प्रगल्भता

Pragalbhata
प्रगल्भता
जन्म झाल्यानंतर "आई" या शब्दापासून मनुष्य शिकण्याचा श्रीगणेशा करतो.
वाढत्या वयानुसार व आवडीनिवडी नुसार वाचनाचे प्रमाण,पद्धती,सवयी वाढत जातात.

"जो वरवर वाचन करतो
तो फक्त असतो वाचक
जो वाचून समजून घेतो
तोच खरा आदर्श वाचक"

ज्ञान आणि वाचन यांचे नाते जवळचे. जर ज्ञान मिळवायचे असेल तर आपल्याला वाचन करणे गरजेचे आहे. आपल्याला ह्या स्पर्धात्मक जगात ज्ञान मिळवून यशस्वी होण्यासाठी भरपूर वाचनाची गरज असते.

वाचनाच्या सवयीमुळे माणसाचे आयुष्य घडत असते. आताच्या आधुनिक जगात ज्ञान मिळवण्याची भरपूर साधने उपलब्ध आहेत त्यामध्ये वाचन हे एक महत्वाचे साधन.

वाचन आपल्यापासून कधीच वेगळे नाही. वाचन आणि माणूस हे एकमेकांचे मित्रच. संपूर्ण जीवन बदलवून टाकण्याची ताकद वाचनामध्ये आहे.

आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण काही न काही कारणावरून नकळत कितीतरी गोष्टी वाचतो.

आधुनिक काळात नवनवीन तंत्राचा शोध लागला व
जीवनात सोप्या सुलभ मार्गांचा प्रगतीसाठी वापर होऊ लागला.
वाचनाचे प्रमाण झाले कमी झाले‌
बदलल्या काळानुसार आवडीनिवडी बदलल्या.
पुस्तके आयुष्यातून हरवली आणि येणाऱ्या परिस्थितीनुसार मनुष्य स्वतःच्या मर्जीनुसार व फायद्यानुसार वागू लागला.
धावपळीच्या काळात कुणाकडेही आज वेळ नसल्यामुळे अनमोल खजिना वाचण्यास
मेळ कसा जमवावा याकडे कुणीही गांभीर्याने पहात नाही.

पुस्तक हेच जीवनाचे खरे मार्गदर्शक असतात.
मानवाला सारासार विचार करण्याची शक्ती व जीवन जगण्याची प्रेरणा देतात
मानवी जीवनात ग्रंथ हेच खरे गुरू असतात
वाचनाशिवाय मानवाचे जीवन सुरुच होतं नाही.

वैचारिक प्रगल्भता
असावी माणसात
माणुसकीने वागावे
माणसांशी जगतात

वाचनाने समृद्ध होतात
मन ,आचार व विचार
वागणुकीतून दिसतात
व्यक्तीवर झालेले संस्कार

भेदभाव, धर्मभेद नसावा
कधीही मानवाच्या मनी
आनंदाचे झरे वाहतील
प्रत्येकाच्याच जीवनी

उक्ति व कृतीमध्ये मानवाच्या
नेहमीच असावी समानता
वैचारिक प्रगल्भतेमुळेच
मिळते व्यक्तीला महानता

क्षणभंगूर मानवी जीवनात जर सुख,शांती व समाधानाचे जीवन जगायचे असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही.
म्हणूनच "वाचाल तर वाचाल " हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

©® श्री सुहास अजितकुमार मिश्रीकोटकर,औरंगाबाद