तूच माझी आई!

एका आईची हृदयस्पर्शी कथा!


तूच माझी आई..!


सात आठ वर्षांची चिमुरडी दाराआडून श्वेताकडे टक लावून बघत होती. ती आपल्याकडे बघतेय हे श्वेताला जाणवत होते. तिचा गोरापान वर्ण, पाणीदार टपोरे डोळे, गुलाबी गाल आणि गुलाबाच्या पाकळ्यासारखेच गुलाबी गुलाबी ओठ!

डोळ्याच्या कोपऱ्यातून तीही केव्हाची त्या चिमुकलीला न्याहाळत होती. दोघींचा हा चोरशिपायाचा खेळ किमान दहा मिनिटे तरी चालला. अकराव्या मिनिटाला दोघींचीही नजरानजर झाली अन श्वेता तिच्याकडे बघून गोड हसली. बदल्यात त्या नाजूक गुलाब पाकळ्याही हलल्या. नजर मात्र बुजलेलीच, जणू तिची चोरी पकडल्या गेलीय.

श्वेताने हात हलवून तिला स्वतःकडे येण्याची खुण केली. दबक्या पावलाने ती तिच्याशेजारी येऊन उभी राहिली.


"नाव काय गं तुझं?"   गोड आवाजात श्वेताने विचारले. आवाजात आपुलकीचा गोडवा आपोआप उतरला होता.



"केतकी."  ती चिमुकली आपल्या मंजुळ स्वरात म्हणाली.


"तुझे नाव किती गं गोड! अगदी तुझ्यासारखेच. मला केतकीची फुले आवडतात. तू ही फार आवडलीस."


केतकीकडे हसरा कटाक्ष टाकून श्वेता म्हणाली.


"खरंच मी आवडले तुला?" केतकीच्या नजरेत काहीसा अविश्वास होता.


"हो, अगदी खरं. देवाशप्पथ!" श्वेता हसून म्हणाली.


"अगं, काय केलेस हे? आजी म्हणते देवाची शपथ घ्यायची नसते." केतकी.


" काय करणार मग? एका गोड मुलीचा माझ्यावर विश्वासच बसत नाहीये तर देवबाप्पाला मध्ये आणावेच लागेल ना."  ती मिश्किल हसली.


केतकीच्या ओठावर देखील हसू उमटले.


"तुला एक विचारू?"


"काय?"

"तू खरेच माझी नवी आई आहेस?"  केतकीने आपले टपोरे डोळे तिच्यावर रोखले.
तिच्या त्या निरागस प्रश्नावर श्वेताने फक्त मान डोलावली.

"पण तू तर माझ्या आईसारखी गोरी नाहीयेस. चेहराही तसा नाहीये."  ती थोडीशी खट्टू झाली.

"तुला जेव्हा वाटेल ना की मी तुझी आई आहे, तेव्हाच तू मला आई म्हणून हाक मार. मग तर झालं?"  तिच्या नाजूक खांद्यावर हात ठेऊन श्वेता म्हणाली.

" तोवर तुला काय म्हणू?"  ती.

"श्वेताआई म्हण, ताई, माई किंवा श्वेता म्हण. चालेल मला." श्वेता.

"आई? नकोच."  केतकीने नकारार्थी मान हलवली.
"ताई म्हटलं तर? नाही. एवढ्याशा केतकीची साडीवाली ताई कशी असेल ना? श्वेता तरी कसं म्हणू? तू मोठी आहेस ना माझ्यापेक्षा. त्यापेक्षा तुला मी माई म्हणेन. आवडेल तुला? " तिने डोके खाजवत स्पष्टीकरण देत विचारले.

"हो, नक्कीच."  श्वेताने दुजोरा दिला.


"माई, तू माझा जाच करणार आहेस का गं?"  थोडावेळ थांबून केतकीने पुन्हा श्वेताला प्रश्न केला.

"हे तुला कोण बोललं?"  श्वेता.


ती मावशीआजी आहे ना? ती आणि रूपा काकू पण म्हणाली.

श्वेताने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

"केतकी, मी तुला का त्रास देईन? पण तुला कधी असे वाटले ना की जाच होतोय तर मला लगेच बोल तसे. मी माझे वागणे नक्की सुधारेन."  तिचा गालगुच्चा घेत श्वेता.

"केतकी ये गं झोपायला."  कुसुमताईचा आवाज आला तशी ती नाजूक कळी धावत जाऊन तिच्या कुशीत विसावली.


"आजी, मावशीआजी म्हणते तशी ती नाहीये. ती नाही जाच करणार मला."  झोपत असताना केतकी कुसुमताईला सांगत होती.
तिने केवळ हुंकार भरला. तशी तिला श्वेता बरीच वाटली होती.म्हणून तर सर्वेशच्या लग्नाचा घाट घातला होता.


"असे काही नसते हो. आजकालच्या मुलींचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात बरं."  मावशीआजी बरळलीच.


"सारिके, गप की. तू आणि तुझी सून रूपा दोघींनीही लहानशा लेकराच्या मनात काय काय भरवले आहे. सर्वेशच्या लग्नापुरत्याच तुम्ही आला होतात ना? मग आता उद्या गेलात तरी बरे होईल."
कुसुमताई काहीशा रागातच म्हणाली.


"राहिलं. स्वतःच्या रक्ताची बहीणच अशी बोलत्ये तर मग त्या श्वेताकडून काय अपेक्षा ठेवायची? ती तर दुसऱ्यांदा बोहल्यावर चढलेली. त्यात वांझोटी. आम्हाला काय म्हणा त्याचं? रूपे, सामानाची बांधाबांध कर बाई. सकाळीच इथून निघू आपण."  सूनेकडे पाहत मावशीआजी म्हणाली. रूपानेही होकार भरत सामान आवरायला घेतले.


"आजी वांझ म्हणजे काय गं? मावशीआजी नव्या आईला वांझोटी का म्हणते?"  केतकीने विचारले.


" तुला नाही कळायचे. झोप तू."  कुसुमताई तिला थोपटत होती.

सगळे झोपले, कुसुमताईला मात्र झोप येत नव्हती. सारिकाला ती रागे भरली खरी, पण तिचे म्हणणे फारसे कुठे चुकीचे होते? सावत्र आई कशी असते हे ऐकून आणि बघूनही माहीत होतेच की. श्वेता केतकीला आपली मुलगी मानून माया लावेल की नाही हा प्रश्न होता.


कुसुमला दीपिका, म्हणजे केतकीच्या आई आठवली नि डोळ्यात टचकन पाणी आले. सर्वेश आणि दीपिकाच्या लग्नाच्या दुसऱ्याच वर्षी केतकीचा जन्म झाला. घर कसे आनंदाने न्हाऊन निघाले होते. हा आनंद नियतीला जास्त काळ पाहवला नाही. केतकी पाच वर्षांची असताना एका अल्पशा आजारात काळाने दीपिकावर झडप घालून हिरावून घेतले. तेव्हापासून केतकी कुसुमच्या सानिध्यात वाढू लागली. कुसुमताई खमकी होती पण आता थकली होती. तरणाताठा लेक डोळ्यासमोर खंगत चाललाय हे तिला सहन होत नव्हते. दुसऱ्या लग्नाला तो तयार नव्हता. शेवटी केतकीची शपथ घातली तेव्हा कुठे त्याने होकार दिला.


त्याचा होकार मिळाला आणि कुसुमताईचे वधूसंशोधन सुरु झाले. मुद्दामच घटस्फोटिता, विधवा अशा मुली ती पाहत होती. अशातच तिला श्वेता दिसली. नाव तेवढे श्वेता, वर्ण मात्र साधाच सावळा. नाही म्हणायला चेहऱ्यावर थोडे तेज होतेच. पण दीपिकाशी तुलना केली तर दीपिकाच सरस होती. कुसुमला सावळी श्वेता आवडली. किमान सौंदर्याचा माज तर करणार नाही असे तिचे म्हणणे होते. वांझ म्हणून नवऱ्याने मारहाण करून तिला सोडली होती. लग्नाच्या चार वर्षांत तिचा घटस्फोट झाला होता. घटस्फोटित, त्यातून वांझ म्हणजे केतकीवर ती अन्याय करणार नाही, हे ही बरेच होते. सर्वेश साठी तिने श्वेताचे स्थळ मंजूर केले. त्याने केवळ आई म्हणतेय म्हणून केतकीसाठी हा प्रस्ताव मान्य केला.


श्वेताची परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. चारच वर्षात नवऱ्याने टाकली म्हणून आईबाबाकडे येऊन राहिलेली ती. भाऊ वहिनी आणि आता तर आईबाबाही तिच्याकडे खोचक नजरेने पाहत होते. जास्त शिक्षण न झाल्यामुळे काही नोकरी धंदा करून वेगळे राहावे हाही पर्याय नव्हता. म्हणून नाईलाजाने ती या लग्नाला तयार झाली.


सारिकाच्या बोलण्याने श्वेताबद्दल कुसुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता पण तिच्या वागण्यात तिला काहीच खोट आढळत नव्हती. केतकीची शाळेची तयारी, सर्वेशचा डबा हे सारे ती मनापासून करत होती. सासुसासऱ्यांशीही प्रेमानेच वागे.
हळूहळू श्वेता सगळ्यात मिसळून गेली. सासुसासरे खूष होते. आधी काहीसा फटकून वागणारा सर्वेश हळूहळू खुलत होता. केतकीचे तर माईशिवाय पान हलत नसे. शाळेतल्या गमतीजमती, अभ्यास, तयारी सगळ्यांसाठी माई लागायची. आपण योग्य मुलगी शोधली याचा कुसुमताईला अभिमान वाटत होता.



एके दिवशी सकाळी श्वेताला मळमळत होतं, दोन तीनदा ओकारीही झाली. ऍसिडिटी वाढली असेल म्हणून तिने दुर्लक्ष केले.


"माई तुझ्या पोटात बाळ आहे? पोटात बाळ असलं की असाच त्रास होतो, ते टीव्ही वरच्या मालिकेत बघितलेय. हो ना गं आजी."  तिने कुसुमताईकडे बघून विचारले आणि श्वेताचे मन वाऱ्यावर झुलू लागले. कारण पाळीची तारीख उलटून आठ दिवस झाले होते. इतक्या वर्षात असे एकदाही झाले नव्हते. दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी 'गुड न्युज' सांगितली.


इतक्या वर्षानंतर अचानक आई बनणार ही बातमी ऐकून श्वेताच्या आनंदाला पारावर उरला नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पहिल्या नवऱ्याने वांझोटी म्हणून तिला टाकले, पण ती वांझ नव्हतीच. आईपण काय असतं हे ती आता अनुभवणार होती. क्षणात तिच्या डोळ्यासमोर केतकीचा नाजूक चेहरा उभा राहिला. आणि मनातील भावनेवर तिने आवर घातला.

"मॅडम, मला हे बाळ नकोय हो." ती निग्रहाने म्हणाली.

"श्वेता, अगं इतक्या वर्षापासून तू या मातृत्वाला आसूसली होतीस ना? अचानक काय झाले? एक महिन्याचा जीव तुझ्या उदरात वाढतोय. दहा दिवसांनी त्याचे हृदयाचे ठोके सुरु होतील. " डॉक्टर तिला समजावत होते.


"म्हणजे बाळाला अजून जीव फुटला नाहीये न? किमान त्या बाळाचा जीव घेतलाय असा ठपका तरी माझ्यावर बसणार नाही. मॅडम, खरेच हो, मला नकोय हे बाळ."  तिने डोळे पुसत  म्हटले. बाळाच्या आगमनाने छोट्या केतकीवर होणारा अन्याय ती मान्य करू शकत नव्हती.

********

दिवसामाजी दिवस सरत होते. केतकी मोठी होत होती. सुंदर नाजूक कळीचे फुलात रूपांतर झाले होते. श्वेताच्या तालमीत ती आता चांगली तयार झाली होती. अभ्यास, घरकाम, स्वयंपाक सर्वच तिला यायचे. माई बद्दल मनात ओढ तर होतीच पण आई म्हणायला मन कधी धजावले नव्हते. तिने आपल्याला आई म्हणावे ही अपेक्षा श्वेताने केव्हाच सोडून दिली होती. एवढे सोडले तर दोघींचे नाते चांगले बहरले होते.

केतकीचे ग्रॅज्युएशन आटोपले नी तिला रिषभचे स्थळ सांगून आले. रिषभ एका मोठ्या कंपनीत कामाला होता. घरी आई बाबा दोघेच. देखणी केतकी पहिल्याच नजरेत रिषभला आवडली. सहा महिन्यात त्यांच्या लग्नाचा बार उडाला.


दोन महिन्यांनी केतकीकडे गोड बातमी असल्याचा फोन आला आणि तिच्यासाठी काय करू नी काय नको असे श्वेताला झाले. पहिली तीन महिने ती केतकीला घरी घेऊन आली. एखाद्या नाजुक फुलासारखी ती केतकीला जपत होती, तिने एकदा म्हटलेही, "माई किती गं जपतेस? आजारी नाहीये मी."

"असू दे गं, माझं नाजूक फूल आहेस तू." श्वेता हसून म्हणाली.


पहिले बाळंतपण माहेरीच करायचे या हट्टाने सासूबाईने केतकीला परत माहेरी पाठवले. श्वेता कितीही चांगली असली तरी ना तिला बाळंतपणाचा अनुभव, ना छोट्या बाळाचा. आपला कसा निभाव लागेल या विवंचनेत केतकी होती.

शेवटच्या महिन्यात तपासणी करिता माहेरच्या डॉक्टरांकडे गेल्यावर तिथल्या डॉक्टरांनी लगेच श्वेताला ओळखले.

"ही कोण?"  डॉक्टरांनी विचारले.

"लेक आहे माझी."  श्वेता हसली.

डॉक्टरांच्या कपाळावरचे प्रश्नचिन्ह केतकीच्या नजरेतून सुटले नाही. तपासणी करून बाहेर आल्यावर श्वेताला बाहेरच थांबवून बाळाबद्दल थोडं विचारायचे आहे म्हणून ती आत गेली.


"डॉक्टर, तुम्ही माईला कसे ओळखता?"


"अगं, ती खूप जुनी पेशंट आहे माझी. माझ्या प्रॅक्टिसच्या सुरुवातीच्या काळातली. म्हणून मी ओळखते. तिला एवढी मोठी मुलगी कशी? हाच प्रश्न मला पडला."  डॉक्टर.


"मी तिची सावत्र मुलगी आहे. तिला मूल होत नाही म्हणून पहिले लग्न तुटले होते. नंतर माझ्या बाबांनी तिच्याशी लग्न केले. नंतरही तिला कधी बाळ झाले नाही."  केतकी खिन्नपणे सांगत होती.



"चुकते आहेस तू. श्वेता निपुत्रिक होती कारण तिच्या पहिल्या नवऱ्यात दोष होता. दुसऱ्या विवाहानंतर ती प्रेग्नेंट होती, पण तिने ती प्रेग्नन्सी नाकारली. नशीबवान आहेस तू की एवढी माया करणारी आई तुला मिळाली."  डॉक्टर तिच्याकडे बघून म्हणाल्या.

केबिनमधून बाहेर निघतांना केतकीला दाटून आले होते.

"सगळे ठीक आहे ना? मॅडम काय म्हणाल्या?"  श्वेताने काळजीने विचारलेल्या प्रश्नावर केतकी आपले अश्रू लपवत मंद हसली. काही न बोलता केवळ तिचा हात तिने प्रेमाने दाबला.


एके दिवशी प्रसवकळा सुरु झाल्या आणि केतकीला ऍडमिट करण्यात आले. आजी, मावशीआजी, रूपाकाकी, सासूबाई सर्वच बाळाला पहिल्यांदा हातात घ्यायला रांगेत उभ्या होत्या. श्वेता मात्र मनात श्री समर्थाचे नामस्मरण करत बाजूला बसली होती. बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि तिच्या डोळ्यातून आनंदाचे दोन थेंब गालावर ओघाळले.


नर्स बाळाला घेऊन बाहेर आली.

"बाळाला आईकडे सोपवायचे असे पेशंटने सांगितले आहे."  नर्स महिलामंडळाकडे पाहून म्हणाली.
 
तशी सासूबाई पटकन समोर आल्या. "मी तिची सासू, पण ती मला आई म्हणते. द्या ते बाळ माझ्याकडे."   सासूबाईने हात समोर केले.



"नाही, ती म्हणाली की बाळाला माझ्या खऱ्या आईकडे द्या. श्वेता नाव त्यांचं. कुठे आहेत त्या?"  नर्स.

श्वेताचे नाव ऐकून मावशीआजी पटकन समोर आली.

"अगं बाई, ती वांझ आहे. तिचा स्पर्शही बाळाला नको."

एव्हाना प्रसूतीगृहातून बाहेर येणाऱ्या केतकीने मावशीआजीचे बोलणे ऐकले.

"मावशीआजी ऽऽ"  ती ओरडली.

"माई वांझ नाहीय, खरे वांझोटेपण तर तुमच्या विचारसरणीत आहे."

"हे मी आधीच बोलायला हवे होते पण कधी बोलताच नाही आले."  ती श्वेताजवळ येत म्हणाली.

"मला आपली लेक म्हणतेस ना? मग माई तूच तर माझी खरी आई आहेस. स्वतःच्या पोटात वाढलेला लहान जीव बाहेर येतो तेव्हा केवढा आनंद होतो, हे सगळं मी अनुभवलंय. केवळ माझ्यासाठी तू मातृत्वाच्या या आनंदाला पारखी झालीस, मला माफ कर गं. आई, ह्या बाळावर पहिला हक्क फक्त तुझा आहे. माझ्यावर जेवढं प्रेम केलंस ना त्याच प्रेमाने ह्या बाळाला माझ्याआधी पहिला स्पर्श तू कर."  केतकीचा स्वर कातर झाला होता.

श्वेताने केतकीला जवळ घेऊन बाळाला हातात घेतले. तो चिमणा जीव हातात घेतल्याक्षणी श्वेताच्या डोळ्यातून धारा वाहायला लागल्या. आज त्याच्या जन्माने केतकीबरोबरच तीही आई झाली होती.


              ****** समाप्त ******


©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)


*साहित्यचोरी गुन्हा आहे *


फोटो गूगल साभार.