नकळत एक प्रेमकथा भाग अंतिम

Ek Prem Kahani

"हाय..नीरज! आमच्या शिखाकडून खूप ऐकलं आहे तुझ्याबद्दल. मात्र आज प्रत्यक्ष भेटीचा योग आला." दादा नीरजशी हात मिळवत म्हणाला.


"हो. आता मला निघायला हवं. खूप उशीर झाला आहे. पण उद्या नक्की भेटू.

पण माझ्या प्रश्नाचं उत्तर मला हवं आहे." नीरज शिखाकडे पाहत म्हणाला.


घरी येताच त्याने अर्पिताला हाक मारली.

"मागे शिखा आली होती कंपनीत? तू हे मला बोलली नाहीस?" नीरजचा आवाज चढला होता.


"हो. अरे मी सांगायची विसरले." अर्पिता त्याची नजर चोरत म्हणाली.


"पण त्यानंतर शिखाचा विषय अनेकदा निघाला होता. निदान तेव्हा तरी बोलायचे..की सोईस्कर रित्या विसरलीस?" सुमेधाताई आणि विवेक दोघेही नीरजच्या आवाजाने बाहेर आले.


"आई, तुला अर्पिताची खूप काळजी आहे? आपल्या नीलूच्या जागी तिला पाहतेस ना? पण तिच्या जागी आज नीलू असती तर अशी वागली नसती. हिने.. शिखाला आम्हा दोघांचं लग्न ठरणार आहे असं सांगितलं आणि म्हणून ती माझ्यापासून दूर जायला पाहत होती.

तुला माहिती होतं ना अर्पिता, माझं शिखावर प्रेम आहे? तरीही तू असं का केलंस? आज योगायोगाने तिची आणि माझी भेट झाली म्हणून या साऱ्याचा उलगडा झाला. तुझ्या वागण्यामागचं कारण मला कळायलाच हवं.

मान्य आहे, तुझं माझ्यावर प्रेम होतं आणि जरीही आपलं लग्न झालं असतं तरी आपण सुखी राहू शकलो नसतो, हेही तू मान्य केलं होतंस. मग पुन्हा असा अट्टाहास का? बोल प्लीज.." 


अर्पिता काहीच बोलत नाही हे पाहून सुमेधा ताईही चिडल्या. "अर्पिता, मी तुला किती प्रेमाने समजावलं होतं? नीरज जे बोलतोय ते खरं आहे का?"


"हो. पण मी स्वतःहून शिखाला काहीच बोलले नव्हते. तिने आपल्याला त्या दिवशी रात्री कॅफेत पाहिले, त्यामुळे तिचा गैरसमज झाला होता म्हणून मी तो तसाच राहू दिला. बस् इतकंच आहे हे." अर्पिता शांतपणे म्हणाली. 


"पण तिला आपल्या लग्नाबद्दल बोलायची गरजच काय होती? तू असं वागशील, मला कधीच वाटलं नव्हतं. इतका स्वार्थी विचार तुझ्याकडून मला अपेक्षित नव्हता अर्पिता. मला वाटलं तू मला समजून घेतलंस! आता असं वाटतंय मी तुझ्यावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली. तुला काय वाटलं हा असा गैरसमज पसरवून तुझं आणि माझं एक नवीन नातं निर्माण होईल? हे कधीच शक्य होणार नाही. तू इथून निघून गेलीस तरी माझी काही हरकत नाही. आता हा विषय इथेच संपला."

नीरज आत निघून गेला. 


अर्पिताला काय करावं कळेना. नीरजच्या प्रेमात ती आंधळी झाली होती. चांगल काय नि वाईट काय हे समजण्यापलीकडे तिचे विचार गेले होते.


"अर्पिता, अशी का वागलीस? जबरदस्तीने प्रेमाची नाती जुळत नसतात." 

विवेक कधी नव्हे ते अर्पिताला म्हणाले.


"मी चुकले मामा..मला माफ कर. इतकी स्वार्थी कशी वागले मी माझे मलाच कळले नाही." अर्पिता रडत म्हणाली.


"माफी मागायची असेल तर शिखाची माग आणि तिचा गैरसमज दूर व्हायला हवा त्यामुळे तिला खरं काय ते जाऊन सांग." सुमेधा ताई बाकी काही न बोलता आत निघून गेल्या. 

--------------------


अर्पिता शिखाच्या घरी आली. आत जावे की न जावे, असा विचार करत ती बराच वेळ बाहेर थांबून होती. पण खरं काय ते सांगितल्याविना हा गैरसमज मिटणार नव्हता. 

दारावरची बेल वाजवून ती बाजूला जाऊन उभी राहिली. 

शिखाने दार उघडलं, तशी अर्पिता तिच्यासमोर आली. तिने एक लिहिलेलं पत्र शिखाच्या हातात ठेवलं आणि सॉरी म्हणून ती निघून गेली.

----------------------------


इकडे पत्र वाचून शिखाच्या डोळ्यात पाणी आलं. 'अर्पिताचं खरचं प्रेम आहे नीरजवर! मी मध्ये आले का यांच्या? पण नीरजचं प्रेम नाही तिच्यावर.'


इतक्यात बेल वाजली. नीरज अर्पिताला घेऊन बाहेर उभा होता. शिखाने दार उघडले, तसे दोघेही आत आले. 


"ते पत्र वाचलेस? आणखी काय बोलू मी..सॉरी? इतकंच म्हणू शकते." अर्पिता शिखाला म्हणाली. 


"मी सॉरी म्हणायला हवं. मी मध्ये आले ना?" शिखा.


"नाही गं. नीरजचं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. तुझं ही त्याच्यावर प्रेम आहे. हो ना? मग इथे माझा संबंध येतोच कुठे? मनं जबरदस्तीने जुळत नसतात. मी चुकले, स्वार्थी झाले..पण आता मी खरंच इथून निघून माझ्या घरी जाणार आहे." अर्पिताने नीरजचा हात शिखाच्या हातात दिला. 

"शिखा एक सांगू का? प्रेमात थोडं स्वार्थी व्हायला हरकत नाही आणि मनातलं सारं मोकळेपणाने बोलायला तर मुळीच हरकत नाही." इतके बोलून अर्पिता बाहेर गेली. 


"माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस अजून?" नीरज शिखाच्या आणखी जवळ आला. 

"नकळत मी तुझ्या प्रेमात पडलो. मला माझं सगळं आयुष्य तुझ्यासोबत काढायचं आहे. लग्न करशील माझ्याशी?


"हम्म्म.. म्हणजे हो." शिखा नीरजच्या डोळ्यात पाहत म्हणाली आणि हलकेच त्याला बिलगली. 


दाराआडून हे ऐकणारी आणि पाहणारी अर्पिता आपल्या डोळ्यातलं पाणी न अडवता तिथून निघून गेली..अगदी कायमची.

..आणि नकळत फुललेली एक प्रेम कहाणी पूर्ण झाली.


समाप्त.

©️®️सायली जोशी.

🎭 Series Post

View all