राघव फ्रेश होऊन समोरच्या खोलीत मोबाईल वर काहीतरी बघत असतो. तेवढ्यात मुलं आली आणि सवयीनी चुपचाप कोप-यात चपला काढून आत जाऊ लागली. तसं राघव हाक मारली,
"कायरे मुलांनो आज प्रिलीमचा निकाल कळणार होता नं?" आणि मुलांकडे बघून हसला.
मुलं गोंधळतात.आज त्यांचे बाबा पूर्वीसारखं बोलत होते .तेवढ्यात आई म्हणाल्या,
" अरे मिळाला नं निकाल. दाखवा नं मग."
त्यानंतर दोघांचा जो धिंगाणा आणि भांडण सुरु झालं ते काही विचारू नका…आधी बाबांना कोण निकाल दाखवणार? त्यांचं ते लडीवाळ भांडण बघून राघवच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला समजलं मुलांना तो किती हवा आहे.
"अरे भांडता कशाला?आपण चितपट करूया."
राघव चितपट करतो स्वातीचा नंबर येतो. प्रथम हिरमुसला होतो.त्याचा चेहरा बघून स्वाती म्हणाली
"बाबा मी हेड नव्हतं म्हटलं तुम्ही चुकीचं ऐकलं. हेड प्रथम म्हणाला होता."
\"असं बोलून स्वातीनी लहान भावाचा गालगुच्चा घेतला. तसं हसून प्रथम म्हणाला
"मला माहिती आहे तूच नेहमी तडजोड करून मोठ्ठी ताई होते." यावर राघव खो खो हसू लागला.
दोघा मुलांना त्यांचं हसणं जरा जास्तच वाटलं. त्यांनी आजीकडे बघीतलं.आजी डोळ्यांनीच खूण केली गप्प रहा.
राघवलाही जाणवलं की आपण खूप दिवसांनी मनमोकळं हसलो.
"मुलांनो यारे माझ्या कुशीत या." दोघंही लगेच राघवला बिलगली.
"बाळांनो तुमची आई गेली त्या दु:खातून तुम्ही लवकर सावरलात. मलाच दु:खातून बाहेर यायला वेळ लागला. आता मी तुमच्याकडे पूर्ण लक्षं देणार.दोघांची आता परीक्षा जवळं आली आहे. तुम्ही चांगल्या रितीने पास झालात तर तुमच्या आईच्या आत्म्याला शांती मिळेल." राघव त्या दोघांना कुरवाळत गदगदल्या स्वरात बोलला.
मुलंही राघवला घट्ट बिलगली. आज खुप दिवसांनी त्यांना त्यांचे बाबा भेटले होते.आई गेल्यापासून मुलांना राघव सतत दु:खातच दिसत असे. धड कधी बोलत नसे. दोघांनाही आपल्या बाबांची खूप दया येत असे पण काय करणार? शेवटी त्यांनीही बाबा बहुदा असेच वागतील असं गृहित धरून आपल्या अभ्यासात स्वतःला गुंतवून घेतलं.
आज अचानक त्यांचे बाबा मुलांना पुर्वीसारखे भेटले. हे काम नक्कीच आजीने केलय याची मुलांना खात्री होती. मुलं इतकी आनंदीत झालेली बघून राघव मनोमन ओशाळला.
त्यांच्या मनात आलं की मुलं या दु:खद परीस्थितीतून जात असताना त्यांचे बाबा पण त्यांच्याबरोबर नव्हते. किती अन्याय झाला माझ्याकडून मुलांवर. आईनी आत्ता सावध नसतं केलं आपल्याला तर ...काय झालं असतं कोणास ठाऊक!
"मुलांनो आज आपण फिरायला जाऊ.बाहेरच जेऊ आणि तुम्हाला आवडतं नं तर रात्री आपण पत्ते खेळू.काय कसा वाटला माझा बेत?"
याहू….असं ओरडायचच मुलांचं बाकी होतं.
"आई तूपण चलायचं." राघव म्हणाला.
" हो आजी तूपण यायचं" स्वाती म्हणाली.
प्रथमनी आजीचा हात घट्ट धरत म्हटलं "आजी तू नाही आलीस तर आम्हीं पण जाणार नाही."
"बापरे….तू तर धाकच घातलास मला. येईन मी. बर का राघव आपण आता दर सुट्टीच्या दिवशी पत्ते खेळण्याचा कार्यक्रम करायचाच. हे पक्कं."
"हो बाबा." प्रथम म्हणाला.
नंतर इतकं छान आनंदी वातावरण तयार झालं होतं की मघापर्यंत असलेल्या नकारात्मक क्षणांचं गाठोडे बांधुन केव्हाच बाहेर फेकल्या गेलं.ते कुणालाच कळलं नाही.
आईपण हसल्या.मनातच म्हणाल्या
"सविता तुझ्या आठवणीतून मी राघवला बाहेर काढलं म्हणून रागाऊ नको. मुलांना त्याची खूप गरज आहे.तू बघते आहेस नं कसे तिघं छान एकत्र आहेत. त्यांच्याबरोबर तुझ्या आठवणी तुझं अस्तीत्व म्हणून आहे. तुझं अस्तित्व या घरकुलात नेहमीच राहणार.काळजी करू नको."
"सविता अगं तुझ्या आठवणींचा मेळा भरतो आपल्या घरी.चहा करतांना स्वाती नेहमी तुझं वाक्य अगदी रोज न चुकता म्हणते.
"स्वाती चहापत्ती घातल्यावर जरावेळ ऊकळावी. छान रंग येतो.नाहीतर चहा पांचट होतो."हे बोलून आई स्वतःशीच हसल्या.
"सविता…अगं आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूत तुझी आठवण आहे. तुझं अस्तित्व आहे. एक गृहिणी म्हणून तू घराला जी शिस्त लावलीस तीपण किती छान पद्धतींनं मुलं आणि राघव तिचं पालन करतात.
ईश्वराला आम्ही आमच्या काळजाचा तुकडा काढुन दिला ग तुझ्या रूपानी. आमचं चौघांचं अस्तित्व अपूर्ण आहे तुझ्याशिवाय.
माझ्या म्हातारीचा तर तू श्वास होतीस.देवानं माझा श्वासच नेला.पण तुला वचन देते. मी स्वाती, प्रथम, राघव सगळ्यांची काळजी घेईन. तुझ्यासारखी काळजी घेणं जमेल का मला …!
आपल्या घरातलं तुझं अस्तित्व अबाधित आहे हे मात्र खरं"
मनातच बोलल्या तरी आईंना दम लागला.डोळे आपसूक वाहू लागले. आनंदात भिजणा-या तिघांना आपले अश्रू कळू नये म्हणून घाईघाईने त्यांनी पदरानी डोळे पुसले.तेवढ्यात प्रथम ओरडला
"आजी तयार हो."
" हो रे राजा तयार होते." आणि हसल्या.
***
आज सविताला जाऊन वर्ष झालं.तरी आम्हा सगळ्यांच्या मनात तिचं स्थान अढळ आहे आणि राहणार आहे.
स्वाती,प्रथम छान टक्क्यांनी पास झाले.आई जिथे कुठे असेल तिथे खूष होईल या आनंदात मुलं आहेत.
राघव पण बराच सावरला आहे. नोकरी व्यतीरिक्त मुलांना भरपूर वेळ देतो आहे. झोपताना मात्र सवितेशी मनातच बोलतो. मला माहिती आहे. त्याने किती नाकारलं तरी. कारण मी राघवची आई आहे.
सविता आता नसली तरी तिच्या अस्तित्वाची रांगोळी तिने आमच्या सगळ्यांच्या मनात छान काढली आहे. हेच आमचं समाधान आहे."
आई मनात हे बोलत होत्या आणि डोळे संततधार पाझरत होते.
--------------------------------------------------
समाप्त
# मीनाक्षी वैद्य.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा