पंख चिमुकल्यांचे

कौटुंबिक विषयावर आधारित लघुकथा
लघुकथा
शिर्षक ------- पंख चिमुकल्यांचे ??

आवरावर करून संगणक बंद केला .
रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते.साडेदहालाच जेवणासाठी उमा चा फोन येऊन गेला होता.
इतका वेळ कधी गेला कळलेच नाही, माझी वाट पाहुणी उशाशी तिची सलगी झाली होती. गाढ झोपेतून उठवायचे मन मात्र झाले नाही.

बाल्कनीतूनच बाहेर डोकावले तर गर्द आभाळांची गर्दी दाटलेली, केव्हा अश्रू ढाळतील सांगता येत नव्हते.
टेरेसवर मी आटोपशीर पद्धतीने तयार केलेल्या गझिबो मध्ये पहुडलो , तसा जेवणाचा खास मूडही नव्हता .

आकाशाकडे पहात गर्द दाटीच्या ढगांचा माझा संवाद सुरू झाला. जणू माझी एक आठवणच त्याच्याशी बोलू लागलो.

2007 मध्ये दिवाळी सुट्टीसाठी माहेरी सोडवून शिरोड्याचे नियोजन कोल्हापुरातील काही आर्किटेक्ट मित्रांसमवेत केले होते. माहेरी सोडवताना तिची धुस् फुस सुरूच होती. पण माहेरपणापुढे सर्व काही फिके होते.

कारण ही तसेच होते, सहा महिन्यापासून डोकेदुखी खूपच वाढली होती. नानाविध् उपचारांनी प्रतिसाद मिळत नव्हता , विविध तर्क करीत वेगवेगळे उपाय शोधताना इलाज सापडत नव्हता.

दोन दिवसाच्या दौऱ्यानंतर मी भेटायला सासरवाडीस गेलो. अस्वस्थ अवस्थेतच ती मला म्हणाली , डोळ्यांना प्रतिमा व्यवस्थित दिसत नाहीत . तिचे दुहेरी प्रतिमांचे आकलन मला गोंधळात टाकत होते.

तत्काळ डॉक्टर बोरगावे यांच्या क्लिनिकला आम्ही रवाना झालो . जनरल तपासणीमध्ये डॉक्टरांनी मेंदूचे स्कॅनिंग करण्याची सुचविले.

आयुष्यातील तसा इतका मोठा पहिलाच प्रसंग, हा मोठमोठाल्या मशीनमध्ये मानवी देह हा मशीन प्रमाणे काम करताना गुढ़ अनाकलनीय देहाचे अंतरंग शोधताना होणारी घालमेल त्या वातानुकूलित वातावरणात सुद्धा डोक्याला दरदरुन घाम फोडणारी होती. हातापायांची थरथर काही केल्या थांबत नव्हती . पुढील तपासणीसाठी काही डोस देण्यासाठी डॉक्टरांनी कागद पुढे केला सही करताना उमटलेले अक्षर आठवतही नव्हते.
काही वेळाने बिलांची आवरावर करून पुन्हा डॉक्टर बोरगावे यांचे क्लिनिक गाठले. डॉक्टरांनी निगेटिव पांढऱ्या अॅक्रीलिक वर पाठमोऱ्या उजेडावर पिन मध्ये टाकले , तसे समजावु लागले . निगेटिव्ह वरील आकृत्या जणू काही काळच घेऊन आल्याचा भास होत होता .

बघ आभाळा , तुझ्या नभांची दाटी आकाशात मावेना, गर्द काळ्या कुठं अंधारातही तुला वाट सापडेना, एकमेकांना बिलगुन कसा रे गलका करतोस ? तुझ्या अश्रूंना ही वाट मिळेना, इतका कुठला रे धीर तुझ्याकडे ? बरसायचं आहे ना तुला , तर घे ना बरसून , पण तसा नाही बरसणार तू । कारण तुला अजून गडगडायचे आहे, धीराने घ्यायचे आहे, अजूनही विधात्याच्या विश्वाचे दर्शन घ्यायचे आहे.
माझ्याही मनाची अवस्था अशीच काही झाली होती रे । विधात्या इतका कठोर का झालास तू ? दोन चिमुकल्यांचीही तुला दया नाही का रे ? आभाळातही मावणार नाही अशी गर्दी मनात माझ्या दाटून आली.
कशी सोसणार या फाटलेल्या आभाळाची चादर ?

एव्हाना डॉक्टरांनी दिलेला रिपोर्ट उमाच्याही लक्षात आला होता ब्रेन ट्युमर बाबत डॉक्टरांनी पूर्ण कल्पना आम्हा उभयंतांना दिली व तज्ञ डॉक्टरांचे भेटी दाखल पत्र ही हाती दिले.लवकरात लवकर उपचाराबाबत मौलिक सल्लाही दिला .

मी तिला सासरवाडीत सोडून माझे डॉक्टर मित्र श्रेयश व अमित यांना भेटून त्यांचा सल्ला घेऊन डॉक्टर प्रभू यांना भेटावयाचे निश्चित करून दुसऱ्या दिवशी आम्ही कोल्हापूरला रवाना देखील झालो.
भग्नावस्थेत वेटिंग कक्षात मला उमानेच दिलेला धीर मला आजही मनाला उभारी देतोय, प्रत्येक अडचणीच्या क्षणात तिचा थीर पाहून अभिमानच वाटतोय.
दोन चिमुकल्यांसाठी मला लवकर बरे व्हायचे आहे, जगायचं आहे ,जगण्याचे माझे हे दोन पंखच आता माझी ताकद आहे . त्यांच्यासाठीच उरायचं आहे आणि त्यांच्यासाठीच मला जगायचं आहे .
देवा मनोमन तुझा आभारी आहे ही ताकद तू तिला दिलीस संकटात सावरण्यासाठी या चिमुकल्यांचे तू तिला पंख दिलेत अन् बळही। माझ्यात नव्हती इतकी ताकत तू तीला दिलीस मनाला सावरणारी ।
डॉक्टरांना भेटायची वेळ जवळ आली तसा मी अंतर्बाह्य थरथरू लागलो. डॉक्टरांना भेटल्यावर साक्षात प्रभूंचे दर्शन झाले चेहऱ्यावरील स्मितहास्य् आणि प्रसन्नता त्या वातावरणातही आशेचे दोन थेंब शिंपडून गेले. विविध तपासण्या करून तात्काळ डॉक्टर प्रभू यांच्या दवाखान्यात ऍडमिट ही केले. सायंकाळी एप्पल हॉस्पिटल ला एम आर आय साठी ॲम्बुलन्स मधून दाखल झालो. एव्हाना सासरवाडीत व घरी निरोप पोहोचला होता .
वाट न पाहता दवाखान्यात दाखल झाल्याचा निरोप ही दिला. सर्व मंडळी हजरच होती.
अँप्पल च्या प्रवेशद्वारावर असलेल्या झाडाच्या ओट्यावर आता माझं सुरू झालं फोनवरचे संभाषण व पैशाची जमवाजवी । काही पार्ट्यांचे येणे तर होतेच , गरजच होती .
काही दिवसापूर्वीच ऑफिसच्या जागेसाठी गुंतवणूक केलेली व सहा महिन्यातच म्हणजे दसऱ्याला इंडिका खरेदी केलेली अर्थातच बजेट कोलंबडलेलंच होतं ।
खऱ्या माणुसकीचे दर्शन झालं , तेव्हा काहीसा नकार व काहीसा होकार ? मित्रमंडळी होतीच दिलासा द्यायला .
अनिल माझे मेहुणे तसे सालस खूपच लाघवी स्वभावाचे त्यांनी मला खडसावून काही रक्कम खिशात कोंबली व कोठेही फिरायचे नाही अशी जणू तंबीच दिली.
ऑपरेशनचा दिवस उजाडला खूपच अस्वस्थ होतो. ऑपरेशन पूर्वतयारी म्हणून तिचे सर्वाधिक प्रेम असलेले ते केसांचे केशवपण पाहताना कधी नवे ते अश्रुनी दाटी केली . मनातून गडगडून ते कधी ओघळु लागले मला कळलेच नाही .
ऑपरेशन थेटर मध्ये जाताना तिचा निश्चल खंबीर चेहरा , पुनर्जन्मासाठी तिचा साई धावा स्पष्ट जाणवत होता . साईबाबाच मला यातून तारणार अशी तीची धारणा होती.

वेटिंगमध्ये एकही क्षण स्तब्ध बसवेना सारखे मन थेटरकडे धावत होते . क्षणोक्षणी बेचैनी वाढतच होती . साडेचार तासांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर डॉक्टर प्रभू वेटिंग कक्षात आले पेशंट पूर्णपणे व्यवस्थित आहे व आतापर्यंत केलेल्या ऑपरेशन पैकी हे खूपच क्लिष्ट आणि अवघड सर्जरीपैकी एक असल्याचे सांगितले .

आतासा कोठे जीव भांड्यात पडला होता. कोण्या पूर्व संचिताचे पुण्य माझ्या कामी आले होते .तिच्या आईची शिवभक्तीच माझ्या कामी आली होती . आयुष्यभर तिने शिवभक्ती व शिवपूजा अगदी मनोमनी केले होती.
देवतारी त्याला कोण मारी याचा जणू प्रत्ययाच मला आला होता .

आयसीयू मध्ये हळूहळू भूल उतरत होती अजूनही जाग आलेली नव्हती सर्व काही सोपस्कार् व्यवस्थित होत आहेत असं वाटत होतं . थोड्या वेळात जाग आल्यानंतर डोळे हळुवार उघडत होती . तिला कोण आनंद चेहऱ्यावर मावत नव्हता . कारण खिडकीतून बाहेर बिरदेव बँकेच्या बोर्ड वरील अक्षरे तिला वाचता येत होती .
डॉक्टरांनी ऑपरेशन नंतर उजवा डोळा वाचेल याची शाश्वती दिली नव्हती. अक्षरे पाहून एखाद्या दृष्टीहीनाला स्पष्ट डोळ्यांनी सृष्टी पाहिल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
एव्हाना सांगोल्याहून पट्टपूर्ती साईबाबांची उदी माझे मामा घेऊन आले होते. संकट टळले होते .
धन्य ती साई भक्ती । धन्य ती शिवभक्ती।??

✒️ लेखन ---- किशोर सोनटक्के , इचलकरंजी (9422046069)