सासूबाई जोमात!

सासू-सून एक प्रेमळ नाते!

नीट बघून घे.. खूप कडक शिस्तीची आहे तुझी सासू.." गर्दीतून कोणीतरी बोलले.

सासूबाईंकडे मी पहिल्यांदा फोटो काढताना पाहिले होते.

नववारी.. एक रूपयाच्या आकाराचे कुंकू, नाकातील नथ ओठांवर पडणारी, पायातील जोडवी भली मोठी, गळ्यात सगळे पारंपरिक दागिने.

मी मनातून खूप घाबरून गेले होते

कारण आमचे अरेंज मॅरेज. ओळखीतून ठरलेले. मी माझ्या पतीला देखील जास्त ओळखत नव्हते. त्यात आता सासूबाई पण कडक शिस्तीच्या म्हणजे आपले काही खरे नाही, या विचारातच विवाह सोहळ्यातील फोटो सेशन पूर्ण झाले.

लग्नानंतर थोडे दिवस गावीच रहावे लागेल, मग आपण पुण्यात जाणार आहोत, हे पतीने आधीच सांगितले होते त्यामुळे मनाची पूर्ण तयारी झाली होती. पती फक्त शनिवार आणि रविवार शहरातून गावी येतं. इतर दिवशी सासू सासरे आणि मीच!

सासूबाई खूप कष्टाळू व्यक्तीमत्व. खणखणीत आवाज अन् प्रेमळ धाक! मी माहेरी शेतात काम करायची परंतु सासरी सगळी कामे खूप कष्टाची होती. 'कष्टाला पर्याय नाही..' असं सासूबाईंच्या कायम मुखी!

भाजी जास्त झाली, भाकरी जास्त झाली, उठायला उशीर झाला, देवाला चुकून एखाद्या दिवशी दिवा लावला नाही, त्यांचे इतके घरात बारीक लक्ष असे की मी आश्चर्यचकित होत असे.. इथला तांब्या दिसत नाही..ती छोटी डिश कुठे गेली? शिवाय दिवसभर शेतात काम. वय साठ पार झाले आहे तरी, हे विशेष! 

मी त्यांच्यापासून चार हात लांबच राहायची कारण माझ्याकडून नेहमी चूका होत राहायच्या. त्या अनेकदा प्रेमाने शिकवायच्या परंतु दरवेळी माझ्याकडून नवीन चूक होत राहायची. मला सारखे माहेरी जावेसे वाटायचे कारण मी परिस्थिती स्वीकारतच नव्हते,पळवाटा शोधत होते. अशातच गोड बातमी आली आणि बाळाची चाहूल लागली. पतीचे प्रमोशन झाल्यामुळे आम्ही पुण्यात आलो. बाळा मुळे सासूबाई देखील आल्या होत्या. त्या खूप काळजी घ्यायच्या परंतु मला पटत नसे, कधी सासूबाईंना पटत नसे.

एकेदिवशी माझे पती मला म्हणाले,

"तू आईचे बोलणे सकारात्मक घेत जा म्हणजे आनंदी रहाशील आणि संयम ठेव. बघ एक दिवस तुझी सासू तुझी आई होईल.."

अशातच कोरोना सारख्या भयंकर आजाराने सगळीकडे थैमान घातले होते.

एके दिवशी सासूबाई तापाने फणफणल्या. त्यामुळे घरातील सगळ्यांची RTPCR  test केली. सासूबाईंना धाप देखील लागत होती. मी आणि बाळ दोघे negative, सासूबाई आणि पती positive.

आता माझी खरी लढाई सुरू झाली होती.

कायम संकटापासून लांब पळणारी मी आता खंबीर झाले होते. सासूबाईंना दवाखान्यात दाखल केले आणि पतीला home isolation. माहेर पुण्यातच असल्याने बाळाला आईकडे देताना खूप रडले होते परंतु पर्याय नव्हता. पहिल्यांदा मी माझ्या बाळापासून चौदा दिवस दूर राहिले, आजही या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाही.

दोघांचे करताना अगदी मी थकून जात होते.. शारीरिकपेक्षा मानसिक.. प्रचंड धावपळ होत होती.

कसे होणार?? परंतु देवाच्या कृपेने सगळे व्यवस्थित झाले.. सासूबाईंना डिस्चार्ज मिळाला तेव्हा डाॅक्टर म्हणाले..

"मुलीने खूपच काळजी घेतली तुमची.. त्यामुळे लवकर ठणठणीत झालात.. रोज तीन टाईम गरमागरम डबा मिळणाऱ्या पहिल्याच कोव्हीड पेशंट आहात तुम्ही आमच्या हाॅस्पिटलमधील. काही लोक एकदा ॲडमिट केले की कोव्हीडमुळे पुन्हा पाहायला देखील येत नाहीत.. आम्हालाच काॅल करावा लागतो.. "

मग त्याच म्हणाल्या...

"मुलगी नाही सून आहे."

आज खऱ्या अर्थाने मला त्यांच्या डोळ्यात समाधान दिसले होते. तो माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग ठरला होता २० जानेवारी २०२१.

तेव्हा पासून पतीने सांगितल्याप्रमाणे खरचं आज सासूबाई माझ्या आई झाल्या आहेत. संयम ठेवला आणि आपलेपणा असला की कोणत्याही नात्याला आपण योग्य न्याय देऊ शकतो.

संसारात एखादी गोष्ट पटत नसेल तरी कुटुंबातील आनंद आणि ऐक्यासाठी सांभाळून घ्यावे लागते.. कुठल्याही गोष्टीला वेळच उत्तर असते, हे नक्की..!!!

©® आरती संभाजी सावंत

कथा आवडल्यास like, comment and share करायला विसरू नका.