तिची अमूल्य शिदोरी

उरतात फक्त आठवणी . त्यांचं स्थान जीवनात अमूल्य असे असते.
अबोली शाळेतून आली आणि रडायला लागली. तिची आई ज्योती आणि बाबा रुपेश दोघेही कामाला गेले होते.
अबोलीने रडतच ज्योतीला फोन लावला. ज्योती तासाभरातच घरी आली.

"अबोली, बाळा काय झाले? दार उघड." ज्योती.

आईचा आवाज ऐकून तिला बरं वाटलं.

अबोलीचे डोळे रडून रडून सुजले होते. तिचा तो अवतार पाहून ज्योतीला फार चिंता वाटली.

"अबोली, काय हे? डोळे सुजले गं राणी." अबोलीच्या डोक्यावर हात फिरवत ज्योती म्हणाली.

अबोली फक्त रडत होती.

"अबोली, शांत हो आधी. तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना आई ? मग आईला सांगणार नाही."

आता मात्र अबोली ,ज्योतीला घट्ट पकडून रडू लागली."
ज्योतीला चिंता वाटू लागली.
अबोली फक्त रडत होती.


ज्योतीची नजर अबोलीच्या कपड्यावर गेली.

तिचा फ्रॉक पाठून रक्ताने माखला होता.

अबोलीच्या रडण्याचे कारण ज्योतीच्या आता लक्षात आले होते.

नुकतीच अबोली 12 वर्षाची झाली होती आणि तिला पहिल्यांदा मासिक पाळी आली होती.

"आई,बघ ना हे काय झाले. किती रक्त जातंय. मला काय झाले? मला काही होणार तर नाही ना?" अबोली रडावलेल्या स्वरात म्हणाली.

"चूक माझीच आहे अबोली,आई म्हणून ह्या गोष्टीचे ज्ञान मी आधीच दयायला हवे होते.बरं ऐक आता . आधी कपडे बदल , फ्रेश हो मी तुला काहीतरी सांगते."

अबोलीने कपडे बदलले.

ज्योतीने, अबोलीला यु ट्यूबवर पाळीच्या संदर्भात विडिओ दाखवले. त्यात सर्वकाही माहिती होती. दोन चार विडिओ पाहिल्यावर अबोलीला धीर आला.

"आई ,हे तर खूप नॉर्मल आहे. रक्त पाहून मी खूपच घाबरले होते. मला काहीच सुचत नव्हते.मला वाटलं मला मोठा आजार झाला आहे की काय."

"हो अबोली, मला सुद्धा जेव्हा पहिल्यांदा पाळी आली होती तेव्हा मी देखील तुझ्यासारखी घाबरले होते ;पण तेव्हा माझ्या मोठ्या बहिणीने मला सर्वकाही व्यवस्थित समजावून सांगितले होते."

"केतकी माऊने सांगितले होते?" अबोलीने विचारले.

"हो तुझी केतकी माऊ." ज्योती.

खरंतर हे निसर्गनियमानुसार प्रत्येक मुलीला होतेच. आईपणाचे सूख हे वेगळंच असते. पहिली पाळी, पहिले बाळंतपण, मोनोपॉज ह्या चक्रातून जाताना अनेक बदल होतात. ते बदल सहजतेने आपल्याला आपलंसं करता आले की सर्वकाही सोप्प होतं बघ. जसं गणितात नियम असतात अगदी आपल्याही मनुष्याचे तसेच असते. निसर्गाने आपल्याला काही नियम दिले आहे . त्या नियमानुसार जगलो की आयुष्य सहज,सुंदर होते. बरं आज आपण छान सेलिब्रेशन करूयात." ज्योती.

"सलिब्रेशन" अबोली आनंदाने म्हणाली.

"हो ,सेलिब्रेशन तर गरजेचं आहे. आज माझ्या अबोलीने किती छान बातमी दिली." ज्योती अबोलीचा हात पकडत म्हणाली.

काही वेळापूर्वी रडणारी अबोली आता खूश झाली होती. पाळी येणे ही तर सेलिब्रेशन करण्यासारखी गोष्ट आहे. तो आत्मविश्वास ज्योतीने दिला.

ज्योतीने अबोलीसाठी जे पदार्थ तिला आवडतात ते सर्व बनवले होते. पुरणपोळी, गुलाबजामुन, बासुंदी,पनीर टिक्का,तवा पुलाव. अजूनही बरंच काही बनवले होते.


ज्योतीला त्या दिवशी गहिवरून आले होते कारण तिलाही जेव्हा पहिल्यांदा पाळी आली होती तेव्हा , तिच्याही आईने तिला तिच्या आवडीचे जेवण बनवले होते आणि स्वतःच्या हाताने खाऊ घातले होते. आज आई जगात नव्हती ; पण तिच्या आठवणीने ज्योतीचा कंठ दाटून आला होता.


खरंतर आई मुलांना जे काही देते ते आयुष्यभर स्मरणात राहते. ती तर शिदोरी असते. आज ज्योतीने जी गोष्ट मुलीला दिली होती ,ती गोष्ट पुढच्या पिढीकडे नक्कीच जाणार ही निश्चित होते. उरतात फक्त आठवणी . त्यांचं स्थान जीवनात अमूल्य असे असते.

अश्विनी ओगले.
कथा आवडली असेल तर लाईक, शेअर ,कंमेंट जरूर करा.मला फॉलो करायला विसरू नका.धन्यवाद.