दुसऱ्यांचा तराजू नकोच

Fulfill Your Dreams .age is Just Number


आशा पन्नाशीकडे झुकली होती. मुलगा,नवरा असे छोटे कुटुंब . मुलाचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. सून आली होती. आशाचे राहणीमान अगदी साधेच होते. नेहमी साडी , हातात छान हिरव्या बांगड्या, भांग पाडून चापून चोपून घट्ट वेणी, मोठ्या गोल आकाराची लाल टिकली. मिस्टरांची ट्रान्सफर सतत होत राहायची. सतत इकडचा संसार तिथे करताना दमछाक होत असे. सासू सासरेही सोबतीला होते. पाच वर्षांपूर्वी एकापाठोपाठ दोघेही आजाराने गेले. आशाने सून म्हणून सर्वच कर्तव्य मनापासून निभावली होती.आदर्श बायको, आई, सून,सासू कशी असावी तर आशा हेच मूर्तिमंत उदाहरण. आता मात्र थोडी निवांत झाली होती. तसं तिने सून आली म्हणून स्वतःला काही कामापासून अलिप्त ठेवले नव्हते. ती सुनेला कामात हातभार लावतच होती. दोघींचे बऱ्यापैकी जमायचे.हल्ली काही महिने झाले तिने बाहेर पडणे बंद केले होते. थोड्या दिवसानंतर ती बाहेर पडली ह्यावेळी तिचे रूप मात्र पालटले होते.

जवळच तिने योगा क्लास, म्युझिक क्लास लावला होता. सरू आणि लक्ष्मी ह्या तिच्याच बिल्डिंगमध्ये राहात होत्या. आशा, लक्ष्मी आणि सरू ह्या एकाच वयाच्या होत्या. आशाचे हे असे एकाएकी बदलले रूप पाहून दोघीही अवाक झाल्या. आशा आता चक्क लेगिन्स टॉप , हलकासा मेकअप करून बाहेर पडत असे. कमालीचा बदल झाला होता, तिच्यात वेगळा आत्मविश्वासही दिसत होता. चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते.

एक दिवस सकाळीच, आशा योगा क्लासला निघाली. सरू आणि लक्ष्मी तिथेच बसल्या होत्या. घाई गडबडीत असल्या कारणाने तिने दोघींना पाहून छान हास्य दिले आणि निघून गेली. आशा गेटच्या बाहेर गेली ह्याची खात्री केल्यावर सरू आणि लक्ष्मी एकेमकींशी गप्पा मारू लागल्या. गप्पा कसल्या त्या ? नुसत्या उचापत्या म्हणा.

सरु : काय गं सरू? ह्या आशाला काय एकाएकी झाले आहे ?काय ते योगा आणि म्युझीक क्लास लावले आहे म्हणे? हल्ली खूपच नटणं चालू आहे . क्लासला जाताना काय तो मेकअप करते? पन्नाशीकडे झुकतेय ही बाई आणि पंचवीशीतल्या तरुण पोरीप्रमाणे काय ते लायनर लावते. केशरचना पाहिलीस ? काय ते पफ काढते .आधी कशी वेणी घालून असायची ? छे काय ते ??शोभतं का?? ते ही ह्या वयात? डोक्यावरचा पदर सावरत ती म्हणाली.

सरू मावशीच्या बोलण्याला दुजोरा देत लक्ष्मी मावशीही सुरू झाली. "हो ना खरंच बाई खरंच . काय ते नवीनच थ्यार? नवलच वाटतंय मलापण. इतके वर्ष कधी नव्हे ते आताच हिला काय हे उपद्व्याप सुचत आहेत ? आधी कशी राहत होती अगदी काकू बाई आणि आता अचानक काय जादू झाली काय माहित?ह्या वयात जरा नामाचा जप करावा . देव दर्शन करावे तर काय खूळ लागले आहे देव जाणे. अगं काल तर चक्क जीन्स टॉप घालून आली , वरून केस सुद्धा मोकळे. किती ती फॅशन? सून आल्यापासून जरा जास्तच बदलली ही. वय काय आणि ही करते काय ? जनाची नाही कमीत कमी मनाची तरी आणि मी काय म्हणते ही आशाच जर अशी ताळतंत्र सोडून वागली, तर सून काय हिच्या धाकात राहणार आहे होय? आता सासू झाली आहे. हिला काय कळत नाही का? कसं जरा मापात रहावं. जाऊ दे आपण उगाच तोंडाची वाफ घालवण्यात अर्थ मुळीच नाही. ज्याची त्याला वागण्याचे तारतम्य बाळगता आले पाहिजे. लहान आहे का ही??हिची हिला कळायला नको?"


ह्या दोघींचे बोलणं पाठून आशाच्या सुनेने म्हणजे स्मिताने ऐकले.

स्मिता:"काय हो सरु मावशी आणि लक्ष्मी मावशी काय गप्पा चालू आहेत?"

स्मिताला पाहुन दोघींचे डोळे चमकले. दोघीही जाम दचकल्याच .

सरू:"काही नाही गं , आपल्या रोजच्या गप्पा"


स्मिता:"मी काय म्हणते ,तुम्ही दोघीही आईसोबत योगा क्लास का लावत नाही?"

सरू:"नाही गं बाई,ह्या वयात नको नको.कसं वाटतं ते!

स्मिता:"का कसं वाटतं? स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आणि स्वतःचे छंद जोपासणे काय चुकीचे आहे का? तुम्ही तर असं बोलत आहात जणू काय मी तुम्हाला काहीतरी जगावेगळे करायला सांगते आहे"

लक्ष्मी मावशी बोलती झाली..:"अगं आता अध्यात्माकडे वळायचे वय आणि कसले छंद जोपासते पोरी ?"


स्मिता:"मावशी, कसं आहे ना आपण बायकाच आपल्याला एका मापदंडात बसवतो .आपणच आपल्या वर काही बंधन घालतो आणि नंतर त्याचे खापर दुसऱ्यावर फोडतो.हो राहिला प्रश्न अध्यात्माकडे वळायचा तर ते पण करावं की , खूप आत्मिक समाधान लाभते. आता आईचंच बघाना कमी वयात लग्न झाले.चौदाव्या वर्षी लग्न. अठराव्या वर्षी बाळंतपण . मग संपूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त संसार रेटत राहिल्या. आवड असूनही घरच्या जबाबदारीमुळे सवड मिळालीच नाही. चाळिशीत डायबिटीसने डोकं वर काढलं. हो सांगायचे राहून गेले , काही महिन्यांपूर्वी त्यांना सौम्य हृदय विकाराचा झटका येऊन गेला. नशीब चांगलं की, त्यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले नाही. मृत्यूला स्पर्श करून आल्यानंतर त्या खूपच डिप्रेशनमध्ये गेल्या. त्यांच्या नंतर आमचं कसं होईल , काय होईल? ह्या विचारातच गुरफुटून असायच्या. सतत एकट्या बसलेल्या असायच्या. खूप निराशावादी झाल्या . स्वतःच्या इच्छा आकांक्षा मन मारून जगत आल्या. एकदिवस मी आईंचा गातानाचा विडिओ पाहिला . खूप सुंदर गात होत्या, अगदी तल्लीन होऊन. तसलं तर मला आजन्म जमणार नाही बुवा. पण तेव्हाच ठरवलं आईना म्युझीक क्लासला पाठवायचे. त्यांना त्याच्यातून बाहेर पाडण्याचा तोच उपाय मला योग्य वाटला. स्वतःचं मन डायव्हर्ट केले की , माणूस मानसिक ताण तणावातून बाहेर पडतो हे नक्की . योगा क्लासला जायचे म्हंटलं तर साडीवर काय त्यांना मी पाठवणार न्हवते. छान लेगिन्स आणि टॉप घेऊन दिले. त्यांनी पहिल्यांदा असा पेहराव घातला . बाबा तर आईचं रूप पाहून खुश झाले. आम्हालासुद्धा खूप छान वाटलं. त्यांना हळूहळू सवय झाली . खूप कन्फरटेबल वाटतं ना. आणि कसं आहे स्त्री जेव्हा संसारात पडते तेव्हा नटणं मुरडणं कितीही आवडत असलं , तरी ती ते सुद्धा त्यागते. घरच्यांना आवडत नाही, नवऱ्याला आवडत नाही किंवा हवे तितके पैसे नसतात. आणि पैसे असले तरी स्त्री दोन पैसे ती कठीण काळासाठी जपून ठेवते. आईंना मी म्हणाले, आई नटण्या मुरडण्याची हौस तेव्हा केली नाही पण आता मात्र पूर्ण करा. आधी नको नकोच म्हणत होत्या पण मी काय ऐकते . त्यांना छान हलक्या शेडच्या लिपस्टीक, कॉपेक्ट हो आणि लायनर आणून दिलं. लायनर कसं लावायचे हे सुद्धा मीच शिकवलं. म्हणत होत्या अगं माझी त्वचा काय पहिल्यासारखी आहे का? कसं वाटतं? माझं वय झाले आहे.लोक काय म्हणतील?

पण मी त्यांना म्हणाले " लोकांचे काय घेऊन बसायचे ? . जग आपण काहीही करा नावं ठेवतचं असते. आपल्या सुखदुःखाची कोणाला इतकी पडलेली नसते हो आई . देवाने तुम्हाला हे जे आयुष्य दिले आहे ना ते फक्त आता स्वतःला काय आवडतं ते करण्यात घालवा. इतक्या वर्षाची हौस पूर्ण करण्याची हीच योग्य वेळ आहे आई. आता नाही तर कधीच नाही. हौसेला मोल नसते आई आणि हौसेला वयाचेही बंधन नका घालू . तुम्ही अजून तरुणच आहात".
त्यांना खूप मनवावं लागणार ह्याची मला शंभर टक्के खात्री होतीच, कित्येक वर्षाच्या सवयी ज्या अंगवळणी पडल्या आहेत त्या काय लगेच सुटतात होय. पण मी मनात ठरवलं होतं, आईंना शिकवायचेच स्वतःसाठी जगायला .थोडं स्वार्थी होणं कधी कधी चांगलं असतं नाही का? आणि आपण जेव्हा टापटीप , व्यवस्थित राहतो तेव्हा एक वेगळाच आत्मविश्वास हा आतून येतो हे ही तितकंच खरं आहे.


सरू आणि लक्ष्मी मावशी अगदी एक एक शब्द मन लावून ऐकत होत्या.

स्मिता पुढे बोलू लागली..

"वय कोणतंही असो ,स्त्री असो पुरुष प्रत्येकाने स्वतःकडे , स्वतःच्या आरोग्याकडे,छंद जोपासण्याकडे , सुंदर दिसण्याकडे आवर्जून लक्ष द्यावे . त्याला वयाचे बंधन घालून स्वतःचा कोंडमारा करू नये. नाही का? नटणं मुरडणे हे फक्त आणि फक्त स्वतःच्या आनंदासाठीही करावं कारण स्वतः खुश राहिलो तरच आजूबाजूच्या लोकांनाही आपण खुश ठेवू शकतो. कुठेतरी मन गुंतवलं की, आपलंही मन फ्रेश राहते आणि आपण आपल्या सभोवतालच्या लोकांनाही तितकंच आनंदीत ठेवू शकतो. आपल्या अंगी एक सकारात्मक्ता येते..आणि कसं आहे ना, हल्ली आयुष्याचा भरोसा नाही ओ ,कधी काय होईल सांगता येत नाही. आपण आपल्या इच्छा , आकांक्षा उद्यावर लोटतो पण जर का तो उद्या आलाच नाही तर काय? त्या इच्छाचं ,त्या स्वप्नांचे काय?इथे आजचा भरोसा नाही आणि उद्याचं काय घेऊन बसायचे?ज्या पण इच्छा, आकांक्षा, स्वप्न आहेत ते उद्यावर न सोपवता आजच्या आज पूर्ण करावी. आयुष्यातील प्रत्येक सेकंद भरभरून जगता आला पाहिजे. हो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, आपला वेळ दुसऱ्यावर टिका टिप्पणी करण्यापेक्षा, आपला अमूल्य वेळ असाच वाया घालवण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष देणे , स्वतःला खुश ठेवणे, स्वतःचे छंद जोपासणे हे केव्हाही चांगलेच नाही का?


बरं, चला ऑफिसला उशीर होतो आहे. चालू द्या तुमच्या गप्पा"


स्मिताच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत दोघीही निशब्द झाल्या. स्मिताने खरं तर दोघींचीही बोलती बंद केली होती ; पण एक मात्र आहे दोघींना स्मिताचे बोलणे मनोमन पटले होते.

सरू लक्ष्मीला म्हणाली..
"लक्ष्मी, आपणसुद्धा योगा क्लास लावूया का गं? म्हणे योगाने शरीर स्वस्थ, सदृढ राहते..

लक्ष्मीने होकारार्थक मान हलवली .


आयुष्यात छोटे बदल मोठा बदल घडवून आणतात नाही का? कशी वाटली आजची कथा ? आवडल्यास नक्की लाईक, कंमेंट,शेअर जरूर करा. मला फॉलो करायला विसरू नका.
हो आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात काय बदल केले त्याचा काय सकारात्मक परिणाम झाला हेसुद्धा आवर्जून कंमेंट मध्ये लिहा.शेअरिंग इस कॅअरिंग .धन्यवाद.

समाप्त.
©®अश्विनी ओगले.