प्रिय अहो,

मी तुमचाच हिस्सा आहे. कुठेही गेलो तरी जोडीनेच.भांडू-तंडू पण सोबतच राहू..

   प्रिय अहो,

अहो, तुम्ही अगदी सदोदीत सोबतच असता, तुझ्याशिवाय, तुझ्याविना मला करमत नाही ग.. असे म्हणून मला कुठे जाऊ देत नाही. गेलो तरी साथीने, जोडीने, एकत्रच... त्यामुळे मग पत्र लिहिण्याचा कधी योगच आला नाही. पत्र लिहावे तरी केव्हा आणि कसे?

पण यावेळी मात्र मी जिद्दीला पेटली. मला दोन दिवस माहेरी राहायचं. गेली मग हट्टाने.

पण कसंच काय? मलाही करमेना..

खरं आहे मी आता तुमचाच हिस्सा झाली आहे. भांडू,तंडू पण सोबतच राहू...

         आजचे पत्र लिहिताना जरा सुरुवातीपासूनच सुरुवात करावी लागेल. अहो तुम्हाला सांगते, माझा लग्नासाठी जरा विरोध होता. कारण मी फार वेगवेगळ्या नवऱ्या बद्दल ऐकले होते.

तिरसक, हेकड, संशयी आणि हो काळजी घेणारा नवरा सुद्धा.. पण एकंदरीत माझा नवरे प्रकरणाला जरा विरोध होता.

म्हणून जरा उशीराच लग्न करायचे ठरले. बाबांनी स्थळ बघायची ठरवली आणि तुम्ही आलात..

पहिल्यांदाच भेटलो आपण. पण तुम्हाला बघताच वाटलं सूत जुळेल आपलं... मी होकार दिला आणि आपलं लग्न झालं..

लग्नानंतर तुमच्यातील नवरेपणाचा परिचय झाला.जरा वेगळाच.... तुम्ही स्वभावाने जरा हट्टी. पण हट्ट सोडला तर कायम प्रोत्साहनच देणारे. तुमच्या प्रोत्साहनामुळेच तर मी डॉक्टर होऊ शकली...

तुम्हाला जे पटत नाही ते तुम्ही करणार नाही पण मला मात्र कधीच अडवलं नाही. "तुला आवडते ना तू कर.."

नवरा बायको पासुन कधी चांगले मित्र बनलो कळलंही नाही. एखाद्यावेळी तुमच्यातला नवरा डोकावतो, "तेव्हडं चालतय की"...

आपल्या बऱ्याच सवयी सारख्या आहेत. त्याचं मला फार आश्चर्य वाटतं..

लग्नापूर्वी मी दह्यात तिखट, मीठ, साखर घेऊन खायची. तेव्हा माझ्या बहिणी मला म्हणायच्या, "तू ना जरा जगावेगळी".. पण तुम्हालाही दही आवडते साखर मीठ घेऊन याचा मला खूप आनंद झाला..

    रंग मात्र वेगवेगळे आवडतात आपल्याला. मला सगळे डार्क रंग तर तुम्हाला सगळे लाईट रंग.. पण त्याने काहीच फरक पडला नाही. आताशा तर तुम्हीच मला म्हणता डार्क रंग वापर..

बघता बघता वीस वर्ष झालीत आपल्या लग्नाला वाटतच नाही.

हळूच मागून येऊन चिडवता तेव्हा वाटतं असंच तरुण राहावं नेहमी.. कुठेही गेलो तरी तुम्हाला घरी जेवायचं असत. मला कंटाळा येतो कधी स्वयंपाक करायचा. पण तुम्ही जेव्हा चार जणांमध्ये म्हणता "माझी बायको सुगरण आहे" तेव्हा अगदी भरून पावते मी.... फक्त जेवताना कधी म्हणत जा की भाजी चांगली झाली आहे बरं वाटेल मला...

हा मला पैसे देताना जरा हात आखडता घेता तुम्ही. तुम्ही म्हणता, "तू कमावते ना. कर की खर्च. तुला थांबवले आहे का कोणी?" पण पैसे दिले तुम्ही मला तर मला आवडेल..

तुमची एक गोष्ट खूपच खटकते मला. बघा जरा काही करता आले तर.. माझ्या वाढदिवसाला भेटवस्तू देत नाही तुम्ही. म्हंटलं तर म्हणता, "तुझेच तर आहे सगळे वेगळे काय द्यावे लागते?"अहो बायकांना हवं ते दाखवायला नवऱ्याने गिफ्ट दिलं सांगायला...

तिथेच तर माझी मोठी पंचाईत होते. कोणी मला विचारते, "वाढदिवसाचे काय गिफ्ट मिळालं?"तेव्हा जरा मला वाईट वाटते.. बघा माझा वाढदिवस जवळच आहे काही करता आलं तर.. द्या यावेळी भेटवस्तू मला...


    बाकी तर आपलं छानच चाललंय. गंमत म्हणजे संसार आणि अध्यात्म जोडीने करतोय. भोग आणि मोक्षाची यात्रा सोबत करतोय यासारखा आनंद कोणता..

खूप आनंदी आहे मी तुमच्यासोबत....

मला वाटते वीस वर्षातलं पहिलं पत्र आहे.. वाचून नक्की अभिप्राय द्या..

आणि हो, दोघी मिळून गाणे ऐकतो ना मोठ्याने ते फार भावते हो मला... तुम्हाला आणि तुमच्या गाण्याला दोन दिवस झाले मिस करते मी...

फार आनंद होतोय.पत्र लिहून..

पत्र जपून ठेवा बरं..

अक्षर नाही माझे तितकेसे चांगले.तुमचे अक्षर अगदी मोत्याचा दाणा..पण माझ्या भावनांचे दाणे आहे यात...

भेटू उद्या...

तुमची प्रिय सखी/ बायको..

अर्चना...


अर्चना काळे....