Login

त्रस्त गृहिणी भाग आठ

नवरा आणि सासू मुळे वैतागलेली सर्वसामान्य गृहिणी The House Wife
त्रस्त गृहिणी भाग आठ


परवा माझी एक मैत्रीण मला भेटायला आली होती. सुरुवातीच्या इकड तिकडच्या गप्पा झाल्यानंतर अगदी माझ्या जवळ येऊन शक्य तितक्या हळू आवाजात ती मला विचारत होती, ”काय ग आठ पंधरा दिवसांपूर्वी तू काहीतरी तंत्र-मंत्र, वशीकरण आणि तांत्रिक लोकांबद्दल वाचन आणि व्हिडिओ बघत होतीस ना!”

मी म्हटलं, “हो बघत होती.” “बरं मग तुला त्याबद्दल काही विशेष माहिती किंवा एखादा बाबा किंवा तांत्रिकाचा पत्ता सापडला का?” मी तिला म्हटलं, “नाही मला काही असा पत्ता वगैरे किंवा एखादा बाबा सापडला नाही, बाबा!” माझ्या या उत्तरामुळे तिचा पुरता हिरमोड झाला. तिचा चेहरा अगदीच पडला. मी न राहून तिला विचारलंच, “पण तुला काय एवढं काम त्या बाबांशी किंवा तांत्रिकाशी?”

त्यावर त्या बिचारीने एवढुसं केविलवाणं तोंड केलं, आणि स्वतःची दुःख भरी कहानी सांगीतली. कारस्थानी सासवा आणि सोशिक सुना या रोजच्या डेली सोप मधली ती स्वतःला नायिका समजत होती.

“अगं मी कितीही चांगला स्वयंपाक केला तरीही माझ्या सासूच मन आणि पोट कधीच तृप्त होत नाही. कधी तिला भाजी अळणीच होते तर कधी तिखट जास्त, कधी तिला रसा पातळ पाणी वाटतो तर कधी लोण्यासारखा घट्ट, गोडाचा पदार्थ केला तर म्हणते कशी, “घरातली सगळी साखर ओतली वाटतं! गोड पदार्थ बनवताना साखरेवर हात कमी आणि वागण्यात, बोलण्यात गोडवा जास्त आण हो!” आणि नवरा तो तर अगदी श्रावण बाळ आहे. आईच्या अगदी अर्ध्या वचनात. त्याच्या आईने काहीही म्हटलं तरी हा नुसता नंदीबैलासारखी मान डोलवणार! आणि मी त्याच्या कानी कपाळी कितीही ओरडले तरी त्याच्या कानात ढीम्म काही जाणार नाही! मित्रांसोबत पार्टी करून घरी यायला याला रात्रीचे दोन म्हणू नको, तीन म्हणू नको, चार वाजले तरी चालतात आणि जरा कुठे बाहेर जायचं असलं आणि मी तयार व्हायला जरा एखाद दीड तास इकडे तिकडे केला की लगेच याचा पारा चढतो आणि नाकाचा शेंडा लाल होतो.” एवढं बोलून तिला अश्रू अनावर झाले आणि तिच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहायला लागल्या.

प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन मी तिला म्हटलं की “तुझ्या अपेक्षा तरी काय आहेत या दोन महत्त्वाच्या व्यक्तींकडून?”

“काय अपेक्षा असणार गं? एखादवेळी आपल्या आवडीची एखादी भाजी किंवा पदार्थ केला तर लगेच सासुबाई नाक मुरडतात आणि म्हणतात कश्या ‘तुझ्या माहेरच्या गोष्टी इथे नको आणू.’ “स्वतःच्या माहेराचं आणि तिथल्या लोकांचं मात्र गळा दुखेपर्यंत आणि घशाला कोरड पडे पर्यंत गुणगान सुरू असतं, आणि नवरा! रोज सकाळी आमच्या खोलीतल्या टेबलावर मोजे, हात रुमाल, पैशाचं पाकीट, गाडीची चावी आणि जेवणाचा डबा असं सगळं अगदी तयार ठेवलं ना तरीही ऐनवेळी त्याला कधी कंगवा सापडत नाही, तर कधी डोळ्यासमोर असलेला परफ्युम दिसत नाही! ज्या दिवशी ऑफिसमध्ये एखादी महत्त्वाची मीटिंग असेल ना त्यादिवशी हमखास महत्त्वाची फाईल कुठे ठेवली आहे हे त्याला आठवत नाही किंवा ती फाईल तो घरीच विसरुन ऑफिसला निघून जातो.” एवढं बोलून तिने परत पदर नाही, ओढणी नाही, रुमाल जाऊद्या काहीतरी डोळ्यालं लावलं हे मात्र नक्की!

त्या बिचारीची कैफियत ऐकून एक क्षण मी ही उदास झाले. माझी मनस्थिती पाहून तिने परत मागचीच री पुढे ओढली.

“जाऊया का मग आपण त्या बंगाली बाबा कडे?” मी हो म्हणेन या आशेने ती माझ्याकडे डोळे लावून बसली होती. “अग कुठले बंगाली बाबा? मला कुठला तांत्रिक मांत्रिक माहित नाही बाई.” अंगावरची पाल झटकावी तस मी तिचं म्हणणं अक्षरशः उडवून लावलं.

“अग तेच ते, जसं कुठे कुठे भिंतींवर लिहिलं असतं ना **रोगी मिलेंगे बुधवार और शनिवार को. तसंच रेल्वेच्या डब्यांमध्ये आणि वर्तमानपत्रांमध्ये छोट्या जाहिरातींमध्ये असते ना ती जाहीरात वशीकरण, जारण, मारण, पती-पत्नी अनबन, उच्चाटन, सौतन, कारोबार मे नुकसान, मूठकरनी, 24 घंटे मे रिझल्ट आना शुरू वरना पैसे वापस. जाऊया का त्यांच्याकडे?”

मी तोंडाचा आ वासून आणि डोळे मोठे करून तिच्याकडे बघत होती. तर ती म्हणाली, “आधी तोंड बंद कर एखादा मच्छर जायचा तोंडात!” मी लगेच तोंडापुढे दोन्ही हात हलवले आणि तोंडाचा आ बंद केला. तिचं हे सगळं बोलणं ऐकून माझं डोकं फिरलं होतं, आवाजात शक्य तेवढी नरमाई आणून, जमेल तेवढ्या समंजस आणि समजूतदारीच्या स्वरात मी तीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला.

“अगं पण त्यांनी जाहिरातीत केवळ मोबाईल नंबर दिला आहे पत्ता नाही. आणि कशावरून तो त्या बाबाचाच आहे? काही असामाजिक तत्त्व किंवा समाज विघातक व्यक्तींचा तो मोबाईल नंबर असेल तर? तेही जाऊ दे, गेला बाजार आपण त्या मोबाईल नंबर वर फोन करणार आणि मग तो मोबाईलवाला आपला नंबर घेऊन त्यात वायरस टाकून आपला सगळा डेटा चोरी करणार आणि आपल्या खात्यातले सगळे पैसे उडवणार! आधीची गोष्ट वेगळी होती ग. नवऱ्याच्या खिशातले पैसे निदान त्याचे कपडे धुवायला घेताना तरी चोरता यायचे. पण आता हे ऑन लाइन ढमका पे, टमका पे यामुळे अशी चिरीमिरीही आज-काल मिळणं जवळ जवळ अशक्य झालं आहे. त्यात बँकेतले उरलेसुरले पैसे जर कोणी उडवले तर काय भावात जाईल?” माझं हे म्हणणं तिला तितकसं रुचलं नव्हतं. आणि कोण्या बंगाली बाबा कडे जाणं माझ्याही अगदी जीवावर आलं होतं मग मी तिला आणखीन समजावून सांगितलं.

मी तिला सांगितलं, “हे बघ सासू आणि नवरा हे कधीच आपल्या मनाप्रमाणे वागत नसतात. ती पृथ्वीवरील अशी प्रजाती आहे, अशी जमात आहे की, त्या प्रजातीला आणि जमातीला सुन आणि बायको नावाच्या भूतलावरील अतिशय गरीब (असं केवळ प्रत्यक्ष त्या सुनेला अर्थात बायकोलाच वाटतं हा भाग वेगळा) प्राण्याला मनसोक्त त्रास देण्यात आणि नावेठेवण्यातच आनंद मिळतो आणि त्या आनंदाच्या भरवशावरच ते जगत असतात. जर तू त्यांचा आनंद हिरावून घेतलास तर ते तत्काल गतप्राण होतील. अगं आपल्याला सासू नाही त्रास देणार तर कोण त्रास देणार? जेव्हा आपण माहेरी जातो, सण समारंभाला सगळेजण एकत्र येतो, हळदी कुंक, गेला बाजार भिशी पार्ट्यांमध्ये जेव्हा इतर मैत्रिणी त्यांच्या सासूची गऱ्हाणी सांगत असतील तेव्हा तू काय सांगशील? की माझी सासू आता मला वश झाली आहे आणि मी कुठलाही पदार्थ केला तरी ती निमुटपणे आणि आवडीने खाते. मी केलेल्या स्वयंपाकाचं कौतुक करते? अगं सासूच्या कुटाळक्या करण्यासारखं दुसरं सुख नाही जगात! बरं ते जाऊ दे, तू जर नवऱ्याला वश केलं आणि त्याने तुझा वाढदिवस, तुमच्या लग्नाचा वाढदिवस, तुमची एंगेजमेंट एनिवर्सरी, गेला बाजार तुम्ही पहिल्यांदा जेव्हा भेटले ती तारीख ही त्यांनं लक्षात ठेवली आणि प्रत्येक वेळी तुला गुलाबाची फुलं, चॉकलेट्स, गजरे किंवा प्रत्येक वेळी एखादं काहीतरी छानसे प्रेसेंट दिलं तर हे सगळं तुला पचणार आहे का? आणि मग दुनियेतल्या ज्या 90% बायका स्वतःच्या नवऱ्याच्या नावाने खडे फोडून, ज्या असीम आनंदाची प्राप्ती करून घेतात त्यापासून जर तू वंचित राहिली तर तुझ्या आयुष्याला काहीतरी अर्थ उरेल का?”

आता माझी ही मात्रा तिच्यावर बरोबर लागू पडली आणि तिने बंगाली बाबांकडे जाण्याचा आणि त्यांना फोन करण्याचा आपला बेत आणि मानस तत्काळ रद्द केला.

तर वाचक हो तुमच्या संपर्कातही एखादी अशी व्यक्ती असेल जी तंत्र मंत्र आणि वशीकरणाच्या नादी लागण्याच्या मार्गावर असेल तर त्यापासून तिला तत्काळ थांबवा. तिला कुठल्याही अशा वाईट मार्गावर जाऊ देऊ नका आणि स्वतः सत्कर्माचे भागीदार व्हा.

हा भाग कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू लवकरच.

©® राखी भावसार भांडेकर नागपूर

सदर लिखाण संपूर्णतः काल्पनिक असून त्याचा वास्तवात कुणाशी कुठलाही संबंध नाही तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.

सदर लिखाणाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून लेखिकेच्या परवानगीशिवाय कोणीही ते वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.