Login

मांजराचे डोके अडकले तांब्यात

There may happen some mischievous things at our home... sometimes because of the heavy work in houshold work, homemaker or housewife just gets pissed off the situations.. what happens next is what ellaborated here

मांजराचं डोकं अडकलं तांब्यात.. ????????
शीर्षक वाचून हैराण झालात ना... तसंच झालं होतं खरं... आईचीच नव्हे तर सगळ्यांचीच त्रेधातिरपीट उडाली होती त्या दिवशी........ 

बरीच वर्षे झाली पण प्रसंग अगदी डोळ्यासमोर आहे.. रविवारची आळसावलेली सकाळ.. म्हणजे फक्त आम्हा भावंडांसाठी आळसावलेली.. आईसाठी तर रोजचाच कामाने व्यापलेला दिवस.. 

सकाळी उठल्यापासून काम चालू व्हायचं ते अगदी रात्री पाठ टेकेपर्यंत तिला आराम करायची उसंत मिळत नसे....घर, अंगण झाडणे, सडा रांगोळी,  सकाळचा चहा नाष्टा, बाबांच्या पूजेची तयारी, त्यांचे आणि आमचे डब्बे बनवणे,अंधुक दृष्टी असलेल्या आजीचे सगळं हवं नको बघणं... एक ना दोन हजार कामे तिच्यासाठी आ वासून उभी असत.. 
शिक्षणासाठी जेव्हा मी बाहेर पडले तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने तिची तारेवरची कसरत कळून आली आणि आपण प्रत्येक गोष्टीसाठी तिच्या मागे किती पिरपिर लावत होतो याची जाणीव सुद्धा  ..... 

 
तर.. त्या दिवशी सकाळीच कामवाल्या मावशीचा येणार नाहीत म्हणून निरोप आलेला...भांड्यांचा भला मोठा ढीग पडला होता... 
त्यातच दूधवाला आला.. तो ही इतक्या गडबडीत असायचा की बस्स... दुधातल्या पाण्यावर त्याने एक बुलेट घेतली होती त्यावरून भर्रर्रर्रर्रर्रर्र जाण्याची त्याचीही तितकीच गडबड. ... 
बुलेट चा आवाज ऐकून आई दूध घेण्यासाठी पातेले शोधू लागली पण कालची भांडी न धुतल्याने घोळ झाला होता.  .. 
दुधाचे पातेले घासलेलेच नव्हते त्यामुळे आईने गडबडीत एका पाणी पिण्याच्या तांब्यात दूध घेतले.   पातेलं धुवून मग तापवावे म्हणून तिने ते तसेच ठेवले.. 
आणि मग सुरु झाली घरातल्या सगळ्याची पिरपिर.. 
बाबांना नैवेद्यासाठी साखर हवी होती, आजीला गरम पाणी हवे होते आणि आम्हाला सकाळचा नाष्टा..  रात्रीची भांडी बोलवतच होती...  त्या सगळ्या नादात आई पातेल्यात दूध काढायचे विसरली... 
आणि तेवढ्यात वाड्यात सतत फिरणाऱ्या मांजराने त्यात तोंड घातले.. आणि हाय रे दैवा ????????????
त्या  तांब्याचे तोंड निमुळते असल्याने मांजराला तोंडच बाहेर काढता येईना..ते सैरावैरा इकडेतिकडे पळू लागले. 
ते बघून सगळेच धावत आलो.. आईला लक्षात आलं की दूध आज तांब्यातच राहिल्याने हा घोळ झाला... 
आणि मग मात्र सगळयांचीच त्या मांजराचे तोंड तांब्यातून काढण्यासाठी झटापट सुरु झाली.. 
एकतर ते मांजर दिसत नसल्याने घाबरलं होतं आणि कासावीस सुद्धा.. त्यामुळे वाट फुटेल तसं पळत होतं.. 
त्याला कसं पकडायचं आणि तो तांब्या कसा काढायचा यावर वाड्यातले प्रत्येक जण बोलू लागला... पण एकालाही यश मिळालं नाही.. 
जवळपास पंधरा मिनिटे ही त्रेधातिरपीट चालू होती. 
पकडायला गेलं की मांजर नख्या मारायचं त्यामुळे आम्ही तर लांब च राहिलो.. मग आईनं एक शक्कल लढवली. मांजराला एकाने पकडलं.. त्याच्या पायावर एक पोतं टाकलं आणि एक चुलत आत्या बाळंतपणासाठी आलेली होती तिने जोर लगाके हैशा???????? म्हणत तो तांब्या ओढला.. तिला मागे धरण्यासाठी आम्ही थांबलो.. एकदम पिक्चर टाईप सीन होता तो.. 
आणि एकदाचा तो तांब्या निघाला आणि मांजराची सुटका झाली.. मांजराने अशी काही धूम ठोकली की बस्स !!
पुन्हा पंधरा एक दिवस आमच्या वाड्याकडे फिरकलेच नाही ते ????
आणि त्या सुप्रसिद्ध तांब्याची रवानगी कायमची माळ्यावर झाली !!!

कामाच्या धांदलीमध्ये अशा बऱ्याच काही गमतीजमती घडतात.. हो ना?
आणि कधी कधी या आठवणींनी पुन्हा एकदा हास्य बहरते. ... 
तुमच्याही असतील अशाच काही गंमती तर नक्की लिहून पाठवा...