।। पाठलाग भाग 5 अंतिम भाग ।। कथामालिका.. ईरा... अष्टपैलू लेखक महासंग्राम कथा स्पर्धा

पाठलाग भाग 5 अंतिम भाग

।। पाठलाग भाग 5 अंतिम भाग ।।


दुसर्‍या दिवशी पेपरमध्ये बातमी झळकली. "कुख्यात गुंड रणजीत ऊर्फ रघूदादा मेंटल असायलमच्या रूग्णांच्या हल्ल्यात ठार. मानसिक रूग्ण असल्याने हाॅस्पिटलप्रशासनावर कुठलीही कारवाई झाली नसली तरी योग्य त्या उपाययोजना करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. "


तीन महिन्यानंतर......

माखन आता पुर्णपणे बरा झाला होता. त्याच्या स्वागतासाठी त्याच्या पुर्ण परिवारासोबतच समरीनही हाॅस्पिटलच्या गेटवर पुष्पगुच्छ घेऊन त्याची वाट पाहत ऊभी होती. माखन बाहेर येताच दोघं गळाभेट घेऊन हमसून हमसून रडत होते. हे अश्रू होते आफरीनला मुक्ती देण्याचे. हे अश्रू होते आफरीनला न्याय देण्याचे. ज्या माणसाने आफरीनवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता व या झटापटीत आफरीन जास्तच प्रतिकार करतेय हे पाहून तीला पाण्यात बुडवून ठार मारले होते व पुराव्याअभावी तो निर्दोष सुटला होता त्यास त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देऊन त्याचा प्रतिशोध घेतल्याच्या समाधानाचे अश्रू होते ते. होय प्रतिशोधच. अगदी नियोजनबद्धरित्या घडवून आणलेला प्रतिशोध. न्यायाचा अन्यायावरचा विजय. समरीन माखनला पहिल्यांदा भेटली त्याचवेळी माखनची मानसिक स्थिती या भेटीच्या आघाताने बर्‍याच अंशी पूर्वपदावर आली होती.आफरीनच्या मृत्यूच्या आघाताने माखनला मानसिक रुग्ण बनवले तर समरीनच्या भेटीच्या आघाताने माखन तीला आफरीन जिवंत आहे हे समजून पूर्वपदावर आला होता. नंतरच्या एकदोन भेटीतच माखन पुर्णपणे बराही झाला होता. त्या दिवशी घडलेल्या घटनेचा पुर्ण तपशील त्याने समरीनला सांगितला होता.
लाजरा बुजरा माखन व निर्मळ मनाची आफरीन पहिल्यांदा आर्ट काॅलेजमध्ये भेटले तेव्हा त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं की या मैत्रीचे पुढे काय परिणाम होणार आहेत. खरंतर हे दोघं एकमेकांमध्ये ईतके रमले होते की एक मिनीटही एकमेकांपासून लांब राहू शकत नव्हते. केवळ याच कारणामुळे आफरीन मामूचं घर सोडून ईथे हाॅस्टेलला रहायला आली होती. यांचं वागणं आक्षेपार्ह नसलं तरी बऱ्यापैकी काॅलेजमध्ये याची चर्चा रंगली होती पण या दोघांनाही याची पर्वा नव्हती. असंही अजून कितीसं ईथं रहावं लागणार हा दोघांनीही विचार केला होता. कधी काॅलेजच्या टेरेसवर, कधी काॅलेजच्याच परिसराला खेटून असणार्‍या घनदाट वनराईत, कधी खोलीतले रूममेटस बाहेर गेलेले असले तर रूममध्ये असं यांचं प्रेम फुलत चाललं होतं. हाॅस्टेलच्या मुलांच्या जेवणाचा कंत्राट घेतलेला तिथला स्थानिक गुंड रणजीत ऊर्फ रघूदादा त्याचे ईतरही अनेक अवैध धंदे या कामाआडून चालवत होता. आफरीन व माखनची रघूदादासोबत पहिली झडप घडली ती जेवणाच्या निकृष्टतेच्या वादावरून. या दोघांनी ही बाब थेट काॅलेज प्रशासनाच्या मुख्य संचालकांच्या कानावर टाकताच रघूदादा खूप चडफडला होता. तेव्हापासूनच त्याने यांच्यावर कट्टा धरला होता. काही दिवसांतच त्याला अशी माहिती मिळाली की त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. आफरीन व माखन प्रेमसंबंधात आहेत व आताही ते समुद्रकिनारी फिरण्यास गेले आहेत हे समजताच तो त्यांच्या मागावर तिथे गेला. आफरीन पाण्यास खुप घाबरते हे माखनला जेव्हा समजले तेव्हा मुद्दामच तीची ही भिती घालवता यावी यासाठी तो तिला ईथे समुद्रकिनारी घेऊन आला होता. ईथे हे दोघं लव्ह बर्डस मुक्तपणे आनंदाच्या डोहात विहरत होते. एका नाजूक क्षणी अगदी आडोशाला जिथे कुणीही येणार नाही अशा जागी माखनने आपले ओठ आफरीनच्या ओठात मिसळले होते.दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठित आवळले होते.लांबूनच त्यांचा हा प्रेमालाप डोळे फाडून रघूदादा पाहत होता. तो त्यांच्या मागावर इथपर्यंत पोहोचला होता. त्यांना पाहून रघूदादाचीही वासना चाळवली गेली. तो कधी त्यांच्या जवळ जाऊन ऊभा राहिला हे त्या दोघांनाही समजले नाही. याची चाहूल लागताच हे दोघं खूप गडबडले, घाबरले, तिथून पळून जाऊ लागले. मात्र हा ऐकण्यास तयार नव्हता. त्याने आधी माखनला एक जोरदार लाथ मारली व आपला मोर्चा त्याने आफरीनकडे वळवला. लाथ जोरात बसल्याने माखन विव्हळत तिथेच खाली पडला. त्यास असं पाहून आफरीन कळवळली व माखनला सोबत घेऊन तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली. आडदांड खुनशी रघूसमोर त्यांचा किती वेळ निभाव लागणार होता? आफरीन मात्र कडवा प्रतिकार करत होती. ती ऐकत नाही हे पाहून रघू तिला ओढून पाण्याकडे घेऊन जात होता. माखन सोडवत होता पण याने फारसा फरक पडत नव्हता. ते दोघं अशा निर्जन ठिकाणी आलेले होते की या तिघांशिवाय तिथं कुणीही नव्हतं. मारामारीत थकलेल्या माखनला रघूने अर्धमेले केले होते व त्याला तिथेच सोडून आफरीनला ओरबाडण्याचा प्रयत्न तो करत होता. शेवटपर्यंत ही आपल्या कर्हात येत नाही पाहून चिडून त्याने तीला पाण्यात बुडवले व तडफडून तीने माखनसमोरच जिव सोडला. हे दृश्य पाहून माखनने जोरात किंकाळी मारली. तोंड झोडत ओरडत ,रडत तो आफरीनला पुकारू लागला. आफरीन मेलीये हे पाहताच रघूने तिथून पळ काढला.
घटनेचा ईतिवृत्तांत ऐकून समरीनच्या डोळयांना धारा लागल्या. त्याहीपेक्षा ती हे ऐकून हैराण झाली होती की आफरीनने माखनचा उल्लेख अगदी तिच्याजवळ ही केला नव्हता. मात्र काहीही असले तरी या गोष्टीने तीचे आफरीनवर असणारे प्रेम कमी होणारे नव्हते.

मात्र रघूदादा सारख्या भयंकर माणसास तोंड देणे या दोघांच्याही आवाक्यात नव्हते. मग समरीनने हाॅस्पिटलला एकटे येणे, जफरची साथ चुकवणे व रघूचा समरीनचा पिच्छा करत हाॅस्पिटलला येणे व तिथल्या मुक्त रूग्णांसमवेत माखनने त्यास बुडवून ठार मारणे ही त्यांची योजना सफल झाली होती. प्रकरण थंड होईपर्यंत माखन तीन महिने तिथेच रूग्ण बनून राहीला. मानसिक रूग्णांकडून असा प्रकार झाला तर न्यायालय काही शिक्षा करत नाही या गोष्टीचा फायदा घेत या दोघांनी या राक्षसास संपवले होते. आफरीन प्रकरणाची फाईल आधीच बंद झाल्याने या प्रकरणात साक्षीदार असलेला माखन वेडा झाल्याने न्यायालयाने मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा आदेश दिला होता. तो बरा झाल्याने या प्रकरणातूनही त्याचीही मुक्तता झाली. व आज तो पुन्हा एकदा मोकळ्या हवेत श्वास घेण्यास हाॅस्पिटलबाहेर पडला होता. आफरीनची साथ सुटल्याचे दुःख असले तरी तीची प्रतिकृती असलेला समरीनसारखी जिवलग मैत्रीण त्याला भेटली होती. समरीन व माखनचा असलेला "पाठलाग" आज संपला होता. "पाठलाग" मैत्रीचा, प्रेमाचा, बहिणप्रेमाचा, प्रतिशोधाचा, अन्यायावर न्यायाच्या विजयाचा.मात्र तरीही आयुष्यभर सोबत करणाऱ्या आठवणींचा " पाठलाग" यांची कधीच साथ सोडणार नाही. जिवात जीव असेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत हा "पाठलाग" होतच राहणार.

समाप्त 



आपलाच समीर खान. ©®

( आपला बहुमुल्य अभिप्राय नक्की द्या. लाईक, कमेंटरूपी उपस्थिती नक्की नोंदवा ? या स्पर्धेत आपले लाईक आणि कमेंटच पुढच्या फेरीसाठी पात्र ठरण्यास मदत करणार आहेत म्हणून अशा दर्जेदार कथा जर पुढेही वाचायच्या असतील तर नक्कीच साथ द्या ?)

🎭 Series Post

View all