Login

नववधू प्रिया मी बावरते

आणि ती हसली

कथेचे नाव -
नववधू प्रिया मी बावरते
विषय - कौटुंबिक कथा
फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका


भाग - १

“नववधू प्रिया मी बावरते
लाजते पुढे सरते फिरते..”

सायलीचे हे गाणं म्हणजे अगदी जीव की प्राण आणि त्यातल्या त्यात लतादीदींचा आवाज म्हणजे सोने पे सुहागा परंतु आज अगदी खास कारण होते. अनिरुद्ध सायलीचा नवरा आज पंधरा दिवसानंतर बिजनेस टूर वरून परतणार होता. सायलीला अगदी कुठे ठेऊ नि कुठे नको झाले होते. तसं बघता सायलीला हे अनिरुद्ध चे बिजनेस टूर काही नवीन नव्हते. अगदी लग्नाच्या पंधरा दिवसानंतरही तो टूरला गेला होता परंतु जेव्हा जेव्हा तो जायचा तेव्हा तेव्हा सायलीची अशीच अवस्था व्हायची. अगदी आजही लग्नाला पंधरा वर्षे झाली तरीही. त्याला कारणही तसंच होतं. प्रेमविवाह होता दोघांचा. एकाच वयाचे, एकाच कॉलेजला प्रपोजही दोघांनी सारखेच केले पण नंतर ठरविले सेटल झाल्याशिवाय लग्न नको. शिक्षण आटपून अनिरुद्ध जॉबला लागला. इकडे सायलीलाही भरपूर ऑफर होत्या जॉबच्या, परंतु तिला जॉब करायचा नव्हता. ती नेहमी अनीला म्हणायची,

“माझा पूर्ण वेळ हा तुझाच राहील मला नाही करायचा जॉब वगैरे.”

अनिरुद्धही तिच्या प्रत्येक निर्णयात सोबत असायचा. तो तिला नेहमी म्हणायचा,

“आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुझ्यासोबत राहीन आणि तुला स्वतः पेक्षा जास्त जपेन. वचन आहे माझं तुला..”


ते ऐकून सायली अगदी मोहरून जायची. मध्यंतरी काही वेळ गेल्यानंतर प्रेमविवाह असला तरी जनरीती प्रमाणे अगदी वैदिक पध्दतीने पार पडला. संपूर्ण लग्न निर्विघ्नपणे पार पडलं दोन्ही कडील मंडळी खुश होते. नवीन घरात नवीन जीवनात सायलीचा प्रवेश झाला. सगळे खूप आनंदात होते. सायली होतीही तशीच शिक्षण, सौंदर्य कशाचीच कमी नव्हती अगदी ‘सर्वगुणसंपन्न..”

हळूहळू लग्नाचे सर्व विधी पार पाडून नातेवाईकही आपापल्या घरी गेले होते. आज सायली आणि अनिरुद्धची मधुचंद्राची रात्र होती. अनिरुद्धला रूम मध्ये यायला वेळ आहे हे पाहून सायलीने तोपर्यंत वॉश घेतला. रूममध्ये येऊन अनिरुद्धच्या आवडीची पिच कलरची साडी तिने नेसायला घेतली. ओठांवर हलकीच गुलाबी लिपस्टिक, अंगावर मंद वाटणारा परफ्युम, मोकळे केस, स्लीवलेस ब्लाऊज या सर्वांनी तर तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घातली होती. आरशात आपलेच नव्याने खुललेले सौंदर्य पाहून ती लाजली आणि अश्यातच अनिरुद्धने तिला मागून मिठीत घेतले सायलीच्या संपूर्ण शरीरावर शहारे उभे राहिले. ती लाजून अगदी गुलाबी झाली होती.

"अनी प्लीज मला मोकळे कर"

असे हलकेच पुटपुटली खरी पण मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं. अनिरुद्धने तिला पूर्णपणे आपल्या बाहुपाशात कैद केले होते. तो तिला अगदी नखशिखांत न्याहाळत होता. आधी डोळ्याने आणि नंतर स्पर्शाने. त्याच्या प्रेमाच्या वर्षावात सायलीला आज पूर्णपणे भिजायचं होतं. अनिरुद्धने आपले ओठ सायलीच्या ओठावर ठेवले नि दोघेही प्रेमरसात न्हाऊन निघाले. आजची संपूर्ण रात्र फ़क्त दोघांचीच होती.

“बाई गं.. हे काय फ्लॅशबॅक मध्ये गेलो आपण..”

म्हणत सायलीने आवरायला घेतलं परंतु जुन्या आठवणीनं ती पूर्णपणे शहारली होती. मन काही केल्या त्यातून बाहेर यायला तैयार नव्हते. घरातले काम पटापट आवरून सायलीने घड्याळाकडे बघितले. बघताच क्षणी ती चाचरली. अनिरुद्धच्या यायची वेळ झाली होती. आजही आपण नववधू सारखं लाजतो हे पाहून ती आणखीनच लाजली. मुलगी शाळेत गेली होती. घरात ती एकटीच अनिरुद्धची वाट पाहत बसली होती. काहीतरी आठवून ती अचानक उठली नि तडक बेडरूममध्ये जाऊन अनिरुद्ध च्या आवडीची पिच कलर ची साडी नेसून तैयार झाली.

“लग्नाच्या पंधरा वर्षा नंतरही आपण एखादया नववधूलाही लाजवेल असे आहोत..”

हे मनातल्या मनात आठवून सायली अगदीच मोहरली. याच विचारात असतांना दारावरची बेल वाजली आणि इकडे सायलीचे हृदय जोरजोरात धडकायला लागले. स्वतः वरचा ताबा तिचा कधी सुटायला लागला होता हे तिचं तिलाच कळेना.

“ही काय अवस्था होतेय आपली? अनिरुद्धलाही असेच वाटतं असेल काय?”

या विचारात असतांनाच वारंवार वाजणाऱ्या दारावरच्या बेल नि ती भानावर आली नि पुन्हा लाजली. आता मात्र धावत जाऊन तिने दार उघडले.
अनिरुद्धला समोर पाहून ती परत रोमांचित झाली पण तसं तिने त्याला जराही भासू दिलं नाही. त्याचीही अवस्था सायलीला पाहून काही वेगळी नव्हती. त्याने घरात प्रवेश करत विचारले,

“काय म्हणता सायली मॅडम, सर्व ठीक ना?”

नुसता मानेने होकार दर्शवत सायली आत गेली. पाठोपाठ तोही आत आला. बॅगा बाजूला सारून तो वॉश घ्यायला गेला. जातांना सायलीला

“मस्त अद्रक वाली चाय कर..”

सांगायला तो विसरला नाही. सायलीने चहा गॅसवर ठेवला नि ओट्यालाच टेकून ती उभी राहली. चहाकडे एकटक पाहत असतांना अनिरुद्धच्या ओल्या स्पर्शाने ती भानावर आली.

“काय अनी हे! थोडी थोडकी नाही पंधरा वर्षे झालीय आपल्या लग्नाला..”

“अच्छा म्हणजे तू म्हातारी झालीय..”

हसत हसत अनिरुद्धने सायलीला मारलेली मिठी आणखीनच घट्ट केली. खोटं खोटं का असेना सायली रागात येऊन म्हणाली,

“म्हातारी नि मी? छे.. पूर्ण सहा महिने लहान आहे तुझ्यापेक्षा..”

नि दोघेही हसायला लागले. निवांत चहा घेत गेल्या पंधरा दिवसांचा अनिरुद्ध आढावा घेत होता. मुलं, शाळा, सोसायटी, बँकेचे कामसारं सारं काही सायलीने त्याला सांगितले.

थोडा आराम करावा म्हणून अनिरुद्ध आपल्या बेडरूममध्ये गेला नि सायली आपल्या कामाला लागली. रात्री तिने खास अनिरुद्धच्या आवडीचा मेनू प्लॅन केला होता.

वेळ हळूहळू पुढे सरकत होता. घड्याळात पाचचा ठोका पडला नि मुलीने दार ठोठावले. सायलीने धावत जाऊन दार उघडले व मुलीला बाबा आल्याची गोड बातमी सांगितली. बातमी ऐकूनच मुलांच्या आनंदाला पारावर उरला नाही. तिने हॉलमध्ये शाळेची बॅग फेकून बाबाला भेटायला म्हणून बेडरूमकडे धावली.

\"ओवी \"

या एका गोंडस बाळाला जन्म दिला होता सायलीने. खूप कठीण डिलिव्हरी झाली होती. खूप गुंतागुंत होती. डॉक्टरांनी तर तिसऱ्या महिन्यातच जाहीर केलं होतं.

“डिलिव्हरी नॉर्मल होणार नाही. सिझेरियन करावं लागेल..“

बातमी ऐकताच अनिरुद्धचे आई वडील, सायलीचे आई वडील सर्वजण काळजीने पुण्याला पोहचले. काय हवं नको ते काळजीने पाहायला लागले. अगदी फुलासारखी जपली. सायलीला आईने आणि सासुनेही नऊही महिने ती आनंदात असेल याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली.

जसजशी डिलिव्हरीची तारीख जवळ येत होती, तसतशी सायलीची काळजी वाढत होती. मनात नाना विचारांचे काहूर रोज माजत होते.

“डिलिव्हरीमध्ये मला काही झालं तर? बाळाला काही झालं तर? माझ्या नंतर अनीचे नि बाळाचे कसे होणार?”

नुसते नकारात्मक विचार मनात यायचे पण ती ते चेहऱ्यावर किंवा बोलण्यातून भासू दयायची नाही. सतत हसरा चेहरा ठेवायची. देवाचं नामस्मरण सतत सुरू ठेवायची. श्रद्धा होती तिची गजाननावर. तो काहीही वाईट होवू देणार नाही यावर तिचा अगाध विश्वास होता.

पुढे काय होत? पाहूया पुढील भागात.. कथेचा दुसरा भाग लवकरच..

क्रमशः

©® मीनल सचिन ठवरे


जिल्हा:-  भंडारा

🎭 Series Post

View all