भावनिक गुंतवणूक..

भावनिक गुंतवणूक..


काहीही झालं तरी नातं आयुष्यभर जपण्याचा संयम आपण जपून ठेवतो पण जर समोरच्या माणसाच्या दृष्टीने त्या नात्याला काही किंमतच नसेल तर आपण आतून तुटण्यापेक्षा तो संयम तुटलेलाच बरा..

आपण आपलं 100% द्यायचं आणि समोरच्या माणसाने त्याची 10% नेही परतफेड करायची नाही मग काय उपयोग आहे अशी भावनिक गुंतवणूक करून. मला ही भावनिक गुंतवणूक शेअर मार्केटमधल्या शेअर्ससारखी वाटते.. कधी कुठली भावनिक गुंतवणूक जवळीक साधेल आणि कुठली आयुष्यात दुरावा आणेल याचा काहीच अंदाज नसतो. आपण कुणाच्या वागण्यावर निर्बंध नाही लादू शकत पण समोरच्या माणसाच्या आयुष्यात आपलं किती महत्व आहे, हे नक्कीच पडताळू शकतो. आणि आपल्याला ते जितक्या लवकर समजेल तितक्या लवकर त्यातून बाहेर पडणं सोपं होईल.

सोबत कुणाला नको असते. एकट्याने प्रवास करणं सोपं नाही. पण म्हणून स्वतःच्या सकारात्मकतेला, व्यक्तीमत्वाला उपद्रव करणारी सोबत नको. म्हणजे आपल्या आयुष्यातले मग ते मित्रमैत्रिणी असोत किंवा आणखी कोणी, खऱ्या चेहऱ्यामागचे खोटे चेहरे ओळखता यायला हवेत. आता ते कसे ओळखायचे?? चित्रपटात वगैरे खोटे मुखवटे वापरतात पण खऱ्या आयुष्यात तोंडावर गोड बोलणारी माणसं असतात जी आपण बेसावध असताना आपल्याच पाठीत खंजीर खुपसतात..

समर्थ रामदासांच्या "श्रीमत दासबोध " मध्ये काही समासांमध्ये "सावधान "हा शब्द वापरलाय. लग्नात सुद्धा प्रत्येक मंगलाष्टक संपल्यावर "शुभमंगल सावधान"!!! असं म्हणतात. त्यातला सावधान शब्द खूप व्यापक अर्थ दर्शवतो. आता तुझं शुभमंगल झालं पण संसारातल्या कर्तव्यासाठी, जबाबदाऱ्यांसाठी, नवरा - बायकोतलं, सासू - सुनेतलं भांडण टाळण्यासाठी, ते शांतपणे मिटवण्यासाठी, कुठल्याही परिस्थितीत शांतपणे निर्णय घेण्यासाठी तू सावध हो, तयार हो. जबाबदारीची जाणीव करून देणारा हा शब्द. तसंच आपणही आपल्या दैनंदिन आयुष्यात सावध असायला हवं.

चोर पैशांची चोरी करतो तसंच वाईट विचार, वाईट संगत आपल्यातल्या चांगल्या गुणांची, विचारांची चोरी करतात आणि ते चांगले विचार आपल्यापासून इतके लांब नेतात की काहीतरी मोठ्या चुका झाल्यावर पश्चातापाच्या अश्रूबरोबर आपले हरवलेले चांगले विचार, चांगली वागणूक आठवायला लागतात. म्हणून प्रत्येक क्षणी सावध असावं, दक्ष असावं म्हणजे पश्चातापाची वेळ येणार नाही आणि समजा आलीच तरी खचून जाऊ नये.. पुन्हा नव्याने उभं राहावं आणि आयुष्याचं सार्थक करून घ्यावं. मोठमोठ्या तपस्वी, ऋषींची साधना जिथे तग धरू शकली नाही तिथे आपण किस झाड की पत्ती !!

चुका होतात.. कधी निर्णय घेण्यात तर कधी माणसं ओळखण्यात पण म्हणून आयुष्याच्या वाईट काळाची ची टेप किती काळ आपण स्वतः ऐकणार आणि दुसऱ्यांना ऐकवणार.. अशीही माणसं आहेत जी आपल्यापुढे रडून ऐकतील आणि तेच दुसऱ्यांपुढे हसून सांगतील. आयुष्याची व्यथा चार भिंतींच्या बाहेर गेली की त्याची कथा व्हायला वेळ लागत नाही. आणि कथेच कथानक वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शित करून आपलाच देखावा करणारी आपल्यातलीच माणसं असतात. ( आपलं दुःख गावभर करून आपली दुखरी बाजू जगजाहीर करणारी आपल्यातलीच माणसं असतात. )

सावध राहा, आनंदी राहा.. आपली दुःख व्यक्त करायला जर कुणी भेटत नसेल तर देवापुढे मांडा.. तो स्क्रीनशॉट नाही काढून ठेवणार पुरावे म्हणून.. भलेही समोरून काहीच उत्तर येणार नाही पण मनातलं बोलून आपण तर मोकळे होऊ. आणि देवही एक मित्र म्हणून आपलं ऐकून घेईल आणि आपल्या संकटात आपल्nयाला मित्र म्हणूनच मदत करेल. ?