ती...!

Story Of Her
ती... मस्तमौला... कायम स्वतःच्याच संसारात रमलेली! बाहेरच्या जगाचा अन् तिचा काही संपर्कच नाही... तिचा सुखी संसार हेच तिचं जग... जगायला आणखी काय हवं !

एक टुमदार घर... प्रेमळ नवरा ... लाघवी मुलगी... सहृदय जावई, तिची लाडकी नातवंडं, कर्तबगार मुलगा...आर्थिक सुबत्ता...सगळं कसं अगदी छान! दृष्ट लागण्याजोगं !!

तिला तिचं हे जग फार फार प्रिय! त्याशिवाय दुसरं काही नकोच असतं तिला...ह्या सुंदर जगामधून कधी बाहेर येऊच नये असं वाटतं!

पण बाहेर यायला लागतं तिला कधी-कधी... तिच्या जगातून हळूवार मान काढून ती बाहेरच्या जगाचा अदमास घेते.

मान बाहेर काढताच नाकाला दारूचा उग्र भपकारा येतो. आजही तो दारू पिऊन आलेला दिसतोय... कामधंदा न करता दिवसभर उनाडक्या करून आलेला मुलगा , प्रेमविवाह केलेल्या नवऱ्याला सोडून घरात बसलेली मुलगी अन् झोपडीबाहेर खाट टाकून शिव्यांची लाखोली वाहणारी तिची सासू!

ती हताश मनाने सभोवार नजर फिरवते. दोन खोल्यांचं खोपटं... खोपटं कसलं खुराडंच ते... त्यात दाटीवाटीनं भरलेलं सामान, कोपऱ्यात झिंगून पडलेला नवरा, तंगड्या वर करून पसरलेला मुलगा "नवऱ्यानं टाकलेली" तिची लाचार लेक अन् सतत करवादणारी सासू!

तिला सगळं असह्य होऊ लागतं... हे असलं वास्तव स्वीकारण्यापेक्षा मरून गेलेलं काय वाईट? तिच्या मनात विचार येतो....

पण जगणं सोपं... मरणं कठीण! तिच्या घरादाराची वाताहत होत असताना तिला मृत्यू तरी कसा यावा?

मग तिला तिचं ते स्वप्नाळू जग पुन्हा खुणावू लागतं... पुन्हा
ती आपली मान त्या कोषात वळवते आणि तिच्या "त्या" जगात रममाण होते! हसू-गाऊ लागते... स्वतःभोवती गिरकी घेत छमछम नाचू लागते.

"आईला पुन्हा अटॅक आला वाटतं! पुन्हा मनाच्या डॉक्टरला दाखवावं लागणार बहुतेक."तिची मुलगी तोंडात पुटपुटते आणि डॉक्टरांनी दिलेली झोपेची गोळी बळेच तिच्या घश्याखाली उतरवते.

आता तिचा स्वतःभोवतीचा कोष अधिकच घट्ट होत जातो आणि ती त्या कोषामध्ये स्वतःला गुरफटून घेत पुन्हा सुखस्वप्नात रममाण होते!