Login

त्रस्त गृहिणी भाग दहा

एका गृहिणीची व्यथा The House Wife
त्रस्त गृहिणी भाग दहा

सालाबाद प्रमाणे यंदाही प्रेम आठवडा त्याच्या निर्धारित तारखेला सुरू झाला आणि जगाच्या पाठीवर असलेल्या समस्त तरुणाईने प्रेमाच्या गुलाबी रंगात लाल होण्याचं (आपल्या भारतात, विशेषतः महाराष्ट्रात या विशेष सप्ताहावर समस्त पोलिसांची अगदी करडी नजर असते आणि खडा पहारा असतो, त्यामुळे मी लाल हा शब्द का वापरला हे सुज्ञवाचक आत्तापर्यंत समजून गेले असतीलच.) म्हणजेच प्रेमात अगदी नाहून निघण्याचं समस्त तरुणाईने पक्क केलं तर अशावेळी, सदानकदा नवऱ्याला हाडतुड करणाऱ्या, नवऱ्याच्या केवळ पाकिटावर डल्ला मारूनच न थांबता त्याच्या सगळ्या क्रेडिट, डेबिट कार्डचे पिन कोड माहिती करून घेऊन, वेळी अवेळी मनाला वाटेल तशी आणि तेवढी खरेदी करणाऱ्या, नवऱ्याने घरातल्या पसाऱ्यावर, बाथरूम, वॉश बेसिनच्या, अस्वच्छतेवर, आणि हॉलमधल्या पसरलेल्या अस्ताव्यस्त वस्तूंवर एक जरी शब्द उच्चारला, फ्रिजमध्ये साठलेल्या सडक्या, नासक्या, भाज्या आणि एक्सपायरी डेट झालेली लोणची, मसाले, यावर काही विशेष टिप्पणी केली तरी त्याला तोच कसा वेंधळा आणि बावळट आहे, हे अगदी उदाहरणासह समजून सांगणाऱ्या, नवऱ्याच्या पार्ट्यांवर बारीक नजर ठेवून असणाऱ्या आणि नवऱ्याच्या दुप्पट पैसे स्वतःच्या किटी आणि भिशी पार्टीवर उधळणाऱ्या, सासूच्या चुगल्या माहेरच्या नातेवाईकात अगदी न चुकता सांगणाऱ्या, मुलांना परीक्षेत कमी गुण मिळाले तर ती सगळी त्याच्या बाबाची आणि शिक्षकांची जबाबदारी आहे असं तिकीट फाडणाऱ्या, अतिशय प्रामाणिक आणि पतिव्रता स्त्रियांची व्यथा मी आज तुम्हाला सांगणार आहे.

या स्त्रियांची कर्म कहाणी ऐकून सुरुवातीला माझे केवळ डोळे भरून आले होते पण नंतर माझ्या डोळ्यातून गंगा यमुना व्हायला लागल्या, मीच स्फुंदू लागले आणि मग केव्हा कशी उर बडवून बडवून रडायला लागले ते माझंच मला कळेना.

या बिचाऱ्या सगळ्या जणी घरात मर मर कामं करतात. मारून, धोपटून का होईना सकाळी मुलांना बळजबरीने शाळेत पाठवतात. नवऱ्याला एकदाचा ऑफिसमध्ये पिटाळला की ह्यांची हाताची बोटं विशेषतः अंगठा मोबाईलच्या पटावर सरसर फिरतो आणि मग,मान अकडते, पाठीत लचक भरते, हातापायांना गोळे येतात, आणखीन बरंच काही काही होतं, आणि अशा ह्या अंगदुखी मुळे या बिचाऱ्या पुरत्या जेरीस येतात.

या माझ्या सगळ्या निगुतीने संसार करणाऱ्या आणि उभं आयुष्य घरासाठी खर्ची घातलेल्या मैत्रिणींना कोणी साधं एखादं गुलाबाचे फुल सुद्धा देऊ नये हे ऐकून माझे डोळे भरून आले.

त्यातल्याच एकीने तिची राम कहानी मला सांगितली ती मी आता तुम्हाला सांगते आहे. ती तुम्ही शांत चित्ताने वाचून अभिप्राय नक्की द्यावा ही विनंती.

माझी ही मैत्रीण अतिशय पतीव्रता. नवऱ्यावर,मुलावर ती भरभरून प्रेम करते. आपल्या मुलाने सगळ्या भाज्या खाव्यात म्हणून ती नेहमी खटपट करत असते. पण या खटपटीत आणि वेगवेगळ्या रिल्स बनवण्यात फार वेळ जातो म्हणून मग ती सगळ्या भाज्या स्वच्छ धुऊन तांदूळ आणि डाळीमध्ये शिजवून छान मसालेभात बनवते. अगदी रोज, न चुकता. कधी ती तिच्या या पाककृतीला, मसाले भात म्हणते तर कधी खिचडी, पुलाव, शाही बिर्याणी आणखीन काय काय नावं देते ते देव जाणे. तर प्रेम आठवड्याच्या प्रथम दिनी, तिला तिच्या पती राजांकडून केवळ एका गुलाबाची अपेक्षा होती. ती अपेक्षा पूर्ण होणार नाही हे तिला माहिती असूनही तिने आशा मात्र सोडली नाही. रात्री ऑफिस मधून उशिरा नवरा घरी आल्यावर, गुलाबाची वाट पाहून थकलेल्या हिनेच न राहून शेवटी गॅलरीतल्या कुंडीतलंच गुलाब पुष्प भर्ताराला दिलं आणि त्याच्याकडे लाडे लाडे डोळ्यांची उघडझाप करत बघू लागताच, तिच्या रावांच्या डोळ्यात आगीच्या ज्वाला भडकल्या, चेहरा रागाने आक्रसला गेला आणि आवाजात शक्य असेल तेवढा तिखटपणा आणतं त्याने तिला तेवढ्या रात्री जबर दमदाटी केली “गेल्या दोन महिन्यांपासून मी त्या गुलाबाच्या रोपाला पाणी घालतो आहे. एवढ्या दिवसात एकदाही तुला त्या रोपाला पाणी घालावंसं वाटलं नाही, तुला कोणी सांगितलं होतं दीड शहाणेपणा करत ते फुल तोडायला? खबरदार यानंतर त्या झाडाकडे पाहिलं जरी, माझ्या इतकं वाईट कोणी असणार नाही लक्षात ठेवं!” तिचा प्रेमाचा गुलाब मनातल्या मनातच करपून गेला आणि तिच्या डोळ्यांना धारा लागल्या.

पण एवढ्याने हार मानेल ती माझी मैत्रीण कुठली? प्रेमाच्या प्रस्तावदिनाची आठवण न चुकता हिने तिच्या अहोंना करून दिली. हिचा नवरा ही हिच्यासारखाच इरसाल त्यानेही चटकन उत्तर दिलं,”एकच चूक मी आयुष्यात दोनदा करत नसतो.” एवढं बोलून तो पटकन ऑफिसला निघून गेला. नवरा काय बोलला हे समजायलाच माझ्या मैत्रिणीला अर्धा दिवस लागला. तिने रडून रडून डोळे सुजवून घेतले आणि मग त्या दिवशी तिने स्वयंपाकच केला नाही.

नवऱ्याच्या प्रेमाला आसुसलेली ही माझी मैत्रीण चॉकलेट दिनाला नवऱ्याकडून चॉकलेटची अपेक्षा करत होती. पण झालं वेगळच! नवरा प्रत्येक वेळी मित्रांबरोबर पार्टी करायला गेला की ही त्याच्यावर एकदाही न चुकता वाटेल तसं तोंड सुख घ्यायची, म्हणूनच मग त्याने चॉकलेट दिनाला हीला भरली कारली करण्याचं फर्मान सोडलं. रविवार असून सुद्धा नवरा असा साता जन्माच्या वैऱ्या सारखा वागल्यावर तिच्या मनावर इतका आघात झाला, की तिने भालूदिनाला नवऱ्यासमोर चक्कर शब्द काढला नाही. त्याला आणखी अजून एक कारण होतं. मागल्या वर्षी हिने लाडे लाडे नवऱ्याला भालू मागितला तर त्याने हिलाच आरशासमोर उभं केलं. काय म्हणावं अशा नवरे प्रजातीला? त्यावेळी पण ती स्फुंदून स्फुंदूनरडली होती.

बिचारी माझी मैत्रीण रांधा, वाढा, उष्टी काढा, यातच तिचं सगळं आयुष्य खर्ची होतं आहे. एवढ्या निगुतीने नवऱ्याचा पैसा मनसोक्त खर्च करूनही, त्याला एकच एक खिचडी हा पदार्थ वेगवेगळ्या नावांखाली खाऊ घालूनही तो काही सुधारायचं नाव घेत नव्हता. शेवटी व्हायचं तेच झालं. हिच्या कुंकवाच्या धन्याशी हीच कडाक्याचं भांडण झालं. त्यावेळी तो जे बोलला त्याने हीच हृदय अगदी विदीर्ण झालं. “तुझ्यासारखी कजाग आणि भांडकुदळ बाई मी उभ्या जन्मात कधी पाहिलेली नाही. भांडणात आणि वादावादीत तर कोणीही तुझा हात धरू शकत नाही. मी शपथेवर सांगतो यानंतर, कधीही तुझ्या डोक्याला डोकं लावणार नाही आणि तुझ्याशी कधीच भांडण करणार नाही वचन देतो मी!” या पद्धतीने बिचारीची वचन एकादशी पार पडली.

माझी ही मैत्रीण निळे बाबांची निस्सीम भक्त आहे. आयुष्यात येणाऱ्या या सततच्या संकटांमुळे आणि समस्यांमुळे ती पुरती जेरीस आली होती. मार्गदर्शनासाठी ती बाबांच्या सत्संगात गेली आणि तिथेच महाप्रसादाचा लाभ घेऊन घरी परतली. अशा रीतीने तिची आलिंगन द्वादशी संपली.

तिच्या वैवाहिक आयुष्यात घडत असलेल्या या प्रचंड उलथापालथीने ती अगदी हादरून गेलेली होती. नवऱ्याच्या स्वभावातला कोरडेपणा आणि त्या दोघांच्या नात्यात आलेला या रुक्षपणा संपवण्यासाठी तिने शेवटी गाजराचा हलवा बनवण्याचा निश्चय केला. पण हाय रे माझ्या कर्मा! किसणी हातात घेतल्यावर तिच्या लक्षात आलं की तिच्या घरी केवळ गाजरच नाही तर बटाटा, मुळा, काकडी, खोबरं किंवा असा कुठलाही जिन्नस किंवा पदार्थ नाही ज्याचा ती ‘किस’ करेल. ते म्हणतात ना, ‘घर फिरलं की घराचे वासेही फिरतात’ अगदी तशीच तिची अवस्था झालेली आहे. आता माझी ही मैत्रीण रागाने इतकी भडकलेली आहे की आता जर तीच्या नवऱ्याने काही काही आगळीक केली तर ती त्याचाही ‘किस’ करायला कमी करणार नाही.

माझ्या या मैत्रिणीची अशी राम कथा ऐकून नक्कीच तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल ना? म्हणूनच मी तिच्यासाठी
उरबडवून बनवून रडले. आता माहित नाही उद्या 14 फेब्रुवारी आहे काय घडतयं बिचारीच्या आयुष्यात!


तो पर्यंत हा भाग कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू लवकरच.

©® राखी भावसार भांडेकर नागपूर

सदर लिखाण संपूर्णतः काल्पनिक असून त्याचा वास्तवात कुणाशी कुठलाही संबंध नाही तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.

सदर लिखाणाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून लेखिकेच्या परवानगीशिवाय कोणीही ते वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.