प्रकाश हवाहवासा असा

एका अशा माणसाचे मनोगत ज्याला अंधार हा प्रकाशापेक्षा जास्त जवळचा वाटतो.

प्रकाश हवाहवासा असा...

नमस्कार. मी प्रल्हाद. प्रल्हाद पुरुषोत्तम साठे. मी इकडे उभा आहे ते माझं मन मोकळं करायला. प्रत्येकाचंच आयुष्य विचित्र अनुभवांनी भरलंय. सुख-दु:ख प्रत्येकाच्याच वाट्यात आलेले आहेत. माझंच असं विशेष नाही. पण तरीही मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या आयुष्याबद्दल. आयुष्याने मला दिलेल्या अनुभवांबद्दल. म्हटलं तर साधं अन्  म्हटलं तर विलक्षण. 
डोळे हे माणसाच्या पंचेंद्रियांपैकी एक. सर्व सृष्टीचं अवलोकन या डोळ्यांनीच होतं. अन्  ज्यांना या सृष्टीचं दर्शन घेता येत नाही त्यांचं दुर्भाग्यंच म्हणायला हवं. मीही त्यांच्यापैकीच एक होतो. मी जन्मत:च आंधळा होतो.
माझा जन्म झाला मुंबईच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात. आई, बाबा, मोठा भाऊ, बहीण आणि सर्वात लहान मी. माझा जन्म झाला १९८० साली. माझ्या जन्माच्या आधी आईला सणसणून ताप भरला. औषध गोळ्या घेऊन सर्व ठिक झालं खरं; पण त्याची परिणती झाली माझे डोळे जाण्यात. आई-बाबा तर रड-रड रडले. पण नंतर सावरले. दिवसामागून दिवस गेले. माझं भविष्य तर अधांतरीच होतं. बाबांनी मला आंधळयांच्या शाळेत घातलं. मी ब्रेल लिपी शिकू लागलो अन्  तिथूनंच माझ्या आयुष्याला खरी दिशा मिळाली.
दिसत नसलं ना तरी माझं स्पर्शज्ञान दांडगं होतं. कान तीक्ष्ण होते. एक गंमत सांगतो, माझ्या दादाचा साखरपुडा होता त्या दिवशी. स्वप्निल. माझ्याहून तो आठ वर्षांनी मोठा. समारंभ साधाच पण छान होता असं आई सांगते.
“ काय गं, पोरींनो, बांगड्या भरा की?”, मावशी म्हणाली.
सा-याजणी बांगडीवाल्यापाशी गोळा झाल्या. बांगड्यांचा तो नाद. अहाहा! छन् छन् !! सुरेख. मी जवळंच बसलो होतो. सगळ्यांच्या बांगड्या भरुन झाल्या आणि बांगडीवाला म्हणाला, 
“ताई, पचास रुपया झाले.”
तो असं म्हणण्यात आणि वीज जाण्यात एकच गाठ पडली. अंधारात कोणालाच दिसेना. बांगडीवाल्या भय्याला जायची घाई अन्  वीज येण्याचा पत्ताच नव्हता. तेवढयात मी त्या भय्याला खिशातून पन्नासची नोट काढून दिली. वीज आली तेव्हा सर्वांनी बघितलं. मुलीकडचे तर चाटच पडले.
“प्रल्हू कसं केलंस रे तू?”, आजोबांनी विचारलं.
“त्यात काय अवघड नाहीये हो आजोबा. शाळेत शिकवतात आम्हांला स्पर्शाने वस्तू ओळखायला. आणि प्रत्येक नोटेवर एक चिन्ह असते ना ते ते विशिष्ट असं. त्यावरुन ओळखलं मी आणि दिले पैसे.”
त्या दिवशी सगळयांच्या आश्चर्याचा विषय होतो मी. सगळ्यांनी खुपंच कौतुक केलं माझं. पण आयुष्य एवढ्याने भागात नाही. ब्रेल लिपी शिकतंच मी माझं शिक्षण पूर्ण केलं.
कधी कधी खूप वीट यायचा अशा जगण्याचा. चिडचिड व्हायची. पण आईबाबांनी मला सांभाळून घेतलं. डोळ्यांत औषध टाकण्याचं काम तर माझी सुमीताई नेमाने करायची. माझ्या कुटुंबाचे ऋण तर मी कधीच विसरु शकत नाही. 
माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे माझी पत्नी. सागरिका. माझी बालमैत्रिण. तिला जवळचं असं कुणीच नव्हतं. घरची परिस्थिती बेताची. पेशाने ती नर्स. त्यामुळे माझा आणि तिचा अधिक जवळचा संबंध येत गेला. आम्ही लग्न केलं. एका आंधळ्याशी संसार करणं ही सोपी गोष्ट नव्हे. पण तिने कधीही तक्रार केली नाही.
सागरिकाचा आवाज मंजूळ, मधुर होता. मी तिची चाहूल लगेच ओळखत असे. तिचा आवाज तर माझ्या कानांत सामावला होता. तिचा चेहरा मी बघू शकत नसलो तरी तिच्याइतकं सुंदर कोणी नाही हे मी ओळखून होतो. आमच्या घरात एक शोना नावाची कुत्री पण होती. मी तासन् तास तिच्याशी खेळायचो. फिरण्यात मला त्रास होत असला तरी आता सवयीचं झालं होतं. घराला हातभार लावून मी छोटीमोठी कामं करत होतो.
अचानक एके दिवशी सागरिका माझ्याजवळ आली.
“अहो, ऐकलंत का?”
“काय गं?”
“मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी.”
“अगं मग बोल ना!”
“उद्या माझ्या हॉस्पिटलमध्ये आय स्पेशालिस्ट डॉ. विजयेंद्र आपटे येतायेत. आपण जर तुमचे...”
“हे बघ, सागरिका, आतापर्यंत आपण किती नेत्र तज्ञांकडे गेलो. काही फरक पडला का? नाही ना?”,मी तिचं बोलणं मध्येच खुडत म्हटलं.
“आता फक्त माझ्या समाधानासाठी. प्लीज..”
तिच्यापुढे माझं काही चाललं नाही आणि मी तयार झालो. 
डॉक्टरांनी माझ्या निरनिराळया ट्रीटमेंट केल्या. अन् आशेचा किरण जागवला. ऑपरेशन ठरलं. पैशांची जमवाजमव झाली. मी सारा धीर एकवटला. सागरिका माझी हिंमत वाढवत राहीली. ऑपरेशन झालं. Successful. फक्त डोळ्यांच्या पट्टया काढणंच तेवढं बाकी राहीलं. 
पट्टी काढण्याच्या दिवशी माझी पत्नी माझ्यासोबत होती. डॉक्टरांनी पट्टी काढल्यावर हलकेच डोळे उघडायला लावले. हाच माझ्या आयुष्यातील कसोटीचा क्षण. माझी इच्छा होती माझ्या पत्नीला बघण्याची. पण हाय रे दैवा! समोर उभ्या असलेल्या बाईला मी ओळखलंच नाही. ओळखणार तरी कसा? पहिल्यांदाच पाहत होतो. 
“डॉक्टर, डॉक्टर कोण ही बाई? मी हिला ओळखत नाही.”
“धीर धरा  मिस्टर साठे. हिच तुमची पत्नी आहे.”
“नाही, नाही...”
“अहो, असं काय करता? मी सागरिका. तुमची बायको.”
“हा आवाज. माझ्या सागरिकाचा. हो. हो. माझ्या पत्नीचा. पण हा चेहरा. नाही मी पहिल्यांदाच पाहतोय याला.”
नंतर बरेच दिवस माझे बायकोची ओळख पटवण्यात गेले. तिचा आवाज जितका ओळखीचा तितकाच चेहरा अनोळखी होता. आणि आमची कुत्री शोना. मी ‘इमॅजिन’ केलेलं त्याहून बरीच वेगळी होती ती.
माणूस आणि प्राण्यांमधला फरक शाळेत शिकवला होता आम्हाला. माणसाला म्हणे त्रिमितीचं ज्ञान असतं. उंची, खोली, जाडी, रुंदी त्याला सहज कळते. पण माझं दूर्दैव  म्हणा की काही. त्यांचे अर्थ मला कळतच नव्हते. 
सात फुट दूर असणा-या वस्तूजवळ माझे हात सहज पोहोचणार नाहीत हे मला माहीतंच नव्हतं. तिथपर्यंत चालत जावं लागतं हे मला कित्येक प्रयोगांनंतर मला समजलं.
आजही रंगांमधला नेमका फरक मला ओळखता येत नाही. ड्रायव्हिंग शिकताना तर आलेल्या problems ची गणतीच नाही. लाल, हिरवा, निळा रंग ओळखणं म्हणजे मोठीच परिक्षा. दैव बलवत्तर म्हणून आजपर्यंत माझं ॲक्सिडंट झालेलं नाही. आजही अडगळीतून चालताना मी डोळे बंद करुन घेतो.
जेथे जन्मत:च अंधार होता, तिकडे अचानक आलेला प्रकाश माझ्यासाठी  नवीनच समस्या ठरतोय. आधी होतं त्याहूनही आता नव्या  जगाची ओळख पटवण्यासाठी ‘स्ट्रगल’ करावा लागतोय.
कधी कधी वाटतं, या खून, दरोडा, राजकारण, धकाधकीच्या आयुष्याला पाहण्यापेक्षा माझं आधीचं आयुष्य किती सुरेख होतं. तिथं अंधार होता पण उमेदीचा एक किरणदेखील होता. जो सतत सोबत करत होता. आयुष्य खरंच खुप सुंदर आहे पण तितकंच वेदनादायकही. मला पुन्हा माझ्या जगात जाता येईल का? पुन्हा अंधारातंच प्रकाशाची वाट शोधत...
समाप्त.
हर्षदा शिंपी.