मनातला मैत्र दिवस

About friendship!

प्रिय मैत्रिणींनो,

लेखिका  स्वाती  बालूरकर देशपांडे , सखी


प्रिय मैत्रिणींनो,

कशा आहात गं सगळ्याजणी!

कसे दिवस होते की आपण एकमेकांशिवाय रहायचो नाही एखाद दुसरा दिवस न भेटता गेला की किती हुरहुर वाटायची. . . आणि आतातर वर्ष वर्ष भेटी होत नाहीत पण हे नक्की की आपण जिथे पण असू तिथे एकमेकींची आठवण काढतो. चेहर्‍यांवर हसू येतं  आणि एक डायलॉग  नक्की येत असणार की किती बावळट किंवा वेड्या होतो नाही आपण.
हो वेड्या होतो म्हणूनच हे मैत्रीचे बंध असे जुळले होते.  सगळं कसं साधं सरळ अन सोपं होतं.
बडेजाव नाही की दिखावा नाही. आजकालची पिढी पाहून हे कधीच आठवत नाही की आपण कुठे महागड्या पार्ट्या केल्यात किंवा मग मोठ्या हॉटेलात पैसे उडवले. मुळात पैसे बाळगणं ही संकल्पनाच नव्हती. ते एकमेकांकडील डबेच किती चविष्ट लागायचे!
२ रू ला ८ मिळणार्‍या पाणीपुरीत कितीदा शेअर करायचो. . पण ती मजाच न्यारी.

स्मार्ट फोन नव्हते हे खूप बरं कारण आपण त्यामुळेच छोट्या छोट्या निरोपासाठी पण प्रत्यक्षात भेटायचो!
वेड्यासारखी पत्र व चिट्ठ्या लिहायचो ना एकमेकांना!
आता आपापल्या संसारात रममाण पण त्या आठवणी मात्र आपल्यापासून कुणीच हिरावून घेवू शकत नाही.

त्यावेळी हा असा फ्रेंडशिप डे नव्हता ना म्हणून रोजच फ्रेंडशिप डे असायचा!

शाळेतले मित्रमैत्रिणी होते . . . ती मैत्री तो बाळबोधपणा वेगळा होता. ते ही तितकेच प्रिय आहेत पण कॉलेजातल्या मैत्रिणीं जास्त खास कारण तेव्हा मैत्रीचा अर्थ कळत होता. शिवाय आपण स्वतःला ओळखायला लागलो होतो, आणि आपलं व्यक्तिमत्त्व घडत होतं.
छोटे मोठे किती सिक्रेटस आपण जपून राखून ठेवली त्यावेळी.
सोबत हसलो , सोबत रडलो , सोबत अभ्यास केला.
माझ्या ग्रुपचं मला वरदान म्हणजे मी ज्या ज्या स्पर्धेत भाग घ्यायची मैत्रिणीं घे म्हणायच्या आणि प्रोत्साहन द्यायच्या. त्यांचं प्रोत्साहन म्हणजे " तुम लढो हम कपडे संभालते " असं. मी भाग घेणार व त्या कार्यक्रम बघायला किंवा ऐकायला येणार.
किती सोनेरी दिवस होते ते! प्रत्येक दिवसाचा चेहरा वेगळा!
एकमेकांना सोडून कसे जगू असं वाटायचं.

डिग्री चं कनवोकेशन झाल्यावरचा रोजा चित्रपट सोबत पाहिलेला तो अविस्मरणीय अनुभव!
माझं लग्न ठरलेलं होतं , सिनेमात हिरोईन चं लग्न झालं तेव्हा मलाच सासरी पाठवतायत अशी कल्पना करून गळ्यात पडून थियेटर मधेच रडलेल्या माझ्या गोड मैत्रिणींनो!
खूप मिस करते सगळ्यांना.
प्रत्येकाचं एकत्र वेगळं बाँडिंग आणि प्रत्येकाचं प्रत्येकाशी असलेलं वेगळं बाँडिंग!
लग्नानंतरही किती मैत्रिणीं मिळाल्या, नोकरी करेन तिथे तिथे जिवाभावाच्या मैत्रिणी बनत गेल्या.
मी देवाचे आभार मानते की मित्रमैत्रिणी या नात्याचे भरभरून वरदान मला दिले आहे.
मी मित्रसंपन्न आहे याचा मला अभिमान आहे.
या धनाची बरोबरी ऐहिक मोजमापात होवूच शकत नाही.
मिळेल त्यात आनंद मानावा , आहे त्यात समाधानी रहावं आणि जगेल तितकं आनंदाने जगावं!
या मंत्रावर मी सध्या आयुष्य जगते आहे.

सर्व मित्रमैत्रिणींच्या
खूप खूप प्रेमाच्या ऋणात
मी तुमचीच स्वाती/ स्वाते


©®  स्वाती  बालूरकर देशपांडे , सखी 

दिनांक -  ०७.०८ .२०२२