तिला काय कळतंय

क्षणाचाही विलंब न करता 'तू गप्पच रहा.. तुला काय कळतंय?' असं ऐकवून तिच्या विचारांना तिथेच पूर्णविराम दिला जातो. स्वतःच्याच घरात स्वतःच्या हक्काच्या माणसांकडून ऐकलेले शब्द जिव्हारी लागत नसतील का?

लेखाचे नाव - "तिला काय कळतंय?"
विषय - स्त्री आणि परावलंबित्व
फेरी - राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा


आज या एकविसाव्या शतकात स्त्रिया नानाविध क्षेत्रात कार्यरत आहेत. घरकामात पारंगत असलेल्यांपासून ते अगदी अवकाशात झेप घेण्यातही स्त्रिया आघाडीवर आहेत. रोज कितीतरी घटना आपल्या पाहण्यात अथवा ऐकण्यात असतात ज्या स्त्री सक्षमीकरण, स्वावलंबन यांसारखे मुद्दे प्रकाशझोतात आणतात.

पण खरंच आज अगदी प्रत्येक स्त्री पूर्णतः स्वावलंबी आहे का? फक्त मुलगी शिकली आणि तिने तिचं करिअर घडवलं म्हणजे ‘स्वावलंबी झाली’ असं म्हणायचं का? की अजून कोणते निकष आहेत ज्या आधारे तिचं स्वावलंबनत्व सिद्ध होईल? खरंतर अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या ‘स्वावलंबन’ या व्याख्येत बसतात‌. त्या सर्व बाबींचा विचार करण्यासाठी आपल्या आसपास, घरोघरी असणारी परिस्थिती कारणीभूत ठरू शकेल.

कोणे एकेकाळी सर्वश्रुत असलेली ‘स्त्री म्हणजे फक्त चूल आणि मूल’ ही संकल्पना मोडीत काढून प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहून आपलं अस्तित्व सिद्ध करणारी, रस्त्यावरची वाहने चालवण्यापासून ते आकाशात मुक्तपणे विमान उडवणारी आजची आधुनिक स्त्री.. खरंच स्वावलंबी आहे? आपल्या कुटुंबाची जबाबदारी, त्याचे व्यवस्थापन सांभाळण्यापासून ते कुटुंबाचा आर्थिक भार उत्तमपणे उचलणारी स्त्री खरंच स्वतःला स्वावलंबी समजते? तिचा तिलाच पडलेला प्रश्न.. आजही बरेचदा ’स्त्रियांना हे सर्व करण्याची काय गरज आहे?’ असा प्रश्न केला जातो. चार भिंतीत त्यांना बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांचं शिक्षण थांबवून त्यांची शैक्षणिक प्रगती थांबवली जाते आणि समजा तिने हे सर्व ऐकून विरोध केला तर बंडखोर आणि निमूटपणे ऐकून घेणारी असेल तर तिच्या माथी ‘अबला नारी‘ चा शिक्का मारला जातो.

"तिला‌ काय कळतं? " या वाक्याला तर काही तोडचं नाही. काहीही झालं तरी तिला हे वाक्य संबोधले, की झालं यांचा पुरुषी अहंकार सुखावतो. तिला प्रत्येक वेळी निर्णय घेताना डावलून टाकण्यात येतं. तिचं निर्णय स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं पण मग अशा वेळी तिने करिअरकडे लक्ष द्यायचं की पूर्ण वेळ घरासाठी द्यायचा‌? हा पूर्णपणे त्या स्त्रीचा निर्णय आहे. चांगल्या जम बसलेल्या करिअरला तिलांजली देऊन घर सांभाळणारी ती मुर्ख नसते. कारण इथे प्रश्न स्वेच्छेचा असतो. पण बरेचदा असं होतं की अशा स्त्रियांना पुढे जाऊन कितीतरी गोष्टींत टोमणे ऐकावे लागतात आणि ती कशी ‘परावलंबी’ आहे याची जाणीव करून दिली जाते.

गृहिणी असलेल्या स्त्रियांची तर व्यथाच‌ निराळी. घरात काही विषय सुरू असताना जर तिने तिचं काही मत व्यक्त केलं तर‌ क्षणाचाही विलंब न करता "तू गप्पच रहा.. तुला काय कळतंय?" असं ऐकवून तिच्या विचारांना तिथेच पूर्णविराम दिला जातो. स्वतःच्याच घरात स्वतःच्या हक्काच्या माणसांकडून ऐकलेले शब्द जिव्हारी लागत नसतील का? काय वाटत असेल तिला जेव्हा स्वतःचा नवराच या शब्दात तिला बोलत असेल? तिच्या विचारांना महत्त्व न देता तिला अगदी प्रत्येक बाबतीत कमी लेखत असेल आणि याच सर्व गोष्टींना बघून जेव्हा तिची मुलं सुद्धा तुला काय कळणार यातलं? तू तर गप्पच रहा, अशी वाक्यं बोलतात; तेव्हा तिच्या मनाला होणाऱ्या यातना कदाचित फक्त तीच समजू शकते. परावलंबी असणं यावेळी प्रकर्षाने जाणवत असेल.

शिकल्या-सवरलेल्या तिला बरेचदा इच्छा असूनही नोकरी करता येत नाही की स्वतःच्या मर्जीने कोणती‌ गोष्ट करता येत नाही कारण तिला तिच्या मर्जीपेक्षा घरच्यांची मर्जी राखणं महत्त्वाचं किंबहूना गरजेचं असतं. बरं, एवढं असूनही ती जेव्हा एखादं काम करायला जाते तेव्हा "हे तुला जमणार तरी आहे का?", "उगीच काम बिघडवून ठेवशील", "हे काम म्हणजे काय जेवण बनवण्याइतकं सोप्पं वाटलं का तुला?" अशी कितीतरी टोमणे स्वरूप वाक्यं ऐकवली जातात. घरी काही नवीन वेगळी वस्तू खरेदी केली की तिचा वापर करायला तिला जणू दुसऱ्यांवर विसंबून राहावे लागते कारण ती स्वतःहून जर ते करायला गेली तर मागून आरोळी आहेच की! या वाढत्या अन् बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात तर याचं प्रमाण जास्तच आहे.

जेव्हा ती घर सांभाळताना घरखर्च, मुलांचे खर्च व संगोपन, वीजबिल, इतरही अनेक गोष्टी अगदी सहजपणे या लीलया पार पाडते तेव्हा तिच्या कामाला "त्यात काय एवढं?" चा शिक्कामोर्तब होतो. पण तेच जेव्हा चुकून का होईना थोडी काही गडबड झाली की "तुला कोणतं काम नीट जमतं?” चा ठप्पा मात्र न विसरता लागतो. कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याचा विचार केल्यावरही काही वेगळी परिस्थिती नसते. ‘अगं तुला जमणारे का हे?’ पासून ‘तुला गरजचं काय आहे या नसत्या उठाठेवींची?’ इथपर्यंत सारं काही ऐकणं तिच्या हक्काचंच झालेलं असतं.
‘तुला काय कळणारे घरात बसून की, बाहेर मला किती काही करावं लागतं, कामावर काय मला बसून पगार मिळत नाही..’ हे बोलताना तिच्या दिवसरात्र घरासाठी घेतलेल्या कष्टांना मात्र गौण दर्जा दिला जातो.

सतत हे सर्व ऐकून ऐकून तिच्या स्वाभिमानाला ठेच लागत नसेल का? प्रत्येक वेळी काही करताना जेव्हा तिला समाज काय म्हणेल?, घरचे काय म्हणतील? याचा विचार करायला लागतो तेव्हा आपसूकच परावलंबी असण्याची जाणीव होते. रोजच्या जीवनातील अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मग मनोबल खच्ची करतात.

बरेचदा एक स्त्रीचं दुसऱ्या स्त्रीच्या आयुष्यातील अडचणींचं, अपमानास्पद वागणूक मिळण्याचं कारण असते. आता याचा‌ संदर्भ इथे जोडण्याचं कारण हेच की स्त्री परावलंबी होण्यासही या गोष्टीचा मोलाचा वाटा आहे. "मी तर नाही कधी असं केलं", "आमच्या वेळी असं नव्हतं.”  "आम्ही नाही असं मध्ये नाक खुपसत", "बाईच्या जातीला शोभतयं का हे?", "काय ती एक एक थेरं" ,ही अन् अशी अनेक वाक्यं बोलण्यात बऱ्याच वेळा स्त्रियाच अग्रेसर असतात. अपवादात्मक परिस्थिती सुद्धा नक्कीच आहे पण म्हणून जिथे हे सारं घडतं ते नजरेआड नाही ना करू शकत?

जो तो आपापल्या परीने आपल्या क्षेत्रात पुढे जात असतो. मग जर स्त्रीने आपल्या मेहनतीने यश संपादित केले तर त्यात काय हरकत आहे ? पण तरीही यावर बऱ्याच मिश्र प्रतिक्रिया पहायला मिळतात. ज्यात आघाडीवर असलेली प्रतिक्रिया म्हणजे "आता बघा ही कशी डोक्यावर मिऱ्या वाटते". या सर्वांत तिचं स्वावलंबी असणं खटकतं कि तिला परावलंबी बघण्यात समाधान मिळतं? ज्या सहजतेने पुरुषांचं काम, उशीरा घरी येणं, कामानिमित्त बाहेर जाणं हे स्वीकारले जाते तीच सहजता स्त्री बाबतीत सगळ्याच ठिकाणी दिसून येत‌ नाही.

‘मुलीच्या जातीनी असं वागू नये’, ‘ही काही मुलींची कामं नव्हे..’, ‘शेवटी तुला नवरा आणि सासरचे लोकं म्हणतील तसेच वागावे लागेल..’ इथंपासून रचलेला परावलंबित्वाचा पाया सासरी ‘तुला काय कमी आहे?’ ‘तुला अक्कल आहे का गं?’ ‘तुला काय कळतंय?’ यावर येऊन पूर्ण होतो.

परिस्थिती खुप काही शिकवून जाते आणि खुप काही करायलाही लावते. गरज असते स्वतःच्या अस्तित्वासाठी जोमाने उभं राहण्याची आणि याची सुरुवात स्वतःचे विचार बदलल्याशिवाय तर होऊच शकत नाही. शेवटी पुढाकार घेणं महत्त्वाचं. तरचं ‘स्वावलंबनाच्या’ व्याख्येचे धडे गिरवणं खऱ्या अर्थाने सुरू होईल.

असे म्हटले जाते की सत्य कटू असतं. अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या खऱ्या आहेत हे माहित असूनही त्या स्वीकारणं मात्र जड जातं. पण कुठे तरी ते सत्य मान्य करून, त्या काही चुकीच्या गोष्टींना आळा घालणं हे आपल्याच हातात आहे नाही का?

"तिला काय कळतंय?" हा विचार करून सतत तिला कमी लेखण्यापेक्षा "तिला खरंच किती आणि काय काय कळतंय?" यावर लक्ष केंद्रित केलं तर बरं होईल नाही का?

©® कामिनी खाने.
जिल्हा :- रायगड - रत्नागिरी.