ती कातरवेळ!

ती कातरवेळ..

आपल्याच प्रियकराला दुसऱ्याचे होताना पाहणे, 

हतबल होत फक्त बघ्याची भूमिका घेणे..

अबोल राहून मनातल्या मनात निव्वळ झुरणे.. 

हृदयभंग झालेल्या एका प्रेयसीसाठी, 

खरंच कठीण असते अनुभवणे, "ती कातरवेळ!"


आपल्याच माणसांना परके होताना पाहणे, 

कुठे आपली चूक झाली याची शोधाशोध करणे.. 

परत कुणावर विश्वास ठेवण्यास मनाची तयारी नसणे.. 

विश्वासघात झालेल्या एका व्यक्तीसाठी,

खरंच कठीण असते अनुभवणे, "ती कातरवेळ!" 


आठवणींच्या हिंदोळ्यावर मनाचे द्वंद्व सुरू असणे..

भूतकाळाच्या चिखलात मन तुडुंब बुडणे.. 

वर्तमानाचा हिशेब करताना जिव्हारी घाव होणे..

आठवणींच्या गाभाऱ्यात बुडलेल्या एका व्यक्तीसाठी,

खरंच कठीण असते अनुभवणे, "ती कातरवेळ!"


वाटेत चालताना जिवलगाची सोबत सावलीसम काळाआड गडप होणे.. 

खळखळणाऱ्या हास्याच्या लहरींचा दुष्काळ जाणवणे..  

एका हक्काच्या व्यक्तीची जागा रिक्त भासणे..

जिवलग मित्र गमावलेल्या एका व्यक्तीसाठी,

खरंच कठीण असते अनुभवणे, "ती कातरवेळ!"


एकांताच्या क्षणी वाळूवरच्या पाऊलखुणा पुसट दिसणे.. 

भेट होण्याची शाश्वती नसतानाही फक्त एका भेटीची आशा मनात बाळगणे.. 

स्वप्नातच खरे पण त्या मिठीच्या स्पर्शाला मुकणे.. 

फक्त एका भेटीसाठी आसुसलेल्या व्यक्तीसाठी, 

खरंच कठीण असते अनुभवणे, "ती कातरवेळ!"


कीर्तीवंत सैनिकाची बायको होण्याचा मान स्विकारणे.. 

आपल्या सैनिक पतीच्या शौर्याची प्रत्येकवेळी दृष्ट काढणे.. 

त्याच्या परतीची अपेक्षा नसतानाही तो परत येईलच या विश्वासाची ज्योत मनात कायम तेवत ठेवणे..

परतीच्या आशेत जगणाऱ्या एका वीर सैनिकांच्या पत्नीसाठी, 

खरंच कठीण असते अनुभवणे, "ती कातरवेळ!"


क्षणात होत्याचे नव्हते झाल्याचे साक्षीदार होणे..

नशिबाने लाभलेले सौभाग्य क्षणात पुसले जाणे..

फक्त विधिलिखित डावपेचांना बालबुध्दीने उमजून घेणे.. 

नुकताच वैधव्यप्राप्त एका वधूसाठी, 

खरंच कठीण असते अनुभवणे, "ती कातरवेळ!"


वर्षभर पावसाच्या अपेक्षेत जगून कर्जांचा डोंगर उराशी पेलणे.. 

सोन्यासारखे पीक आल्याचे उघड्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न तुटणे.. 

कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टीच्या काळाने आघात करूनही हसत सामोरे जाणे.. 

पिकांना लेकरांसारखे सांभाळणाऱ्या एका शेतकऱ्यासाठी, 

खरंच कठीण असते अनुभवणे, "ती कातरवेळ!"


लेकराला जरा ठेच लागताच हृदयी कळ उठणे..

हात धरून चालणे शिकवणाऱ्या हातांना उतारवयात आधाराचा हात न मिळणे..

लेकरांना निवारा मिळावे म्हणून दिवसरात्र झटणाऱ्या त्या पायांनी वृध्दाश्रमाची पायरी चढणे..

लेकरांपासून दुरावलेल्या त्या आईवडिलांसाठी,

खरंच कठीण असते अनुभवणे, "ती कातरवेळ!"


आईने बनविलेल्या चटणी भाकरीच्या स्वादासाठी अमाप धन खर्चूनही तो स्वाद न मिळणे..  

कुठे चुकलो हे कान पिळून सांगायला कुणीच नसणे..  

कायम आईच्या वात्सल्यावाचून अन् बाबांच्या आधाराविना स्वतःचं अस्तित्व निर्माण करणे..

जन्मतःच पोरके असलेल्या एका बालकासाठी,  

खरंच कठीण असते अनुभवणे, "ती कातरवेळ!"


कधी वाटे नकोशी ती आठवणींची पहाट, कधी वाटे नकोसा दिवसही.. 

कधी वाटे नकोशी विचारात गुंतलेली रजनी तर कधी कधी नकोशी भासते ती सांजवेळ, 

प्रत्येकापरी असते भिन्न ती कातरवेळ, 

पण तरीही प्रत्येकालाच कठीण असतानाही अनुभवावी लागते, "ती कातरवेळ!"


©®

श्रावणी