मातृदिन विशेष- आईस पत्र

मातृदिनानिमित्त आईस पत्र

प्रिय आई,
सप्रेम नमस्कार!

अग,टू बी ऑर नॉट टू बी मध्ये अडकल्यामुळे पत्र लिहिण्यास उशीर झाला.. कारण तुझ्या कार्ट्याला डेज चं असं काही अप्रूप नाही ना ग.. एखाद्या व्यक्तीचे कौतुक वर्षाचा एकच दिवस का करावं??(काहींच्या बाबतीत तर बाकीचे दिवस तो माणूस गणतीत ही नसतो).. माणसाची काळजी ही वर्षाचे ३६५ दिवस घ्यावी.. सारे दिवस त्या व्यक्तीला योग्य तो सन्मान द्यावा या मताचा मी.. पण शेवटी म्हटलं असेही तुझ्याबद्दल कधी, कुठे व्यक्त झालोच नाही अन आज इराने आवाहन केलंच आहे तर मनातलं लिहून द्यावं..

बघ, मी इथे सुसंगत असं काही लिहिण्याचा प्रयत्नच करणार नाहीये.. जे मनात पहिलं येईल आणि जसं येईल; अगदी तसेच लिहिणार.. कारण आई नामक विश्वाला जिथे देवाला झाकता येत नाही तिथे मजसारखा अतिसामान्य व्यक्ती काय म्हणून शुद्धलेखनाची ठिगळं लावणार.. 

तु मला कसं वाढवलं , माझी कशी काळजी घेतली हे सांगून मी  तुला बोअर बिल्कुल नाही करणार.. कारण तुझ्या कामात तु परफेक्टच असतेस.. आज मला फक्त तु माझ्यावर केलेले काही संस्कार परत आठवावेसे वाटतात..

तु म्हणजे माझी सर्वात मोठी डिफेन्स लॉयर... इतक्या वर्षात माझ्या सगळ्या चुकांना पोटात घेणारी, मला पाठीशी घालणारी.. कोणी माझ्यावर टीका करत असेल तर माझ्या बाजूने खमकेपणाने उभी राहणारी.. 

आणि तु म्हणजे माझी सर्वात मोठी क्रिटिक्स सुद्धा.. जरा डोक्यात हवा भरली की लगेच टीकेचा व्हॅक्युम पंप लावून माझं विमान जमिनीवर उतरवणारी... कोणी माझी जास्तच तारीफ करत असेल तर त्याला माझे दहा अवगुण सांगून माझा स्तूती-काटा बॅलन्स करणारी तु..

आज या पत्राच्या माध्यमातून तुला खूप साऱ्या गोष्टींसाठी धन्यवाद दयायचे आहेत ग..तु शिकवलेल्या कित्येक गोष्टी मी तशाच्या तशा लक्षात ठेवल्या आहेत हे सांगायचं आहे..

तुला माहीत नसेल पण आजही माझे बहुतांशी शाळकरी मित्र आणि मैत्रीणी माझ्या संपर्कात आहेत.. तु बोलायचीस ना? की मोठा होशील, नवे मित्र जोडशील पण म्हणून तुझं बालपण ज्यांच्यामुळे ऑसम होतं त्यांना विसरू नकोस.. मी नाही विसरलोय हा आई कोणाला..अग त्यामुळेच आजवर कधी एकटा पडायला झालंच नाही ना ग.. लाईफमध्ये कुठे खट्ट झालं की आपला मित्रांचा गोतावळा धावतो आपल्यासाठी.. पण कोणाच्या शिकवणुकीमुळे?? तुझ्याच..

तुला आठवतं का ग?? कॉलेज कॅम्पसमधून एल अँड टी कंपनीचा कॉल आला तेव्हा आपण किती खुश झालो होतो.. आपल्या चाळीतल्या घरी आपण किती जल्लोष केला होता.. पण जेव्हा कंपनीचा बॉयलर सूट घेऊन घरी आलो होतो तेव्हाच तुझं वाक्य आजही माझ्या लक्षात आहे आये - ' एल अँड टी मध्ये कामाला लागला म्हणून जास्त उडू नकोस.. सोबतच्या माणसाला माणूस म्हणूनच वागवायचं.. तुला कंपनीत जो काही आदर मिळेल तो तुला नाही ; या तुझ्या व्हाईट कोटला असणार आहे.. हा पण; तोच आदर तुला कंपनीच्या गेट बाहेरपण मिळत असेल तर मग ती तुझी श्रीमंती..' मी आजही हे वाक्य लक्षात ठेवलं आहे आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक नवोदितांनाही हेच सांगतो..

आता हेच बघ ना; इरा वर लिखाण चालू केलं तेव्हा माझे काही प्रयत्न वाचून; मला पर्सनलवर काही मेसेज आले होते की तुम्ही महिलांची लाईफ अचूक मांडता ओ.. पण खरं सांगायचं तर माझं ज्ञानपीठ तर आमच्या माँसाहेबच.. तुझं रोजचं जगणं पाहूनच तर सारं काही सुचतं.. सारे काही आपल्या समोर असतं पण तू म्हणतेस ना तसच आहे बघ; आपले डोळे तेवढे उघडे असायला हवेत..

तसा मी मुलुखाचा आळशी; पण मला माझ्या मर्जीच्या विरुद्ध कामाला लावणारी तु एकमेवाद्वितीय बरं.. हे अगदी आमच्या कंपनीलादेखील अकरा वर्षांत जमलेलं नाहीये (आणि म्हणे मल्टिनॅशनल कंपनी).. बाकी तुझ्यासारखी मला कोण बॉस भेटलं नाही हे माझं नशीब..

तुला अजून एक सांगतो; सुरुवातीला ट्रेनला लटकून जाणाऱ्या महिलांना पाहून हसू यायचं.. त्यांच्या जीवावर बेतणाऱ्या घाईची आम्ही टर उडवायचे.. पण आई, मध्ये तुझा हात दुखावला होता.. प्लॅस्टरमध्ये असताना तुला घरकामासाठी सक्त मनाई होती.. बाबा जेवण आणि कपडे धुणी करायचे आणि मी बाकीची काम.. आपल्याकडे चाळीत तेव्हा पाणी संध्याकाळी यायचं.. म्हणजे माझ्यासाठी कामावरून यायचं तीही शॉपची काम करून आणि मग पाणी भरणे, भांडी घासणे हे सारं.. कसला घामटा निघायचा आई सांगतो.. आजही ते आठवलं की भीती वाटते..( अग बरोबर आहे ना, बिना डायट एक-दोन किलो वजन कमी झालं तर आमच्या डायटीशनच काम काय?).. पण आई, नेमका हेच ते दिवस होते की जेव्हापासून माझा नोकरदार स्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.. त्यांच्या घाईमागची नेमकी कारण मला आपल्याच घरात उमगली.. 
जेव्हा मी तुला हे सांगितलं तेव्हा तु हसलीस आणि म्हणालीस की आम्हीं घरात राहणाऱ्या स्रियांनापण अधून मधून बघत जा.. तुझ्या बोलण्याचा अर्थ मला तात्काळ उमगला होता कारण विना-कौतुक केवळ निरपेक्षपणे काम करत राहणे हा गृहिणीचा स्थायी भाव झालेला असतो आणि आता माझी नजर काहीशी स्पष्ट झाली होतीच.. त्यामुळेच तुला जे नेमकं दाखवायचं होते ते माझ्या नजरेत आलं होतं.. 

आरंभशूर बनत काही काळ मी तुला घरकामात मदत करणे चालू केलं होतं पण आता त्यात खंड पडला आहे त्याबद्दल 'सॉरी'.. आज परत तु एकटीच किचनमध्ये आणि मी मोबाईलमध्ये.. चित्र बदलायला हवं.. निर्जीव मोबाईलबरोबर वेळ घालवण्यापेक्षा तुझ्याकडून ज्ञान टिपलेले कधीही चांगलेच ना.. कधी आमचे डोळे उघडतात माहीत नाही..

आज तुझ्या आणि बाबांच्या आशिर्वादाने आपण चाळीतून प्लॅटमध्ये आलो..तु तो विश्वास आणि जिद्द माझ्यात कायम जागी ठेवलीस त्याबद्दल तुला आणि बाबांना धन्यवाद.. एवढं सार करूनही माझे पाय जमिनीवर राहण्यासाठी तु आजही धडपडतेस, प्रसंगी मला सुनावतेस त्या बद्दल तुला धन्यवाद..

काही दिवसांपूर्वी साईटवर असताना मला आठ वर्षांपूर्वी माझ्यासोबत काम केलेल्या एका व्यक्तीचा फोन आला होता.. खूप वेळ बोलणं झालं.. पलीकडून आपुलकीने चौकशी झाली.. सोबतचा सहकारी चाट पडला. आठ वर्षांपूर्वी फक्त सहा महिने सोबत काम केलेल्या माणसाचा फोन? त्याला विश्वास बसत नव्हता..
त्याला म्हटलं की आमच्या माँसाहेब.. कारण तो एकदा घरी येऊन माझी तारीफ करत होता.. खूप छान वागवतात म्हणून सांगत होता..त्याला वाटलं की मी आणि आई खुश होईल.. मी हसत होतो आणि आई त्याला समजावत होती.. 'चांगला वागवतो हे काही सांगण्यासारखं नाही.. त्याने चांगलंच वागवलं पाहिजे.. पण तो जर काही नाटक करत असेल, सुपरवायजरगिरीचा तोरा मिरवत असेल तर ते मला सांग.. मग मी बघते याला बरोबर..'.. तो चाट पडला.. मला बोलला की साहेब, तुमच्या वागण्याचं मूळ इकडे आहे तर.. मी म्हटलं, मग मी का हसतोय.. अरे माझा कर्ता करविता वेगळाच आहे.. 

अशी आगळीवेगळी तु.. माझ्या कित्येक यशामध्ये पडद्यामागची सूत्रधार तु.. आज वैयक्तिक आणि नोकरीच्या ठिकाणी टाळ्या भेटतात पण खरं सांगू का ग?? सारं श्रेय तुझं आणि बाबांचं.. लहानपणापासून तुझ्याशी जास्त बिलगून असल्याने अंमळ तुझे जास्तच..

बाकी बघ, ज्याची भीती होती तेच झालं.. किती वाहवत गेलो लिहिताना.. तुला मोजक्या शब्दांत नाही मांडता यायचं ग.. तु माझी आई आहेस आणि त्याचा मला माज आहे... 

आता अजून जास्त लिहीत नाही ग.. बास, तुझे अजून एकदा आभार- मला 'माणूस' म्हणून जगायला शिकवल्याबद्दल.. 

बाकी तु कायम खुश रहा, मी चुकलो तर माझा कान पिरगळत रहा आणि तुझे आशिर्वाद माझ्या सदैव पाठीशी राहू देत.. 

ईश्वर तुला आणि बाबांना उदंड आयुष्य देवो हिच प्रार्थना!!

तुझा लेक,
  मयुरेश