फिट्टंफाट

शाळा संपताना तुटलेल्या संपर्कानं आम्ही दोघं दूरदूर निघून गेलो आणि आज अशी अचानक भेट घडून आली...

फिट्टंफाट

          थंडीच्या दिवसांतील सकाळची वेळ होती. सुट्टीसाठी गावाकडं निघालो होतो. पाठीवर सॅक, कानात हेडसेट आणि हातात मोबाईल. खूप दिवसांनी घरी जाण्याची ओढ काही औरच असते ! आपलं गाव, आपली माती, आपली माणसं यांना बघण्याची, भेटण्याची आस मनाला लागून राहीलेली असते. त्यांच्याशी हितगुज करायचं असतं. अनेक दिवसांचं-महिन्यांचं साचलं संचित गावाकडे घेऊन जायचं असतं. आदल्या दिवशीच गावाकडं जाण्यासाठीची केलेली तयारी व रिझर्वेशन केलेलं असल्यानं घाईगडबड नव्हतीच. चांगला तासभर आधीच रेल्वेस्टेशनवर आलो होतो. स्टेशनवर बऱ्यापैकी गर्दी होती. भरीसभर म्हणून थोडीफार 'हिरवळ' सभोवताली विखुरलेली दिसत होती. काही 'पाखरं' प्रेमवार्ता करत जागोजागी बसलेली होती. त्यांच्याकडे प्रयत्नपूर्वक दुर्लक्ष करत मी उगाचच टाईमपास म्हणून इकडून तिकडे अन् तिकडून इकडे चकरा मारत होतो. अचानक माझ्या पाठीमागच्या बाजूने मोठ्यानं 'राssहूssल...' असा आवाज आला. आवाज जरासा ओळखीचा वाटला म्हणून उत्सुकतेनं मी माझ्याही नकळत गरकन मान वळवली आणि.. आणि मंत्रमुग्ध झाल्यासारखा भान हरवून नुसता बघत राहीलो.. अंजू !.. हो, अंजूच.. गोरा वर्ण, मध्यम उंची, कमनीय बांधा, अंगात पर्पल कलरचा शॉर्ट कुर्ता, त्यावर डार्क ग्रे रंगाचा स्वेटशर्ट आणि ब्लॅक कलरची जीन्स, डोक्यात कानांचं थंडीपासून संरक्षण करणारी पिंक कलरची सुरेख आकर्षक कानटोपी, मानेवरून पाठीवर रुळणारे मोकळे सोडलेले दाट काळे केस, खांद्यावर अडकवलेली सॅक, पायात स्पोर्ट्स शूज, मनगटात चमकणारं सोनेरी घड्याळ आणि हातांत आयफोन अशा रुपात नजरेसमोर पन्नासेक फुटांवर 'ती' होती. माझ्याच दिशेनं जरासं धावत येत होती. काही क्षणांत ती माझ्यासमोर धापा टाकत आणि दम भरलेला अशा अवस्थेत येऊन ऊभी ठाकली.. मीही थोडासा बावरून, गोंधळून गेलेलो आधी श्वास रोखून नुसता तिच्याकडे बघत राहीलो; नंतर हलकेच माझ्या ओठांतून उद्गार बाहेर पडले, 'अंजू !!!' आणि ते ऐकताच माझ्या डोळ्यांत बघत झट्कन पुढं होत तिनं कसलाही विचार न करता मला मिठी मारली. आमच्या बाजूने धडधड आवाज करत एक गाडी मार्गस्थ झाली. मी मात्र सुरवातीला अवघडून गेलो. आजूबाजूच्या बऱ्याच नजरा आमच्यावर आपसूक रोखल्या गेल्या आणि मी आणखीनच बावरलो पण.. पण काही क्षणांत मला हायसं वाटलं ! तिची कृती, तिचं ते वागणं अगदी हवंहवंस वाटू लागलं; कदाचित् वातावरणातील थंडीमुळे तसं असेल ! जरा वेळानं ती बाजूला झाली आणि मी सुटकेचा नि:श्वास टाकला.

          "कसा आहेस ?" तिनं बाजूला होत विचारलं.

          धावत आल्याने तिला लागलेला दम काहीसा ओसरला होता. मी मात्र तिच्याकडून अनपेक्षितपणे घडलेल्या कृतीनं बसलेल्या धक्क्यातून अजूनही सावरलो नव्हतो. शून्यात नजर लागलेलो, मनानं अजूनही हवेत, तिच्या मिठीतच तरंगत होतो.

          "ओ साहेब, आहात कुठं ?"

          माझ्या डोळ्यांसमोर चुटकी वाजवत आणि खट्याळ हसत तिनं विचारलं आणि मी भानावर आलो. हलकेच एक मंद स्मित माझ्या चेहऱ्यावर उमटलं. "चल कुठंतरी बसू" आजूबाजूला पाहत मी बोललो. तिच्या 'हम्म' बरोबर आम्ही दोघं चालू लागलो.

          अंजली ! माझी बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत असतानाची एक जिवाभावाची मैत्रिण. एकदम बिनधास्त मुलगी. कोणाचीही भीड न ठेवणारी. वेळेप्रसंगी समोरच्याला सणकन् कानाखाली ठेवून देणारी. जशास तसं हा ऍटीट्यूड असलेली पण काही बाबतीत तितकीच भावनाशील असणारी; बुद्धिमान, सुंदर आणि गोड मुलगी.

आज किती दिवसांनंतर मी तिला बघत होतो ! जवळजवळ सहा-सात वर्षे झाली असतील. दहावीचे पेपर्स देऊन बोर्डिंगस्कूल सोडलं तेव्हा तिला शेवटचं बघितल्याचं अजूनही चांगलंच आठवतंय. त्यानंतर थेट आज, या रुपात तिचं खुललेलं सौंदर्य मी बघत होतो. कदाचित् तिच्या या खुललेल्या सौंदर्यामुळे मी आज तिला ओळखूही शकलो नसतो पण तिचा तोच गोड हवाहवासा वाटणारा आवाज आणि तिचं पहिल्यापासूनचं असलेलं असंच आजच्या सारखं उत्स्फूर्त आणि बिनधास्त वागणं यांमुळेच तर मी, ही 'अंजली'च हे बघताक्षणी ओळखलं होतं. आमची दोघांची पावलं स्टेशनवरच्या कॅन्टीनकडे वळली. चालत असताना सहज तिनं माझा हात आपल्या हातात घेत बोटांत बोटे गुंफली आणि मी मस्तपैकी गालांतल्या गालांत हसलो. ती मात्र नजरेसमोर बघत होती !

          स्टेशनवरच्या कॅन्टीनमध्ये आम्ही दोघं एका टेबलजवळ समोरासमोर बसलो. तिनं जास्त विचार न करता पटकन वेटरला कॉफीची ऑर्डर दिली न् माझ्याकडे बघू लागली. मी मात्र अजूनही तिचंच निरीक्षण करण्यात व्यस्त होतो.

          "कुठे निघालास ? गावाकडे ?" तिनं विचारलं.

          "हम्म; आणि तू ?"

          "मी पण रे.. बरं झालं तू भेटलास आज, मला प्रवासात सोबत होईल." ती हसत म्हणाली.

          'मी तर सगळा प्रवास 'तुझ्या सोबतीनं' करायला तयार आहे !' माझं मन कसला भन्नाट विचार करायला लागलं होतं !

          "किती दिवसानंतर भेटतोय आपण, आठवतंय का काही ?" मी विचारलं.

          "हम्म ! आठवतंय ना. अगदी आपली शेवटची भेटसुद्धा ! पण त्यावेळेस आजच्यासारखी संपर्काची साधनं सहज उपलब्ध नसल्यानं आपला संपर्क तुटला, आपण दुरावलो गेलो." ती म्हणाली.

          'काही हरकत नाही, आज तर भेटलोय ना..' हे माझं मन पण ना...

          "हम्म.. काही गोष्टींसाठी पुन्हा भेट होते असं समज.. आज आपली झाली." मी खडा टाकण्याचा प्रयत्न केला. ती क्षणभर गंभीर, विचारमग्न झाली पण लगेच विषय बदलत,

          "काय करतोस इकडे ?" तिनं विचारलं.

          "जॉब."

          "हम्म.."

          समोर आलेल्या कॉफीचे सिप घेत आमचं औपचारीक बोलणं चालूच राहीलं. बोलता बोलता लक्षात आलं दोघंही आज एकाच गाडीने, एकाच डब्यातून एकत्र प्रवास करणार आहोत. मला मनोमन आनंद झाला. मी तिची प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर तिलाही आजच्या भेटीचं नक्कीच समाधान वाटत होतं. कॉफी संपवून दोघं कॅन्टीनच्या बाहेर आलो. थोड्यावेळाने आमची गाडी येताच आम्ही आतमध्ये गाडीत चढलो. आजच्या एकत्र प्रवासाविषयी माझ्या मनांत विचार आला, 'अर्रे यामागे काही प्रयोजन ? नियतीचं !' मला माझ्याच विचारांचं हसू आलं. तिने ते हेरलं.

          "काय रे? अजूनही स्वत:शीच हसतो, बोलतोस.. आजिबात बदललेला दिसत नाहीयेस तू..." ती मला पॉईंट आऊट करत बोलली.

          "तू तरी कुठं बदललीस, तशीच तर आहेस आधी सारखी, मनमौजी !" मघाचा मिठीचा प्रसंग आठवून मी म्हणालो.

          'मनमौजी' या नावानं शाळेत असताना मी तिला सतत पिडत असायचो. क्षणभर तिनं माझ्याकडे रोखून बघितलं. मग खट्याळ हसली. 'तू ना...' असं पुटपुटत पुन्हा समोर चालू लागली. ट्रेनच्या मोकळ्या डब्यातील खिडकीजवळचे दोन रिकामे सिट्स आम्हा दोघांची वाट बघत होते.

          रेल्वेची चाकं प्रवासाच्या पुढच्या दिशेनं पळायला लागली तर आमची विचारांची चाके आम्हा दोघांना उलट्या दिशेनं भुतकाळाकडे नेऊ लागली. एक एक जुनी आठवण निघायला लागली, अगदी सुरवातीपासूनची. दोघेजण गप्पांमधे हरवून गेलो. आमची शाळा, आमचे शिक्षक, मित्रमैत्रिणी यांच्याबद्दलच्या आठवणींना नव्यानं उजाळा दिला जात होता. अनेक गंमतीजमतींना आठवून पोटभरून हसत आणि हसवत होतो. त्यावेळी एकमेकांशी शेअर केलेले क्षण आठवून आज आता पुन्हा जगत होतो. पुढील कित्येक तास आमचे गप्पांच्या सोबतीनं संस्मरणीय बनले. खरंच हा एक आयुष्यातला यादगार दिवस ठरला, अनेक अंगांनी.

          आमची गाडी आता लोकवस्ती मागे टाकून दुर्गम डोंगरदऱ्या आणि जंगलाच्या परीसरातून जात होती. डोळ्यांना सुखदायक असं बाहेरचं निसर्गाचं हिरवंगार रुपडं खिडकीतून दिसत होतं. आम्ही दोघंही बाहेरचा परीसर न्याहाळण्यात हरवून गेलेलो. निसर्गाचा हिरवा नजराणा बघून मला आमची शाळेची एक सहल आठवली इतक्यात,

          "तुला आठवतं, आपली आठवीला असताना गेलेली ट्रिप ?" एकदम आठवल्यासारखं करत अंजली बोलली. मी हसलो. काही गोष्टी एकाचवेळी आठवण्याला काही 'खास' कारणं तर नसतात ?...

          "हो तर." मी उत्तरलो.

          "कसली धम्माल केली होती ना, आपण सगळ्यांनी मिळून !" ती म्हणाली.

          "तुझ्या सगळं काही लक्षात दिसतंय तर.." माझ्या डोळ्यांसमोर एक छानशी आठवण तरळली.

          एक झक्कास स्माईल देत तिनं म्हटलं, "का नसणार बरं ? ते दोन-तिन दिवस तू माझ्यासाठी केलेला 'त्याग' मी कशी विसरेल..."

          "त्या ग ? " मला तिच्या बोलण्याचं हसू आलं.

          "हो मग त्यागच !"

          "अगं त्याग वगैरे काही नव्हतं.. एक गोड गुलाबी मुलगी गुलाबी थंडीत कुडकुडत असताना गुलाबाच्या फुलासारखे तिचे लाल झालेले गोबरे गोल गाल बघून खरंतर मला दया आलेली म्हणून मी माझी कानटोपी त्या मुलीला देऊ केलेली..."

          "अरे व्वा ! फ्लर्ट करतोयेस ?" ती लाडीक हसली.

          "नाही गं.. गंमत ! पण तू, तुझी टोपी विसरण्यामुळे माझी गैरसोय झाल्यानं ट्रिपवरुन आल्यानंतर थंडीमुळे मी आठ दिवस आजारी पडलो होतो; आठवतंय का ?"

          "बिच्चारा राहुल ! पण ते आठ दिवस मी घेतलेली तुझी काळजी विसरलास वाटतं ?"

          "काळजी !" मला पुन्हा हसायला आलं,

          "तू माझी काळजीपण करायचीस ?" मी मुद्दामहून विचारलं.

          "हो मग ! मित्राची काळजी करण्यात काय गैर !"

          "...आणि मित्राला विसरुन जाण्यात पण काहीच गैर नाही, नाही का ?"

          पण मी मारलेल्या या पंचकडे तिनं सरळ सरळ दुर्लक्ष केलं आणि ती खिडकीबाहेर शून्यात बघितल्यासाखं पाहू लागली; निदान मला तरी तसंच वाटलं. नंतर बराच वेळ आम्ही दोघं शांत बसलो. आणि नंतर अचानक,

          "अरे तुला ती टिना आठवते का ?" तिनं विचारलं.

          "अंs.. हो, पुसटशी." मी विचार करुन बोललो. ती मात्र हसली.

          "का गं, का हसलीयेस ?"

          "तू तिला लाईक करायचास ना त्यावेळी ?"

          मी अवाक् होऊन तिच्याकडे बघू लागलो.

          "कसा मोठाले डोळे करुन बघतोयस साध्याशा प्रश्नावर !.."

          "नाहीतर काय ? कुठं ती टिना न् कुठं त्..." मी शब्द आवरला, बोलणं अर्धवट सोडून गप्प झालो. आता अवाक् होण्याची तिची पाळी असावी असं तिचं माझ्याकडे बघण्यावरून मला वाटलं.

          "म्हणजे नव्हता करत ?" तिनं चलाखीनं माझ्या अर्धवट बोलण्याला बगल देऊन विषय पुढे नेला. कदाचित् तिला आत्ताच माझ्याकडून काही ऐकायचं नसावं असं मला वाटून गेलं.

          "तुझं काहीतरीच आपलं !" मी म्हणालो.

          "अरे मला वाटायचं रे तसं.."

          "हो, खरंच ?"

          "हम्म !"

          "मलापण"

          "काय ?"

          "काही नाही.. जाऊदे.. " मी म्हणालो.

          ती पुन्हा खिडकीतून बाहेर बघू लागली. तिला नजरेसमोर नक्कीच काहीतरी वेगळं दिसत असावं असं मला वाटलं.

          मी मनांत विचार करू लागलो, काय बरं असावं हिच्या मनांत ? टिनाचा न् माझा काहीच संबंध नसताना तिनं मुद्दामहून तिचं नाव का बरं घेतलं असावं ? तिला काही सांगायचं-बोलायचं किंवा माझ्याकडून काही ऐकायचं असावं का ?.. आता तिनं आपले डोळे मिटून घेतलेले होते पण माझी विचारांची गाडी मात्र सुसाट सुटली होती.

          कदाचित् त्यावेळी शाळेत असताना तिलाही आपल्याबद्दल नक्कीच काहीतरी वाटत असावं, मैत्रीच्या पलिकडचं आणि प्रेमाच्या अलिकडचं ! का नाही वाटणार बरं ? ते वयच तसं असतं. किशोरवयीन अल्लड वयातलं सुप्त आकर्षण हलकेच प्रेमात घेऊन जातं. अर्थात् आकर्षण आणि प्रेम यांत भेद करणं त्यावेळी शक्य होत नाही. तरीही त्या वयात एकदुसऱ्याचा निरोप घेत असताना ओलावणारे डोळे हे नक्कीच प्रेमाचे निदर्शक असतात; नाही का ? माझ्या डोळ्यांसमोर मी बोर्डिंगमध्ये दाखल झाल्यापासून दहावीचे पेपर्स देऊन तिथून बाहेर पडलो तोपर्यंतचा ओझरता प्रवास ऊभा राहीला. सहावीला असताना घरच्यांनी मला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकलं. लहान वय, घरापासून, आपल्या माणसांपासून खूप दूरवर अनोळखी जगात मी आलो होतो. आधी बावरलेला मी दोनतीन महिन्यानंतर बऱ्यापैकी रुळलो. घरची आठवण कमीकमी होत गेली. सुरवातीचे काही नविन मित्र-मैत्रिणी बनले त्यात अंजली होती, माझी क्लासमेट. जसजसे दिवस, महिने पालटत गेले आम्ही दोघं क्लोज फ्रेंड्स बनत गेलो. निरागस वयात फुललेली त्यावेळची मैत्री, निरनिराळे प्रसंग, एकदुसऱ्यांच्या मुद्दामहून काढलेल्या खोड्या, अनेकदा केलेली-झालेली फजिती, भांडणं आठवून आजही खुदकन् हसू येतं. किती निष्पाप आणि निरागस असतो आपण दहा-बारा वर्षांचे असताना, नाही का ?.. अशातच आयुष्यात एक वळण येतं जे आपल्याला 'बालक' या स्थितीमधून 'किशोर' या अवस्थेकडं घेऊन जातं. या काळात शरीरातील हार्मोनल आणि फिजीकल चेंजेसमुळे आपल्या मनोवृत्तीत बदल होत असतो. या संक्रमनावस्थेत आपला बरोबरच्या भिन्न लिंगाच्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टीकोन काहीसा बदलतो आणि जवळच्या मैत्रिणींविषयी (मुलींच्या बाबत मित्रांविषयी) मैत्रीच्या पलिकडचं एक सुप्त आकर्षण आकार घेत असतं. आपल्याला ती व्यक्ती 'आवडायला' लागते. असंच काहीसं मी नववीत शिकत असताना घडत होतं. नववीची उन्हाळ्याची सुट्टी संपवून मी दहावीच्या वर्गात दाखल झालो त्यावेळी मी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे बदललेलो होतो. 'अंजली' आता फक्त मैत्रिण वाटत नव्हती तर त्यापलीकडे तिच्याविषयी काहीतरी वेगळंच वाटत होतं. नक्की काय ते मात्र त्यावेळी उमगत नव्हतं. तिला बघताच छातीतली धडधड वाढायची, तिच्याशी बोलताना ओठ थरथरायचे. एखाद्या दिवशी ती दिसली नाही, भेटली नाही तर कासाविस, बेचैन व्हायचो. माझ्या आठवणीप्रमाणे त्यावेळच्या तिच्या देहबोलीनुसार तिलाही असंच काही नक्की वाटत असणार पण दहावीचं महत्वाचं वर्ष, अभ्यासाचा लोड यांमुळे दोघांच्याही मनांतील त्या भावना तशाच अबोल राहील्या. अशातच ते वर्ष संपलं आणि आमचा निरोप समारंभाचा दिवस उजाडला. तेरा फेब्रुवारी सात ! आमचा दहावीचा निरोप समारंभ होता त्या दिवशी. गेल्या पाच वर्षांचा दिर्घ प्रवास संपवणारा तो एक आयुष्यातला महत्वाचा दिवस होता. आम्ही सगळे मित्रमैत्रिणी, शिक्षक एकमेकांचा औपचारीक तरीही भावनावश होऊन निरोप घेत होतो. त्या दिवशीचा शेवटचा प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर ऊभा राहीला. अचानक अंजली माझ्यासमोर येऊन ऊभी राहीली आणि माझ्याही नकळत माझे डोळे पाणावले होते. मुलं कधी मुलींसमोर रडत नसतात या विचारानं मी डोळ्यांतील पाणी लपवण्याचा आटोकाट प्रयत्न चालवलेला. तिचीही माझ्याहून काही वेगळी अवस्था नव्हती आणि मग भरलेल्या डोळ्यांसोबत काहीच न बोलता ती तिथून निघून गेली होती. ती पाठीमागे वळताच माझ्या डोळ्यांतलं रोखून धरलेलं पाणी गालांवर टपकलं होतं. खरंतर मला त्यावेळी तिच्याशी खूप काही बोलायचं होतं, तिला मनातल्या भावना सांगायच्या होत्या पण असलं काहीच त्यादिवशी घडायचं नव्हतं. नंतर पुढे परीक्षेच्या काळात एकमेकांना शुभेच्छा देण्यापुरतं औपचारीक बोलणं फक्त व्हायचं. शेवटचा पेपर संपल्यानंतर लगेच त्याच दिवशी ती तिच्या बाबाबरोबर गावाकडे निघून गेली. जेव्हा मला ती गेल्याचं कळालं तेव्हा तिची भेटही घेता आली नाही याचं खूप वाईट वाटून मी पुन्हा एकदा रडलो होतो. तिनं का बरं मला टाळलं असावं या प्रश्नाचं उत्तर त्यावेळी माझ्याकडे नव्हतं. कधीतरी वाटायचं, तिच्या शिस्तप्रिय बाबांना ती घाबरत असावी. काही असो पण शेवटी त्यावेळचं माझं ते अबोल प्रेम मात्र अनुत्तरीत अन् अव्यक्तच राहीलं होतं. बऱ्याच वेळानं विचारांच्या तंद्रीतून मी बाहेर आलो.

          संध्याकाळचे साडेसात वाजत आलेले. अंजलीचं स्टेशन येण्यास आणखी दिड-दोन तास बाकी होते. दिवसभर मनसोक्त गप्पा मारून ती बाजूला माझ्या खांद्यावर अलगद डोकं टेकवून शांत झोपली होती, निरागसपणे. त्या सुंदर चेहऱ्याला मी कितीतरी वेळ न्याहाळत राहीलो. मनांत एक विचार आला, 'एक लहानपणापासून आवडणारी मुलगी, जी सोबतीनं शाळेत शिकली, बोर्डिंग लाईफ जगत असतानाची जिवाभावाची सोबत, विरंगुळा बनली ती आज इतक्या वर्षांनी भेट झाल्यानंतर माझ्या खांद्यावर डोकं टेकवून शांतपणे गाढ झोपली आहे; केवढ्या विश्वासानं !' या विचारानं एक शांतपणाची सुखद जाणिव मला झाली. मीही माझे डोळे मिटून घेतले. मन पुन्हा विचाराधीन झालं. शाळा संपताना तुटलेल्या संपर्कानं आम्ही दोघं दूरदूर निघून गेलो आणि आज अशी अचानक भेट घडून आली. कदाचित् आम्हा दोघांना आयुष्यभरासाठी एकत्र आणायला ! विचारानं मी सुखावलो. मनांत आलं, आज तिच्यासोबत तिच्या स्टेशनवर उतरुन घ्यावं आणि तिला 'दिल की बात' सांगून आयुष्यभराची जिवनाची सोबती म्हणून मागून घ्यावं... ठरवलं, हिच ती वेळ ! आज नाही तर कधीच नाही. मनांत ओळी रेंगाळल्या,

"हरवलीस वेडे कधी आज सापडली

चंद्राच्या सोबतीला चांदणी अवतरली"

          रेल्वेची गती हळूहळू कमीकमी होत गेली आणि ती थांबली. आम्ही दोघं आपापल्या सॅक घेऊन अलगद खाली उतरलो. स्टेशनवरील लाईट्सच्या झगमगाटाने आमचे डोळे दिपून गेले. आम्हाला घेऊन आलेली गाडी पुढे तिच्या मार्गानं निघून गेली. आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं. दोघांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं.

          "आता ?" मी विचारलं.

          "घरी जाऊया." तिनं म्हटलं.

          आम्ही दोघं चालतचालत रेल्वेस्टेशनच्या बाहेर पडलो तसा एक रिक्षावाला आम्हाला सामोरा आला,

          "कुठं जायचंय ?" त्यानं विचारलं.

          मी अंजलीकडे बघितलं. तिनं मात्र त्याच्याकडे पाहून नकारार्थी मान हलवली आणि आम्ही पुढे निघालो. शंभर-सव्वाशे फुट अंतर पार करून दोघं मुख्य रस्त्यावर आलो. उजवीकडचा टर्न घेऊन चालू लागलो. अचानक माझ्या मनांत शंकेची पाल चुकचुकली. मी जागेवर थांबलो. तिचा हात माझ्या हातात असल्याने तिलाही थांबावं लागलं. तिनं मागे वळून माझ्याकडे भुवया उंचावून प्रश्नार्थक पाहीलं.

          "अगं, अंधार कितीये बघ. साडेनऊ वाजून गेलेत. रिक्षा करून जाऊयात ?" मी म्हणालो.

          "अरे दहा मिनिटांचीच तर पायवाट आहे बस्स.. चालतच जाऊ." तिनं म्हटलं.

          "नक्की ?" मी विचारलं. ती आश्वासक हसली. आम्ही पुन्हा चालायला लागलो.

          "या भयाण, सुनसान रस्त्यावर कुणी गुंडे-मवाली आडवे आले तर..." मनातील भितीनं पुन्हा डोकं वर काढल्यानं मी शंकीत स्वरात विचारलं.

          "यू नो ? वी बोथ आर दी कराटे चैम्पियन्स." तिनं आठवण करून दिली. तोच शाळेत असतानाचा बोलण्यात डोकावणारा कमालीचा आत्मविश्वास. ही मुलगी खरंच एक अजब रसायन आहे असा एक विचार माझ्या मनांत चमकून गेला. आम्ही पुन्हा चालायला लागलो.

          वरती आकाशात पौर्णिमेचं लख्ख चांदणं पसरलेलं होतं. त्याच्या पिवळसर दुधाळ रंगानं सारा आसमंत, धरा न्हाऊन निघाली होती. त्या शांत आणि सुनसान रस्त्यावर आम्ही दोघंच हातात हात गुंफून निर्वेध चाललो होतो, एकदम 'आजाद पंछी' बनून. मी तिचं चंद्रप्रकाशानं झळाळणार अंधूक पिवळसर सौंदर्य डोळ्यांत साठवत होतो, तिच्याही नकळत. एका बेसावध क्षणी तिनं माझ्याकडे एक चोरटा मोहक कटाक्ष टाकला न् माझी चोरी पकडली गेली, मी आधी नजर चोरली मात्र ती मधाळ हसली. तिच्या त्या मधाळ हसण्यानं मी विरघळलो. चालायचं थांबलो. एकदुसऱ्याला न्याहाळत एका अनावर ओढीनं हळूहळू जवळ येत गेलो. माझ्या मानेभोवती तिच्या नाजूक हातांचा विळखा पडला. माझ्या हातांच्या ओंजळीत तिचा 'चंद्रकोरी' चेहरा आला. नजरेत नजर गुंतली गेली, खोल खोल.. लयबद्ध श्वासांची गती वाढली, त्यांची उष्णता जाणवायला लागली. आमचं दोघांचं भान हरवलं आणि हलकेच ओठांवर ओठ टेकले गेले. मनांत शब्द रेंगाळले,

"ऊजळला चंद्र गुलाबी बोल थरथरले

चुंबन घेण्या रसाळ ओठांत ओठ दिले"

          "ऐ राहूल, राहूssल... अरे उठ." अंजलीनं आवाज दिला.

          "ऊंss.." मी.

          "अरे, वाजलेत किती बघ."

          "जाऊदे ना गं, झोपू दे मला... दमलोय मी रात्रीच्या प्रवासानं." मी अर्धवट झोपेत म्हणालो.

          "अरे उठ लवकर, जायचंय मला."

          "नको ना जाऊ... आज सुट्टी घे."

          जरा वेळ ती शांत राहिली. काहीच बोलली नाही आणि नंतर,

          'तू पण ना... थांब असा नाही ऐकायचास..' असं बोलत तिनं तिच्याजवळच्या बाटलीतल्या थंडगार पाण्याचा शिडकावा माझ्या चेहऱ्यावर मारला. एकाएकी त्या रक्त गोठवून टाकणाऱ्या पाण्याच्या थंडगार स्पर्शानं माझी झोप कुठल्या कुठे उडून गेली. मी डोळे फाडून तिच्याकडं बघितलं मग आजूबाजूला पाहू लागलो न् माझ्या एकदम ध्यानात आलं, आम्ही तर अजून ट्रेनमध्येच आहोत. म्हणजे.. म्हणजे मघापासून मी बघत होतो ते एक सुंदर गोड गुलाबी स्वप्नं होतं तर ! मला जाणिव झाली. तिला माझी सगळी धांदल लक्षात आली असावी. 'नाही' अशी नकारार्थी मान हलवत,

          "तू अजूनही अगदी तसाच आहेस लहानपणीसारखा, स्वप्नाळू !" ती उद्गारली.

          मी आता पूर्णपणे जागा झालो होतो. आता थोड्याच वेळात ती उतरणार होती आणि मग कदाचित मीसुद्धा. मी मनांत शब्द जुळवत होतो आणि ती ? ती शांतपणे ट्रेनमधून उतरण्यासाठीची तयारी करत होती. तिचा चेहरा प्रसन्न होता, पूर्ण उमललेल्या गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत.

          गाडी स्टेशनमध्ये येऊन थांबली. गाडी आल्याची स्टेशनवर अनाउंसमेंट झाली. ट्रेन बदलण्याचं निमित्त पुढे करून मी तिच्यासोबत खाली उतरलो... आम्ही आत स्टेशनमध्ये गेलो. ज्या क्षणाची मी सकाळी ती भेटल्यापासून वाट बघत होतो तो क्षण आलेला.

          "अंजली" मी हलकेच बोललो. तिनं चालणं थांबवून माझ्याकडे वळून बघितलं. आता आम्ही दोघं समोरासमोर ऊभे होतो. तिने भुवया उंचावल्या.

          "अंssजssलीss" ...

          मी बाजूला बघितलं. एक ऊंची सुट घातलेला, जवळपास माझ्याएवढीच ऊंची असलेला, वर्णानं गोरा, हॅंडसम तरूण आमच्याकडे येत होता.

          मी समोर अंजलीकडे बघितलं. ती त्याच्याकडेच बघत होती.

          मी हळूच 'अंजू' म्हणून तिचं लक्ष स्वतःकडे वेधलं. तिनं माझ्याकडे बघितलं.

          "अ.. अमन, माय हब्बी-माय लाईफ !" ती स्मित करत बोलली.

          माझ्या डोळ्यांत पाणी तरळलं. त्याला कष्टपूर्वक मी आवरलं. एव्हाना अमन आमच्याजवळ येऊन ऊभा राहीला होता. अंजलीनं आमची दोघांची ओळख करुन दिली. मी दोघांचा निरोप घेणार इतक्यात तिनं विचारलं,

          "आता ट्रेन ?"

          "पहाटे... तिनला" मी माहीती दिली.

          "तोपर्यंत ? आणि एवढ्या थंडीत ?" तिनं काळजीच्या सुरात विचारलं.

          मी हसून खांदे उडवले, "वेटींग रूम !"

          तिनं आपल्या डोक्यातील कानटोपी काढून माझ्या हातात कोंबली आणि हसून 'बघ उपयोग होईन' म्हणाली. अमननेही यावर हसून माझ्याशी हस्तांदोलन करत निरोप घेतला. आपल्या आलिशान कारमध्ये बसून दोघेजण निघून गेले.

          हातातल्या कानटोपीकडे मी उदास चेहऱ्यानं बघितलं आणि वेटिंग रूमच्या दिशेनं पावलं वळवली. तेथे पुढील चारपाच तास मी बसणार होतो,

     ट्रेनची वाट बघत...

                    ट्रेनचीच की मिना-मिनम्माची..???

[पूर्वप्रकाशित]―र ! / २४ नोव्हेंबर १७