समीर, जरा अनयची शाळेसाठी तयारी करून दे ना."
कविता टिफिन बनवता बनवता आपल्या नवऱ्याला समिरला किचन मधून आवाज देत म्हणाली.
"कविता, सकाळी मला वेळ नसतो. माहित आहे ना तुला आणि आई आहे ना घरात तर तिला सांग ना ती करेल. "
असं म्हणून समीर अंघोळीला निघून गेला सुद्धा त्यामुळे कविता अजून काही बोलू शकली नाही.
शेवटी तिने आधी आपल्या हातामधलं काम टाकलं आणि तिच्या लेकाच अनयच आवरून दिल. त्याची स्कूल बस यायची वेळ झाली होती. इकडे समीरचा डब्बा बनवायचा बाकी होता. त्यामुळे तिची खूपच धांदल उडाली. तिने विचार केला एकदा आईंना विचारून तर बघते.
"आई, अनयला आज तुम्ही स्कूल बस पर्यंत सोडाल का?"
"अगं, मी प्राचीच्या मुलांकडे बघते ना आधीच, त्यांची यायची आता वेळ झाले. त्यांच्यासाठी काही नाश्ता केलास का?? आणि बघ ही चढ उतर करताना पाय दुखतात. शिवाय अनयला आई-वडील असताना आजीने का करायचं?"
हे ऐकून कविता गप्प झाली, तिच्या डोळ्यात पाणी आलं. ते पाहून नकळत्या वयात आलेले शहाणपण म्हणा पण आपल्या आईची ओढाताण त्या चिमुकल्याला दिसत होती. त्यानेच म्हंटल,
" आई, आज मी राज सोबत जाईन, काळजी नको करुस मी नीट जाईन. "
ती काही बोलणार तेवढ्यात समीरचा आतून आवाज आला.
" कविता, चहा आण पटकन, मला उशीर होतोय. "
ते ऐकून जास्त विचार न करता तिने अनयच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला पाठवून दिल.
पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय वसुधा सोसायटी मध्ये देशपांडे कुटुंब राहत होते. त्याच सोसायटी मध्ये मीनाक्षी देशपांडे तिसऱ्या मजल्यावर राहत होती. तिच्या नवऱ्याचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं. सत्तरीच्या उंबरठ्यावर असली तरी तिच्यात अजूनही उत्साह होताच. तिच्या दोन्ही मुलांवर, प्राची आणि समीरवर, तिचं नितांत प्रेम होतं. आता त्या मुलगा समीर, सून कविता आणि नातू अनयसोबत राहायच्या.
समीर आणि कविता ह्यांचं लग्न चार वर्षांपूर्वी झालं होत. त्यांना तीन वर्षांचा अनय नावाचा मुलगा होता. कविता एका खाजगी कंपनीत कामाला होती, आणि समीर मोठ्या कॉर्पोरेटमध्ये मॅनेजर होता. मात्र, त्याचा वेळ फोन, मित्र आणि ट्रीप्समध्ये जात असे. मुलाच्या जबाबदाऱ्या सांभाळणं हे त्याच्या डोक्यात आलंच नव्हतं.
तर प्राची त्याच शहरात राहत होती, तिचं सासर आणि माहेर दोन्हीही जवळ जवळ मग काय काही ना काही कारण काढून ती बऱ्याचदा माहेरी यायची. तिचे दोन लहान मुलगे, आरव आणि ईशान इकडेच असायचे आणि घरभर मस्ती करत फिरत असायचे. त्यांनी केलेला पसारा आवरताना कविताचा जीव मेटकुटीला यायचा.
पण त्यांची आजी मीनाक्षी त्यांच्यावर भरभरून प्रेम करायची. त्यांच्यासाठी खास पदार्थ करायची, त्यांना गाणी शिकवायची आणि त्यांचं कौतुक करायची.त्यांच्यासाठी कपडे शिवायची आणि शाळेच्या गोष्टींमध्येही लक्ष घालायची. शिवाय इकडे प्राची ऑफिस मधून आली आणि कधी दमलेली दिसली तर,
"तू विश्रांती घे, मी मुलांना सांभाळते"
असं म्हणून स्वतःच तिला चहा नाश्ता आणून द्यायची. मीनाक्षी बाईंचा आपल्या मुलीच्या मुलांवर जीव टाकायची, पण सुनेच्या मुलासाठी वेळ नव्हता किंवा त्यांना कविताची काही काळजी देखील नव्हती.
मीनाक्षी बाईला लेकीचं दुःख दिसायचं पण तेच त्यांच्या सुनेने कविताने कधीही काहीही मदतीची अपेक्षा ठेवू नये असच त्या तिला दाखवून द्यायच्या. कधी काही अनयच काम सांगितलं की त्या म्हणायच्या,
"कविता, मुलाला सांभाळणं आईचं काम असतं! समीर दिवसभर काम करतो, तुला तरी सुट्टी मिळते ना?"
पण हेच प्राची च्या मुलांच्या बाबतीत मात्र उलट चित्र होत.
कविता नेहमी मनातच म्हणायची, "मग प्राचीचे मुलं सांभाळणं तुमचं काम कसं काय?" पण ती बिचारी काहीच बोलायची नाही, तोंड बंद ठेवायची, कारण समीर ने तिला कधीच समजून नाही घेतलं. मग ती सांगेल तरी कुणाला? बिचारीला माहेरचा सुद्धा आधार नव्हता.
कविता काही ठोस पाऊल टाकेल का?
क्रमश