पाळी आलीच नाही मग लग्नाचं काय

पाळी आलीच नाही तर....मुलीच्या लग्नाचं काय...??

      पीनू अत्यंत खेडेगावात राहणारी मुलगी....गावात एस.टी चीसुद्धा सोय नाही.चार बहिणीत पीनूचा दुसरा नंबर आणि एक भाऊ,आई-वडिल,आजी-आजोबा असा त्यांचा परिवार...पीनू दिसायला चवळीच्या शेंगेसारखी नाजूक,चाफेकळीसारखं नाक,गोरीपान,छोटसं कपाळ आणि लांबसडक सरळ केस,आणि सगळ्या माणसांत मिळून मिसळून राहणारी.....तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं.आता लग्नासाठी नंबर होता पीनूचा.....
तसं पीनूचं आर्टस् मधून ग्रॅज्यूएशन पूर्ण झालं होतं.पीनू खूप धडपडी मुलगी होती कामाला कधीही न कंटाळणारी.. ति एका हॉटेलमध्ये काम करत होती. तेवढ्यावरच न थांबता तिने घरी एक कपड्याचं दुकान टाकून दिलं होतं आणि ते दुकान आई सांभाळायची.पूर्ण घराची जबाबदारी पीनू खूप छान पार पाडत होती.असेच काही दिवस लोटले आणि पीनूपेक्षा लहान बहिणीला लग्नासाठी स्थळ आलं.सगळं चांगल असल्याने पीनूच्या लहान बहिणीचं लग्न झालंदेखील....काही कालांतराने पीनूच्या बहिणीला जुळ्या मुली झाल्या.त्या मुलींचही पीनू आनंदाने हट्ट पुरवायची आणि असं म्हणतातही,माय मरो पण मावशी उरो....
      या सगळ्या गोंधळात पीनूचा मात्र कोणीच विचार करत नव्हतं.पीनूच्या लग्नाचं काय...??कारण पीनूमध्ये एक कमी होती...पीनूला पाळी येत नव्हती.खूप दवाखाने केले पण काहीच उपयोग झाला नाही.पीनूलाही मनातून खूपदा वाटायचं की,मी आयुष्यभर वडिलांवर भारच आहे.आता ठीक आहे पण भावाच्या लग्नानंतर माझी अडचणच होणार सगळ्यांना...पण तीही काहीच करू शकत नव्हती कारण लग्नासाठी एकही स्थळ तिला येत नव्हतं.असेच खूप दिवस गेले;ती स्वत:ला कामात गुंतवून घ्यायची.पण कधीच आपलं लग्न होऊ शकणार ही सल तिच्या मनात कायम होती.एक दिवस पीनूला वडिलांचा फोन आला की पीनू,तुला स्थळ आलंय.उद्या तू घरी ये,तुला पाहायला पाहुणे येणारेत.पीनू आनंदून गेली,तिला वाटलं की या जगात देव नक्की आहे आणि माझी काळजी त्याला आहे.पीनू खूप आनंदाने घरी आली.छान साडी घालून तयार झाली.तोवर चारचाकी घरासमोर येऊन उभा राहिली.पाहुण्यांचा पाहुणचार व बघण्याचा कार्यक्रम झाला. व तिथेच लगेच त्या मुलाने पीनूला पसंती दिली. पीनूला खूप आनंद झाला की पुण्याचा मुलगा...आणि त्याने माझ्यात प्रॉब्लेम असूनही लगेच पसंतही केलं.खरंच खूप उच्च विचार आहेत याचे.पण पुढंच बोलणं ऐकल्यावर पीनू पुरती गोंधळून गेली.
        पाहायला आलेला मुलगा एका वर्षाच्या मुलाचा बाप आहे.त्याची पहिली बायको हार्ट अँटॅकने वारली होती.घरातल्या लोकांनी पीनूला काही विचारायच्या आतच ति होकार देऊन मोकळी झाली.घरच्यांनी तिला वेळ घेऊन नीट विचार करून होकार दे असं सांगितलं.पण पीनूला आता कोणावरही भार बनून न राहता एकदाचं लग्न करून सासरी जायचं होतं.पीनूने हट्टाने हे लग्न केलं. तिने काहीच पाहिले नाही; की मुलगा जॉब करतो का,त्याला राहायला घर आहे का??लग्न एकदाचं पार पडलं आणि पीनू आनंदाने नांदायला गेली.पीनूला कशाचाही काडीमात्र अंदाज नव्हता.ति सगळ्यांशी छान वागत होती;छोट्या मुलाला आरवलाही तिने एक ते दोन महिन्यांतच आपलसं केलं.पण तिच्यासमोर दैवाने काय वाढून ठेवलं होतं हे तिलाही माहित नव्हतं.
         लग्नाला सहा महिने झाले तरीही नवरा कामाला जात नव्हता.सासू,नवरा,मुलगा,सासरे,अपंग एक नणंद आणि पीनू एवढ्या लोकांची तिची फॅमिली.....पीनूला लग्नानंतर माहेरी यायला परमिशन नव्हती.आणि कधी आलीच तर २४ तास सासू तिच्यासोबत असायची.पीनूला खूप त्रास द्यायचे सासरचे लोक....खूप मारहाण करायचे.तरीही पीनू मुकाट्याने सगळं सहन करत होती.पीनूने पहाटे ४ वाजता उठून मंडईत जाऊन विकायला निलावातून भाजी आणायची नंतर घरातली कामे आवरून दिवसभर भाजीच्या गाडीवर भाजी विकायला बसायचं.म्हणजे हिनेच काम केलं तर यांच घर चालणार. एवढं करूनही मार बोलणं सहन करायचं.कोणाला फोन सुद्धा करायचा नाही.लग्नाआधी बिनधास्त व मोकळी राहणारी पीनू आता पुरती सासरच्या लोकांच्या हातातली कटपुतली झाली होती.स्वत:च मन रमवायला कधी आरवला घेतलेलही सासूला पटत नव्हतं;तिच्या आयुष्यात स्वत:च असं कोणीच नव्हतं की ज्याच्याजवळ ति मन मोकळं करू शकेन.ती मनाने खचून गेली होती;तरीही ती आई-वडिलांकडे परत यायला ती तयार नव्हती.
       खरंच पाळी जर आलीच नाही तर त्या मुलीच्या योग्यतेचा,तिची व तिच्या कष्टांची कदर करणारा नवरा मिळणं अशक्यच आहे का...??पाळी आली नाही म्हणजे अशी तडजोड करावी लागणारच का...??आणि जर समजा तडजोड केलीच तर तिचं आयुष्य नरक बनवलंच जात का...? उलट पीनूच्या नवरयाने स्वत:च्या मुलाचा विचार करून तरी निदान पीनूशी नीट वागायला हवं होतं;पण हे सगळं पीनूलाही अनपेक्षितच होतं.सगळेच लोक असे आहेत असं माझं म्हणणं नाही पण थोडे का होईना समाजात असे लोक अजूनही आहेत.खरंच समाजात अशा कितीतरी मुली आहेत.मग या मुलींनाही सुंदर आयुष्य जगण्याचा अधिकार आहे पण समाजातील काही लोक याचा गैरफायदा घेतात.जरी बाईला मुलगी असेल तर मुलगा का होत नाही म्हणून तिचा छळ केला जातो आणि बाळचं होत नसेल तर,मुलगा किंवा मुलगी काहीही झालं तरी चालेल पण बाळ झालंच पाहिजे असंही असतं.आणि मुलीला पाळीच येत नसेल तर......तर तिच्या लग्नाचं काय...??हा प्रश्न पडतो.मग असा कोणीच विचार करत नाही की अशी कितीतरी अनाथ मुलं आहेत त्यातील एकतरी बाळ दत्तक घेतलं तर आपल्यामुळे त्याचं आयुष्य मार्गी लागेल.

## सत्यघटना
## अक्षया राऊत
प्रिय वाचकहो माझा लेख आवडला असेल तर लाईक करून मला फॉलो करा.व तुमचही मत मला कमेंन्ट करून कळवा.काही चुकलं असेल तर मला माफ करा.हे माझं मत आहे प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं.