्फुर्तपणे यशोदा बोलून गेली तस शिंदे मॅडमच्या चेहऱ्यावर हलकं स्मित पसरलं..

शिंदे मॅडमनी, आपला लॅपटॉप बाजूच्या LCD स्क्रीनला कनेक्ट केला तसे स्क्रीनवर काही ग्राफ्स दिसू लागले..

'यशोदा, तु जेव्हापासून ही कंपनी जॉईन केली आहेस, तेव्हापासूनचा हा तुझा परफॉर्मन्स..त्याचाच हा ग्राफिकल डाटा आहे.. माझ्याकडे जेव्हा तुमच्या नोटीसची कॉपी आली तेव्हा तुमच्या लीडकडून मी हा डाटा मागवून घेतला.. तुम्हांला या कंपनीमध्ये एकंदरीत दहा वर्षे झालीत.. त्यातली सुरुवातीची सहा वर्षे तुमची कामगिरी ही सर्वांपेक्षा कितीतरी पटीने चांगली आहे.. चार वर्षे तुम्ही कंपनीचे बेस्ट एम्प्लॉयी ऑफ द इयर चे मानकरी होतात..या शीटमध्ये तसे रिमार्कपण आहेत मेंशन केलेले..पण मागचे चार वर्षे तुमचा ग्राफ सलग उतरणीला लागला आहे.. लास्ट टू इयर्स तर तुमचा परफॉर्मन्स वर्स्ट आहे.. इतका की हाऊसकिपिंग स्टाफ पण तुमच्यापेक्षा जास्त बेटर काम करतोय..'- शिंदे मॅडम टोचून बोलत असल्या तरी त्यांच्या आवाजाची पट्टी अजून वाढली नव्हती..

काही वेळापूर्वी स्वतःला सावरलेली यशोदा पुन्हा एकदा हसमसून रडू लागली होती.. तिला प्रयत्न करूनपण स्वतःच रडणं थांबवता येत नव्हतं.. शेवटी वैतागून तिने केबिन बाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता.. मॅडमची गैरमर्जी झाली तर सरळ राजीनामा देण्याच्या निर्णयाप्रत ती आली होती.. तिने खुर्चीवरून उठण्याचा प्रयत्न करताच; शिंदे मॅडमनीं तिच्या हाताला धरून तिला खाली बसायला सांगितले होते..

'बाळ, खाली बस आधी.. लढाई अशी अर्ध्यावर सोडून कशी चालेल ग?'- मॅडमच्या तोंडून प्रेमळ शब्द बाहेर पडताच यशोदेने त्यांच्याकडे पाहिलं तस त्यांच्या डोळयांत तिला कारुण्य दिसलं.. नकळत यशोदा परत खुर्चीवर बसली..

'बघ, मी ना तुझी आई की ना तुझी सासू.. तुला काय त्रास होतोय तो इथे कोणालाच माहीत नाही.. मला तुझी मैत्रीण समज आणि तुला जस वाटेल, जितकं मन मोकळं करावंसं वाटलं; बिनदिक्कत कर.. आज मात्र तु बोलायचंच यशोदे.. अग किती दिवस स्वतःचा डब्बा हाऊस किपिंगवाल्याला देऊन स्वतः उपाशी राहणार आहेस.. आजकल कधीही पाहावं तर शून्यात नजर लावून असतेस.. अचानक रडू लागतेस? बाळ, अग ; माणसानं व्यक्त व्हावं.. भले तुझ्या प्रॉब्लेमच माझ्याकडे सोलूशन नसेल पण माझ्याशी बोलून किमान तुझं मन तरी हलकं होईल.. आणि जर माझ्याने तुझा प्रॉब्लेम संपत असेल तर मी नक्कीच तो निकाली काढेन..पण बोल बेटा... तुला आज सांगावच लागेल यशोदा.. मला माझ्या एका टॅलेंटेड एम्प्लॉयच करीअर असं वाया जाऊ द्यायचं नाहीये.. यशोदा? ऐकतेस ना?'- शिंदे मॅडमनी आपला हात तिच्या हातावर ठेवून तिला नजरेनेच धीर दिला..

मॅडमच्या प्रेमळ स्पर्शाने यशोदा शहारली.. आज कित्येक दिवसांनी कोणी तरी तिच्याशी इतकं आपुलकीने बोलत होतं.. तिने तिची नजर मॅडमच्या डोळ्यांकडे नेली खरी पण तिच्या वेदनांची खोली इतकी जास्त गहन होती की नेमकं कुठली मोजमाप सांगावी हेच तिला कळत नव्हतं.. काहीच बोलता येत नसल्याने तिच्या डोळ्यांत आसवांचा खळ साचू लागला होता..

'बोल यशोदे.. बोल बाळा..'

'मॅडम.. मॅडम.. नाही कळत ओ मला.. कुठून सुरुवात करायची हेच सुचत नाहीये.. आई बनू शकत नाही याची सल सांगू? की मातृत्वप्राप्ती नाही झाली म्हणून घरच्या आणि आजूबाजूच्या लोकांकडून ऐकाव्या लागणाऱ्या टोमण्याचं दुःख सांगू? की त्याहीपेक्षा सगळं कळूनही; मला मानसिक आधार नाकारणाऱ्या नवऱ्याचा भ्याडपणा सांगू.. नाही.. नाही सांगता येत.. मला नाही सांगता येत.. काहीच सुचत नाहीये.. नाही सहन होत आता.. माझ्यामुळे माझ्या घरच्यांना विनाकारण ऐकावं लागतंय; अपमानित व्हावं लागतंय.. काय करू हेच नाही समजत.. किती टेस्ट केल्या, किती डॉक्टरी अन किती धार्मिक उपाय केले पण..पण कुठेच गुण नाही ओ.. मला.. मला ना मॅम कधी कधी मरावस पण वाटतं.. पण ती पण डेअरिंग होत नाही ओ मॅम माझी.. काय चुकतंय ओ मॅम माझं?'- यशोदेने एका दमात आपलं सारं दुःख शिंदे मॅडमसमोर मांडला तस तिला थोडं हलकं वाटू लागलं.. 

शिंदे मॅडमनी तिच्या हातावर थोपटून तिला धीर दिला तशी ती हलकीशी शांत झाली.. तरीपण एखाद्या नुकत्याच सुकलेल्या जखमेची आपण उगाचंच खपली काढावी आणि मग त्यातून रक्त वाहून आपल्यालाच त्रास व्हावा, मॅडमकडे मन मोकळं करताना; यशोदेची अवस्था तशीच काहीशी झाली होती.. मागची पाच वर्षे तिच्या डोळ्यासमोरून सरसर फिरत होती.. त्यातही मागच्या तीन वर्षातल्या मानसिक वेदनांची कळ तिला आजही जाणवत होती.. तिचे भोग ऐकून स्वतः शिंदे मॅडम आतून हादरल्या होत्या.. 

"बापरे...केवढं भयंकर.. कसं सहन केलं इतकं या पोरीने...आता कसा हिला समजावून सांगू रे बाप्पा.. तूच काहीतरी मार्ग सुचव.."- डेस्कवरच्या श्रीगणेश मूर्तीला मनोमन हात जोडून त्यांनी प्रार्थना केली..


'म..मग तु सांगत का नाहीस त्यांना की त्यांचं बोलणं तुला इतकं हर्ट होतं म्हणून??'- काहीतरी सुरुवात करावी म्हणून शिंदे मॅडमनी तिला विचारलं तशी ती त्याही मनस्थितीत खिन्न हसली..

'तुम्हांला काय वाटतं माझे अश्रू त्यांना दिसत नसतील??  चारचौघांत आपल्या निपुत्रिकपणाची कोणी जाणीव करून दिली तर कोणाला स्वतःचा आवेग रोखता येईल मॅडम?'- यशोदेने प्रतिप्रश्न केला..

'ते पण आहे म्हणा.. मग तु त्यांना प्रतिउत्तर का देत नाहीस??'- शिंदे मॅडम..

'ते.. ते.. तुम्ही मघाशी बोललात ना टिपिकल लो कॉन्फिडन्स.. तेच.. दोष आमच्या आई-बाबांच्या चांगल्या संस्काराचा आहे मॅम.. दोष माझा आहे की मी ते कायम स्वतःवर बिंबवून ठेवले..नेहमी वाटायचं; आपण चांगल तर जग चांगल.. त्या घराला मी माझं समजले, सासू-सासऱ्यांना माझे आई-बाबा समजले पण त्यांनी मला कायम परकीच मानलं, मी त्यांची सूनच राहिली.. नवऱ्याच काय.. त्यांना काही म्हणावं तर समाज बोलणार की बायकोने नवऱ्याचे कान भरले, नवऱ्याला आई-बापापासून तोडलं... आपला समाज तरी कुठे एका तोंडाने बोलतो मॅडम..'- यशोदा हळूहळू शांत होत होती.

दोघी बराच वेळ गप्पा मारत बसल्या होत्या.. यशोदा भरपूर दिवसांनी कोणाशीतरी इतकं मनमोकळेपणाने बोलत होती.. आपले आतापर्यंतचे सारे भोग तिने शिंदेमॅडम समोर ठेवले होते.. अचानक तिला खूप वेळ आपण असेच वाहवत गेल्याची जाणीव झाली तशी ती आपल्या जागेवरून उठली..

' मॅडम, तुम्ही स्वतःचा एवढा सारा अमुल्य वेळ देऊन; माझी चौकशी केलीत, मला सहानुभूती दर्शवलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.. खरंच आता खूप हलकं वाटतंय मॅम.. थँक्स.. पण.. पण.. मला अस वाटतं की जर माझं काम बरोबर नसेल तर तुम्ही मला डिसमिस केलेलंच चांगलं.. विनाकारण माझ्या पर्सनल इश्यू मुळे तुम्हांला कोणाचं ऐकावं लागू नये..पण आज एक गोष्ट कळली की तुम्ही..तुम्ही जितक्या कठोर वाटता, वागता तितक्याच तुम्ही आम्हां सर्व एम्प्लॉयीचीं काळजीसुद्धा घेता.. आजच्या घडीला तेच जास्त दुर्मिळ आहे मॅम..'- यशोदेने नकळत शिंदे मॅडमसमोर हात जोडले..

'अग, आम्हांला पण मन असत ग.. पण तुला सांगते; या कंपनीच्या सुरुवातीच्या दिवसापासून मी कंपनीसोबत आहे.. आम्ही काही सिनिअर मंडळींनी आमच्या रक्ताचं पाणी करून ही कंपनी नावारूपाला आणली आहे अस म्हटलंस तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही.. परंतु काहीजणांना कदर नाही ग कंपनीची; मग अशी लोक समोर आली की आमचं पित्त खवळत.. कामचुकार लोकांना मी कधीच सोडत नाही.. पण मी आतापर्यंत एकदाही एकतर्फी निर्णय घेतला नाही.. सगळ्या बाजूने विचार करून, योग्य ती माहिती जमा करूनच आम्ही योग्य तो निर्णय घेतो.. आता तुझ्याच बाबतीत बघ ना..आम्ही तुला तडकाफडकी काढू शकलो असतो.. पण तुझा बॅकग्राऊंड पहिला; पास्ट-रेकॉर्ड पहिला आणि मला डाऊट आला.. बघ बर झालं ना, तुझ्याशी बोलली ते..तुला पण किती हलकं वाटलं.. किमान नोकरीबाबतचा ताण तरी मी हलका करेन तुझा..'- शिंदे मॅडम जागेवरून उठून यशोदेजवळ जाऊन उभ्या राहिल्या होत्या.. 

'म्हणजे??'- यशोदा..

'तु एक वीकचा ब्रेक घे.. आय मीन सुट्टी घे.. मी सांगते तुझ्या लीडला..या एक वीकमध्ये; तु स्वतःच आत्मचिंतन कर.. तुला स्वतःला जितकं बदलता येईल तितका प्रयत्न कर.. या पुर्ण लिव्ह पिरियडमध्ये तुला डेली माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे.. मी बघते तुझ्यासाठी अजून काही करता आलं तर.. डोन्ट वरी.. तुझ्या फॅमिली मॅटर मध्ये मी ढवळाढवळ करणार नाही... बट तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये काही बदल घडवून तुझा आत्मविश्वास वाढवू शकलो तर आपण ट्राय करूयात.. चल आता आपण निघुयात.. मला संध्याकाळी सातपर्यंत एका ठिकाणी पोहचायच आहे.. चल बाय.. बट कीप इन माइण्ड.. काहीही स्ट्रेस घ्यायचा नाही.. अगदीच वाटलं काही बोलावसं तर बिनदास्त मला फोन करायचा..'- यशोदेच्या डोक्यावरून हात फिरवून; शिंदे मॅडम केबिनबाहेर पडल्या..

'किती चांगल्या आहेत मॅम.. उगाच सर्वजण खडूस म्हणतात यांना.. मलासुद्धा यांच्यासारखं स्ट्रॉंग राहता आलं असतं तर??'- यशोदा आज खूप मोठया कालावधीनंतर हलकीशी सुखावली होती..

                                   --#--


शिंदे मॅडमच्या मुलाचा आज अठरावा वाढदिवस होता.. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्या मुलाचा वाढदिवस; अनाथ मुलांसोबत साजरा करण्यासाठी #### संस्थेत सहपरिवार आल्या होत्या..
 
केक कापून झाल्यावर सर्वजण मिळून छोटयाशा डान्स पार्टीची मज्जा घेत होते.. पण शिंदे मॅडमच्या डोक्यात अजूनही यशोदाच फिरत होती.. तिचं रडणं , तिचं दुःख अजूनही त्यांना टोचत होत.. त्या आपल्याच विचारांत हरवल्या होत्या..

'शिंदे मावशी?? मावशी? कुठे हरवलात?'- #### संस्थेची आजच्या प्रोग्रामची को -ऑरडीनेटर लक्ष्मी त्यांना तस विचारमग्न अवस्थेत पाहून; त्यांची विचारपूस करायला आली होती..

'अम्म्म.. काही नाही ग..ऐ लक्ष्मी सर्व अरेंजमेंट बाकी चोख हा.. नेहमीसारखीच.. अजून काही खर्च लागला तर सांग.. पोर खुश झाली पाहिजेत ही सर्व..'- शिंदे मॅडमनी समोर नाचत असलेल्या अनाथांकडे पाहत म्हटलं..

'अहो, शिंदे मावशींच्या प्रोग्रामला ती कायम खुशच असतात.. तुमच्यावर जिवापाड प्रेम करतात.. तुम्ही कधी अशाच रिकामी हाताने भेटायला आलात ना तरीपण तुम्हाला पाहून खुश होतील सर्व..भरपूर करता मावशी तुम्ही आमच्या मुलांसाठी'- लक्ष्मीने शिंदे मॅडमचे आभार मानले..

'हो ना ग..एक ही मुलं.. ज्यांना आई-बाप मिळत नाहीत म्हणून  ही दुःखी.. तर कुठे निपुत्रिकपणामुळे होणाऱ्या अवहेलनेमुळे कोण्या स्त्रीला भोगाव्या लागणाऱ्या नरकयातना.. या दोघांचा आपापसांत कधीच मेळ बसणार नाही का ग?'- एवढं बोलून शिंदे मॅडम परत यशोदेच्या विचारात हरवून गेल्या..

'काय झालं मावशी.. मला सांगा..मला माहित आहे; उगाचंच तुमचा मूड डाऊन होणार नाही.. मला सांगाल का प्लीज??'- लक्ष्मीने काळजीने शिंदे मॅडमना विचारलं..

लक्ष्मीला मुलीप्रमाणे मानणाऱ्या मॅडमनी तिला सर्व हकीकत सांगून टाकली तसे लक्ष्मीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले होते..

'मावशी, तुमच्या यशोदेच आडनाव काय म्हणालात??'- लक्ष्मीला अंदाज तर आला होता तरीपण तिला पुन्हा एकदा खात्री करून घ्यायची होती..

'यशोदा देवकाते'- शिंदे मॅडमनी नाव सांगितलं..

'मावशी, आता तुम्ही काळजी सोडा.. मी तुम्हांला प्रॉमिस करते की तुमच्या यशोदेचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून देईन.. असपण हा माझ्या घरचा प्रॉब्लेम आहे..'- लक्ष्मी रागाने लाल झाली होती..

'काय? म्हणजे?'- शिंदे मॅडम भडकलेल्या लक्ष्मीकडे पाहतच राहिल्या होत्या..

क्रमशः


© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..

🎭 Series Post

View all