माहेरचा उंबरा ओलांडताना

माहेरचा उंबरा ओलांडताना


??? *माहेरचा उंबरा ओलांडताना !!*???

साखरपुडा झाल्यानंतर लग्नाची तारीख जवळ येऊ लागली. साड्या, खरेदी सगळ्या गोष्टी झाल्या. मावशी, आत्या, मामी यांच्या घराकडे रोज चकरा वाढायला लागल्या. हळू-हळू लग्नघर गजबजू लागलं. देवक बसलं, दारात वेल उभा राहिला, मांडव सजला. हातावर मेहंदी काढली, वहिनी, बहिणी आनंदानं मेहंदीच्या कार्यक्रमात नाचू लागल्या. तिन्ही सांजेला नवऱ्याच्या नावाचा हिरवा चुडा भरला. शाळेत नवा फ्रॉकही सावरता न येणाऱ्या लेकीच्या हातातला चुडा बघून मनातले भाव डोळ्यात आले. त्याक्षणी आईच्या डोळ्यात चटकन पाणी आलं. चहा करण्याच्या बहाण्यानं आई आत निघून गेली.

बघता-बघता लग्नाचा दिवस आला, उद्या लग्न, आदल्या दिवशीची घाई सुरू होती. पंगती बसल्या, उद्या बहिण जाणार म्हणून सगळे भाऊ एक-एक घास भरवत होते. सगळ आटोपून उखाणे पाठ करायची तयारी सुरू झाली, अंथरूणं टाकली, सगळे दमून झोपी गेले आणि घर शांत झालं. उद्या लग्न होणार. आपल्यावर असणाऱ्या हक्कांची, अधिकारांची आणि सत्तेची खांदेपालट होणार. उद्यापासून प्रत्येक दिवसाचा हिशोब मागणारं कोणीतरी येणार. माहेरी असणाऱ्या शेवटच्या रात्री सगळा जन्म आठवला. आई-वडील, भावंडं असं एवढंच जग प्रत्येक गोष्ट करताना फक्त त्यांच्याच परिणामांचा विचार व्हायचा. पण अचानक सगळी उलथापालथ (अर्थात सकारात्मक) समजून घ्यायला आनंदी वाटत असलं तरी हूर-हूर आहेच.

माझ्या पहिल्या वाढदिवसा पासून ते लग्नापर्यंत सगळ्या क्षणांचे आई-वडिलांकडून सोहळे झाले. लग्नातही सगळ्यांचाच कस लागला होता. झोप काही येईना, उठून प्रत्येक खोलीत गेले. भिंतींवर, कपाटांवर, सोफ्यावर, उशांवर, वस्तूंवर एकदा हात फिरवला. सगळ्या गोष्टी नीट जागच्या जागी ठेवल्या. काय माहिती यापुढे मनाला वाटेल तेव्हा येऊन तेवढ्याच हक्कानं आवरता येईल का..? या घरातली प्रत्येक वस्तू, भिंत जणू माझ्याशी बोलत होती. माझी पाठवणी करत होती.

या घरात जन्म होऊन आले तेव्हापासून ते लग्नाच्या पाठवणी पर्यंत प्रत्येक क्षणाच्या साक्षीदार इथल्या भिंती, इथल्या वस्तू होत्या. त्या सगळ्या आठवणी एकदम डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागल्या. घरातल्या प्रत्येक गोष्टीचा निरोप घेतला. मग देवाजवळ गेले. माझं हे घर आत्तापर्यंत कायम बहरलं, याचं पावित्र्य कोणत्याही मंदिरा पेक्षा कमी नाही. ते असंच कायम राहू दे, बहरू दे.. माझ्या मनात जी घालमेल आहे ती माझ्या आई- बापाच्या मनातही असणार. शाळेत पाटीवरची पेन्सिल दिल्या वरही परत मिळेल का नाही भीती वाटायची. पोटची मुलगी द्यायला त्यांची काय अवस्था असेल नं?

जगात पोरीच्या आई-बापा इतकं मोठं मन कोणाचंच नाही. जी पोर आपल्यापाशी राहणारच नाही, हे माहिती असूनही तिला कसलीही कमी पडू द्यायची नाही. सगळी हौस करायची. लग्नात आपल्या आयुष्याची कमाई पणाला लावायची, हे करायला फक्त बापाचंच मन असाव लागतंं.. एरव्ही सगळीकडे मान, अदब असणाऱ्या माझ्या वडिलांना मी पहिल्यांदा एवढं झुकलेलं पाहिलंय हो.. आपली पोर फक्त सुखात रहावी यासाठी सगळा अट्टहास. पाठवणी करताना जावयाला *‘सांभाळा पोरीला’* असं म्हणून आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या कळवळीनं केलेली विनंती.. *आणि आम्ही खूप नशिबवान म्हणून आमच्या पोटी लेक जन्माला आली, असं म्हणायला आणि समजायला ख-या आई-बापाचंच् काळीज असावं लागतं नाही का..!!* ??


🎭 Series Post

View all