तारूण्याच्या उंबरठ्यावर-२

एक वळण आणि तिच्या आयुष्याला भेटलेली कलाटणी...!


























   " बरं,ठिक आहे.तूम्ही मला तुमचे नाव.ज्या व्यक्तीला समूपदेशनाची गरज आहे, त्या व्यक्तीचे नाव आणि त्या व्यक्तीची पूर्ण माहिती मला सांगा. मी नोटडाऊन करते. "तीने शेजारीच असलेल्या पेन स्टँड मधील ,एक पेन हातामध्ये पकडत समोर ठेवलेले रजिस्टर उघडले. 


"मी- "इंद्रजीत भालेराव";आणि समुपदेशन करायचे आहे त्या व्यक्तीचे नाव - "समीरा शशिकांत देसाई " कलेक्टर आॅफीसर आॅफ पुणे डिस्ट्रीक्ट."तीने ताडकन मान वर करून समोर पाहीलं.हातातील पेन केव्हाच गळून खाली पडलेला. 


आता पूढे :



"काय्यययय? "तिच्या तोंडून पटकन आश्चर्यकारक उद्गार बाहेर पडले.त्याची नजर अजूनही तिच्यावरचं रोखलेली.



" मी म्हणालो माझे नाव- इंद्रजीत भालेराव, आणि समुपदेशन ज्या व्यक्तीचे करायचे आहे त्या व्यक्तीचे नाव -समीरा शशिकांत देसाई. "त्याने अजून एकदा तेच वाक्य पून्हा सांगितले.पण तीचा गोंधळ जास्तच वाढला.हे तर माझे नाव आहे?आणि या माणसाचे नाव ही कोठेतरी ऐकल्यासारखे वाटतेय.आपल्या डोक्यावर जोर देत, नक्की कोठे ऐकलेय ते आठवण्याचा ती प्रयत्न करत होती.आणि क्षणात तीच्या डोक्यात प्रकाश पडला.हे तर तीला सांगून आलेल्या स्थळाचे नाव आहे.ती भांबावून त्याच्याकडे पाहत होती. 



" हाय! मला वाटतेय तूमच्या लक्षात आले आहे ,मी कोण आहे ते. बरोबर ना?चला ,चांगलेच झाले हे तर.मी गेले पाच महिने तूम्हाला एकदा भेटायचं म्हणतो आहे पण तूम्ही आहात की,प्रत्येकवेळी टाळत आहात.म्हणून मगं म्हंटलं आज भेटूनचं याव तूम्हाला ."त्याने अभिवादन करण्यासाठी तिच्यासमोर हात पुढे केला. चेहर्‍यावर एक मोहक हसू होत त्याच्या. ती एकदा त्याच्या हाताकडे तर एकदा त्याच्या सुहास्यवदनाकडे बघत होती.मनात विचारांचा कल्लोळ माजलेला. 


"ह...हॅलो! "तीने सरळ सरळ त्याचा हात मिळवून अभीवादनाचा प्रस्ताव धुडकावून लावत ,दोन्ही हात जोडून नमस्कार करत ,त्याला त्याच्या हस्तांदोलनाच प्रत्युत्तर दिलं.तीची अशी प्रतिक्रिया पाहून तो हलकेच गालात हसला; आणि हाताची बोटे सरळ मागच्या रेषेत दूमडत हात पाठीमागे घेऊन मांडीवर ठेवला.पण यामध्ये, तीच्या कपाळावर पसरलेले आठ्यांचे जाळे त्याच्या नजरेतून काही सुटले नाही. 


"वेल,मगं करायचं का समुपदेशन सूरू? "उजवा पाय, डाव्या पायावर अधांतरी ठेवत तो तीचा अंदाज घेत बोलला. 


"अं...माझे समुपदेशन? "तीने जरा चाचरतच विचारले.गेल्या पाच महिन्यांपासून ज्या व्यक्तीला भेटायचे टाळत आली होती,तो व्यक्ती आज अचानक येऊन तीच्या समोरासमोर बसून, तिच्याशी एकदम शांतपणे संवाद साधत होता.तो असा कधी अनपेक्षीतपणे समोर ऊभा राहील याची पुसटशी कल्पनाही तीला आली नव्हती. रुमालाने कपाळावर जमा झालेले घर्मबिंदू पुसत, ती स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होती.


"हो,तुमचेच!"तीच्या डोळ्यांत रोखून पाहत तो म्हणाला. चेहर्‍यावरील हसू किंचितही लोप पावलेले नव्हते .तशीच प्रसन्न, हसतमुख मुद्रा कायम होती. 


" मला समजले नाही तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ; पण मला आता समूपदेशनाची आवश्यकता नाही.मी ठीक आहे."तीने स्वतःला शांत ठेवत ठामपणे सांगितले. 


"बरं! ठिक आहे. त्या विषयावर आपण नंतर बोलू.तूम्ही मला माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्याल का? "


"हं.हो बोला ना! "


"मी काही विचीत्र दिसतो का?माझी पर्सनॅलिटी सूट नाही होता का मला? " दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफत त्यावर हनुवटी टेकवून ,तो आशेने तीच्या उत्तराच्या प्रतीक्षेत ,तीच्याकडे डोळ्याची पापणी न लवता पाहत होता. आणि त्याचा असा प्रश्न ऐकून ती जास्तच गोंधळात पडली.हे महाशय असे काहीही निरर्थक प्रश्न विचारून मला नक्की काय सुचवू पाहतायत ,असे वैतागवाणे भाव तिच्या चेहर्‍यावर त्या क्षणी रेंगाळले.


" नाही.ठीक आहात! "तीने जेवढ्यास तेवढेच उत्तर दिले. 


"ठीकठाक की अप्रतीम ? "त्याने लगेच पुढचा प्रश्न विचारला.अरे, आता सांगितला ना ?हा काय प्रश्न पून्हा अजून ?आणि मूळात म्हणजे मुलांची स्तुती करताना तो अप्रतिम आहे असं कुठे ऐकण्यात नाही माझ्या.हा स्वभाव, बोलण्याची कला, घातलेले कपडे अप्रतिम आहेत असं एकवेळ म्हणू शकतो, पण अमूक अमूक मुलगा अप्रतीम आहे असं कसं ? हा तसे हँडसम ,आकर्षक या प्रकारांत मोडू शकतात हे महाशय. 


"सांगताय ना? "तीचं काहीच प्रत्युत्तर नाही म्हणून त्यानेच तीला आवाज दिला. 


" अं..हो. पण मला एक समजले नाही. तूम्ही मला असे प्रश्न का विचारत आहात? "तीने शेवटी मनात घोळणारा प्रश्न त्याला स्पष्टपणे वीचारलाचं.


"हो सांगतो. पण त्याआधी तूम्ही मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सांगा. "


" अहो ,मी असं कसं सांगणार? "तीच्या बोलण्यातील संकोच त्याला जाणवला. त्याने हलकाच एक उसासा सोडला. 


"मी तूम्हाला पाहायला आलोय, अशा अर्थाने विचारतचं नाही.इन जनरल तूम्हाला कसा वाटतो मी ते तर सांगू शकता ना ? "


"अम्म...असं एकदा पाहून कसं सांगणार म्हणजे मी तूम्हाला ठीकसं ओळखतही नाही."तीचा नकारार्थीपणा अजून कायम होता. 


" म्हणजे,अजून कितीवेळा मला पाहिल्यावर या प्रश्नाचं उत्तर मला मिळेल?म्हणजे तसं माझ्या रजेचं वगैरे पाहायला.मला फक्त शुक्रवारीच आॅफ असतो ना."तो मिश्कील आवाजात बोलला. 


"अहो म्हणजे तसं नाही.ते मी..आपलं...ते "तीच्या तोंडांतून शब्दच फुटत नाव्हते.त्याचं असं एकटक पाहण तीला अस्वस्थ करत होतं.अरे ,असे डायरेक्ट काय बोलतायतं हे महाशय.मी तर एकवेळ सुद्धा भेटायचे टाळत होते आणि हे आहे की,पून्हा भेटायचं असं ठरवून सूट्ट्या पण अॅडजेस्ट करायला निघाले.अजबच आहे बुवा! 


"मगं कसं? "त्याच्या आवाजात मिश्कीलता कायम होतीच. 


" हे पाहा, मिस्टर... "


"लग्नाआधीच मिस्टर ??? "तो मिश्कील हसत तिच्या डोळ्यांत पाहू लागला तशी ती गडबडली .


"तसे नाही हो.माझे ऐकून तर घ्या. "तीने वैतागतच हाताची बोटे कपाळावर फिरवली. 


"बोला ना. तुमचेच ऐकण्यासाठी तर आलो आहे आज इथे. "तो सरळ बसतं गुंफलेले हात ,अधांतरी डाव्या पायावर ठेवलेल्या, उजव्या पायाच्या गुडघ्याभोवती आवळत म्हणाला.


"हं बोलते.तर मला हे सांगायचं होतं मीस्टर भालेराव ,तूम्ही ज्या कारणासाठी इथे आला आहात,ती गोष्ट होणारचं नाही.मूळात मला लग्नंच करायचे नाही. माझ्याकडून आणि माझ्या आई-बाबांकडून तूम्हाला त्रास झाला त्यासाठी मी तूमची मनापासून माफी मागते. "ती शांत मूद्रेने त्याला म्हणाली. यावेळी तीने मूद्दामहून मिस्टर सोबत असलेल्या भालेराव शब्दावर जोर दिला.त्याच्याही ते लक्षात आले. 



"बरं.कारण सांगू शकाल नकाराचं. "त्याचे डोळे तीच्या डोळ्यात आरपार पाहत, तीच्या मनाचा वेध घेऊ पाहत होते. 



"सांगितलं ना आत्ताच. मला लग्न नाही करायचं."



"माझ्याशी की कोणाशीच नाही? "त्याने लगेच पुढचा प्रश्न विचारला.मला आता वाटतेय, मी हॉट सीटवर बसून कौन बनेगा करोडपती खेळतेय.एक झाले की,लगेच पूढचा प्रश्न.समोर अमिताभ बच्चन असता तर बक्षिसाची रक्कम तरी मिळाली असती. हे महाशय तर नुसते प्रश्नपत्रिकाच घेऊन आलेत वाटतं. 


"कोणाशीचं नाही!पण आई-बाबांना वाटतं मी लग्न करून सेटल व्हावं म्हणून ते माझ्यासाठी स्थळ पाहत असतात.तूम्हीही त्यामधीलच एक.मी त्यांना कितीवेळा स्पष्टपणे नको असे सांगितले पण ते ऐकतच नाहीत. "तीचा केविलवाणा स्वर. 


" मगं तूमची अशी इच्छा आहे का की, मी तूमच्या लहान बहिणीशी लग्नाची बोलणी करावी?"पहील्या प्रश्नाचे उत्तर सांगून होते न होते तोच धाडकन पुढचा प्रश्न आदळला. आणि ती पून्हा गांगारली.आई -बाबा बोललेले दिसतात तर. मगं, तरिही आज मला भेटायला यायची काय गरज? 


" हो. म्हणजे,तीचं ही नुकतंच शिक्षण पूर्ण होऊन चांगल्या नामवंत हॉस्पीटलमध्ये ती सध्या कार्यरत आहे.मी तर लग्न करणार नाही मगं तूम्ही एकदा तीचा विचार करून पाहाव असं मला वाटलं म्हणजे... "


" पण जर मला तूम्ही आवडला असाल तर ,मी त्यांना का पाहावं? "तीला वाक्य पूर्ण करूही न देता, त्याचा पुढचा प्रश्न, तीच्या उत्तराच्या प्रतीक्षेत कानावर येऊन आदळला.ती एकदमच शांत झाली. आता यावर काय बोलावं हेच तीला समजेना. 



" पण, तुम्ही एकदा तीला पाहा.ती छान दिसते माझ्यापेक्षा आणि कमावतेही उत्तम. शिवाय तुमच्या दोघांच फिल्डही एकच आहे. म्हणजे आई मला फोनवर बोलता बोलता बोलली की, तूम्ही  एम. एस.केलं आहे आणि मुंबईतीलच ख्यातनाम हॉस्पीटलमध्ये न्यूरोसर्जन म्हणून रूजू आहात. 


"तसं पाहायला गेलं तर, कितीतरी नवरा -बायकोचे फिल्ड वेगवेगळे असतात.आपण ही त्याचं पावलावर पाऊल ठेऊ, आणि तूमची बहीण नाही, तर मला तूम्ही पसंत आहात. त्यांना पाहण्याचा प्रश्नच उरत नाही. "


"अहो. पण मला लग्नंच करायचे नाही. "तीला आता हळूहळू त्याचा राग येऊ लागला होता.मला लग्न करायचे नाही आणि तूम्हाला पसंत असून काय फायदा? आणि असपणं माझा भूतकाळ ऐकून नकारचं येणार तूमचा.मगं आधी मीचं नको असं सांगितलं तर काय चूकलं.



" माझ्या मते लग्न न करण्याची दोन कारणे असतात...एक तर प्रेम किंवा मग दूसरे आईवडील.आर्थीक परिस्थिती हे कारण तर असूच शकत नाही तुमचे,बरोबर. आणि आई -वडीलांच म्हणतं असाल तर आपल्या लग्नानंतर मी त्या दोघांचीही जबाबदारी स्वीकारायला तयार आहे. "तो ठामपणे तीच्या डोळ्यांत पाहत म्हणाला.ती एकदम स्तब्ध झाली.एवढे स्पष्ट मत?


" पण माझे कारण वेगळे आहे. "


"सांगण्यासारखं नाही की घाबरलात ?"त्याने गूढ हसत तिच्यावर नजर रोखली. 


" तूमच्या अशा बोलण्याचा अर्थ काय समजायचा मी,मी.भालेराव ?"तीच्या बोलण्याचा स्वर रागीट टीपेकडे पोहोचतो आहे, हे त्याच्या लक्षात आले. 


" तुमचे ओठ आणि तुमचे डोळे विसंगत का भासत आहेत मिस.देसाई? "त्याने टेबलवर झूकत, तिच्या डोळ्यांतील भाव निरखून पाहण्याचा प्रयत्न केला आणि कदाचीत त्याला ज्याची अपेक्षा होती ते गवसलही.हलकेच त्याच्या ओठांचे कोपरे रूंदावलेले तीच्या नजरेस पडले.तशी तीने पटकन आपली नजर खाली वळवली.टेबलच्या खाली हातांच्या बोटांची चाळवाचाळव तीच्या अस्वस्थतेची जाणिव करून देत होती. 



" मी.भालेराव हा विषय इथेच थांबवला तर ठीक होईल.चार वाजून गेलेत,मला आता निघायला हवं." अप्रत्यक्षपणे, ती त्याला तिथून निघून जाण्याची सूचना करत होती.टेबलवरील रजिस्टर बंद करत, खाली पडलेला पेन उचलून पेन स्टँड मध्ये ठेवत,खूर्चीवरून उठून तीथेच बाजूला अडकवलेली पर्स घेऊन ती दरवाजाच्या दिशेने पावले टाकू लागली.तीला असे घाई घाईत जाताना बघून इंद्रजीतही तीच्या मागोमाग उठला आणि चालू लागला. 



"दोन दिवसांची सूट्टी काढून आलोय मी.मला वाटतं आपण  अजून एकदा भेटायला हवं.निदान तूमच्या नकारच कारण तरी समजाव अशी अपेक्षा.उद्या दुपारी चार वाजता -मंथरा रेस्तराँ .मी वाट पाहतोय! "असे म्हणत तो तिच्यामागून पूढे येत ,तीच्याआधी दरवाजातून बाहेर पडला.आणि ती जागीच स्तब्ध झाली. 


#######################

इस मोड से जाते है 
कुछ सुस्त कदम रस्ते 
कुछ तेज कदम राहें ,पत्थर की हवेली कों ,
शीशे के घरोंदे मे, तिनको के निशेमन तक ,
इस मोड से जाते है
कुछ सुस्त कदम रस्ते... 

    
       सायंकाळी  नेहमीप्रमाणेच, अलेक्सावर गाण्यांची फर्माईश करत ती आरामखुर्चीत रेलून बसलेली.हातातील चहाचा कप एव्हाना सुकून गेलेला.आणि ,अहो आश्चर्य म्हणजे आज तीच्या डोळ्यांत आसवांची रेलचेल नसून चिकित्सक भाव डोकावत होते.


" तुमचे ओठ आणि तुमचे डोळे विसंगत का भासत आहेत मिस.देसाई? "

    दुपारी तो बोललेला, वाक्य न वाक्य तीच्या डोक्यात रुंजी घालत होते.

  ती पटकन आरामखुर्चीतून पूढे होत ऊभी राहीली; आणि पटपट चालतच तिच्या रुममधील मोठाल्या आरश्यासमोर जाऊन ऊभी राहीली.नजर समोर आरशावर रोखून ती स्वतःलाच निरखून पाहत होती. 


"खरचं! माझे डोळे बोलके आहेत का? "तीने मनातचं स्वतःला प्रश्न विचारला.सोबतचं डोळ्यांवर आच्छादलेल्या  नाजूक पापण्यांची उघडझाप थोडावेळ रोखून धरत, तीने आपल्या डोळ्यांवर लक्ष केंद्रित केल.

   
  समजले असतील का माझ्या मनातील भाव त्यांना? मी पुरेपूर माझ्या भावनांना आवर घालण्याचा प्रयत्न केला होता.अगदी रूक्षपणाचा आव आणून मी बोलत होते, तरीही ते असे का म्हणाले? ती विचार करत करतच हळूहळू एक एक पाऊल पाठीमागे जात बेडवर बसली.तीला तीन महिन्यांपूर्वीच तो दिवस आठवला.



   जिल्हयातील एका गावात नुकत्याच नव्याने बांधलेल्या ग्रामपंचायतीची पाहणी करायची होती.म्हणून चार तास प्रवास  -दोन तास जायचे, दोन तास परतायचे, पून्हा तीथे थोडावेळ  आदर सत्कार ,या सगळ्यात तीला घरी पोहोचायला संध्याकाळ होऊन गेली.रात्रीचे दहा वाजता सगळं आवरून ती रुममध्ये झोपायला गेली.आज चहासोबत अलेक्सावरील गाण्यांच्या मैफलीला ही आराम मिळाला होता.बेडवर पडल्या पडल्या तीला जरा हायसं वाटलं. नाहीतर पाच -सहा दिवस ती कामातचं जूंपलेली. आणि भर म्हणजे आजची व्हिजिट .जीव अगदी थकून गेला होता.फोनही बघायला उसंत भेटला नाही आज तीला. दुसर्‍या दिवशी साप्ताहिक सुट्टीचा दिवस असल्यामूळे जरा मनाला दिलासा भेटलेला.पण रोजच्याप्रमाणेच झोपेची काही चिन्ह दिसत नव्हती.हात थोडासा लांबवत शेजारीच बेडवर उपडा पडलेला फोन सरळ करत तीने हातात घेतला.
  

    एरवी तीचा आणि सोशल मीडीयाचा दूर दूर संबध नसायचा.व्हॉट्सअॅप तेवढे होते फोनमध्ये.पण ते ही कोपर्‍यात धूळ खात पडलेल्या अडगळी प्रमाणे कित्येक दिवस दूर्लक्षीत झालेले.मनात काय आले कोणास ठाऊक? नकळत तीची बोटे व्हॉट्सअॅपच्या लोगोवर जाऊन स्थिरावली.स्क्रीन ओपन झाली.आलेल्या मॅसेजेसची तर गणतीच अशक्य होती.झोपेची वाट बघतं, हळूहळू एका एका प्रोफाईलवर टच करत मेसेजेस डोळ्यांखालून घालत होती.बाबांचं प्रोफाइल वर आला तसे ,त्यावर जाऊन तीने टॅप केलं.दोन कसल्यातरी डाऊनलोड न केलेल्या इमेजेस दिसत होत्या.पाहू की नको ?असा विचार करतचं अलगदपणे तीने ते फोटो डाऊनलोड केले.पहीला फोटो झूम करून पाहिला तर त्यामध्ये एका मुलाचा फोटो होता.तीने ते पाठवलेल्याची तारीख बघीतली तर दोन महीन्यांपूर्वीची.म्हणजे आजकाल घरून येणाऱ्या फोनवर ,ज्या स्थळाबद्दल भरभरून बोलले जाते ,ते हेच असावे.काय बर नावं ते -हां इंद्रजीत का काही असेच काहीतरी .तीने मनातच अंदाज बांधला.एक क्षण वाटले बंद करून बाजूला ठेऊन द्यावा फोन.पण पून्हा एकदा तो फोटो पाहायचा मोह काही आवरेना.तीच्याच नकळत तीने पुन्हा तो फोटो झूम केला आणि डोळ्यांची पापणीही न लवता त्या फोटोमधील त्याच्याकडे पाहू लागली.खरचं अगदी पहील्या नजरेतच मनात भरेल असा होता तो.कितीतरी वेळ ती त्या फोटोकडेच नजर लावून बसलेली. पण क्षणात तीला वास्तवाची जाणीव झाली.तीने पटकन फोन बंद करून बाजूला ठेऊन दिला.

   
   नाही! हे शक्य नाही! कधीच शक्य नाही.जे कधी सत्यातचं उतरणार नाही ते स्वप्न पाहण्यात काहीच अर्थ नाही.आणि मला काहीच अधिकार नाही आता स्वप्न पाहण्याचा जी कधीच पूर्णत्वास येणार नाहीत.हो !नाही करु शकत मी अशा कामना ज्या माझ्या नशीबात रेखाटलेल्याच नाहीत. मी स्वतःच माझ्या हाताने ते दरवाजे कायमचे बंद केले आहेत.

   मीरा !वेळीच सावर स्वतःला.आयूष्य पून्हा पून्हा नवीन संधी देत नाही. 

    डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा, बोटांनी हलकेच टिपून घेत, लाईटचे बटन बंद करून अंधार करत ,अश्रूधारी डोळ्यांच्या पापण्या मिटत, ती झोपेची वाट पाहू लागली. 

     
      तो दिवस तिच्या डोळ्यासमोरून क्षणात तरळून गेला.त्या दिवसानंतर तीने अजीबात त्या फोटोकडे ढुंकूनही पाहिले नाही.
   
     नाही मला हक्क आता इतर मुलींसारखे संसारूपी बंधनात अडकून आयुष्य जगण्याचा.आजची ही अनपेक्षीत भेट पहीली आणि शेवटचीसूद्धा.नाही जायचे त्या वळणावर मला.तीथे फक्त उपेक्षा आणि यातनाच माझ्या वाट्याला येणार आहेत.


    पण, तिकडे हॉटेल मृगनयनी मधील डिलक्स रूमच्या, बंद दरवाजाआड त्या मखमली, मुलायम गादीवर पाठीच्या आधाराने, डोक्याखाली हातांची उशी करून पहुडलेल्या इंद्रजीतला ठाम विश्वास होता," ती उद्या येणार.नक्कीच येणार! माझे डोळे,मला कधीच दगा देणार नाहीत. "ओठांची कमान रुंदावत,तीचा चेहरा डोळ्यासमोर आणून, पापण्यांना खाली झूकवत त्याने आपले डोळे मिटले. 

क्रमशः 















     

बाबाआआआ!!! "मोठ्याने किंचाळतचं,ती झोपेतून जागी झाली.अंगातून घाम निथळत होता. हातपाय थरथरत होते.डोळ्यांची बूबूळ बाहेर पडतील एवढी मोठी झालेली.केस अस्ताव्यस्तपणे विस्कटून चेहर्‍यावर आलेले. जरा स्थिर झाल्यावर हात लांबवत टेबलवर असलेले मनगटी घड्याळ तीने हाताने स्वतःजवळ ओढून घेत त्यावर नजर टाकली.रात्रीचा एक वाजलेला. दीर्घ श्वास घेत ,तीने स्वतःला नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला; आणि बेडवरून खाली उतरत लाईटचे स्वीच आॅन केले.टेबलवर रात्री झोपताना भरून ठेवलेल्या पाण्याच्या जारवर नजर गेली, तर तो एव्हाना रिकामा झालेला दिसत होता. तशीच कशीबशी पाय ओढत तो जार घेऊन किचनमधे गेली.अॅक्वा चे पाणी, ग्लासमध्ये भरून घेत गटगटा पीत होती. निम्मे तोंडात तर निम्मे कपड्यांवर सांडत होते.ग्लासमधील पाणी संपल तसं जार भरून घेत ती रूममध्ये आली.जार तसाच टेबलवर ठेऊन गॅलरीचे पडदे बाजूला सारत तिथेच भिंतीला टेकून आकाशात दूरवर नजर टाकत विचारांत गुंतून गेली. 



      "आज पुन्हा तेच स्वप्न! कधी पाठ सोडणार आहे माझा भूतकाळ? की कायम असचं मला त्यामध्येच गुरफटून जगाव लागणार आहे?सगळं काही हिरावून घेतलं माझ्या एका चूकीने.हे धन, दौलत, पैसा काय करू यांच मी?सूख नाही ना विकत घेता येत याच्यातून.गडगंज संपत्ती असूनही मानसिक समाधान नाही.किती विचीत्र आयुष्य आहे माझं.आता माझ्याजवळ सगळं सगळं आहे ; पण ज्यांच्यासोबत तो आनंद वाटायचा होता ,ती माझी माणसचं माझ्यासोबत नाहीत.काय काय घडून गेलं नाही या पाच -सहा वर्षांत.बाबांनी आणि बहिणीने तर बोलणचं सोडून दिलेलं.आता दोन महिन्यांपासून कुठे थोडेफार बोलायला लागले होते तिच्याशी.ते ही मोजकचं.नेहमी खंबीर असणारे बाबा अंथरुणाला खिळले होते.आता सहा महिन्यांत कुठे त्यांच्यात थोडीफार प्रगती जाणवत होती.काठीचा आधार घेऊन चालायला, बोलायला लागले होते.आईची ही हॉस्पिटलवारी सूरू झालेली.बहीण आत्ता कुठे तीच्याशी मनमोकळी बोलायला लागलेली,नाहीतर नेहमी तोंड वेंगाडून निघून जायची तीच्यासमोरून.आणि ती?ती जगत तर होती ;पण त्या मध्ये सजीवपणाचा काडीमात्र लवलेश नाही.पूर्वी मध्यम बांध्याची असणारी ती ,आता कृषपणाच्या विळख्यात अडकलेली. चेहर्‍यावर नकली हास्य तर असायचं ;पण तजेला मात्र कधी दिसायचा नाही.पूर्वी वेगवेगळ्या प्रकारे केशरचना करून बांधलेले केस, आता फक्त एका सागरवेणीत गुंफले जायचे. सरळसोट कपाळावर आता फक्त एक नाजुकशी खड्यांची टीकली चिकटली होती.मूळतःच फिकट गुलाबी छटा असणार्‍या ओठांवर ,आता लीपस्टीकचे आवरण पाहायला मिळायचे नाही.कानात ही फक्त साधी मोत्याची फूले घातलेली. तीशीच्या उंबरठ्यावर आलेली ती अकाली प्रौढत्व आल्याची प्रचीती करून द्यायची. 


       अंगाला गार वारा झोंबू लागला तसे पडदे एकमेकांजवळ ओढून घेत ती आतमध्ये येऊन बेडवर पडली.लाईट बंद करायचे कष्टही तीने घेतले नाहीत.पाठ जरी गादीवर टेकली असली तरी डोळ्यांवरील झोपेचा अंमल नाहीसा झालेला.डोळे सताड उघडे ठेऊन पून्हा त्या वेदनादायक आठवणींची उजळणी चालू होती डोळ्यांसमोर चित्रफितीप्रमाणे.पहाटे चार -साडेचारच्या सुमारास केव्हातरी डोळा लागला तीचा. 



#####################


मलमली तारूण्य माझे , तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसांत माझ्या, तू जीवाला गुंतवावे 

लागुनी थंडी गुलाबी , शिरशिरी यावी अशी ही 
राजसा माझ्यात तू, अन् मी तुझ्यामाजी भिनावे

तापल्या माझ्या तनूची , तार झंकारून जावी 
रेशमी संगीत स्पर्शाचे , पून्हा तू पेटवावे

रे तुला बाहूँत माझ्या , रुपगंधा जाग यावी 
मी तूला जागे करावे , तू मला बिलगून जावे. 


          
       तेव्हा, जर वेळीच आवर घातला असता स्वतःच्या मनाला तर कदाचीत,हे गाण्याचे बोल मला चिरकाल अनुभवायला मिळाले असते.मनात विवंचना घोळत, नेहमीप्रमाणे अश्रूंचा मारा होत होता गालांवर. चुरगळून मिटलेल्या पापण्या आज ही अश्रूंना थोपवण्यास असमर्थ होत्या. गुलाबी गालावरून ओघळणारे अश्रूंचे टपोरे थेंब तीच्या थरथरत्या ओठांशी हितगूज साधत होते. हातामध्ये पकडलेला चहाचा रिकामा कप निसटून केव्हाही खाली पडण्याच्या बेतातच होता;आणि ती शांत, निश्चलपणे बाहेर गॅलरीमध्ये असलेल्या आरामखुर्चीत पाठीमागे रेलून बसलेली.


      
      ती, "समीरा देसाई " नूकतीच दोन वर्षांपूर्वी संघ लोक सेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा (Upsc)उत्तीर्ण होऊन जिल्हाधिकारी पदी निवड झालेली.सहा महिन्यांच्या प्रशिक्षणाचा (ट्रेनिंग) कालावधी पूर्ण करून पूणे  जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी तीची नियुक्ती करण्यात आली होती.मध्यमवर्गीय असं चौघांच कुटुंब -आई ,बाबा , एक लहान बहीण आणि ती.वडील रिटायर्ड पेन्शधारी शिक्षक तर आई गृहिणी.बहीण तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान.तीचेही नुकतेच शिक्षण पूर्ण होऊन एका शासकीय रुग्णालयात एम. बी. बी. एस. डॉक्टर म्हणून कार्यरत आहे.क्लास वन आॅफीसर म्हणून निवड झाल्यामुळे, कामाच्या ठिकाणीच मिळालेल्या सरकारी बंगल्यात ती एकटी राहत होती.आई -वडील गावी आणि बहीण पुण्यातीलच एका नामांकीत रूग्णालयात लागल्यामुळे ती ही तिकडेच स्थायीक झालेली.एकटीच असल्यामूळे घर नेहमी खायला उठायचं. तसं तीच रोजचं रूटीन ठरलेलं.सकाळी पाच वाजता गजर वाजला की उठायचं.ट्रॅक सूट घालून दोन किलोमीटर धावांयचं, परत माघारी घरी येऊन थोडसं वॉर्मअप आणि व्यायाम करून अंघोळीला जायचं.अंघोळ झाली की ,पहीला आल्याचा कडक चहा बनवून सकाळीच दरवाज्याच्या फटीतून आत येऊन पडलेलं वर्तमानपत्र वाचत बसायचं.नंतर किचनमध्ये जाऊन नाष्टा, जेवण बनवून आवरायला घ्यायचं; आणि नाष्टा करून टिफीन गाडीमध्ये ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयकडे सुसाट धावत सुटायचं.तीथे दिवसभर कामकाज पाहून घरी आले की,फ्रेश होऊन निवांत गॅलरीत बसून अलेक्सावर गाण्यांची फर्माईश करत चहाचा आस्वाद घ्यायचा.कपातील चहा संपला तरी डोळ्यांतील पाणी काही थांबायचं नाही. मग डोळ्यांतील आसवांचा भर ओसरला की खुर्चीवरून ऊठून आतमध्ये जावून आई -बाबा आणि बहिणीशी फोनवर बोलायचं-ते ही मोजकचं. आणि जे काही जेवण बनवले असेल ते पोटात ढकलून शतपावली करून लाईट बंद करून झोपी जायचं. दुसर्‍या दिवशीही तेच ठरलेलं रूटीन . 



       संध्याकाळचे आठ वाजून गेलेले.अश्रूंचा भर ओसरला, तसे हातामधून निसटत आलेला कप घट्ट पकडत ती खुर्चीवरून उठली;आणि गॅलरीचे पडदे ओढून घेत  आतमध्ये आली.एव्हाना थंड होऊन गेलेले जेवण मायक्रोवेव्ह ला लावत तीने फोनवर नजर टाकली ;आणि तशीच हातांची घडी घालत किचनकट्टयाला रेलून ऊभी राहीली.रोज जेवणाच्या आधी येणारा आई -बाबांचा फोन आज आठ वाजून गेले तरी आला नव्हता.बहिणीशी आल्या आल्याच बोलणे झाले होते.एका पेशंटची, हृदय प्रत्यरोपण शस्त्रक्रिया असल्यामूळे लवकरच फोन करून तीने समीराशी आणि आई -बाबांशी बोलून घेतलं.सर्जरी खूप वेळ चालणार होती म्हणे. मायक्रोव्हेव चा आवाज झाला तशी ती किचनकट्टया पासून दूर झाली ;आणि मायक्रोवेव्ह मधून गरम झालेले जेवण बाहेर काढत डायनिंग टेबलवर नेऊन मांडले.खुर्ची पाठीमागे ओढून,खुर्चीवर बसत ताट वाढून घेऊ लागली.फोन सायलेंट तर नाही ना, म्हणून अजून एकदा फोनवर नजर टाकली पण फोन आॅनच होता.शेवटी तिनेच फोन करायचे ठरवले आणि तेवढ्यातच तीच्या हातातील फोन खणाणला.बाबांचाच होता.



" हॅलो...मीरा! "फोन उचलून कानाला लावला तसा , पलीकडून आईचा आवाज कानात शिरला.


" हां बोल आई!बरे आहात ना तूम्ही दोघे? "हे विचारताना तीचा आवाज किंचीत हळवा झालेला.हे विचारण्याचा हक्क मला आहे का? कारण मीच तर... तीच्या मनात विचार येऊन गेला. 


" हो!अगदी ठणठणीत आहोत आम्ही दोघे.आणि अशी का विचारतेस गं आज ?आवाज वेगळा जाणवतोय तूझा. "आईचा काळजीयूक्त स्वर आणि तीचं मन पून्हा हेलावलं. एवढं होऊनसुद्धा माझी काळजी ???



" अगं सहजच विचारलं.आज उशीर झाला ना तूला फोन करायला. "डोळ्यांतलं पाणी परतवत आवाज पूर्ववत करत तीचा बोलण्याचा प्रयत्न चालू होता आणि काहीअंशी ते तीला जमलं ही होतं.आणि अस ही आता सवय झाली होती तीला या सगळ्याची. 



"हो उशीरच झाला जरा आज.जेवलीस का तू बाळा? "



" हे काय आत्ताच बसत होते बघं जेवायला.तूमचं झालं का जेवण आणि बाबा कुठे आहेत? "तीने वाढून घेतलेलं ताट समोर ओढलं.बाबांबद्दल विचारताना कायम मनात एक धाकधूक असायची.


" नाही अजून.आम्हीपण जेवणारचं होतो आता.म्हंटलं तूला आधी फोन करून घ्यावा.बाबा आहेत इथेच ,बातम्या बघत बसलेत टीव्हीसमोर. "


"बरं! बाकी ठिक आहे ना सर्व?औषध वेळेवर घेता ना दोघे ? ऊद्या रूटीन चेकअपसाठी जायचं आहे लक्षात आहे ना?समीर दादानां सांगितलं आहे ते तूम्हाला घेऊन जातील वेळेवर.तीथे गेल्यावर सर्व व्यवस्थीत सांगा डॉक्टर विचारतील ते ;आणि काही ही लपवू नका अगदी छोट्यातलं छोटं दूखणं ही. "ती न थांबता एकामागोमाग एक सूचना देत होती.आणि स्पिकर आॅन केलेल्या फोनवरून तीच्या सूचना ऐकून आई -बाबा दोघांच्याही चेहर्‍यावर समाधानानं हसू तरळलं पण त्यालाही दुःखाची किनार होतीच. 


" हो गं.आम्ही घेतो काळजी आणि जातो उद्या समीर बरोबर चेकअपसाठी .तू स्वतःची काळजी घे. एकटीच असतेस तीथे.बदली करून इकडे ये म्हंटल तर... "


" आईइइइ "आईला मध्येच अडवत ती बोलली. 


" मीरा...अगं विसरून जा ते;आणि ये बाळा परत इकडे ."आईचा आवाज ही आता भरलेला.भूतकाळातल्या आठवणी होत्याच तशा त्रासदायक .


" आई...आपल्या हातामध्ये नसतं ते.आणि मला खरचं इच्छा नाही पून्हा तीकडे यायची. उलट तूम्हीच या इकडे माझ्याजवळ राहायला म्हणजे मी निश्चिंत राहीन "तीला ही भरून आले होते.पापण्या ही थोड्याफार ओलावलेल्या. कितीही नाही म्हंटल तरी काही आठवणी कधीच विसरता येत नाही. आणि कटू तर नाहीच नाही.अशक्यप्राय!!! 


" बरं तूझी इच्छा.तूझ्या बाबांना नाही पडू वाटतं इथून बाहेर.लहानपणापासून या गावाशी, इथल्या मातीशी नाळ जोडलेली.नाही पाय निघतं इथून असं म्हणतात.आणि मला ही गावीच मोकळ्या वातावरणात बरं वाटतं.तीथे शहरात दिवसभर कोंडून रहायचं नाही बाई जमायचं आम्हाला."आईचं बोलणं ऐकून ती मनातल्या मनातचं केविलवाणी हसली.एवढं होऊनही गाव सोडावसं वाटतं नाही.खरचं कशाचे बनलेत आपले आई -वडील...खूप काही घडून गेलं, खूप सारं सोसलंही.ज्या लोकांनी आपलं असल्याची जाणीव करून दिलेली ,त्यांनी क्षणात परकही केलेलं.तरीही अजून तिथेच रहायचं???


" बरं मी फोर्स करणार नाही. पण जेव्हा तूम्हाला इकडे यावं असं वाटेल तेव्हा लगोलग निघून.मी नेहमीचं तूमची वाट पाहत असते.एकटीला नकोस होतं इथे अगदी. "तीने बोलता बोलताच घराच्या भिंतींवर नजर फिरवली.जणू  स्वखूशीने तुरूंगात बंदिस्त करून घेतलेल्या कैद्यासमान ती स्वतःला तोलत होती यावेळी.


"मीरा, मगं ऐक ना बाळा आमचं.नको राहूस एकटी आता.सोपं नाही गं आयुष्यभर एकट्याने राहणं.लग्न करून..."समीराच्या आईची आर्तता त्यांच्या प्रत्येक शब्दातून जाणवत होती. 


"आई, नको तो विषय!"समीरा आईला पूढे बोलू न देता मध्येच बोलली. 


" अगं,अशी काय करतेस बाळा.कितीदिवस अशी एकटीच राहणार आहेस?आत्ता नाही पण उतरत्या वयात जोडीदाराची गरज भासते.तेव्हा फक्त एकटेपणा नाही पुरत बाळा. "


"आई, तूम्ही दोघे आहात तेवढं बास आहात मला.तू आणि बाबाचं आहात, जे काही आहात ते माझं.नको दुसरं कोणी मला.तूम्हीच पूरे माझ्यासाठी. "समीरा एक दीर्घ श्वास घेत म्हणाली .खूप पूढे आले मी आता. नाही राहीला रस मला त्या लग्नरूपी बंधनात.आणि असंही भूतकाळाचे पडसाद पाठ सोडणार आहेत का माझी भविष्यात?नाहीचं ना! मगं  कशासाठी हा लग्नाचा अट्टाहास? मनातल्या मनात स्वतःलाच प्रश्न विचारतं होती ती.


"तसं नसतं गं मीरा.आम्ही किती दिवस पुरणार आहोत तूला? पिकल पान -एकदिवस गळणारचं.मी आणि बाबा सांगतोय ते ऐक.लग्न करून निवांत आयुष्य जगं. का त्या जून्या आठवणींतच घूटमळतेस अजून?सोडून दे ते आता. धरून ठेवण्यात काहीचं अर्थ नाही. नव्याने सुरूवात कर आयुष्याची. "


"आई, का समजतं नाही तूला?एवढं सोप नाही गं विसरणं आणि एवढं सगळं होऊन पण तूम्ही माझ्या लग्नाची आणि सुखी संसाराची स्वप्न का पाहत आहात? कधीच शक्य नाही ते. जे कधी सत्यात उतरणारच नाही अशी स्वप्न पाहावी तरी का माणसाने? "बोलताना समीराचा आवाज घोगरा झालेला.आतून खूप काही दाटून आलेलं.अश्रूंचा बांध केव्हाही फूटेल आणि गालावरून वाहू लागेल अशी अवस्था झालेली पण तरीही ती खूप जिद्दी होती.तीच्या पापण्यांना, तीने अश्रूंना थोपवून ठेवण्याच कौशल्य अगदी पुरेपूर शिकवलेलं.तीच्या मर्जीशिवाय डोळ्यांतून बाहेर पडण्यास आसवांना बंदी होती.


"अहो, हे घ्या तूम्हीचं बोला!माझं काही ऐकत नाही ती."समीराच्या आईने शेजारीच सोफ्यावर बसलेल्या समीराच्या बाबांजवळ फोन दिला. 


"मीरा,मी बोलतोय. ऐकतेयस ना? "बाबांचा आवाज आला तशी ती खुर्चीवर सावरून बसली आणि फोन घट्ट पकडला.हात थरथरत होते.घशाला कोरड पडलेली.सहा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बाबा एवढे मोठे ,सलग वाक्य बोलले होते फोनवर. 


"हो बाबा, ऐकतेय.बोला ना! "तीचा हळुवार आवाज फोनमध्ये घुमला.बाबांनाही तीचा आवाज ऐकून हायसं वाटलं. नाहीतर एरवी या तीन वर्षात बाबांशी बोलायचं त्यांच्या समोर यायचं टाळलंच होतं तीने.बोलली तरी फक्त एक दोन वाक्य नाहीतर नाहीचं. आईशीचं काय ते बोलणं आणि बाबांची विचारपूस.चूकचं एवढी मोठी होती की, बाबांसमोर ऊभ राहायची ही पात्रता नाही असं वाटायचं तीला.कदाचीत आपल्यामुळे पून्हा त्यांना काही झालं तर??? नाही पाहू शकणार मी. विचारही करवत नाही. 


"कशी आहेस?ठिक चालू आहे ना तीकडे सर्व तुझे?व्यवस्थीत जमतेय ना तूला तीथलं सगळं कामकाज हँडल करायला? "बाबांचा असा मवाळ वाक्यसंभार ऐकून तीला गलबलून आले. आधीच ती अश्रू डोळ्यांतच थोपवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होती आणि बाबांचं बोलण कानावर पडताच तीला अश्रू रोखणं अवघडं वाटू लागलेलं.तब्बल सहा वर्षांनी ती बाबांचा असा विचारपूस करणारा, काळजीयूक्त आवाज ऐकत होती.नाहीतर एरवी धीरगंभीर आवाज आणि हो नाही एवढेच शब्द तीच्या वाट्याला यायचे.सुवर्णक्षण होता तो तिच्यासाठी आणि या क्षणी अश्रूंनी डोळ्यांची कवाडे ओलांडले नाहीत म्हणजे आश्चर्यचं.शेवटी फुटलाच अश्रूंचा बांध.केली त्यांनी आपली वाट मोकळी एकदाची.


"सॉरी बाबा!! सॉरी! चूकले मी! "हमसून हमसून रडत फक्त एवढेच शब्द तीच्या ओठांतून बाहेर पडत होते.इकडे आईनेही आपल्या डोळ्यांना पदर लावलेला.बाबांनी कितीही स्थितप्रज्ञ राहण्याचा प्रयत्न केला तरी, काही चुकार थेंब तरळलेच त्यांच्या डोळ्यांत.



"असू दे .जे झाले ते झाले ; पण आता पूढे जायला हवं.तूमच्या दोघींची लग्न डोळ्यासमोर लावून दिली की, मी जायला मोकळा. "बाबा हलकेच हसत म्हणाले. 


"बाबाआआआ...प्लीज् !असं नका बोलू. "बाबांचं बोलण ऐकून समीराच्या काळजात धस्स झालं.आई आणि बाबांची अशी निर्वाणीची भाषा तीच्या काळजात रुतत होती.आई-बाबांवीणा पूढचं आयुष्य जगण्याची कल्पनाही करवत नव्हती तीच्याच्याने. 


"खरं तेच बोलतोय मी मीरा.एक ना एकदिवस या जगाचा निरोप घ्यावाच लागणार. मनूष्यजन्म आहे शेवटी हा-जसा जन्म हे विधिलिखित आहे तसा मृत्यू ही येणारचं.फक्त तूमच्या दोघींच सुखी आयुष्य या डोळ्यांनी बघीतलं की आम्ही निश्चिंत झोप घेऊ दोघे.आपल्या हातात फक्त जीवन जगण असतं. जन्म आणि मृत्युची सुत्रे तर विधात्याच्या हातात.आपण फक्त श्वास घेत राहायचे. "ती शांतपणे बाबांच बोलणं ऐकत होती.खूप दिवसांनी बाबा असं काहितरी सांगत होते,शिकवण देत होते.आपण खूप मोठी चूक केली आणि या सगळ्याला मुकलो याची तीला पदोपदी जाणीव होतं होती.जर भूतकाळ बदलता आला असता तर किती बरं झालं असतं असा पोरकट विचारही तीच्या मनात येऊन गेला.मानवी मन -काल्पनीक गोष्टींचा विचार करणे त्यांच कामचं!


" काय हरकत आहे आता लग्न करायला मीरा?सगळ्या गोष्टी वेळीच झालेल्या चांगल्या.तीशी आली तूझी.मिनूचंही लग्नाच वयं उलटायला लागलं आता."बाबांच्या प्रत्येक शब्दागणीक आतून हुंदके दाटून येत होते.कोठून आणलं असेल एवढं मोठेपण?


"ती ही तू करत नाही तोपर्यंत नाही करणार असं म्हणते.अवघडं होऊन बसलयं सगळं "समीराची आई पाठीमागून बोलली. 



"आई, मी आधीच म्हणालेय ,तीचं बघा तुम्ही.चांगलं एखाद स्थळ असेल तर करून द्या तीचं लग्न. माझ्यासाठी नका थांबू उगीच.मला खरचं नाही करायचं लग्न.मी एकटी ठीक आहे ;आणि अस ही जे काही झालं आहे पुर्वी, ते ऐकून तर कोणीच तयार होणार नाही. माझ्यामुळे मिनूची फरपट नको बाबा.तूम्ही स्थळ पाहायला सुरुवात करा तिच्यासाठी. "


"अगं पण, किती दिवस तिथेच अडकून राहणार आहेस?पाठिमागे तुझ्यासाठी सांगून आलेल्या स्थळाचा काल पाचव्यांदा फोन येऊन गेला.मीरा,त्यांना एकदा तू भेटावसं असं मला वाटतं.सर्वच चांगलं आहे त्या स्थळाचं- मुलगा ही वेल सेटल्ड.वय ही जास्त नाही,तूझ्याच वयाचा. घरचेही सुशिक्षीत.छान कुटुंब आहे अगदी "बाबा आज खरचं मनापासून बोलत होते तीच्याशी.



" बाबा,तूम्हाला अजूनही वाटतयं का माझा भूतकाळ ऐकून ते लग्नाला तयार होतील?का नाही सांगत तूम्ही आधी घडून गेलेलं सर्व येणाऱ्या स्थळांना?आणि खरचं जर चांगल असेल तर मिनु तयार असेल तर तिच्यासाठी पाहा त्यांना सांगून.मिनू आवडेल त्यांना आणि काही अडचणही येणार नाही पूढे. "


"मीरा, काय हरकत आहे एकदा विचार करायला?तूमच्या दोघींच चांगल व्हावं म्हणून तर करतोय ना आम्ही एवढे प्रयत्न.घे ना भेटून एकदा आणि त्यांना मीनूला नाही, तूझा फोटो पाहून तूला पंसत केलं आहे बाळा.तू आवडली असताना मिनूला दाखवणं बरोबरं नाही वाटतं. "



"पण आई ,तूम्ही सर्व माझ्या चांगल्यासाठी, माझ्या काळजीपोटी जरी करत आहात, तरी माझा भूतकाळ लपवून ठेवून लग्नासाठी उभ राहणं मला अजीबात पटत नाही. शुद्ध फसवणूक झाली ही त्यांची आई.नाही जमणार मला हे.प्लीज् !!!तुम्ही मीनूसाठी स्थळं बघा.माझा विचार सोडून द्या."



"अगं तुझ्याच तर मनासारखं करत होतो ना आधी;पण काय झालं माहीत आहे ना तूला बाळा?आधी लग्नाला तयार असायचे पाहुणे;आणि नंतर ते सर्व सांगितलं की शांतपणे निघून जायचे काहीच न बोलता.नंतर काहीचं उत्तर यायचं नाही.म्हणजे नकारच ना!ती गोष्ट न सांगता जर तुझं चांगल होत असेल तर काय हरकत आहे?"



" आई, प्लीज!!! पून्हा हा विषय माझ्यासमोर नका काढू. तुम्ही दोघे पुरे आहात माझ्यासाठी.बासं आहे तेवढचं मला. मी नाही अपेक्षा करत आता कशाची.जे आयुष्य मिळालं आहे त्यात सुखी आहे मी. नको तो वीषय आता. "तीने रडत रडतच फोन कट करून टेबलवर ठेवला.तीकडे आई-बाबाही काळजीत पडले.कसं होणार पूढे?दोघांच्याही डोळ्यांत काळजी स्पष्टपणे जाणवत होती.


#######################



    आज रविवार.कार्यालयात फार काही काम नव्हते .ना ही कोणत्या ठिकाणी व्हिजीट होती.सकाळी अकरापर्यंत कामे आटोपून समीरा कार्यालयातून बाहेर पडली. कपाळावर आडवा हात धरत तीने वर आभाळाकडे नजर टाकली.सूर्य हळूहळू डोके वर काढू लागलेला. ऊन्हाची झळाळी एव्हाना अंगावर जाणवायला लागलेली. हात खाली घेत ती आपल्या गाडीच्या जवळ जाऊ लागली.तीथून पंधरा मिनिटांवरच तीचा सरकारी बंगला होता ;पण गाडी तीकडे न घेता त्याच्या विरूद्ध बाजूच्या रस्त्यावर घ्यायला सांगून तिने पाठीमागे सीटवर डोकं टेकवलं.रवीवारी जेव्हा निवांत वेळ भेटायचा तेव्हा ती जवळच्याच समुपदेशन केंद्रात जाऊन बसायची.त्या एका गोष्टीमुळेच उतरती कळा लागलेल्या आयुष्याला योग्य दिशा मिळाली होती.अर्ध्या तासाभरानंतर ती तीथे पोहोचली. तीच्या मार्गदर्शक आणि त्या समुपदेशन केंद्राच्या सर्वेसर्वा "मधुमालती जोशी "यांची भेट घेऊन ती आपल्या कक्षात जाऊन खुर्चीवर बसली.हो !ती जेव्हा बरी होऊन तीथून बाहेर पडली, तेव्हा तीला वाटलं की, असे कितीतरी लोक असतील जे नकळत्या वयात,अनावधानाने किंवा वाहवत जाऊन चूकीच पाऊल उचलतात आणि नंतर योग्य दिशा, मार्गदर्शन न भेटल्यामूळे आपल्या आयुष्याची राखरांगोळी करून घेतात.किंवा मग आत्महत्येचा पर्याय अवलंबतात.निदान आपण त्यांना नवीन आयुष्य जगण्यासाठी मार्ग दाखवू शकलो तर हा विचार करूनच ती रिकाम्या वेळेत तीथे येऊन अशा लोकांना जगण्याची उमेद देत होती.



" अम्म, आत येऊ का? "ती नेहमीप्रमाणेच तीच्या विचारांत गढलेली असताना दरवाजातून एक पुरूषी आवाज कानावर पडला.तीने तत्काळ मान उंचावून वर पाहिले.सहा फूट उंची,भारदस्त शरीरयष्टी,अंगावर फॉर्मल ड्रेस परिधान केलेला-व्हाईट कलरचा फूल स्लीव्हज् शर्ट आणि खाली ब्लॅक पँट,गहूवर्णीय चेहर्‍यावर विद्वत्तेचे तेज.पायात काळ्या कलरचे लेदरचे बूट ,एक हात पॅन्टच्या खिशात घालून, तो तिच्याकडे पाहत दरवाजात ऊभा होता.



" हो. या ना! "तीने पटकन त्याच्यावरची नजर वळवत खाली बघतले,आणि हातात असणारी कागदपत्रे चाळू लागली. 


"अरे उभे का?इथे समोर बसा! "तो अजूनही उभाच आहे, हे डोळ्यांच्या कोपर्‍यातूनच तिला जाणवलं तसं, तीने त्याला समोरच्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली.तो ही खुर्ची थोडीशी मागे ओढून घेत त्यावर जाऊन ताठपणे तिच्यासमोर बसला.तीची नजर आता दरवाजावर टिकून राहीलेली.सोबत कोणी आले नाही का? शक्यतो समुपदेशन करतेवेळी कोणीतरी सोबत येतेच.हा विचार तीच्या मनात येऊन गेला.पण लगेच ते विचार झटकून तीने त्याच्याकडे पाहीलं.तो ही तीलाच पाहत, तीच्या चेहर्‍यावरील हावभावांच निरीक्षण करत होता.


" हं ,तूम्ही एकटेच आहात का? आय मीन तुम्हालाच समूपदेशन करायचे आहे का? "यांच्याकडे पाहून, यांना समूपदेशनाची गरज आहे असं तर वाटतं नाही.सोबतही कोणी आल्याचे दिसत नाही.तीच्या मनात चालेल्या विचारांप्रमाणे तीच्या मुद्रा बदलत होत्या.आणि तो अनिमीश नेत्रांनी तीचे निरीक्षण करण्यात गुंतलेला. 


" हो! एकटाच आलो आहे मी. पण तूम्हाला वाटतोय, तो मी नव्हे!"तो त्याच्या बहारदार पण शांतप्रीय आवाजात बोलला.पण त्याचे बोलणे ऐकून ती पूर्णपणे गोंधळून गेली. 



"म्हणजे? मला समजले नाही? "


"मी इथे समूपदेशनासाठीच आलो आहे;पण माझ्या नाही. "त्याचा स्वर अजूनही शांतच होता. 



" अच्छा! मगं तूम्ही आधी माहिती घ्यायला आला आहात तर.ओके!मी सांगते तुम्हाला सर्व समजावून.हे पाहा..."ती बोलतचं होती तर तीला मध्येच थांबवत तो बोलला, 



"नाही,मी माहिती घ्यायला आलो नाही.समूपदेशनासाठीच आलो आहे. "पून्हा तोच भारदस्त पण शांत आवाज. 



" पण, आत्ताच तर तूम्ही म्हणालात,तूम्हाला स्वतःचे समुपदेशन करायचे नाही;आणि तूमच्या सोबतही कोणी दिसत नाही. "ती आता गांगरून त्याच्याकडे संशयीत नजरेने पाहत होती. 



" हो, मी तेच म्हणालो.माझे समुपदेशन नाही करायचे."ती आता विचीत्र नजरेने त्याच्याकडे बघू लागली.आता मला वाटतेय हाच मानसिक रुग्ण असावा.यालाच समूपदेशनाची गरज असेल, असे दिसतेय याच्या एकंदरीत बोलण्यावरून.तरीही तीने चेहरा सरळ ठेवण्याचा प्रयत्न करत पूढे बोलायला सुरूवात केली. 


" बरं,ठिक आहे.तूम्ही मला तुमचे नाव;आणि ज्या व्यक्तीला समूपदेशनाची गरज आहे, त्या व्यक्तीचे नाव आणि त्या व्यक्तीची पूर्ण माहिती मला सांगा. मी नोटडाऊन करते. "तीने शेजारीच असलेल्या पेन स्टँड मधील ,एक पेन हातामध्ये पकडत समोर ठेवलेले रजिस्टर उघडले. 


"मी- "इंद्रजीत भालेराव";आणि समुपदेशन करायचे आहे त्या व्यक्तीचे नाव - "समीरा शशिकांत देसाई " कलेक्टर आॅफीसर आॅफ पुणे डिस्ट्रीक्ट."तीने ताडकन मान वर करून समोर पाहीलं.हातातील पेन केव्हाच गळून खाली पडलेला. 


क्रमश :

       कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथेचा मजकूर कोणी चोरी करण्याचा अथवा कॉपी करण्याचा प्रयत्न केल्यास किंवा तसे आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

©️ मनमंजिरी?
                                              


🎭 Series Post

View all