बरं असतं गप्पं बसणंही कधीकधी..

जेव्हा संवाद उगाच चर्चा अन् चर्चा वादविवाद बनते..


      खरंच कधीकधी बोलून काहीच उपयोग नसतो कारण एकाचे चार शब्द होतात.. संवाद चर्चेत, तर चर्चा वादात रुपांतरित होते पण विषयाच्या खोलात कुणी शिरूच शकत नाही. म्हणूनच कधीकधी न बोलता गप्प राहून आलेले प्रसंग अनुभवणे गरजेचे असते. मग एक वेळ अशी येते की, मन मोकळं व्हावं, आपलं मन मोकळं करावं अशी साधी अपेक्षाही नसते मनात.. का कोण जाणे.. मग स्पष्टीकरण देणे गरजेचे वाटत नाही. कारण गैरसमजाचा पडदा असा काही डोळ्यांवर झाकलेला असतो की, मग कितीही समजुतीचे घोट पाजा सगळे प्रयत्न व्यर्थच ठरतात.

           कारण म्हणतात ना.. " विनाशकालैयः विपरीत बुध्दी.. " आणि हेच खरंंय जेव्हा गैरसमजुती वाढत जातात आणि ते दूर करण्यासाठी प्रयत्न फक्त एकतर्फी सुरू असतील ना तर मग ते गैरसमज दूर होतील याची शाश्वती नसते. कारण अशावेळी एकतर्फी प्रयत्न करणारा वेडा ठरतो कारण असं वाटतं गरज त्याचीच आहे, जो गैरसमज दूर करण्याचा कसोशीने प्रयत्न करतोय आणि ज्याला गैरसमज झालाय तो मात्र त्याच्याच ऐटीत.. 

            म्हणून निदान मी तरी हाच सल्ला देणार की, काहीही गरज नाही एकतर्फी प्रयत्न करण्याची.. ज्याला उगाच खाज आहे ना गैरसमज करून घेण्याची.. सांगोवांगी गोष्टींवर विश्वास ठेवून आपल्याच माणसांवर संशय घेण्याची, त्यांनाच खोटं ठरविण्याची.. तर मग अशा खुमखुमीच्या लोकांना खुशाल अनुभव घेऊ द्या स्वार्थी जगाचे.. कळू द्या अशांना त्यांची पात्रता.. जेव्हा तोंडावर पडतील तेव्हा त्यांचं त्यांना कळेल.. तुम्ही केले ते प्रयत्न पुरे झाले.. आता त्या लोकांना गैरसमजासकट श्रध्दांजली वाहा आणि स्वतःला महत्त्व देत स्वतःचं आयुष्य जगा! 

         खूप झाला त्यांचा आणि त्यांच्या पोकळ गैरसमजांचा विचार, आता स्वतःला वेळ आणि महत्त्व द्या.. नवीन वर्षात नवीन सुरुवात करा.. झाले गेले वाईट अनुभव सारे विसर्जित करुन आता श्रीगणेशा करा आयुष्यात येणाऱ्या नवीन आठवणींचा, गोड अनुभवांचा! 

          म्हणून एक अनुभवाची शिदोरी म्हणून हा लेख लिहून सांगतेय कधीकधी गप्पं बसणंही इच्छा नव्हे तर आपली गरज बनून जाते. म्हणून स्पष्टीकरण देणे सोडा, आयुष्य जगणे सुरू करा.. संवाद करा पण उगाच वादविवाद करण्याच्या फंदात अडकून जाऊ नका. आणि अपेक्षा ठेवून नातं जोडू नका, जे तुमच्यासाठी असेल ते तुमचंच असणार कुठल्याही परिस्थितीत. आणि जे तुमचं नसेल ते कायम पळवाटंच शोधणार.. म्हणून उगाच अपेक्षा करून स्वतःचीच दिशाभूल करून घेऊ नका.

         सुखी जीवनाचा एकच मंत्र, "इतरांचा विचार तर करा पण त्याआधी स्वतःला प्राधान्य देत तुम्ही खुश राहा.. " पटलं तर घ्या अन्यथा शेवटी तुमचाच निर्णय! 

        ............ 

        गतकाळाला साक्षी मानून माझ्या अनुभवाच्या शिदोरीतून हा मोजून मापून लिहिलेला लेख.. सांगा तुम्हाला काय वाटतं ते.. बाकी काळजी घ्या.. शुभ रात्री.. 

        तुमचीच सेजल अर्थात श्रावणी..