Login

मराठी माध्यम जरुरी

This post is about why education through Marathi medium is necessary.

राज्यस्तरीय करंडक स्पर्धा

वादविवाद फेरी

विषय:- मराठी माध्यम जरुरी -भाग १

संघ:- रायगड-रत्नागिरी

कोणत्याही उपहारगृहात खाण्यासाठी जावे, इतरांचे पाहून आपणही काहीतरी वेगळं खावं असं मनात येऊन एखादा झणझणीत पदार्थ मागवून घ्यावा. ताटात घेतलेलं टाकू नये म्हणून तोंडाला लागलेला तिखटाचा जाळ आवरत, तो संपवावा. आपली ती बिकट अवस्था लक्षात घेऊन उपहारगृहाच्या शेट्टीने स्वतःहून एखादा गोड पदार्थ सुचवावा, अर्थात वेगळे पैसे सांगूनच. आपणही तो तात्काळ होकार देत मागवून घ्यावा, त्याच्या दर्जाचा बिलकूल विचार न करता. कारण त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर एकच लक्ष्य असते ते म्हणजे काहीतरी गोड खाणे मग ते कितीही दर्जाहीन का असेना. यांत आपण कमावलं काही नसलं तरी नकळतपणे काहीतरी विनाकारण गमावलंच. 

किस्सा फुटकळ वाटतोय? शिक्षणासाठी मराठी माध्यम निवडावं की इंग्रजी माध्यम, हा प्रश्न वरील प्रसंगासोबत जुळतो की नाही ते एकदा पहाच. अजूनही कळलं नसेल तर हा लेख नक्कीच वाचा. अगदी डोक्यावर बर्फाची लादी ठेवून. 

एखाद्या गोष्टीचे जागतिकीकरण म्हणजे नेमकं काय? साऱ्या जगभरात त्या गोष्टीची चर्चा असणे किंवा मान्यता असणे. बरोबर न? उदाहरण द्यायचं झालं तर लांबी-रुंदी मोजण्यासाठीची एकके. श्या! तुम्हांला काय वाटलं, इंग्रजीच उदाहरण देऊ? नाय बा. आमच्या भारतीय संस्कृतीत सगळं महत्व पहिल्या क्रमांकालाच असतं, तेव्हा तृतीय किंवा फारतर द्वितीय असणाऱ्या भाषेला आम्ही डोक्यावर बसवून का नाचवावं? चला मानलं की संगणक, मोबाईल आणि अन्य संवादाची भाषा म्हटलं की डोळ्यासमोर येते ती म्हणजे इंग्रजी. पण त्यासाठी इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण घेणे गरजेचे आहे का? आताच्या घडीला कित्येक मराठी शाळांनी कात टाकली आहे. आधुनिकीकरणाच्या युगात मराठी माध्यमातून शिकणारी मुले मागे पडू नये म्हणून त्यांनी शालेय काळातच संगणक प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. काय म्हणताय? मोबाईलच काय? म्हणजे सुंभ जळला तरी.. आजकल वयाची  दोन वर्षे पुर्ण न झालेलं पोरही मोबाईल अगदी सराईतपणे हाताळतो. आपलीच कृपा अजून काय म्हणावं? जरा भोकाड पसरलं की दे हाती मोबाईल. एकीकडे मोबाईल, संगणकामुळे पिढी बिघडते म्हणून बोंब मारावी आणि त्याच गोष्टींच्या अद्ययावत शिक्षणासाठी इंग्रजी माध्यम गरजेचे म्हणून प्रचार करणे म्हणजे जागतिक दर्जाचा विनोद नाही का?

एक सांगा,जीवनात यशस्वी होण्यासाठी इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण घेण्याची गरज आहे का? अभिनेता प्रशांत दामले, बुद्धिबळपट्टू अभिजित कुंटे, गायक महेश काळे, क्रिकेटपटू पृथ्वी शॉ, झहीर खान, तरुण संशोधक प्रथमेश हिरवे. कोण आहेत हे सगळे? ओळखत तर असालच ना? आपापल्या क्षेत्रात नाव कमावलेले हे सारे दिग्गज शिकलेत मात्र चक्क मराठी माध्यमातून. याचा अर्थ तुम्ही जर कर्तृत्ववान असाल तर भाषा वा माध्यम कधीही तुमच्या यशाच्या आड येत नाही. 

मराठी माध्यमातून शिकलेली मुले ही स्पर्धायुगात इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांपेक्षा मागे राहतात असा गैरसमज आजकाल फारच फोफावू लागला आहे आणि त्याला कारणीभूत मोठ्या अंशी आजकालचे पालकच आहेत. जगभरातले शास्त्रज्ञ सांगतात की एखादी कल्पना कितीही क्लिष्ट असू द्या, मुलांना त्यांच्या मातृभाषेत समजावली तर ती त्यांच्या दीर्घकाळ लक्षात राहते. यावर आता कदाचित तुम्ही म्हणाल की इंग्रजीमध्येही मुद्देसूद समजावून सांगितल्यावर मुलांना कळू शकते. पण अहो 'डोन्ट डू धिस माय बॉय' आणि 'बाळा, असं नको करुस बरं..!' ही दोन वाक्यं वाचताना जो फरक तुम्हांला जाणवला तोच फरक आहे मातृभाषेततून आणि इंग्रजीमधून समजावण्याचा. 'मायेचा ओलावा'. अगदी बरोबर! पण आजकालच्या पालकांनाच मराठीचे वावडे असल्याने त्यांना मराठी इंग्रजीपेक्षा जास्त कठीण भासू लागली आहे हे दुःखद वास्तव आहे. फ्लॅट आणि चारचाकीच्या हप्त्यांच्या चक्रव्यूहात फसलेल्या पालकांनी घरी येऊन मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसण्यापेक्षा आपल्या मुलांसोबत काही वेळ घालवल्यास नक्कीच फरक पडेल. आताच्या इंटरनेटच्या जमान्यात जर तुम्ही खरेदीवर जास्तीत जास्त सूट देणाऱ्या वेबसाईट शोधून काढू शकता तर मराठीतले पर्यायी शब्द शोधणे नक्कीच आव्हानात्मक नाहीत. बरोबर ना?

आजमितीला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील निरक्षरतेचे प्रमाण जवळपास ३४% आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असणाऱ्या आपल्या समाजबांधवांना जर आपल्यासोबतच प्रगतीपथावर आणायचं असेल तर तिथे शिक्षणाचा प्रसार होणे खूपच जास्त गरजेचे आहे. अश्यावेळी त्यांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळांचा प्रसार होणे फार गरजेचे आहे. याच मुलांमधून चांगले शिकलेले तरुण/तरुणी ग्रामीण भागात शिक्षक म्हणून नेमले तर रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यांना यशस्वी झालेलं पाहून इतर अनेक मुले शिक्षणाकडे वळतील. परिणामी राज्याचा साक्षरतेचा दर वाढेल आणि मुख्य म्हणजे ज्ञानाचा यज्ञ अखंड धगधगत राहील.

मुलांचे पालक म्हणजे मुलांचे आद्यगुरू! मूल मराठी माध्यमातून शिकत असले तर भले पालक अशिक्षित असले तरी ते पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीवर लक्ष ठेवू शकतात, त्यात अपेक्षित सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करू शकतात कारण त्यांना भाषेची किमान ओळख असेल. पण तेच पाल्य इंग्रजी माध्यमातून शिकत असल्यास शक्य असेल का? अशावेळेस कोचिंग क्लासच्या कुबड्या आवश्यक बनतात. त्यासाठी लागणारा पैसा आणावा कुठून? अशाने त्यांच्या शिक्षणात मधेच खंड पडू शकतो किंवा त्यांना शिक्षणाच्या दर्जाबद्दल तडजोड करावी लागू शकते. तिखट लागल्यावर दर्जाहीन गोड खाणे म्हटलं ते हेच! 

मराठी माध्यमातून शिकल्यास दहावीपर्यंत तर काहीच अडचण नाही. कॉलेजात गेल्यावर सुरुवातीचे काही दिवस समस्या जाणवते. सुरुवातीला डळमळीत झालेला आत्मविश्वास काही दिवसांतच भरारी घेतो तो एका नव्या जिद्दीसह. अल्पावधीत मराठी माध्यमातील मुले अभ्यासात किंवा शैक्षणिक उपक्रमात इंग्रजी माध्यमातील मुलांशी बरोबरी करू लागतातच. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. मग थोडे घाव मुलांनी सोसले तर काय होईल? आत्मविश्वास कमी पडेल असं म्हणत असाल तर तिथे पालक म्हणून आपली जबाबदारी सुरू होईल.  

इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे वैशिष्ट्य म्हणजे इथली स्वप्नं! म्हणजे डॉक्टर, इंजिनिअरिंग, सी.ए. आणि अभिनय. अहो त्याच्या बाहेरही बरीच कार्यक्षेत्रं आहेतच की! संगीत, शिक्षण, मैदानी खेळ, सैन्य. सैन्यात भरती होणाऱ्या मुलांमध्ये मराठी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांचंच प्रमाण लक्षणीय आहे. इथे पुनः एकदा नमूद करावसं वाटतं की कोणतीच भाषा कोणाच्या कर्तृत्वाच्या आड येत नसते. आड येते ती दुबळी मानसिकता! हो हो. दुबळी मानसिकता! कारण आजही दाक्षिणात्य राज्यांमध्ये बस्तान बसवायचं झालं तर तिथल्या भाषा येणं गरजेचं मानलं जातं; पण आपल्याकडे? आपल्या राज्यात राहण्यासाठी मराठी बोलता नाही आली तरी चालते. उलट इथे तुम्ही मान उंच करून चालायचं असेल तर मराठी माणसाला कमी लेखणं गरजेचं झालंय. का? आपली अस्मिता कमी पडली म्हणून? नाही. कारण आपण आपल्या माय-मराठीचं वैभव त्यांच्यासमोर ठामपणे मांडू शकत नाही. ज्ञानेश्वरांनी अमृतासोबत जिच्या जोरावर पैजा जिंकण्याची भाषा केली तिचा गोडवा आपण त्यांच्या मनात पसरवू शकत नाही हे आपलं अपयश. आणि आपल्याच अपयशाचे भांडवल करत उभा राहिलेला धंदा म्हणजे इंग्रजी माध्यम शाळा. इंग्रजी माध्यमातून शिक्षण म्हणजे यशाची हमखास हमी हे आपल्या मनावर पद्धतशीर बिंबवलं गेलंय आणि आजही तेच केलं जातंय. बघा शांतपणे विचार करून. सुरुवातीच्या प्रसंगातील हटके काहीतरी खाण्याची जी इच्छा होती त्याचंच हे जिवंत उदाहरण.

आणि अजूनही प्रश्न पडले असतील तर आपला इतिहास आठवा. घरात छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राज्यभिषेकाची तसबीर असेल तर ती नीट निरखून पहाल तर त्यात इंग्रज अधिकारी आपल्या राजांना लवून मुजरा करताना नक्कीच दिसेल. आणि इतिहास फक्त एक भूतकाळ असं समजून पुढे जाणार असाल तर सावधान! कामावर जाताना मुलांना तुमच्या कमी शिकलेल्या पालकांकडे सांभाळण्यासाठी ठेवून जाल. अशाच एका बेसावध क्षणी मुलांनी आजीकडे 'किशी' मागितली आणि ती कदाचित नारळ सोलून त्याची 'किशी' काढून देईल. पण चुकून ‘हगी’ मागितली तर मात्र पंचाईत व्हायची!