तारुण्याच्या उंबरठ्यावर-४

तीच्या आयुष्यात आलेले अनपेक्षित वळण आणि तिच्या आयुष्याला भेटलेली कलाटणी...!


















समीराचा भूतकाळ आपण तिच्याच तोंडून ऐकू. 



   

      मी "समीरा शशिकांत देसाई ".


   सगळ्यांची लाडकी "मीरा ".


     समीरा म्हणून मला कोणी हाक मारतच नाही.मीराचं छान वाटत म्हणतात. साध आणि सोपं.तसतरं मलापण मीराचं नाव आवडतं.किती मृदू आणि शांत भासत ना ते.पण माझी लहान बहीण, चोंबडी कूठची! मोरा म्हणते मला चक्क! आईचा मात्र मिरेचा गजर असतो नेहमी.तर अशी ही मी मीरा, गावातल्या प्रतिष्ठित लोकांपैकी एक मानल्या जाणाऱ्या देसाईमास्तरांची मुलगी.


  

   बाबा शिक्षक असल्यामूळे गावात एका वेगळ्याच आदरानं आमच्याकडे पाहिलं जायचं.आणि ते ही गणिताचे शिक्षक म्हंटल्यावर अंदाज आलाचं असेल तुम्हाला.पण मी आणि माझी बहीण दोघीही नेहमी बाबांच्या नावाला धक्का लागेल ,असं वागायचं कटाक्षाने टाळायचो.तशी तर आई भरमसाठ सूचना द्यायची रोज पण ते आमच्या चांगल्यासाठीचं आहे म्हणून आम्ही दोघी तीच्या सूचनांचा काटेकोर पालन करायचो.तसतरं पाच मिनिटांवरच हायस्कूल होतं आमच्या घरापासून. बाबांसोबतचं जायचो आम्ही सकाळी आणि येतानाही बासांसोबतचं.कधी बाबांना जादाचे तास किंवा स्टाफ मिटींग असेल तर जायचो दोघी बहिणी एकमेकींची सोबत करत घरी.पण नववी नंतर माझे जादा तास असल्यामूळे मी जवळच राहणाऱ्या माझ्या वर्गमैत्रीणींबरोबरचं घराची वाट पकडायचे.सगळं कसं अगदी छान चालू होतं.बंधन तर होतीच खूप काही मुलगी असल्यामूळे पण आई -बाबा दोघेही शिक्षीत त्यामूळे पूर्णपणे जखडूनही ठेवलं नाही कधी. फक्त जिथे चूक होईल तीथे बाबांच्या खड्या बोलांसोबत आईचा मायेचा पदरही मिळायचा डोळे पुसण्यासाठी. नंतर दहावी जशी उत्तम गुणांनी ,बोर्डात येऊन उत्तीर्ण झाले तसं शेजारच्या गावात अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला.गावात फक्त दहावीपर्यंतचं वर्ग होते त्यानंतर पुढील शिक्षणासाठी शेजारच्या गावात जायला लागायचं. पण तीथेही फक्त बारावीपर्यंतचं शिक्षण!पण शिक्षणाची आवड आणि घरातील शैक्षणीक वातावरण यांमुळे एस.टी.ने ये-जा करण्याचेही जास्त काही वाटले नाही.आणि दोन बालमैत्रिणी होत्याचं की सोबतीला.



  आज माझा बारावीचा निकाल लागला.नव्वद टक्के मिळाले.तशी तर लहाणपासूनच मी हुशार मुलांच्या यादीत अव्वल स्थानावर कायम होते.पण बारावी म्हंटले की जरा टेन्शन असतेच.तोच तर पूढे ठरु पाहणाऱ्या करीयरचा पाया असतो.आणि तो मी अगदी उत्तमपणे पार केला. आज खरचं खूप छान वाटतं होतं.दूपारी निकाल लागल्यापासूनचं सगळ्या पै -पाहुण्यांचे, बाबांच्या स्टाफ मेंबर्सचे फोन येत होते अभिनंदनासाठी.घरच्यांना तर मला अगदी कुठे ठेऊ आणि कुठे नको असं झालेलं.शेजारी राहणाऱ्या एक-दोन मैत्रिणीही मला समक्ष भेटून माझ्याकडून "पार्टी पाहिजे !"असा लटक्या धमकीवजा आग्रह करून गेलेल्या.आमच्या कॉलेजनेही दोन दिवसांनंतर माझा आणि अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय स्थान पटकावलेल्या दोघांचा भव्य असा सत्कार आयोजीत केला.मला तर सेलिब्रिटी असल्याचा फिल येऊ लागला.सगळे शिक्षक आणि गावकरी अगदी तोंडभरून माझ्यावर स्तूतीसूमनांची बरसात करत होते. आणि मी त्यावर अधांतरी तरंगत आकाशात विहार करत असल्याचा भास मला होत होता.खरचं माझा आनंद शब्दात व्यक्त करता येण्यासारखा नव्हताच मुळी.निकाल समजल्यावर बाबांनी अभिमानाने थोपटलेली पाठ आणि मुलीचे यश पाहून आईचे अत्यानंदाने भरलेले डोळे पाहून माझ्या डोळ्यांत आनंदाश्रूंनी दाटी केली.बहीण मात्र फुशारक्या मारत मी या मोरापेक्षा एक टक्का जास्त मिळवून दाखवेन असं म्हणतं घरभर फिरत होती.आणि मला खात्रीही होती तीच्या त्या व्यक्तव्यावर .होतीच ती माझ्यापेक्षा सरस! आणि मला त्याचे अजिबातं दुःख नव्हते.बहिणीसोबत कसली स्पर्धा आणि ते ही लहान बहिणीसोबत! वेडी आहेच तशी,समोरासमोर कधी कौतूक करत नाही पण नंतर सगळ्या गावभर सांगत फिरत होती "माझी बहीण आहे ती."


    

     निकाल लागून दोन महीने होऊन गेले होते.एव्हाना सीईटी आणि नीट परीक्षेचा ही निकाल लागला होता.अपेक्षेप्रमाणे तिथेही चांगलेच मार्क्स मिळाले होते.बाबा जरी गणिताचे शिक्षक असले तरी त्यांच्या मुलांनीही त्याच विषयात प्रावीण्य मिळवून पूढे त्याच क्षेत्रात काम कराव असा अट्टाहास कधीच पाहायला मिळाले नाही.कोणत्याही क्षेत्रात जा पण, त्यामध्ये अव्वल स्थानी रहा एवढेच फक्त त्यांचे म्हणणे असायचे.आता घरात पूढे अॅडमीशन कधी आणि कुठे घ्यायचं ,याची चर्चा सुरू झाली.तीथून पुढचे शिक्षण घेण्यासाठी शहरात जावं लागायचं कारण गावी पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणाची सोय नव्हती.मी मेडिकल कॉलेज साठी अर्ज भरले होते.नावाजलेल्या शासकिय कॉलेजेस् ना प्रथम प्राधान्य दिले होते.शेवटी पहील्या कॅप राऊंड थ्रू चं ,मुंबईतीलच एका ख्यातनाम वैद्यकीय महाविद्यालयात माझे नाव लागले.घरी द्विधा अवस्था होती.पाठवायचे की नाही? 



   आजपर्यंत जवळपासची गाव सोडली तर बाहेर कुठे पाऊल टाकले नव्हते.कोणा नातेवाईकांच्या घरी सुट्टीला जरी जायचे असेल ,तरी आई कींवा बाबा या दोघांपैकी कोणितरी असायचेचं सोबत.आईतर तयारच नव्हती एवढ्या लांब एकटीला पाठवायला. तीथे ना कोणी ओळखीचे ना पाळखीचे.मी एकटी हॉस्टेलवर जमेल का मला? असा आईला प्रश्न पडलेला.बाबाही चिंतेत होते.माझ्याबरोबरच्या दोघींचेही बारावीनंतर लग्न उरकून घेतलं.त्यामूळे मी तशी एकटीचं पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जाणार.एवढे मार्क्स मिळवून सुद्धा मुलीला घरी ठेवायचं हे काही वडीलांना रूचत नव्हतं.शेवटी हो नाही करत मला पूढे शिक्षणासाठी मुंबईला पाठवायचे या निर्णयावर एकदाचा शिक्कामोर्तब झाला.



    तीन तासांचा भलामोठा प्रवास करून मी आणि बाबा शेवटी कॉलेजच्या कमानीजवळ उभे होतो.अगदी दमायला झालं होतं.बाबांच्या हातात दोन आणि माझ्या हातात दोन अशा चार बॅगा घेऊन आम्ही कॉलेजमध्ये प्रवेश केला.सकाळी घरून निघताना पायचं नीघतं नव्हता. आई आणि बहिणीने तर रडून रडून पार डोळे सूजवून घेतले होते. तशी माझीही काही वेगळी अवस्था नव्हती.बाबा सोडायला येणार होते त्यामूळे काळजीचं काही कारण नव्हतं. शेवटी आमचा भरतमीलाप उरकला, तसे मी आणि बाबा घरातून बाहेर पडलो.तरीही दरवाजातून बाहेर येत आईच्या काळजीवजा सूचना कानावर पडतचं होत्या.आईच्या मागून मूसमूसत डोकावणाऱ्या बहिणीला हात हलवून टाटा करत मी आणि बाबा मुख्य रस्त्याकडे वळलो.पहील्यांदाच बाहेर जातोय म्हणून खूप काहीबाही बनवून दिलं होतं आईने. एक पिशवी तर खाऊनेच टम्म फुगलेली.एका बॅगेत कपड्यांची रेलचेल तर दुसर्‍या दोन बॅगमध्ये जीवनावश्यक वस्तू. हे सर्व हातात पकडूनच आत गेलो तर गर्दीच गर्दी! काही काही समजतं नव्हतं.मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी भली मोठी महाविद्यालयाची इमारत पाहत होते.जेवढी नजर दूरवर जाईल तिथे फक्त उंचच उंच इमारती दृष्टीस पडत होत्या.शेवटी आॅफिसीयल कामकाज पाहणाऱ्या खिडकीजवळ जाऊन अॅडमीशन प्रोसेस पूर्ण केली. लगेचच हॉस्टेलचही सगळ पेमेंट वगैरे करून आम्ही कॉलेजच्या बिल्डिंगला वळसा घालून अगदी पाठीमागेच असणाऱ्या मुलींच्या वसतीगृहात पाऊल ठेवलं.मला माझ्या खोलीजवळ पोहचवून,तीथे नव्यानेच आलेल्या माझ्या रूमममेट्सना मला ,"समजून घ्या. भांडू नका "असे सांगून बाबा घरी जायला निघाले. मी ही खालीपर्यंत त्यांना निरोप देण्यासाठी आले होते.मला जवळ घेत खांद्यावर थोपटत "नीट राहा.चांगला अभ्यास कर. आणि तो फोन घेऊन दिला आहे त्यावरून रोज फोन करून ख्यालीखूशाली कळवत जा बरं.येतो आता मी!"असे म्हणतं डोळ्यांच्या पाण्यावलेल्या कडा हलकेच बोटाने टिपून घेत, बाबा तिथून निघाले. शेवटी बाबा नजरेच्या टप्यात दिसेनासे झाले तेव्हा मी पाठमोरी होत पुन्हा माझ्या रूमकडे चालत जाऊ लागले.



हूश्श!!! दमले बाई मी.किती त्या पायर्‍या चढा-उतरायच्या.माझी रूम चौथ्या मजल्यावर होती.मी, मानसी, वैभवी आणि रुहानी अशा चौघीजणी एका रुममध्ये राहणार होतो.तसे पाहायला गेले तर तिघीही खूपचं छान होत्या फक्त वैभवीच जरा शिष्ठ वाटली पण तेवढं सोडलं तर सर्वच छान होतं.आमच्या चौघींचीही लौकरचं गट्टी जमली.असेच आपापला परिचयं देत, एकमेकींबद्दल अजून जाणून घेत आम्ही आमचं सामान बेडला अॅटॅच असणाऱ्या कपाटात अगदी नीटनेटक मांडल.बोलता-बोलता संध्याकाळचे सात कधी वाजले समजलंच नाही.बाबांचाही फोन येऊन गेला होता मध्ये, व्यवस्थित पोहोचले घरी म्हणून.सगळं आवरून झालं तसं फक्त खाऊच्या बॅगा खाली ठेऊन ,बाकीच्या बॅगा पोटमाळ्यावर टाकत एक -एक करत आम्ही फ्रेश झालो आणि दरवाजा ओढून घेत खालीचं पहील्या मजल्यावर असलेल्या वसतीगृहाच्याचं मेसमध्ये जेवण करण्यासाठी गेलो.चौघीही नवीनचं होतो.तीथे गेल्यावर आमच्याचं वर्गातील अजून मुलींसोबत आणि आमच्या सिनीयर दिदींसोबत ओळख झाली.सगळ्या खूप छान बोलत होत्या."काही अडचण आल्यास आम्हाला विचारतं जा" असा प्रेमळ सल्लाही त्या दोघींनी दिला.जेवण झालं तसं वसतीगृहाच्या पुढच्या भागातचं शतपावली करून आम्ही चौघी नव्याने झालेल्या मैत्रिणींचा निरोप घेऊन आमच्या रुममध्ये गेलो.गेल्या गेल्या सगळ्यांनी आपापल्या घरी फोन लावला.तसं तर मला आणि मानसीला खूप रडू येत होतं. आम्ही पहील्यांदाच घरच्यांना सोडून असं एवढं दूर आलो होतो. सायंकाळ होऊ लागलेली तेव्हाच घरच्यांच्या आठवणीने कासावीस व्हायला झालं होतं.पण मैत्रीणींबरोबर इकडच्या -तीकडच्या गप्पा मारून मन रमवायचं चालू होतं.शेवटी एकदाचा फोन लावून सगळ्यांशी बोलून घेतलं. बरं झालं बाबांनी येताना फोन घेऊन दिला, नाहितरं मला जमलचं नसतं इथे राहायला.घरच्यांची सारखी आठवण येत राहीली असती आणि त्यांच्याशी बोलताही आलं नसतं.बोलून झालं तसं आम्ही आपापली सॅक भरून ठेवली,पहील्याच दिवशी लेटमार्क नको! आणि पून्हा एकमेकींशी कूजबत उशीरा केव्हातरी झोपी गेलो. 



  सहा महीने झाले मला इथे येऊन.आता चांगलीच रूळली होते मी या वातावरणात.एक-दोन वेळा घरी ही जाऊन आले होते.एकटी नाही बरं, बाबा आले होते घ्यायला आणि सोडायला ही.एव्हाना वर्गात हुशार मुलगी म्हणून प्रसिद्धी ही मिळाली.सगळे माझ्याशी मैत्री करायला उत्सुक होते.मी ही आनंदाने सगळ्यांशी मिळून-मीसळून वागत असायचे.पण फक्त मुलींशीचं!मूलांशी चार हात अंतर ठेऊनचं असायचे मी नेहमी.गावात कधी असा संबधच आला नाही आणि इथे आले तरी मनामध्ये एक मर्यादा घालून मी वागत होते.छान चालू होतं सगळं. बघता बघता एक वर्ष पूर्ण झालं.पहील्या वर्षाचा वार्षिक निकाल लागला. पहील्या दहा नंबरमध्ये होते मी.पहीलीच यूनिव्हर्सिटी एक्साम असल्यामूळे सारे काही नवीनचं,सगळेच नवीन त्यामूळे काही ठिकाणी गडबड ही झाली ;पण आता बर्‍यापैकी अनुभव आला होता सगळ्याचं गोष्टींचा.



झालं. पहिलं वर्ष संपून द्वितीय वर्षाला सुरूवात झाली.चांगली आठवडाभर घरी राहून पून्हा वसतीगृहात आले होते.या वर्षी खूप काही बदललं होतं.प्रथम वर्षाचे अॅडमीशन होऊन आम्ही आता सिनीयर या कॅटॅगरीत प्रवेशलो होतो.पहील्या वर्षी असणारी एक अनामिक भिती, घाबरटपणा जाऊन आता एका मॅच्यूअर आणि जबाबदार व्यक्तीत आमचे रुपांतर झाले.मैत्रीणीं सोबतचे बंधही आता, पर्सनल गोष्टींची देवाणघेवाण होण्याएवढे घट्ट विणले गेले होते.खुप काही गोष्टींची नव्याने ओळख झाली.मॅम ,दिदी,दी हे शब्द नव्याने कानावर रेंगाळू लागले.क्लासमधील गॉसीप्ससोबतचं वर्गमीत्रमंडळाच्या आणि सिनीयर, ज्यूनियर्सच्या वैयक्तीक आयूष्याबद्दल ही फ्री अव्हर्समध्ये चर्चा होऊ लागलेली.गर्लफ्रेंड ,बॉयफ्रेंड, रिलेशनशीप,ब्रेकअप,पॅचअप ,स्पेशल गिफ्ट्स,सीक्रेट मिट्स,क्लास बंक, लाँग ड्राइव्ह विथ समवन स्पेशल. कधीकधी तरं अगदीच खाजगी जस की, चोरून -लपून किसींग ,लव्हबाईट्स आणि बरंच काही येता जाता कानावर पडू लागलं.हळूहळू हे विषय चघळण्यातं जास्तच रस वाटू लागला .आणखीन जाणून घेण्याची मनीच्छा जागृत होऊ लागली.आता आता तर वर्गातील सिक्रेट कपल गोल्स ,कोण कोणाबरोबर रीलेशनमध्ये आहे हे ही सीक्रेटली समोर येऊ लागलेले. त्यामध्ये काही जवळच्या मैत्रीणींची नावही समजली.काहींचे तर उघड उघड "वी आर इन रिलेशनशीप "असे जाहीर ही करून झालेले.नेहमी कानावर पडणारे हे विषय, रुममेट्सचे चादरीमध्ये घुसून मध्यरात्री पर्यंत फोनवर चालणारे लाडिक बोलणे, रुममध्ये नव्याने भरती होणारे लव्हेबल गिफ्ट्स आणी मैत्रींणीच्यात झालेला एकंदर बदल पाहता मला ही आता या सर्व गोष्टींमध्ये खूपच स्वारस्य वाटू लागलं.


क्रमश :

©️मनमंजिरी ?


🎭 Series Post

View all