मुलगी आहेस तू..

विचार कर जरा..
मुलगी आहेस तू, कपडे नीट घाल जरा.. 
लोक काय म्हणतील, याचा विचार कर जरा.. 

मुलगी आहेस तू, शब्द जपून वापर जरा.. 
तुझं असं प्रत्युत्तर देणं पटत नाही लोकांना,याचा विचार कर जरा.. 

मुलगी आहेस तू, वेळेचं बंधन लक्षात घे जरा.. 
वेळी अवेळी तुझं प्रवास करणं खटकतं लोकांना, याचा विचार कर जरा.. 

मुलगी आहेस तू, रागावर आवर घाल जरा.. 
नाकावर साधी माशी बसू देत नाही, असा टोमणा मारतात लोकं, याचा विचार कर जरा.. 

मुलगी आहेस तू, घरची कामं करायला कंटाळा नको करत जाऊ जरा.. 
सासरी गेल्यावर कामंच करायची आहे तुला, याचा विचार कर जरा.. 

'मुलगी आहेस तू' म्हणत म्हणत बराच बोझा टाकला जातो बालमनावर तिच्या, 
सर्रास बालवयातंच रटला जातो भेदभावाचा हा पाढा.. 

कधीतरी तुम्हीही विचार करून पाहा जरा.. 
फक्त एकदा भेदभाव न करता माणूस म्हणून वागवून पाहा तिला जरा.. 

✨❣️ श्रावणी ❣️✨