माझ्या बाळाने केलेली पहिली पोळी

story revolves around my child's kitchen interest

माझा मुलगा अश्वथ, लहापणापासून त्याची रुची खेळण्यांमधे कमी आणि स्वयंपाकघरात जास्त. त्याचं काय आहे ना मला खायला आणि करून खाऊ घालायला दोन्हीही खूप आवडते. मी सतत स्वयंपाकघरात काहीतरी नवीन प्रयोग करत असते ते कधीतरी फसतात पण बऱ्याच वेळा यशस्वीही होतात.

आम्ही नोकरीनिमित्त बाहेरराज्यात मग घरात फक्त तिघेच नवरा, मी आणि आमचं बाळ अश्वथ. तो खूप चपळ असल्यामुळे मला एक डोळा चोवीस तास त्याच्यावर ठेवावा लागतो. त्याचे पप्पा ऑफिसला गेल्यावर दिवसभर आम्ही दोघेच घरात मग तो सगळं काम आवरताना घरभर माझ्यामागे फिरतो. मी स्वयंपाक करताना किचन ओट्यावर बसून सगळं निरीक्षण करतो. मला सारख्या सूचना करतो.

त्याची खेळणी म्हणजे कढई, पातेलं, कुकर, चमचे, ताट, वाट्या, पोळपाट लाटणं हेच सगळं. तो खरीखुरी भांडी वापरून खोटा खोटा स्वयंपाक रोजच करतो. तो रोज मला पोळ्या करताना खूप निरीक्षण करून बघायचा. मध्यंतरी एकदा त्याने खूप हट्ट धरला की मलाही पोळी करायची. मी त्याला खूप समजावलं की माझ्या सगळ्या पोळ्या करून झाल्यावर तुला शेवटची पोळी करायला देते पण तो काही ऐकायला तयार नाही. आता या लॉकडाऊनमधे आधीच मुलं घरात राहून कंटाळली आहेत त्यात दिवसभर तीच तीच खेळणी आणि तेच चेहरे बघून मुलं कंटाळली आहेत मग त्यांना काय रडायला आणि चिडचिड करायला बहानाच लागतो. मग शेवटी मी त्याच्या कलेने घेतलं. एकच पोळपाट लाटणं मग काय गॅस बंद करून त्याला पोळी लाटायला दिली. घरभर पिठाचा पसारा होणार आणि काम वाढणार याची कल्पना होतीच मला म्हणून मी बिचारी आई स्वतःच्या मनाला धीर देण्याचा प्रयत्न करत होते.

त्याने पिठाचा मस्त गोळा हातात घेतला आणि हातावर गोल गोल फिरवून पोळपाटावर ठेवला. मधेच त्याला काहीतरी आठवलं आणि तो पळत किचन ओट्याकडे गेला. मला वाटलं अजून काहीतरी भांडी आणून आणखी पसारा करणार आता हा पण आश्चयाची गोष्ट त्याने किचनवरचा कपडा आणून तो पोळपाटाखाली अगदी नीट पसरवून अंथरला. हे मी रोज पोळ्या करताना करत असते जेणेकरून पीठ खाली सांडू नये त्याला कदाचित ते आठवलं असावं. त्याने अलगद पिठाचा गोळा कोरड्या पिठात बुडवून लाटायला सुरुवात केली. पहिल्यांदा लाटणं मागे गोळा पुढे कधी गोळा पुढे आणि लाटणं मागे असं होऊ लागलं. मला हसू येत होतं पण तो प्रयत्न करतच होता. हळूहळू त्याने थोडी लाटून पोळीला आकार द्यायला सुरुवात केली.

मला वाटलं पुरी इतकी पोळी लाटून त्याला आनंद होईल आणि मग हा खेळ संपेल. ती पोळी कमी आणि श्रीलंकेचा नकाशा जास्त झाला होता मग काय माझ्या मास्टरशेफचा इगो दुखावला. साहेबांनी परत लाटलेली पोळी मोडली आणि पुन्हा नव्याने सुरुवात केली. यावेळी थोडी मोठी पोळी लाटली, मी त्याला म्हणाले," चल आता बस, मी भाजून देते आणि आईला बाकी पोळ्या करू दे" तर तो म्हणाला ,"नाही थांब,अजून माझी बाकी आहे" आणि त्याने चार पुडाच्या पोळीसारखी तिला फोल्ड केली????..हे त्याचं निरीक्षण होतं मी पोळ्या करताना त्याने टिपलेलं ज्याची मला काडीमात्र कल्पना नव्हती.

मग त्याने गरगर लाटणं फिरवायचाही प्रयत्न केला पण काही जमलं नाही मग जशी जमेल तशी लाटून म्हणाला "आई,पोली भाजून दे". तरी चांगली पापडाच्या आकाराची लाटली त्याने पोळी. पोळी भाजायला घेतली तोवर त्याने पुन्हा सूचना द्यायला सुरुवात केली, "आई अशी भाज, तूप लावून दे, रोल करून दे,मला खायची आहे, आजीला दाखवायची आहे????" .

त्याच्या सूचना ऐकून हात जोडले मी आणि ती पोळी त्याला भाजून दिली. लगेच आजी आजोबांना व्हिडिओ कॉल करून मला दाखवायलाही सांगितली आणि त्याने ती तूप लावून फस्तही केली.

अशी माझ्या बाळाने लाटलेल्या पहिल्या पोळीची गोष्ट आवडली तर लाईक, कमेंट आणि शेयर जरूर करा.

माझे इतर लेख वाचण्यासाठी मला नक्की फॉलो करा.

©®सुवर्णा राहुल बागुल