"आगतिकता"

पत्रलेखन
'आगतिकता'

▪︎

            मनासारखं खूप काही असेलही पण मनाला जे हवं त्याचा हिशोब लागत नाही. कुंपणाबाहेर जाता येत नाही म्हणून जर तुझं सांत्वन माझ्यासाठी असेल तर ते सांत्वन नकोय मला. अंतर असूनही अंतराचा देह गर्भगळित होतो तो प्रपंच माझ्या वाटेला हवायं. आहे ते पुष्कळ असेलही जे सापडत नाही तो ग्रंथ आणून दे. भेदाचे मुळ नष्ट झाले की जमिनीत अंकुर फुटतात. तुझे ठसठशीत नसणेचं तुझे ठसठशीत असणे वाटावे इतका ठळकपणा तुझा जाणवतो. तुझा विचार करायचे सोडू तरी कसे? 

              _________ मागच्या जन्मात राहीलेली अपूर्ण कविता ह्या जन्मात येऊन पुर्ण होते ह्यापेक्षा मोठा कवी शोधू तरी कुठे? 

https://www.facebook.com/shabdmitra/

            ओलांडून जाता येत नाही तोवर ठिक ओलांडता आले की खरा प्रवास सुरु होतो तुझी पाठ-पाय दुखतायत मग इतके चालावे तरी का? आपुलकीचा डोह अन् पाण्यात उतरलेली पावलं एकदा भिजली की पुन्हा तोचं तोचं जीवघेणा प्रवास. तात्पर्य तुझे येणे हवे तुला निष्क्रिय समजून. सहजता असूनही निद्रानाश व्हावा, तू एकदाचं काय तो झोपेचा सोक्षमोक्ष लाव मला झेपत नाही हे पहाटेपर्यंत जागे रहाणे.

                भरभरून रडता आलेली पीढी सुखी ज्यांना डोळे भरून पहाताही येत नाही त्यांना नर्कवेदना! पाण्याला मुठीत ठेवून जगभर प्रवास करुन यावा तेव्हा समाधान होईल तोपर्यंत कोरड अन् देहांत प्रायश्चित उशाला येऊन उभे राहणार. कळणाऱ्याला डोळे कळतात न करणाऱ्याला शब्दही नाही. माझ्या बाबतीत हिचं उठाठेव शेवटपर्यंत उरली. माझे सांत्वन मला करता आले नाही इतके कफल्लक कोणी असेल तरी कसे? असूनही जिवंत नसल्याचा भास होत जातो तेव्हा तुझे अस्तित्व प्रकर्षाने जाणवते तुझ्यासाठी काही वेगळे मांडावे असे कधी वाटले तरी ते खरे नाही इतके तुझे असणे खरे! प्रचंड वेग असूनही तुझे संथ असणे हा तसा कुतूहलाचा विषय. मी जाणूनबुजून तुझे वर्णन करावे इतकेही तुझे गांभीर्य छोटे नाही. विस्तीर्ण होत जाणे अन् तसेच प्रसरण होत जाणे हे तुला शक्य इतरांचा हा विषय नाही, प्रपंच नाही. आत आत काहीतरी खूप खोलवर तुझा प्रवाह पाझरत रहातो कदाचीत मी जिवंत आहे हिचं ती काय खुण असावी हा केवढा चमत्कार! 

https://www.facebook.com/shabdmitra/

              तडजोड अन् वाताहत हा जगाचा प्रवास जगाला आगतिकता झेपत नाही. प्रश्न विचारून भंडावून सोडूनही उत्तरांचा आडमुठेपणा संपत नाही इतके अघोरी जगणे तुलाचं जमावे. मनापासून तुझे स्पष्ट दिसावे असे वाटत राहते तेव्हाचं तुझी लयबद्धता नष्ट होते हा खटाटोप नक्की कशासाठी? चंद्रावरचे गाव तुझे, तुझ्या घशाला कोरड पडेल तरी कशी? संचित अन् प्रारब्ध प्रौढ होत नाहीत होतो तो माणूस, वार्धक्य हिचं जर तुझी आठवण असेल तर त्या पुढचा, मृत्युदंड आणून दे! रंगीत तालीमीत प्रेक्षक नसतो असते ती निर्विकारता कारण त्यावेळी टाळ्यांचा हिशोब नसतो. आहे तितकेचं ताणून धर यापुढे मला झेपणार नाही! प्रकर्षाने तुझं हवं असणं हा नित्याचा भाग तू कधी हाती लागत नाही हा दैववाद. 
        

          हातावर हाताचे ठसे उमटून जावेत इतका हात घट्ट धरून पुढे विस्तृत असे काहीचं नको. जे असेल ते संपूर्ण असेल. धाप लागते सांभाळ, उन लागते सावली हो, तहान लागते पाणी हो, सध्या तरी इतकचं कर! रात्रीचा गर्भ पहाटेची फुलं ओंजळीत घेऊन येतो, जे आहे ते मिथ्या जे अस्पृश्य ते जातिवंत अगदी तुझ्याइतकं!

     
                                           __________________  तुझीचं 'स्मिता'

-  ऋषिकेश पानगे ©️ 30.09.2021

-  'तुझी - माझी कोरी पत्रे'

-  'आगतिकता'

https://www.facebook.com/shabdmitra/

🎭 Series Post

View all