मृगजळ (भाग 1)

This is a story of a woman whos life revolves around her children. At certain point of time she realise that she should have her own existence

मी आणि प्रभात एका बहरलेल्या गुलमोरोच्या झाडाखाली निवांत बसलो होतो. हातात हात गुंफलेले होते. अशी शांतता आम्हाला क्वचितच मिळायची. मी हळूच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. तो मंद वाहणारा वारा सुखावणारा होता. मला त्याच्याशी खूप बोलायचं होतं, खूप काही सांगायचं होतं. पण इतक्यात दोघं तिघं माणसं आली आणि त्याला माझ्या पासून दूर खेचत घेऊन गेली. मी ओरडत होते पण माझी हाक काही त्याच्या पर्यंत पोहोचत नव्हती. माझा आवाज खोल खोल जात होता. त्याच्या पर्यंत पोहोचत नव्हता. मी त्याला आवज देत राहिली पण तो दिसेनासा झाला होता. 

सकाळी सहाचा गजर वाजला तशी मी दचकून जागे झाले. पून्हा तेच स्वप्न. इतकी वर्ष झाली तरी भूतकाळ काही पाठ सोडायला तयार नव्हता. वेडं हे मन.. कधिही भूतकाळात जातं आणि  आठवणींचे हिंदोळयांवर झोके घेऊन येतं. तशा फारशा बरया आठवणी नसल्या तरी सुरूवातिचे काही दिवस आठवून अजूनही अंगावर रोमांच उभे राहतात.

अरे आज तर अभीचा वाढदिवस. बापरे... वीस वर्ष.? काय पटापट निघून जातात दिवस. पटापट तरी कसं म्हणायचं म्हणा... दू:खाचे चार क्षण इतके मोठे वाटतात... की सरता सरत नाही. आणि सुखाचे अनेक वर्षही भरकन उडून गेल्या सारखे वाटतात. असो. काय या चांगल्या दिवशी आपलं रडगाणं.

उठा रे बाबांनो... लहान होता तेव्हा वाढदिवसाच्या दिवशी छान सकाळी लवकर उठायचा. लवकर आंघोळ करून देवाला नमस्कार करायचा. आणि पाटावर येऊन बसला की ‘ओवाळ न ग पटकन’ म्हणून मागे लागायचा. किती ती घाई असायची तूला. आणि आता आठ वाजले तरी लोळतच पडलाय थोडा काही उत्साह म्हणून नाहीच या पोरांना.”

माझीच आपली एकटीची बडबड सुरू होती. म का कु करत अभी उठला. मग अनुजा पण उठली. अनुजा म्हणजे अभिची मोठी बहीण. जास्त अंतर नव्हतं दोघांत. अगदीच दोन वर्षांनी मोठी होती अभीहून. तिची काही विशेष काळजी नव्हती मला. मागच्या वर्षीच एम.बी.ए. पूर्ण झालं होतं तीचं आणि आता ती एका अॅडव्हर्टायसिंग कंपनीत नोकरीला होती. दिसायलाही खुप सुंदर वगैरे नसली तरी नाकी डोळी छानच होती. माझ्यापेक्षा ती उजळ असल्याचं तर मला भारीच कौतूक. स्वभावही तसा शांत आणि समजुतदार होता. पण ती तिच्या मतांबद्दल नेहमीच आग्रही असायची. कदाचित परिस्थितीनेच तिला तसं घडवलं असावं.

प्रभात घर सोडून निघून गेला तेव्हा अगदीच चार वर्षांची तर होती पोर. काही कळत नसलं तरी घरी काहीतरी चांगलच बिनसलय  हे तर कळतच होतं तिला. मग जस जसं कळायला लागलं तशी अगदीच शहाणी होत गेली पोर. त्या वेळी अण्णा जर खंबीरपणे पाठीशी उभे राहिले नसते तर काय झालं असतं कूणास ठाउक? माझी नोकरी तर अगदीच साधारण होती. शाळेत शिकवणारी मी एक शिक्षिका. असा कितीसा पगार मिळणार होता मला. पण अण्णांनी बाबांना दिलेला शब्द अगदी पाळला. मला अगदी मुली सारखं जपलं. सुन म्हणून कधीही दुजा भाव केला नाही.
 
“आई, नमस्कार करतो ग” अभीनी वाकून नमस्कार केला. 

मी भानावर आले. “अरे वा.. आटोपली आंघोळ? सुखी रहा” मी पदराने डोळे पुसतच त्याला आशीर्वाद दिला. कितीही लपवण्याचा  प्रयत्न केला तरी दिसलेच त्याला माझे पाणीदार डोळे.

“आई काय झालं? तूझ्या डोळ्यात पाणी?” अभीनी विचारलं.
 
“काही नाही रे.. अण्णांची आठवण आली जरा. आज ते असायला हवे होते. ते होते म्हणून तर....”

“आई तू आधीच खूप सोसलं आहेस. आता मात्र आम्ही मोठं झालोय. ताईचंही छान चाललं आहे. पुढच्या वर्षी मिही इंजिनीयर होईल. आता तू कसलीच काळजी करायची नाही. आम्ही आहोत न?” अभिजित माझा हात हातात घेउन अगदी मनापासून बोलत होता. त्याचं बोलणं ऐकून मला जरा अजूनच भरून आलं. लहान लहान म्हणता म्हणता किती मोठी झालीत माझी बाळं. नेहमी अगदी अल्लड, उथळ वाटणारा अभी आज अगदी मोठेपणा घेउन बोलत होता. 

“हो.. आम्ही आहोत म्हणे... आधी आपली दाढी नीट करायला शिका.” वातावरण हलकं करायला म्हणून अनू मधेच येऊन बोलली. आणि सगळेच हसायला लागले. 

परमेश्वरानी संसारसूख काही माझ्या पदरात टाकलं नाही. पण इतकी सोन्यासारखी मुलं मला दिली म्हणून मनोमन मी त्याला हात जोडले. आणि आता माझं घर असचं हसतं खेळतं राहू दे म्हणून प्रार्थना केली.

आज छान अभीच्या आवडीचा बेत होता. पाकातल्या पुरया त्याला खूप आवडायच्या त्यामुळे करायची मी त्याच्या वाढदिवसाला. सकाळचं जेवण मस्त झालं. 

संध्याकाळी पाच वाजताची अनूची गाडी होती. ऑफिसच्या कामानीमीत्त दोन दिवस बाहेरगावी जायचं होतं तिला. 
सांभाळून राहा ग.. पोहोचल्यावर नक्की फोन कर. मी नेहमीचाच आपला सूर लावला.

“हो ग आई.. काळजी करू नको” म्हणत तिही निघाली.
संध्याकाळी अभी पण त्याच्या मित्रांसोबत बाहेरच जायचं म्हणत होता. मी म्हंटलं घरीच बोलाव मित्रांना, छान काहीतरी खायला करते. तर हल्ली बाहेरच बर्थडे साजरा करायचा ट्रेंड आहे म्हणाला. आम्ही काय बाबा ओल्ड फॅशन्ड. आम्हाला काय कळणार तुमचा हल्लीचा ट्रेंड? 

“पण तुझ्या मित्रांना एकदा भेटव तरी.. तसं दोघा तिघांना ओळखते मी... पण मी काय म्हणते आज आधी सगळ्यांना घरीच बोलव. मी ओवाळून घेईन आणि मग जा तूम्ही बाहेर जेवायला.” थोडसं नाखुशीनेच का होईना तो तयार झाला.

संध्याकाळी सगळी मित्र मंडळी आली घरी. तशी चांगल्या घरची वाटत होती मुलं. चला माझी काळजी थोडी कमी झाली. मुलांसाठी छान बेसनाचे लाडू केले होते. आवडीने खाल्ले हो मुलांनी. 

मुलांची संगत चांगली असली की आईची अर्धी काळजी कमी होते. त्याच्या मित्रांना बघून मलाही समाधान वाटलं. बाहेर पर्यंत त्यांना सोडायला गेली तर यांच्यातलाच एक मुलगा कोपरयात उभा राहून चक्क सिगरेट ओढत होता. माझ्या काळजात धस्स झालं. अभीने माझ्या चेहरयावरचे भाव ओळखले असावे. त्याने खुणेनेच ‘मी नाही त्यातला’ हे सांगीतले. पण आत्ता थोड्या वेळापुर्वीच थोडी निर्धास्त झालेली मी  आता परत अस्वस्थ झाली.

रात्री 11.30 वाजून गेले तरी मुलं आले नव्हते. खूप लांब जाऊ नका, लवकर घरी या सांगीतलं होतं तरी काही फायदा नाही. उगाचच जीवाला घोर लावतात ही पोरं. मी घरातच फेरया मारत होते. थोडया वेळापुर्वी फोन केला तर अर्धा तासात येतो म्हणाला. आता त्याही गोष्टीला एक तास उलटून गेला. का उशीर झाला असेल त्यांना? अशा वेळी मन चिंती ते शत्रू न चिती अशी अवस्था होते तसच काहीसं झालं माझं.  नाना विचार मनात येऊन गेले. मनातल्या मनात देवाचा धावा केला. तेवढ्यात फोन वाजला. “काय अभी किती वेळ? काही भान आहे का काळ वेळचं?” म्हणत मी फोन उचलला. तर समोरून एक राकट आवाज आला, “मी गीता नगर पोलीस ठाण्याहून बोलतोय. ताबडतोब ठाण्यात यावं लागेल तुम्हाला. तूमचा मुलगा... ” पुढचं काहीच ऐकू येत नव्हतं. हातापायाला घाम आला होता. हृदयाची धडधड वाढली. काय होतय काहीच सुचत नव्हतं. मी तशीच खाली बसले. 

क्रमशः 

शलाका गोगटे बिनिवाले

कथेचा पुढचा भाग वाचायला मला फॉलो करायला विसरू नका.