देह

ही कथा सत्य घटनेशी प्रेरित आहे . समाजात असे अनेक परिवार असतील जेथे असे नराधाम जन्माला येतात . त्??

देह
-----------
' हा पडाव कुठला? कुण्या समुद्रामधला?
कप्तान कोण अन् कोण खलाशी इथला?
भरकटून गेले वार्‍यावर सांगावे
अन् डोळ्यांदेखत तिथे किनारा बुडाला !

स्मिताला ट्रेनमधून प्रवास करताना अशाच कधीतरी, कुठेतरी वाचलेल्या ओळी आठवत होत्या. काय करायचे हेच तिला सुचत नव्हते. ' मी या स्गळ्यातून बाहेर निघू शकेन का कधीतरी? कि श्वासांची तार तुटल्याशिवाय हे काही सुटणार नाही..'  ती स्वतःशीच पुटपुटत आभाळाकडे पहात होती. खरेतर आत्महत्या करण्यासाठी ती ट्रेनमध्ये चढली होती. पण मध्येच तिला वाटले कि जर हे सर्व उद्या बदलणार असेल तर मी असेन का पहायला? तिच्या विचारांनी अगदी टोकाला येऊन यु टर्न घेतला. गाडी स्टेशनवर थांबताच तिने परत घरची वाट धरली. अजून दोन दिवस तरी घरी ती एकटी असणार होती म्हणून ती निवांत आणि खुश होती. सगळ्या नकारात्मक विचारांचा आटापिटा थांबवून ती मस्तपैकी कॉफीचे घोट घेत होती. आज तिला घरात हवे तसे स्वातंत्र्य होते.  रोज दचकून जगणारी ती आज त्या घरातील भिंतींशी बोलत होती. ते सर्व तिचे साक्षीदार होते न.. भरभरून बोलणार तरी ती कोणाशी? 
       तिला रात्री झोप लवकर लागली.  पण मध्येच तिला जाग आली. वेड्यासारखी ती घरभर फिरली. तिला खूप रडायला येत होते. अनेक त्रासदायक आठवणी तिला आठवत होत्या.  ती तशीच बाथरूममध्ये गेली.. थंड पाण्याने तिने तोंड, हातपाय धुतले. टॉवेलने हात कोरडे करत ती गॅलरीमध्ये गेली. बाहेरच्या गारव्याने जणू तिच्या जखमांवर फुंकर घातली. ते निरभ्र आकाश, लुकलुकणारे तारे, रातकिड्यांची किर्रर्र या सर्वात तिने एक दीर्घ श्वास घेतला. ती स्वतःशीच हसली.  'आय लव्ह यू डियर' असे स्वतःलाच म्हणत तिने स्वतःलाच अलिंगन दिले व परत हॉलमध्ये येऊन झोपली. स्वतःच स्वतःला एका हाताने कुरवाळत तिने प्रेमाने थोपटले. ती गाढ झोपी गेली, स्वच्छंदपणे स्वप्नात विहरण्यासाठी..  तिचे हे दोन दिवस खूप छान गेले.. आज रात्री तो परत  येणार होता, तिची परत घालमेल सुरू झाली. काही कामानिमित्त बाहेर गेलेला तो संध्याकाळ होण्यापूर्वी घरी आला. ती शेजारीपाजारी जाऊन वेळ काढते.. पण बाहेर भटकणार तरी किती? तशीच विचार करत ती पुन्हा घरी  आली. दोघे जेवायला बसतात. तिच्या मनाची तगमग मात्र काही केल्या थांबत नव्हती.. का?  तर जेवणात तिखटमीठ व्यवस्थित असावे , या भितीने. ती काय फारशी पोक्त नव्हती. सतरा वर्षांची नुकतीच दहावी झालेली कोवळी पोर ती.. बर्‍यापैकी स्वयंपाक येणारी. पण भितीनेच कुठेतरी काहीतरी कमीजास्त व्हायचे.. मग ती जीवघेणी शिक्षा.. आज मात्र अगदीच शांत मनाने तिने स्वयंपाक केला होता. त्यामुळेच अगदी छान झाला होता स्वयंपाक.   जेवण झाल्यावर त्याने 'छान झाले आजचे जेवण' अशी पावतीही दिली. कसनुसे हसत तिने मान डोलावली.. सगळे किचन तिने परत आवरून ठेवले. तिने स्वतःलाच स्वतःच्याच घरात बाल्कनीत कोंडून घेतले. आणि या कल्पनेसाठी स्वतःची पाठ थोपटून घेतली. दुसर्‍या दिवशी तिचे बाबा आल्यावर ती खूप खुश झाली कारण आता तरी आपल्याला कोणी काही  बोलणार नाही असे तिला वाटते. दिवस मजेत जात होते. हिचे काही चुकलेच तर त्यात काय एवढे असे म्हणून सोडून दिले जायचे. कधी झालीच तर शिक्षा व्हायची. ती नेहमीप्रमाणे बाल्कनीत झोपली असता, बाबांनी ते पाहिले. त्यांनी तिला घरात झोपायला सांगितले. काय करावे असा तिला प्रश्न पडला. ती बाबांना झोप लागेपर्यंत घरात झोपली. ते झोपले आहेत हे पाहून परत बाल्कनीत जाऊन झोपली.. बाबांना थोडा संशय आला. ते स्वतःच बाल्कनीत झोपू लागले. पण खरे कारण ते नव्हतेच तर त्यांना काय मिळणार होते?
         काही दिवसांनी परत तिच्या बाबांना कामानिमित्त आठेक दिवस बाहेर जावे लागणार होते. स्मिताने मग हट्ट करुन आजीला आपल्यासोबत ठेवायला सांगितले. आजी खूपच म्हातारी होती. तरिही कोणाची तरी सोबत मिळाली म्हणून हिचा जीव भांड्यात पडला. नेहमीप्रमाणेच रात्री हिची चूक झाली म्हणून तिला शिक्षा मिळाली. ती कोणालाही सांगू शकत नव्हती कारण लहान मुलगी म्हणून हिच्यावर कोण विश्वास ठेवणार, असे त्याने आधीच तिला बजावले होते आणि ते तिलाही कळून चुकले होते. दुसर्‍या दिवशी अपचनाचे कारण देऊन ती शतपावली करायला म्हणून घरातून बाहेर पडली. डोक्यात एकच विचार एकतर हे घर सोडावे किंवा जग.. पण नियती कोणाला कळली? 
      बिल्डिंग जवळच्या वाहनतळाशी तिला एक मुलगा धडकला.. हाय, हॅलो झाले. थोडेसे समवयस्क व्यक्तीशी बोलून तिला मोकळे वाटले. अचानक तिचे जगच बदलले.. तिच्यात जगण्याचा उत्साह आला. पण रोजची शिक्षा मात्र चुकली नाही. एके दिवशी गच्चीवर गेली असता, तोच मुलगा परत तिला भेटला.. आधीची खूप ओळख असल्यासारखे दोघेही भरभरून बोलले.. आणि तेव्हाच ह्रदयात प्रेमाची कळी खुलल्याची स्मिताला जाणिव झाली. 'प्रेमचे' त्या मुलाचे तर तिच्यावर प्रथमदर्शनीच  प्रेम जडले होते. मनातले बोलायला हिला एक हक्काचे माणूस भेटले होते. ती त्याच्याजवळ मनातले सगळेच बोलत होती.. पण हे निष्ठुर जग.. हे असे काही नाते स्वीकारेल तर शपथ.. एके रात्री तिचे गुपितही प्रेमसमोर उघड झाले.. ती रात्र प्रेमला कधीच विसरता येणार नव्हती.  त्या रात्री प्रेमचा फोन वाजला. तोच हवाहवासा वाटणारा ओळखीचा आवाज..
"इतक्या रात्री फोन केला  सगळे ठिक आहे ना?"
" नाही.." हे ऐकून प्रेम कासावीस झाला.
" काय झाले? सांगशील का?"
" हो सांगते.. तू ऐक.. आता फक्त मी बोलणार.."
" बोल ना.. तुझा हा गोड आवाज मी आयुष्यभर न कंटाळता ऐकायला तयार आहे.. आणि ऐकणार आहे."
तिने वेळ न दवडता बोलायला सुरूवात केली.
" प्रेम,  आपण इथेच थांबूया.. तुझे प्रेम निखळ , निस्वार्थी आहे.. ते माझ्यासारख्या कलंकिनीसाठी वाया नको घालवूस.."
प्रेमला काही सुचेनासे झाले..
" काय झाले सांगशील का? तुझ्या घरी कळले का? कळू देत.. काळजी नको करूस.. आपण लग्न करूयात. मी टाईमपास नाही करत तुझ्यासोबत.. करूच शकत नाही.. मनापासून प्रेम करतो तुझ्यावर.. तू जर म्हणालीस तर   आत्ता या क्षणी तुझ्याशी लग्न करायला मी तयार आहे.."
हे ऐकून तिला रडू आवरेनासे झाले, कसेतरी स्वतःला सावरत ती म्हणाली, "ऐक, मला आधीपासूनच तुला हे सांगायचे होते. समोरासमोर हिंमत होत नाही, म्हणून फोनवर सांगते. मला तुझ्यापासून काहिही लपवायचे नव्हते.. त्या रात्री मी शतपावली करायला नाहीतर घर सोडून जायला निघाले होते.. तर मला तू भेटलास. तुला भेटून मला परत जगण्याचा उत्साह आला.."
ती श्वास घ्यायला थांबली.  प्रेमला ती शांतता जीवघेणी वाटली..  इतका वेळ जे शब्द गोड वाटत होते. ते आता तापलेल्या तेलासारखे वाटत होते..
" ऐक.. मी तुझ्यायोग्य नाही.. माझ्यावर खूपवेळा बलात्कार झाला आहे.." ती जोरजोरात रडायला लागली.. 
" प्लीज तू रडू नकोस.. कोण आहे तो नीच? मी जीवच घेतो त्याचा.. तू फक्त नाव सांग त्याचे.. आणि माझ्यावर विश्वास ठेव.. मी तुझ्या मनावर प्रेम केले आहे , शरीरावर नाही.."
हे ऐकून तिचे रडणे कमी होण्याऐवजी वाढले.. इथे प्रेमच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू वहात होते.. तो तिला धीर देत म्हणाला.. " आज शेवटचे रडून घे. यानंतर तुझ्या डोळ्यातून एकही अश्रू येणार नाही, याची मी नेहमीच काळजी घेईन.. खूप सहन केले आहेस तू.. त्या नराधमाचे नाव सांग फक्त.."
" माझ्यासोबत,  माझ्या घरात राहणारा माझा भाऊ.." हे ऐकून प्रेम सुन्न झाला.. स्मिता पुढे सांगत होती. "स्वयंपाक बिघडला कि तो शिक्षा देतो मला कपडे काढण्याची आणि म्हणतो यात तुला पण मजा येईल.  तो रोज हे करतो म्हणून मी रात्री, अपरात्री बाहेर फिरत असते. हे सगळे नको वाटते म्हणून.. पण लोकांना काही वेगळेच वाटते.. त्यांना वाटते मी बाहेर कोणालातरी भेटते..सगळेजण माझ्याकडे विचित्रपणे पहात असतात.  मी खूप निराश झाले होते. तेवढ्यात तू  भेटलास..  मलाही माझ्या बायकोसाठी काही ठेवावे लागेल ना?  असे म्हणत हसायचा?"
" तुम्ही दोघेच राहता इथे?" थक्क होऊन प्रेमने विचारले. त्याचा या सर्व गोष्टींवर विश्वासच बसत नव्हता.
" हो, आधी माझा दादा इथे शिकायला आला.. आता माझी दहावी झाल्यावर मी हि आले.. बाबा जाऊन येऊन असतात.. मी त्याला सांगायचे, आईबाबांना सांगते म्हणून.. पण मग तो म्हणायचा, तुझ्यावर विश्वास कोण ठेवणार? तुझे लाडके बाबाही नाहीत..  आणि तू एक मुलगी आहेस हे विसरू नकोस.. खूप जड जाईल तुला हे.."
हे शब्द ऐकून प्रेमाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर हे संपवायचे आणि स्मिताला आपल्या घरी आणायचे, असा त्याने निश्चय केला होता.. ती रडतच होती.. 
"मला आधी हे काहीच समजत नव्हते.. काहीतरी चुकीचे आहे हे कळत होते.  पण मला थांबवता येत नव्हते.. काय करू मी?"
" माझे ऐक.. माझ्यासाठी तू अजुनही पवित्र आहेस. पण हे सगळे जर तू तुझ्या आईबाबांना सांगितलेस तर जास्त बरे होईल.. आपण काढू यातून मार्ग.. एक लक्षात ठेव, काहिही झाले तरी मी तुझ्यासोबत आहेच.. अगदी मध्यरात्री जरी तुला गरज लागली तरी माझ्या घराचे आणि ह्रदयाचे दरवाजे तुझ्यासाठी उघडे आहेत. आपण लवकरच लग्न करायचा प्रयत्न करू जे थोडे अशक्य आहे तुझ्या वयामुळे.. पण तुला इथून काढायचा नक्की प्रयत्न करीन.. आणि वेडाबाई लग्नानंतर काही वाईट होत नाही.. डोन्ट वरी.." प्रेमने हसायचा प्रयत्न केला.. 

'घराला आहे अभिमानाने सांगावेसे गोत्र
घर आहे अगदी घर हवा तसा पवित्र
कर्मठतेची खडूस आळी भाळावरती दिसते
प्रामाणिकतेपेक्षा इथे अदब मोठी असते
असे घर सोयीसाठीच विरोध करत नसते' 

असेच  काहीसे पुढे घडले .
         तिने हिंमत करून आईवडिलांना हि घटना सांगितली.. पण कोणीच तिच्यावर विश्वास ठेवला नाही. उलट रात्री अपरात्री घराबाहेर राहायचीस.. तुझ्यातच काहीतरी दोष आहे. असे आरोप तिच्यावर झाले. दुःखात सुखाची गोष्ट हिच कि तिला तिच्या भावापासून लांब ठेवले गेले.. त्याने तर कानावर हातच ठेवले होते. येता जाता तिला टोमणे दिले जायचे. ती फक्त प्रेमने दिलेल्या वचनावर जगत होती. पण शेवटी  प्रेमने त्याचे वचन पूर्ण  केले. त्याने हिच्या घरी विचारले,  त्यांनीही ब्याद जात आहे, असे समजून तिचे लग्न लावून दिले.. आणि शेवटी तिचे सुखाचे दिवस सुरू झाले..
     इथे एकच प्रश्न उपस्थित होतो कि का तिला सहन करण्यास भाग पाडले गेले?  ते हि आईवडिलांकडून? इतका आपला समाज भावनाशून्य?? 
याच उत्तर एवढच कि तु स्वतः जागी हो ! स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्री ला समजून घे ! 
   तसेच पालकांनी मुलांना नक्कीच आपल्या मर्यादा किती या शिकवाव्यात. मुलांसमोर घरातील मुलींना घालून पाडून आपण बोलत असताना एका समाजाची जडण घडण होत असते , एक मानसिकता तयार होत असते याचे भान असू द्यात.


------------
लेखिका : शगुफ्ता ईनामदार