मैत्रीला वयाचे बंधन नसते.

मैत्रीला वयाचे बंधन नसते हे खरेच आहे. मैत्री असावी निर्मळ, आणि निथड.

सुषमाताई बागेतून घरी आल्या, जेवणाची वेळ झाली होती. त्यामुळे सर्व हॉलमध्ये डायनींग टेबलवर येऊन बसले.

जेवतांना सुषमा बोलली.

"मी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो माझा शेवटचा निर्णय ठरला आहे!"

हे त्यांचे शब्द ऐकून त्यांचा मुलगा आशुतोष आणि लतिका आश्चर्याने एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले.

आशुतोषने तर हातातला घास खाली ठेवला.

"आई तुझं वय बघ अगोदर 65 आहे आणि तुला हे चांगले तरी वाटते आहे का...?" आणि लतिका तर,

"शी, ह्या वयात शोभते का तुम्हांला आई...!!"

अस म्हणून आत निघून गेली.

प्रश्न सर्वांनाच पडका असेल की सुषमाताईंनी  हा निर्णय एवढ्या वयात का घेतला असावा...?

याच्या मागचे कारणनहीं तसेच होते.सुषमा चांगल्या कंपनीमध्ये जॉबला होती. शिकलेले सवरलेली, पण म्हणतात ना जोडीदाराची सोबत संपली मग काही आयुष्याशी सोबत सुटत नसते. असेच काहीसे त्यांच्या बाबतीत घडले होते.त्यांच्या नवऱ्याला जाऊन आता 30वर्ष झाली होती. तेव्हा पासून त्यांनी एकट्याने संसार करायची हिंमत ठेवली होती. आशुतोषचा सांभाळ त्याचे शिक्षण, त्याचे लग्न पोरं बाळ इथपर्यंतच्या प्रवासात त्या सोबती होत्या. पण असे अचानक आज त्यांच्या तोंडून ऐकून जरा वेगळंच वाटतं होत. आशुतोषचे  वडील गेल्यानंतर सुषमाताईंनी त्याला अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवल.त्याला तिकडे चांगली नोकरीही लागली. लग्न झाले, मुलं झाले.

इकडे सुषमाताईनी जॉब सोडला आणि त्या आता एकट्याच राहू लागल्या. कधी आठवण आली की मुलाला कॉल करून त्याच्याशी बोलाव अस त्यांना वाटे. पण आशुतोष नेहमी कामात आहे आई, मीटिंग मध्ये आहे, आता नको नंतर बोलतो, नाही तर माझा कॉल सुरु आहे, मी बाहेर आहे.

असे कारणे सांगून आईला टाळत असायचा. इकडे सुषमाताईना त्याची काळजी लागलेली असायची. घरात एकट्या असायच्या, बाहेर जायचे तर कुणाकडे जाणार, मग त्या रोज सायंकाळी बागेत जायला लागल्या. लहान मुलांना खेळतांना बघून आनंदी व्हायच्या डोळ्यासमोर त्यांचा लहान नातू येत असे, चिन्मय आशुतोषचा मुलगा. असा हा रोजचा उपक्रम चालला होता. एकदा एका लहान मुलाला घेऊन एक वयस्कर  गृहस्थ आले होते बागेत.

बाळ अगदी गोंडस , 4वर्षाचे बाळ त्यासोबत ते खेळत होते, तेव्हा बाळ बॉलच्या मागे धावत असतांना पडले.

सुषमाताई बाकावर बसून आजोबा आणि नातवाचा  खेळ बघत होत्या. तो बाळ धडपडून पडलेला बघताच त्या धावत गेल्या त्याला आपल्या कुशीत घेत त्याच्या डोक्यावर हात फिरवत त्याला लागलं का कुठे ते बघू लागल्या.

त्या आजोबांचा जीवात जीव आला. नातवाला काही लागलेले नव्हते. त्यांनी सुषमाताईंचे आभार मानले.

त्या दिवसापासून त्या त्यांना ओळखू लागल्या, ते गृहस्थ रोज नातवाला घेऊन येत. नातवामध्ये खेळण्यात तासंन तास जाई. आता सुषमाला ही ते आवडत असायच.

तिचा वेळ ही जायचा. एक दिवस सुषमाला आपल्या मुलाचा कॉल आला.

"आई मी उद्या घरी येणार आहे"

हे एकताचं सुषमाच्या आनंदाला पारावर उरला नाही.

दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या आजोबांना सांगितले की

"हे बघा देशमुखसाहेब,मला काही उद्या पासून बागेत यायला जमणार नाही. तुम्ही कृपया माझी वाट बघू नका. माझा मुलगा अमेरिकेतून घरी येती आहे,  मग मला इकडे यायला नाही जमणार...!"


देशमुखसाहेबांची परिस्थिती काहीशी सुषमासारखीच झाली होती. ते आता दोघे चांगले मित्र मैत्रिणी झाले होते. त्यांच्यातले मैत्रीचे नाते निखळ होते.

सुषमाताई  मित्रासारखी त्यांना प्रत्येक गोष्ट शेअर करत असत.

त्या सांगून तर गेल्या, की आता  बागेत येणार नाही म्हणून पण त्यांना पाहून देशमुखसाहेबांनी विचारलं.

"काय हो, सुषमा मॅडम आज कुठे रस्ता चुकलात.नाही म्हणजे तुम्हीच सांगून गेल्या होत्या, मुलगा येणार आहे   म्हणून!"

"ते असो, बसा काय म्हणतात आज नवीन विशेष...मुलगा आला आहे मग सर्व काही मजेत असणार."

" कसलं काय आणि कसलं काय..? देशमुखसाहेब!"

" अहो, पण  झालं तरी काय..? ते तरी सांगा सुषमामॅडम...!"

बोलता बोलताचं सुषमाच्या डोळ्यात पाणी आले.

हे बघून देशमुखसाहेबांना फार वाईट वाटलं.

"काय झाले सुषमामॅडम सांगा तरी, म्हणजे तुम्हांला बरे वाटेल."

"अहो, देशमुखसाहेब कालचं माझा मुलगा, सून, नातू घरी आले, काल रात्री लतिका माझ्यावर जोरात व्हसकली. आशुतोष पुढेच बसलेला होता पण एक शब्दही बोलला नाही.

माझ्याकडून डायनींग टेबलावर थोडी भाजी सांडली तर मला म्हणाली."

"अहो आई, टेबलक्लॉथ घाण झाला ना! तुम्हांला नीट जेवताही येत नाही का..?"

त्या क्षणाला मला खरं तर खुपच वाईट वाटलं होत पण तरीही,  मी म्हटलं.

"बर बाळ, पुन्हा नाही होणार असे!"

त्यावर तर ती अजूनच चिडली.

"बाळ नका म्हणून मला, तुम्हीच बाळासारखे  वागतात आणि वर मला बाळ म्हणतात..!!"

चिन्मय समोरच बसला होता. त्या क्षणाला तो कसला तरी विचार करत होता.

कारण आपले आई बाबा आपल्या आजीवर का बरं ओरडत असतात. कारण थोड्या वेळापूर्वीच चिन्मयकडून टेबलावर जेवतांना भाजी सांडली पण लतिका त्याला एका शब्दाने काही बोलली नाही.

'मी म्हटलं अगं चिन्मयच्या ताटाजवळ भाजी सांडली, तर लतिका म्हणते कशी.

"अहो आई, तो अजून लहान आहे."

तेवढ्यात चिन्मय बोलला.

" मग थोड्या वेळापूर्वी आजीकडून सांडल तर तू का बोलली तीला...?"

"त्यांचे केस पांढरे व्हायला आले, तू तर अजून लहान आहेस "

त्या क्षणाला मी माझे डोळे सर्वांच्या नकळत पुसले, हे मात्र माझ्या लहान नातवाने पाहिले होते. खरं तर त्याला ते आवडल नसावं. त्याने हळूचं इकडे तिकडे पाहून मला खुणावल की आजी रडू नको म्हणून.

" तो तरी काय करणार बिचारा"

यावर  देशमुख साहेबांनी सुषमाताईंना एक उपाय सुचवला.

"आपण की नाही एक गंमत करूया सुषमामॅडम, तुम्ही तुमच्या मुलाला आणि सुनेला सांगा की मी लग्न करणार आहे, मग बघा."

"काही तरीचं काय..? देशमुख साहेब, आता ह्या वयात  कोण लग्न करणार माझ्याशी!"

"अहो, सुषमामॅडम लग्न करायचचं कुठे तुम्हांला फक्त सांगायचं आहे त्यांना."

ठरल्या प्रमाणे सुषमाने दुसऱ्या दिवशी घरी तसें सांगितले.

जेव्हा आशुतोष आणि लतिका अस बोलले तेव्हा सुषमाताईंनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

त्या म्हटल्या की,"आशुतोष काय रे काय झाले...?लग्न करते म्हणून चिडलात ना. की एकटे पडल्याची भिती वाटते आहे, की अजून काही... लोक काय म्हणतील याची भिती वाटते आहे...?

खरं तर तुम्ही हे सारे केले तर चालते,  ते मॉडर्न आणि आमच्या सारख्या लोकांनी केल तर लाज वाटते. खरं तर ह्या वयात आयुष्य घालवायला तूझ्या वडिलांच्या आठवणी पुऱ्या आहेत मला, गरज होती ती तुमच्या सोबतीची, तुम्ही एकदा पण समजून नाही घेतलं, की आई एकटी असते तिला एक कॉल करून विचारले तर बरे वाटेल. 

पण नाही तुम्ही तुमच्या संसारात मग्न होते, ते असो पण आल्यावरही तुम्ही नीट बोलत नाही.

मग करणार तरी अजून काय..?वरून म्हणतात की शोभते का तुला, खरं तर मी तुम्हांला हा प्रश्न विचारला पाहिजे तुम्हांला शोभते का हे असे वागणे...!!"

हे ऐकून लतिका व आशुतोषला स्वतःची खुपच लाज वाटली. त्यांनी मनोमन आईची क्षमा मागितली आणि शेवट पर्यंत आईला सोबत ठेवण्याचे आश्वास  दिले.

खरं तर हे आज देशमुख साहेबांसारख्या मित्रामुळे शक्य झाले होते. खरा मित्र असावा तर असा. 



***लेखिका :- सौं. रुपाली बोरसे.***