भ - भाषेचा

सदर लेख हा मातृभाषा जपता यावी याकरिता लिहिला गेला आहे . कोणाचेही मन दुखावणे हा हेतु मुळीच नाही. एखादे घटक न आवडल्यास दूर्लक्ष करावे विनंती.

भाषा संवर्धन 


सदर लेख हा भाषा संवर्धन करिता सादर करित आहे. 

  भारत देश हा बहुभाषिक देश आहे . काही ठराविक अंतरावर भाषा बदलत असतात. घराघरात भाषा वेगळी असते . काही प्रसंग नमुद करत आहे . हा लेख जो कोणी वाचणार त्यांनी नक्कीच यावर प्रकाश टाकावा कि आपण नेमक चुकतो कुठे? 

(टिपणी : कोणत्याही भाषेला धर्माने जोडणे चुकीचे आहे. भाषेचा धर्म नसतो .)

--------------


 माझे शिक्षण , बालपण हे मुंबई गेले. एकंदरीत काय तर तिथेच लहानाचे मोठे झालो आम्ही . शिक्षण तसेच शेजारी सर्वत्र मराठी मराठी यामुळे मी मुस्लिम असताना देखील मराठी अगदी सहजतेने बोलता येते याचे मला कधीच कौतुक वाटले नाही . कारण महाराष्ट्रात असताना मराठी येणे ही काही कौतुकाची बाब नव्हेच मुळी. त्यात आईचे शिक्षण देखील मराठीत झालेले . जेव्हा आम्ही सोलापुर येथे आलो तेव्हा कळाल कि मुस्लिम लोकांना स्पष्टपणे मराठी येणे किती कौतुकाची बाब कारण इथल्या मुळ मराठी भाषिकांची भाषा शुद्ध नाही. :काय करत आहेस ?\" या इतक्या सहत वाक्याला इथे "काय बे काय कराइला ?" इतक अवगढ करून विचारतात . मी घराजवळच्या एका मेडिकल मध्ये गेल्यावर हातातील चिठ्ठी देत "काका, या गोळ्या मिळतील का इथे ? डॉ. बाकळे यांच्या दिलेल्या आहेत पण इतक्या दूर नाही जाता येणार मला ". मेडिकल वाल्या काकांनी चिठ्ठी नंतर पाहिली आधी वरून खालीपर्यंत नजर टाकली मग गोळ्या दिल्या . बिल ६० रु झाल मी ५०० दिल . उरलेले पैसे परत करताना त्या काकांना राहावल नाही त्यांनी आडनाव विचारल मीः " ईनामदार आहे . पण का?" 

काकाः म्हणजे तु ब्राम्हण नाहीस ? ( त्यांनी उत्तर न देता अजुन एक प्रश्नच विचारल)

 मी :" ब्राम्हण तर सोडाच मी हिंदू देखील नाही , मुस्लिम आहे ." 

एवढ ऐकताच त्यांचे हावभाव खुप काही बोलत होते.

ते म्हणाले " इतकी शुद्ध मराठी फक्त इथे मी कोणाच्या तोंडून ऐकली नाही . किती स्पष्ट पणे बोललीस तु".

मला ऐकून विचित्र वाटल कि यात काय नवल ? मी म्हटले 

" काका महाराष्ट्रात राहतो ना आपण मग मराठी नको का बोलायला . तस मी इथली नाही मुंबईची आहे , मराठीत शिक्षण घेते मग यायलाच हवी". 

त्यांनी एक चॉकलेट दिल मला शुद्ध बोलल्या मुळे. आणि म्हटले " असच असेल कारण तुझ्या बोलण्यात जो आदर स्पष्ट उच्चारण आहे ते सोलापुर मध्ये आजवर मी तरी ऐकल नाही .५० वर्ष झाली तरी ." 

  घरी आल्या आल्या आईला फोन करून कळवल " मम्मी यहाँ मराठी नही आती क्या "? म्हणत सर्व सांगितल . या क्षणी मला नवल का बरे वाटू नये . मग सुरु केल यापुढे निरीक्षण शेजारची मुल मराठी शाळेत जात होती खर पण ......( पुढच तुम्हीच समजून जा) 

 आत्याची मुल देखील मराठी शाळेत जायची पण शुद्ध नाही अजून निरीक्षण केल्यावर कळाल कि मुळात शिक्षकांची भाषा शुद्ध नाही . मग तेव्हा स्वतःच कौतुक वाटू लागल कि ज्या मराठी ला मी इतक साधी सरळ म्हणत होते ती एवढी भारी . लग्नानंतर नणंदेच्या मुलाचा तर आग्रह " मामी तुम्ही हिंदी नको मराठी बोला खुप छान वाटते तुमच्याकडून मराठी ऐकायला . इथे सोलापुरात कधी ऐकावी आम्ही . माझे परधर्माचे मित्र देखील इतक्या स्पष्टपणे मराठी बोलत नाहीत". 

 इथल्या कॉलेज मध्ये देखील शिक्षक कौतुक करायचे "इतकी सुंदर , इतकी गोड मराठी बोलते हि , आम्हाला देखील येत नाही". 

 ----------------

प्रसंग २ 

 बालपणी चा प्रसंग हा जेव्हा मुंबई मध्ये होतो आम्ही . आई बाजारात गेली आणि नेमक एका दुकानात माझ्या दादाच्या सोबत अंगणवाडी - ते पहिली पर्यंत असणाऱ्या सौरभ ची आई भेटली . दोघींच्या गप्पा सुरु झाल्या मग इतक्यात सौरभ आला व त्याच्या आईला इंग्लिश मध्ये बोलू लागला काहीतरी ( माझ्या आईला येत नाही इंग्लिश म्हणून तिला कळण्याचा प्रश्नच नाही ) . सौरभची आई माझ्या आईला फार कौतुकाने बोलू लागली " अहो माझा मुलगा बघा चौकटा बाहेल पाऊल टाकताच इंग्लिश बोलतो . तस आम्ही बजावल आहेच मुलांना . कस आहे येणाऱ्या काळात गरज आहे इंग्रजी नाही आली तर कस बर पुढे जातील ? मुस्तफा देखील बोलत असेल ना इंग्लिश आणि बोलायलाच पाहिजे ". 

 " नाही माझी मुल घरात हिंदी बोलतात घराबाहेर मराठी ". माझी आई उत्तरली . दोघींनी निरोप घेतला . 

आई घरी येताच आमच्या वर बिघडली ना गाडी . आम्ही म्हटल ढ गोळ्यांना इंग्लिश येते हसण्यावारी घेतल आम्ही क्षणिक . पण माझ्या मनात ते खिळत होत खरच इंग्लिश यायलाच हवी का? म्हणजे मी एकतर ढ ढ ढगोळ , त्यात देशप्रेमापोटी सेमी इंग्लिश ही नाकारल पाचवीत असताना . मी का करावी गुलामी गरज असेल तर समोरच्यानेच मराठी, हिंदी मध्ये बोलाव निदान आपल्या देशात असताना तरी. शाळेतही यामुळे कॉलर ऑफ काय तर सर्व असून इंग्रजीच्या नावाने शून्य . आजदेखील इतकी इंग्लिश येत नाही ,देशप्रेम आणखी काय ? 

 शिक्षकांना देखील म्हटल होत इंग्रजीच्या " पासिंग पुरत येत इंग्लिश बास इतकच, बाकी त्या इंग्लिश ची ऐशी तैशी . स्वातंत्र्या साठी इतक लढलेत पूर्वज , राष्ट्रध्वजाला सलामी देताना इंग्रजीत द्या बर . आमचे पूर्वज जीवानिशी गेलेत इंग्रजांशी लढताना . काय गरज मग परत त्यांची गुलामी का बर करावी ?" 

व्यक्तिमत्व विकासच्या शिकवणीचे सर ख्रिश्चन ते वर्गात इंग्लिश बोलायचे मी एकदा वर्ग सुरु असताना उठले व " सर तुम्ही मराठी शाळेत शिकवता मग मराठीत बोला जर नसेल जमत तर हिंदी पण इंग्रजी मी असताना तरी नको इंग्रजी च्या तासाला शिकतो ती पुरते ." 

सर " अरे बेटा क्यू ? आपको नही आती तो मै इंग्लिश सिखाता हूँ ". 


मी उचलली बॅग आणि वर्गाबाहेर जाता जाता म्हटल "मी इथे इंग्रजांच्या गुलामी करिता बसले नाहीये . मातृभाषा सोडून काय बर विकास करणार तो तुम्हीच करा ". 

त्या शिक्षकाने टाळ्यांच्या कडकडाटात माझे स्वागत केले नंतर परत कधीच हिंदी - मराठी ऐवजी भाषा वापरली गेली नाही .

-------------------

 असे अनेक प्रसंग असतील तुमच्याही जीवनात . इंग्रजी येण वाईट नाही मी त्याच्या विरोधात देखील आज तरी नाही . खरच यायला हवी इंग्रजी गरजेपुरती तरी पण मातृभाषा सर्वप्रथम . शाळेत प्रवेश घेताना आजकाल इंग्लिश येते का हे पाहून पात्रता ठरवतात खरच याची गरज आहे का? आई - वडिलांना इंग्लिश आली तरच प्रवेश ,नाहीच जर येत असेल एखाद्याला मग ? त्यांच्या मुलांनी घेऊ नये शिक्षण . भाषेवरून पात्रता ठरवणारे आपण कोण ? कुली चित्रपटात दाखवल्या प्रमाणे इथे भारतीयांना येण्यास मनाई आहे हिच गत झाली नाही का? मग शाळेबाहेर लावा फलक इंग्रजी येणाऱ्यांनाच प्रवेश . आपण ज्या देशात राहतो , ज्या राज्यात राहतो तिथली बोलीभाषा जर येत नसेल मग काय उपयोग आपण विदेशात राहण काय अनं मायदेशात राहण काय ?एकच ते . मुळात काय इंग्रजीच्या अतिहव्यासापोटी माय भाषेच्या भ ला भरकटत नेऊन कुठे तरी लांब भिरकावल्या सारख वाटत. 

   जर अमेरिका सारख्या देशात मराठी शाळेचे वेध असतील तर आपल्याला जन्मतः मिळालेले सौभाग्य असून देखील आपल्या देशात भारतात इंग्रजी शाळेचे एकूण पट वाढत असतील तर आपण नक्कीच यावर विचार केला पाहिजे . मी इथे फक्त मराठी बद्दलच नव्हे तर आपल्या देशात बोलल्या जाणाऱ्या सर्वच मातृभाषाबद्दल सांगते आहे. परदेशात जर एखाद कोणी हिंदी , मराठी बोलणार भेटल कि कस हायस वाटत . किती आपलेपणा वाटतो परक्या देशात सुद्धा . पण आपल्याच देशात राहत असताना विनाकारण ,नको तिथे इंग्रजांची धुताना लाज नको का वाटायला ? 


     कुठेतरी दोन मराठी भेटले कि आपापसांत सुरु हिंदी नाहीतर इंग्रजी ; का रे युवांनो लाज वाटते का आपल्याच संस्कृतीची ? मराठीची ? का इंग्रजी जास्तच चढली ? याद राखा जेव्हा उतरेल ना मग गमावलेल असेल . मी जेव्हा ते यूपी बिहार ची लोक पाहते ना चक्क कर्नाटकात जरी ते गर्दीत भेटले तरी हिंदीच बोलतात. आपण शिकायला नको त्यांच्या कडून ? 

 आपली शेंबडी पोरं इंग्रजी राइम्स गाताना कशी छान दिसतात आणि तिच मायबोलीतील बालगीते बडबड करताना दिसल तर त्याच्याकडे पाहताना घाण केल्यासारख्या नजरेने पाहताना स्वतः च्या नजरेवर किती घाण साचली असेल ह्याचा नक्कीच विचार व्हावा. बहुभाषिक ज्ञान असणे फायद्याचे आहे पण मायबोली सर्वप्रथम या शिवाय किती भाषा येत असून काय उपयोगाच नाही. 

 मायबोली यावी यामागे कारण आहे , ते म्हणजे आपली संस्कृती , संस्कार जपता येतात . मराठी शाळेच्या वार्षिक मेळाव्यात हिकरी डिकरी वर थिरकणारी लहान मुल दिसतील पालकही भूवया उंच करून कौतुकाने पाहतात पण त्याच ठिकाणी इंग्रजी शाळेत गॅदरिंग मध्ये मराठी गीत ? मराठा इतिहास मराठी साहित्यात जास्त उपलब्ध असणार , हिंदी च हिंदी साहित्यात, ऊर्दू च ऊर्दू साहित्यात , कन्नड च कन्नड साहित्यात इ. जर आपणच मायबोली पासून मुलांना वंचित ठेवल तर येणाऱ्या पिढी साठी मायबोली इतिहास जमा होईल यात तिळमात्र शंका नाही. मायबोली ही लिहिता वाचता यायलाच हवी . बाकी भाषांचे देखील नक्कीच स्वागत व्हावे जर लिहिता वाचता नसेल जमत तर बोलता आली तरी चालेल पण मातृभाषा सर्वप्रथम . आपली संस्कृती , संस्कार, भाषा आपण आपल्याच हाताने नष्ट करत आहोत भान असू द्यावा .

     शेवट इतक लिहून करते कि, 

" बाप गरिब आणि काका अमीर आहे म्हणून आपल्या नावापुढे बापाच नाव काढून काकाच लावता येत नाही . बापाची ओळख पटली कि बाकी नाती आपोआपच कळतात ". 


( कोणाचही मन दुखावणे हेतु नव्हता . जर चुकून काही चुकल असेल तर लहान आहे म्हणून क्षमा करा.)

 धन्यवाद!


लेखिका : शगुफ्ता ईनामदार .