Login

त्रस्त गृहिणी भाग 6

दर पावसाळ्यात कांदा भजी, बटाटे वडे, मिर्ची भजे, करणाऱ्या त्रस्त गृहिणीची गोष्ट
त्रस्त गृहीणी भाग 6


त्यादिवशी माझ्या घरचं वातावरण नेहमीपेक्षा जरा जास्तच तणावपूर्ण झालं होतं. मी आपली बापुडी स्वयंपाक घरात काहीतरी खुडबुड करत होती, तर दिवाणखान्यात माझी मुलगी आणि तिचे बाबा एका गंभीर विषयावर काहीतरी बोलत बसले होते. तसं हे आमच्या घरी नेहमीच घडतं.

म्हणजे मी तिकडे स्वयंपाक घरात वेठबिगारासारखं राबराब राबवायचं आणि माझ्या मुलीने आणि नवऱ्याने दिवाणखान्यात बसून काहीतरी मसलत करून एखादा ठराव मंजूर करून नंतर तो माझ्या पुढे ठेवून मी तो पारित करावा अशी अलिखित बळजबरी माझ्यावर गेले कित्येक वर्षे होते आहे. आताशा मलाही त्या गोष्टीं बाबत फारसं काही वाटेनासं झालं आहे.


पण आज विषय इतर वेळेपेक्षा जरा जास्तच गंभीर होता. मुलगी तोंड पाडून बसली होती आणि बापाकडे मोठ्या आशेने डोळे लावून बघत होती. माझा नवरा म्हणजे काय? मुलगी म्हणेल ती पूर्व दिशा असा त्याचा अलिखित नियमच! पण यावेळी मात्र तो देखील सहजासहजी राजी होत नव्हता. अर्धा पाऊण तासा पासून त्या दोघांचं खलबत सुरू होतं. आठवणींच्या कप्प्यातून मला असंच काहीतरी आठवलं की मी तेव्हा लहान होती आणि माझी मोठी बहीण जी माझ्यापेक्षा पाच सात वर्ष जरा मोठी होती तिनेही घरी असंच काहीतरी सांगितल्यानंतर त्यावेळी माझ्या माहेरचं वातावरण हे असंच गंभीर झालं होतं. त्यामुळे आता आपल्या समोर काय वाढून ठेवलं आहे? या विचाराने माझा जीव गलबलला.

शेवटी लेकीच्या बाबाने मनाचा हीय्या करून मला दिवाणखान्यात बोलावलं. खरंतर त्यांना माझ्याशी बोलताना भीती वाटत होती की, जे काही बाप-लेकी मध्ये ठरलं आहे ते कसं सांगावं याचं त्यांना टेन्शन आलं होतं हे सांगणं जरा कठीणच! माझ्याशी बोलताना त्यांच्या घशाला कोरड पडली होती कारण ते वारंवार स्वतःच्या ओठांवरून जीभ फिरवत होते, हातांच्या बोटांची अस्वस्थ चाळवा चाळव सुरू होती. इकडे मलाही भरपूर ताण आला होता. ते काय सांगतील या विचाराने माझा जीव अर्धा होत होता. इन मीन 14-15 वर्षाची माझी लेक पण या वयात तिने काय कारणामे केले असतील हे विचार करून डोक्याचा नुसता भुगा झाला होता. काहीतरी घडलं होतं खास हे मात्र नक्की. मी माझा सारा जीव कानात एकवटला आणि देवाचं नाव घेत सगळे प्राण कानाशी एकत्र केले. आता कानावर काय पडेल याचा विचार करूनच माझ्या पोटात मोठा खड्डा पडला होता, जीवाची नुसती घालमेल सुरू होती. हृदय अगदी वंदे भारत किंवा राजधानी एक्सप्रेस शी स्पर्धा करत त्यापेक्षा दुप्पट वेगाने धडधडत होतं.

माझ्या देहबोली वरून आणि चेहऱ्यावरून माझ्या नवऱ्याने फिरलं की हिच्या तणा मनात तिसरं महायुद्ध भडकलं आहे. त्यामुळे नमनाला घडाभर तेल न घालता त्यांनी सरळ विषयालाच हात घातला. “अगं आपल्या लेकीला आज बटाटेवडे आणि बटाट्याचे भजे खायचे आहेत. तुझी इच्छा असेल आणि शरीरात त्राण असतील तर थोडी कांदी भजी मला पण चालतील आणि तुझा आवडता लेक त्याला तर पकोडे फारच आवडतात तेही जर तू मनावर घेतलंस तर तुझ्यासारखी अन्नपूर्णा आणि तुझ्या छत्रछायेखाली जगणारे आम्ही धन्य होऊ.”

नवरा काय म्हणाला हे एक क्षण मला समजलं नाही. पण नंतर जेव्हा त्याच्या वाक्यांचा मला अर्थबोध झाला तेव्हा मी तीन ताड उडाले. माझी मुलगी एवढ्या लवकर बटाटेवडे आणि भजी खायला राजी होईल असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं.

आत्ताची ही मॅगी पिझ्झा पास्ता वाली जनरेशन बटाटेवडे आणि भजे पकोड्यासाठी बापाकडे हट्ट धरते आहे हे बघून माझं मन भरून आलं. आणि मनातल्या मनात आश्चर्य व्यक्त करत मग मी माझ्या कार्यक्षेत्राकडे वळाले.

कांदे बटाट्याच्या टोपलीतून बटाटे काढून त्यांना उकळत्या पाण्यात बुडूवून मी त्यांचा टोपलीतून कुकरमध्ये कडेलोट केला. त्यानंतर माझ्या हाताशी असणारं माझं आवडतं शस्त्र चाकू घेऊन मी अनेक कांद्यांच्या आणि बटाट्याच्या माना मारल्या! अनेक मिरच्यानां यमसदनी पाठवले. डाळीचे पीठ म्हणजेच बेसन घेवून डब्यातून कटोऱ्यामध्ये त्याचा कडेलोट करून, त्याला पाण्यात यथेच्छ बुडवलं, त्यावर ओवा, मीठ, आलं लसणाची पेस्ट घालून त्याच्या जखमांवर चांगलं मीठ चोळले, कढईमध्ये तेल घालून खालून गॅसच्या रूपातला अग्नी प्रज्वलित केला. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कांद्यांना, बटाट्यांना, बटाट्याच्या भाजीला, बेसन रुपी पितांबर चढवून, उकळत्या तेलात देहांत शासन केले. पावसाळ्यात कांदा भजी, बटाटे वडे, मीर्ची भजे आणि मुगाचे पकोडे करायला मी कंबर कसली.

©® राखी भावसार भांडेकर नागपूर.


सदर लिखाण संपूर्णतः काल्पनिक असून त्याचा वास्तवात कुणाशी कुठलाही संबंध नाही तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.

सदर लिखाणाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून लेखिकेच्या परवानगीशिवाय कोणीही ते वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


🎭 Series Post

View all