नणंद भावजयीचं गोकुळ

गोड गुलाबी असं नातं असणाऱ्या वहिनी आणि वन्सबाईंची ही कथा. कौटुंबिक विषयाभोवती फिरणारी असली तरी छानसा संदेश देणारी ही कथा.


"गोकुळ" बंगल्यात आज सकाळपासूनच लगबग सुरू होती. नेहा सकाळपासून सात-आठ वेळा लाडक्या वन्स बाईंची गाडी आली का पाहून गेली. आमरस, छोले पुरी, मसालेभात, खमंग काकडी असा सारा स्वयंपाक आज तिने मानसीच्या आवडीचा केला होता. एवढ्यात मोटारीचा हॉर्न वाजला तशी नेहा स्वयंपाकघरातून लगबगीने दिवाणखान्यात पळाली. मानसी आणि सोबत तिची लहान दोन मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मामाच्या घरी आली होती. मुलं आल्याआल्या मामीला बिलगली.

"या, बसा नं वन्स. मस्त आल्याचा चहा टाकते. "
मानसीच्या हातातल्या बॅग्ज नेहा आपल्या हातात घेऊन म्हणाली.

नेहा आनंदाने खोलीकडे वळली. इकडे मुलांचा गोंधळ सुरू झाला. मानसीने भाच्यांसाठी आणलेली खेळणी त्यांना देऊन बाहेर खेळायला पाठवलं. हात पाय धुवून " आई..मी आलेय गं. बाहेर ये लवकर. " म्हणत मानसी सोफ्यावर विसावली. प्रमिलाताई मग लगबगीने खोलीतून बाहेर आल्या. हातातली जपमाळ बाजूला ठेवत लेकीला त्यांनी जवळ घेतलं.

" किती सुकलीस गं मनु.." काळजीने आईच्या तोंडून आलं.

" सुकलेय कुठली ? चांगली सत्तर किलोची झाले आहे आई मी. काहीतरीचं असत तुझं. " म्हणून मानसी खळखळून हसू लागली. एवढ्यात प्रमिलाताईंची नजर समोर टीपॉय वर ठेवलेल्या पिशव्यांकडे गेली.

" मनू , अगं किती वेळा समजावून सांगितलं तुला एवढं सगळं कशाला आणत बसतेस ? काय गरज होती गं एवढी महाग मिठाई घेऊन आलीस... बरं हे आणलंस तर आणलंस वर दोन्ही मुलांना कपडे, खेळणीही भरभरून घेऊन आली आहेस. परीसाठी आणलेला फ्रॉक तर महागातला वाटतोय गं...! आत्ता दिवाळीच्या दिवशी तर घेतलेस की सगळ्यांना कपडे.आता पुन्हा कशाला हे सगळं ? वर्षातून एकदा माहेरपणाला येतेस आणि हे एवढं सोबत घेऊन येतेस. किती अनाठायी खर्च होतो बघ बरं. नाहीतर तुझी वहिनी! नखातली माती सुटत नाही तिच्या..मला दरवेळी देण्याघेण्याचं सांगावं लागतं तेव्हा घडतं पुढे काहीतरी. माहेरवाशीणींना भरभरून द्यावं का हे असं त्यांच्याकडून घ्यावं ? साधं व्यवहारज्ञान कळेना हिला.." नेहमीप्रमाणे प्रमिलाताईंची बडबड सुरू होती.

इकडे नणंदबाई आल्या म्हणून उत्साहात उठून स्वयंपाकघरात चहाचं आधण ठेवलेल्या नेहाचा चेहरा आता मात्र सासूबाईंच्या बोलण्याने पार उतरला होता. तिच्या हसऱ्या चेहऱ्यावरचं तेज कधीच नाहीसं झालं होतं. आपली लाडकी मैत्रिणीचं आपली नणंद आहे ह्याचं नेहाला अगदी सुरुवातीपासून कौतुक वाटे. दोघींची ऐकमेकींशी अगदी गट्टी होती. नेहाचं लग्न झाल्यावर दोन वर्षांनी मानसीचं लग्न झालं. त्यामुळे नेहाच्या नव्या लग्नानंतरची सुरुवातीची दोन वर्षे दोघींनीही हसत खेळत एकमेकींसोबत घालवलेली. नंतर मुरलेल्या लोणच्याप्रमाणे नेहाही आपसुक संसारात रमली आणि इकडे मानसीसुद्धा. पण नेहा स्वतःच्याही नकळत हळूहळू बदलत गेली. सासूबाईंच्या नणंदभावजयीमध्ये दुजाभाव करण्याच्या वाईट सवयीनं आपसूकचं नेहाच्या स्वभावात बदल होत गेला. दर वर्षाकाठी मानसी माहेरपणाला येणार म्हणजे घरात वाद विवाद नक्की हे नेहाने डोक्यात फिट केलं होतं. आपली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन आणि आपलं अंथरुण पाहून पाय पसरावेत एवढेच नेहाचं म्हणणं असे. मानसीच्या सासरची आर्थिक स्थिती ह्यांच्यापेक्षा श्रीमंत होती. तिच्या नशिबाने ती सारं सुख उपभोगत होती. स्वभावानेही समजूतदार असणारी मानसी आणि नेहा नेहमी एकमेकींशी मात्र अगदी घट्ट मैत्रिणींसारख्या असत. रोजचा व्हीडीओ कॉलसुद्धा असे दोघींचा. पण मानसी सासरहून येतांना भरभरून वस्तू घेऊन येई आणि मग प्रमिला ताई आपल्या सुनेवर मनसोक्तपणे तोंडसुख घेत. मग घरातलं वातावरणही निष्कारण गढूळ होऊन जाई.

"आई...! अगं थांबशील की नाही. मुलांसाठी आणला मी खाऊ आणि खेळणी. त्यात काय इतकं ? लाडकी आत्या आहे ना त्यांची मी. आत्या म्हणजे भाच्यांसाठी हट्ट करण्यासाठीची हक्काची जागा असते गं आणि तू नेहमी असं दिल्या घेतल्याचं सगळं बोलून दाखवणार असशील तर मी अजिबात येणारचं नाही हं पुढच्यावेळी. " वातावरण हलकं करावं म्हणून मानसी मुद्दामचं प्रमिलाताईंना म्हणाली.

" मनू , अशी का बरं म्हणतेस ? हे घर तुझं आहे. तुला हवं तेव्हा आणि हवं तेवढे दिवस तू इथे यायचंस, रहायचंस. बघू ह्या घरातलं कोण अडवतंय तुला. तुझी आई अजून जिवंत आहे म्हंटल." प्रमिला ताई अजूनही आपल्या शब्दांवर जोर देतचं बोलत होत्या.

त्यांच्या बोलण्याचा सगळा रोख स्वयंपाकघरात उभ्या असलेल्या आपल्या सुनेकडे होता.

" आई खरं सांगू का ? बरेच दिवस झाले तुझ्याशी बोलू म्हणतेय पण आज विषय निघाला आहे तर सांगते. ही वस्तुंची देणीघेणी असो वा माझं इथे माहेरपणाला येणं, सगळं माझ्या सासुबाई आणि मोठ्या जाऊबाई ठरवतात. त्यांना वाटतं हिचं माहेर तर गावातल्या गावातचं आहे मग राहायला कशाला जायला हवं ? पण जनरीती सोडून चालणार नाही म्हणून वर्षाकाठी फक्त एकदाचं त्या मला इथे रहायला येऊ देतात. माझ्यासोबत भरभरून वस्तू वगैरे पाठवतात. आपल्या श्रीमंतीचं घोडं नाचवायला मिळण्याची त्यांना ही जणू संधीचं असते गं...."

आपल्या मनातली खदखद आज मानसीने मोकळी केली. तिचे डोळेही पाणावले होते.

प्रमिला ताई उठल्या. आपल्या लेकीचे डोळे पदराने पुसून तिला त्यांनी घट्ट मिठीत घेतलं. मायलेकींची ती भेट बराचं वेळ सुरू राहिली.

" सासरी काही दुःख असेल तरी मन हलकं करावं गं मनू आणि राहिली गोष्ट देण्याघेण्याची, तुझ्या दादा आणि वहिनीचं तर कर्तव्यचं आहे तुला परत सासरी पाठवताना आणलंस त्याहून दुप्पट परत देण्याचं. त्याबद्दल तू अजिबात काही वाटून घेऊ नकोस बरं." प्रमिला ताई लेकीला समजावत होत्या.

"आई, बास आता. तू आत्ता हे जे बोललीस ते शेवटचं. माझा हक्क,माझं माहेर, माझं घर! मग दादा वहिनीचं काय गं ? त्यांनी नेहमी फक्त कर्तव्य करत राहायचं का ? की नेहा वहिनीनेही स्वतःच्या माहेरी जाऊन वर्चस्व गाजवायचं ? किती बुरसटलेले विचार आहे हे सगळे ! कृपया थांबव आता हे सगळं. मी अगदी लहान असल्यापासून पाहत आले आहे, आत्या येणार म्हणले की तुझी आणि बाबांची होणारी लगबग. मग महिनाभर काटछाट करून केलेली पैशाची जुळवाजुळव. आणि ह्यासगळ्यात आत्या येण्याचा आनंद तर नेहमी कुठंतरी हरवूनच जायचा. मागे असायचं फक्त देणीघेणी, आहेराची चढाओढ आणि नात्यांची केविलवाणी ओढताण. नंतर नंतर तर आत्त्याने आपल्याकडे येणंपण कमी केलं. लग्नकार्य असलं तरंच भेटीगाठी होतात. पण मला हे सगळं आम्हा दोघी नणंद भावजयीच्या नात्यात अजिबात आणायचं नाहीये गं. कारण मुळात आमच्या नात्याचा पाया हा मैत्रीचा आहे. आणि मैत्री मध्ये गरीब श्रीमंत, देवाणघेवाण किंवा व्यवहार नसतोचं मुळी. मला सासरी पाठवतांना ज्या वस्तू द्यायच्या आहेत त्यावरून नेहा वहिनीने टेन्शन घेतलेलं मला खरंच अजिबात नाही आवडणार. तू प्रत्येकवेळी टोमणे मारून तिला दुखवणं कमी कर गं आई. मला नेहा वहिनीचा उतरलेला चेहरा पाहून कसेतरी होतं. ती कष्टाने सारं तर करतेचं, वर माझ्यासाठी दरवेळी आवर्जून छानशी साडी घेते. मुलांना कपडे, ह्यांच्यासाठी कपडे आणि मला परत जातांना घरी न्यायला फराळ. अजून काय अपेक्षा करू गं मी? दादा वहिनीची निखळ माया, भाच्यांचं प्रेम आणि तुमची आधाराची सावली एव्हढचं काय ते माहेरातुन मला अपेक्षित." मानसी भरभरून बोलत होती. इकडे स्वयंपाकघरातून दाराआडून सगळं ऐकणाऱ्या नेहाने डोळ्याला पदर लावला.

"आई, अगं मी आले की किती लगबग असते नेहा वहिनीची. आत्ताही पाहिलंस का ? माझ्या हातातली बॅग स्वतः घेऊन गेली खोलीत. माझी मुलंही बिलगतात तिला मायेने. इकडे आले की रोज छान छान माझ्या आवडीचा बेत असतो. आमच्या गप्पा, मुलांचं एकत्र खेळणं, दादाच्या गाडीवरून आजही हट्टाने मारलेली लांबवर चक्कर हे खरं सुख गं... कशात तोलू मी हे सगळं...? सासरी गेल्यापासून बऱ्याचं लोकांचा अनुभव घेतला... त्या सगळ्यातून एक शिकले, आपल्या मनातल्या भावना आपली आई आणि वहिनीशिवाय कोणीचं जपू शकत नाही. आपला हट्ट आनंदाने पुरवणारा आपला दादा त्याच्या प्रेमाला कशाचीचं तोड नाही. आणि चिमुकल्या भाच्यांनी गळ्याभोवती मारलेल्या मिठीएव्हढ गोड दुसरं खरंच काही नाही गं. मला पैसे, आहेर ह्या सगळ्यांपेक्षा हे सारं महत्वाचं आहे. मला माझं आनंदी माहेर हयासगळ्या करता अजिबात गमवायचं नाही आई. कृपया मला समजून घे...!" मानसीचा स्वर जड होत गेला.

एवढा वेळ दाराअडून सगळं ऐकणारी नेहा आता नं राहवून बाहेर आली. मानसीला जवळ घेऊन तिच्या केसावरून मायेने हात फिरवत म्हणाली,

"मनू वन्स , मी असेपर्यंत तुमचं माहेर मी नेहमी जपून ठेवीन. आपल्या आयुष्यातली सुंदर नाती आपण नेहमी बहरत ठेवायची. एकमेकींना धरून, सांभाळून आपण नेहमी खुलत राहूया हो. एवढे दिवस हे सारं नं बोलून माझ्या मनाचा नुसता कोंडमारा झाला होता. आज तुम्ही सारं बोललात आणि आभाळ पहिल्यासारखं मोकळं झालं. आपली ही मौल्यवान नाती आपण नाही तर अजून कोणी हो जपायची? खरंतर ना, आपलं नणंद भावजयीचं नातं कमी आणि मैत्रिणींचं नातं जास्तचं आहे. तेही निर्व्याज प्रेमावर उभं होतं आणि नेहमी राहील." नेहा भरल्या डोळ्यांनी म्हणाली.

प्रमिला ताईंना एव्हाना आपली चूक उमगली होती. नात्यांपेक्षा कर्तव्य आणि रूढी परंपरांना आजपर्यंत आपण खतपाणी घालत होतो आणि त्याचा परिणामही भोगला. पण आपली पुढची पिढी मात्र सुज्ञ आहे ह्याचा त्यांना तत्क्षणी अभिमान वाटला. हसतमुखाने प्रमिलाताईंनी आपल्या लाडक्या लेकीला आणि सुनेलाही मिठीत घेतलं. "गोकुळ" नावाचं घरकुल आज नावाला जागलं होतं.

©®सायली पराड कुलकर्णी